शिवसेनेने कामगार क्षेत्रात मुसंडी मारून ऑगस्ट १९६७ मध्ये भारतीय कामगार सेनेची स्थापना केली होती. त्यामुळे अनेक कंपन्यामधील कामगारांना न्याय मिळवण्यासाठी हक्काचे व्यसपीठ लाभले होते. दरम्यान बँका, इन्शुरन्स, महानगरपालिका, शासकीय व निमशासकीय कार्यालये व इतर आस्थापनातील शिवसेना प्रेमी मराठी कर्मचारी- कामगारांनाही आपल्या आस्थापनात/क्षेत्रात शिवसेनेची कामगार सेना असावी असे वाटू लागले. ज्या-ज्या ठिकाणी कर्मचार्यांचे प्रश्न व समस्या निर्माण झाल्या तेव्हा तेथील कर्मचारी शिवसेना नेत्यांच्या गाठी-भेटी घेऊ लागले. मग ७०च्या दशकापासून विविध आस्थापनात/क्षेत्रात शिवसेनेच्या अंगीतकृत कामगार संघटना स्थापन होऊ लागल्या. बेस्ट कामगार सेना, एस. टी. कामगार सेना, मुंबई मनपा शिक्षक सेना, मुंबई महानगरपालिका अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक शिक्षक/शिक्षकेतर सेना, मुंबई म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना, महाराष्ट्र दूध वितरक सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र वितरक सेना, विमा कर्मचारी सेना, शिवसेना चित्रपट सेना, रेल्वे कामगार सेना, महाटेलिफोन कामगार संघ, बँक कर्मचारी सेना आदी कामगार सेना स्थापन होऊन त्या आज शिवसेनेच्या झेंड्याखाली यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
बेस्ट कामगार सेना
पूर्वी बहुतेक सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमध्ये कामगार युनियन एकतर कम्युनिस्टांची किंवा समाजवाद्यांची असायची. मुंबई मनपा आणि बेस्टमध्ये तेव्हा संपूर्ण युनियन समाजवादी नेतृत्वाच्या हाताखाली होती. समाजवादी पक्षाची युनियन आणि त्यांचे प्रशासनधार्जिणे धोरण या कात्रीत सापडलेल्या शिवसेनेच्या विचाराच्या मराठी कामगारांनी बेस्टमध्ये सेनेची युनियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देवनार, कुर्ला, कुलाबा, वडाळा, पोयसर आदी बस डेपोतील मराठी कामगारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या, व्यथा मांडल्या. शिवसेनाप्रमुखांनी ७ ऑगस्ट १९७७ रोजी बेस्ट कामगार सेनेची स्थापना केली. अध्यक्षपदी कै. दत्ता प्रधान यांची नेमणूक मा. शिवसेनाप्रमुखांनी केली. या संघटनेच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी व कामगार सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी काम करतात. सुरुवातीस दत्ता प्रधान, शरद आचार्य, नारायण राणे यांनी तर आता शिवसेना उपनेते सुहास सामंत हे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत.
विमा कर्मचारी सेना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विमा क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला न्याय देण्यासाठी भारतीय विमा कर्मचारी सेनेची २३ जानेवारी १९९६ रोजी स्थापना झाली. सरकारी विमा कंपन्यांना खाजगी विमा कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्यामुळे सर्व विमा कंपन्यांच्या सभासदांनी एका छताखाली येऊन लढण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापन, जिप्सा, आय.आर.डी.ए. व केंद्रीय अर्थखाते अशा विविध स्तरांवर विमा कर्मचार्यांच्या हितासाठी चर्चा व वाटाघाटी करून न्याय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तंत्र वापर करताना जाचक ठरणारे नियम व अटी शिथिल करण्यात याव्या, कर्मचार्यांची नियमित पगार वाढ, पदोन्नती, वेळोवेळी प्रशिक्षण व इतर सर्व प्रश्नांबाबत लढा दिला. विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई व सरचिटणीस दिनेश बोभाटे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाशी चर्चा करून व वेळप्रसंगी आंदोलन करून मार्ग काढले आहेत. विमा कर्मचारी सेना अखिल भारतीय स्तरावर असून त्याचे संपूर्ण देशभर जाळे पसरले आहे.
एस.टी. कामगार सेना
१९८६-८७च्या सुमारास एसटीतील अनेक कर्मचार्यांना शिवसेनेची युनियन एस.टी. महामंडळात असावी असे वाटत होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला आपण एस.टी.तील चालक-वाहक कामगार संघटना चालवावी असा प्रस्ताव शिवसैनिक कर्मचारी तुकाराम चव्हाण यांनी ठेवला. कारण चव्हाण तत्कालीन कामगार संघटनेचे कार्यकर्ते होते. परंतु आता एस.टी. कामगारांना एस.टी. महामंडळात सेनेचीच युनियन पाहिजे होती. तेव्हा हा प्रस्ताव मा. शिवसेनाप्रमुखांकडे गेला. त्यांनाही सेनेचीच युनियन असावी असे वाटले. मग काय! डिसेंबर १९८८ साली पुणे येथे झालेल्या शिवसेना अधिवेशनात एस.टी. कामगार सेनेच्या स्थापनेची रितसर घोषणा शिवसेनाप्रमुखांनी केली. शिवसेना नेते सुभाष देसाई हे अध्यक्ष, राम भंकाळ हे कार्याध्यक्ष, तर अरविंद सावंत सरचिटणीस अशी जबाबदारी मा. बाळासाहेबांनी त्या सर्वांना बोलावून त्यांच्यावर टाकली. शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत हे एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष असून अन्य पदाधिकार्यांसह एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडवण्यात तत्पर असतात.
मुंबई मनपा शिक्षक सेना
शिक्षणाची सेवा करताना शिक्षकांना येणार्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी शिवसेनेची एखादी संघटना असावी असे मनपातील काही शिक्षकांना वाटू लागले. तेव्हा त्यांनी एकत्रित येऊन सुरूवातीस ‘मुंबई महानगरपालिका मराठी व अन्य भाषिक प्राथमिक शिक्षक संघटना काढली.’ काळानुरूप युनियनमध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. १९८६ साली तत्कालीन सरचिटणीसन. रा. चाफेकर व इतर पदाधिकारी यांनी आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली व शिवसेनाप्रमुखांनी स्व. प्रिं. वामनराव महाडिक व अॅड. बाळकृष्ण जोशी यांचे नेतृत्व संघटनेला दिले. फेब्रुवारी १९८७मध्ये महासंघाच्या नावात बदल करून ‘‘मुंबई महानगरपलिका शिक्षक संघटना’’ असे बदल करण्यात आले. पुढे कालांतराने २००४ साली शिक्षक संघटनेऐवजी ‘‘मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना’’ असे नामकरण करून आज युनियन याच नावाने कार्यरत आहे. शिवसेना पक्षाच्या सहकार्याने युनियनचे रोपटे फोफावत आज प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
शिक्षक/शिक्षकेतर सेना
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले सर्व प्राथमिक शिक्षक व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एका छत्राखाली एकत्र यावे व त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न एकत्रीतपणे सोडविले जावे. आदरणीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व सन्माननीय-कार्यप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनाप्रणीत विविध संघटनांत सदस्य असलेल्या शिक्षण/शिक्षकेतर कर्मचार्यांना ३० जानेवारी २०११पासून मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना, कोड क्र. १५ या अधिकृत मान्यताप्राप्त असलेल्या युनियनच्या अधिपत्याखाली समाविष्ट करण्यात आले आहे.
मुंबई म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना
मुंबईत १९९२-९३ साली जातीय दंगल झाली. शिवसेना विरोधकांनी या जातीय दंगलीचे खापर शिवसेनेवर फोडले. म्युनिसिपल मजदूर युनियनचे नेते शरद राव यांनीही शिवसेनेवर टीका सुरू केली, जातीयतेचा आरोप केला तेव्हा मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते कै. वामनराव महाडिक यांना मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी कामगारांसाठी शिवसेनेची युनियन स्थापन करण्यास सांगितले आणि वामनराव महाडिकांच्या अध्यक्षतेखाली ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची स्थापना झाली. सूर्यकांत महाडिक यांची सरचिटणीसपदी तर सत्यवान जावकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई मनपात छोट्या-मोठ्या मिळून साठएक कामगार संघटना असल्या तरी म्युनिसिपल कर्मचारी कामगारांना सर्वार्थाने न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना झटत आहे. शिवसेना नेते वामनराव महाडिक यांचे एप्रिल १९९९ मध्ये निधन झाले आणि त्यांच्या जागी बाबा कदम अध्यक्षपदी आणि सत्यवान जावकर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली गेली.
मटेनिलि कर्मचारी महासंघ
१९८४ साली लोकाधिकार समिती स्थापन झाली आणि दोन वर्षात १९८६ साली मुंबई टेलिफोन्सचे रूपांतर ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’मध्ये झाले. सरकारने ‘मुंबई टेलिफोन’च्या कर्मचार्यांना प्रति नियुक्तीवर मुंबईबाहेर पाठविण्याचे ठरविले. प्रस्थापित कामगार संघटनांनी त्याला मान्यताही दिली. मात्र कर्मचार्यांवर होणार्या या अन्यायाविरुद्ध समितीने आवाज उठविला. प्रतिनियुक्तीच्या मुद्यावर एमटीएनएलच्या सर्व कामगार संघटना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. स्थानीय लोकाधिकार चळवळीतून आकार घेतलेल्या एमटीएनएलच्या कामगार संघाने १९९८ साली कम्युनिस्ट आणि इंटकप्रणीत संघटनांशी टक्कर देऊन ‘मान्यताप्राप्त युनियन’ ही बिरुदावली मिळवली. शिवसेनेच्या कामगार संघटनेचा झेंडा एमटीएनएलवर फडकू लागला. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत घवघवीत यश मिळवून कामगार संघाने आपले स्थान बळकट केले. एमटीएनएलच्या कामगार संघाने कर्मचार्यांची सहकारी पतपेढी, महिला कल्याण समिती यावरही आपले वर्चस्व निर्माण केले. महानगर टेलिफोन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांच्या कुशल नेतृत्वाखाली या कर्मचारी संघटनेने नेहमीच देदीप्यमान विजय हस्तगत केला आहे. सर्व विरोध झुगारून, विरोधकांचा संपूर्ण पाडाव करून ‘वन साईडेड व्हिक्टरी’ मिळवली. शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत हे कामगार महासंघाचे अध्यक्ष सरचिटणीसपदी दिलीप जाधव हे धुरा सांभाळत आहेत.
महाराष्ट्र वितरक सेना
विविध व्यवसाय क्षेत्रातील ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार व सचिव अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मारुती साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वितरक सेनेची स्थापना मे २०१२ साली केली. सध्या ती दहा विभागात कार्यरत आहे. फार्मा, मरीन, कन्स्ट्रक्शन, सिने-सांस्कृतिक विभाग, भाजीपाला, गारमेंट, एम्ब्रॉयडरी आदी व्यवसाय क्षेत्रातील होलसेल व रिटेल व्यावसायिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र वितरक सेना करीत आहे. गेली १० वर्षे मारुती साळुंखे हे महाराष्ट्र वितरक सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत असून त्यांना सरचिटणीस दिलीप बाम्हणे आदी पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.
महाराष्ट्र वाहतूक सेना
मुंबई-महाराष्ट्रातील वाहतूक व्यवसाय हा असंघटीत व्यवसाय होता. चालक-मालक यांना वाहनासाठी पार्विंâगची गैरसोय, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग यांचा नाहक त्रास, कामाच्या वेळेची अनिश्चितता या सर्वांमध्ये अडकलेल्या चालक-मालक यांना संघटीत करण्यासाठी उदय दळवी यांच्यासह काही शिवसैनिकांनी पुढाकार घेतला. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर समस्या घातल्या. बाळासाहेबांनी या सर्वांना संघटीत करण्याचा आदेश दिला आणि िडसेंबर १९९५ साली महाराष्ट्र वाहतूक सेनेची स्थापना केली अशी माहिती विद्यमान अध्यक्ष उदय दळवी यांनी दिली. वाहतूक सेनेसाठी चिन्हही बाळासाहेबांनीच दिले. २००५ साली शिवसेनेत फूट पडल्यानंतर वाहतूक सेनेची पुर्नबांधणी करण्यात आली. अध्यक्षपदाची धुरा उदय दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली. वाहतूक सेनेच्या माध्यमातून चालक-मालक यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. सुरुवातीस १,००० सभासद होते. आज १५,००० सभासद वाहतूक सेनेचे आहेत.
शिवसेनेच्या स्थापनेपासूनच कर्मचारी व कामगार वर्गाचे हित, रक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना व शिवसेनेचे नेतृत्व सदैव अग्रेसर राहिले. सुरूवातीस सर्वस्वी दत्ताजी साळवी, मधुकर सरपोतदार, वामनराव महाडिक, सुधीर जोशी, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मोरे, रामराय वळंजू, गजानन कीर्तिकर हे नेतृत्व करीत होते. तर सध्या शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, खा. अनिल देसाई आदी हे विविध कामगार क्षेत्रात कामगारांचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या ५० वर्षात या शिवसेनेच्या सर्व कामगार संघटनांनी कम्युनिस्टांची मस्ती उतरवली. त्यांच्या बर्याच आस्थापनांतील कम्युनिस्टांचे वर्चस्व संपुष्टात आणले. शिवसेनेने राष्ट्रवादी कामगार-कर्मचारी वर्गाची एक भक्कम फळी उभारली. त्यामुळे शिवसेनेच्या अंगीकृत कामगार संघटनांचे जाळे सर्व क्षेत्रात पसरले आहे.