नासाचा एक ३६ वर्षांपूर्वी अवकाशात सोडलेला कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर कोसळणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर जुन्या पिढीतल्या मंडळींना स्कायलॅबची आठवण आली असेल. अमेरिकेनेच अंतराळात सोडलेल्या या पहिल्या स्पेस स्टेशनला अंतराळात योग्य तो बूस्ट न मिळाल्याने ते आपल्या परिभ्रमणाच्या मार्गातून ढळले आणि पृथ्वीवर काही काळ हाहाकार माजला. स्कायलॅब कोसळणार, या बातम्यांमुळे घबराट पसरली. भारतातील ज्योतिष्यांनी तर स्कायलॅब कुठे, कधी कोसळेल, याची भविष्यवाणी देखील केली. आजच्यासारखे तेव्हा टीव्ही चॅनेल असते, तर त्यांनी कदाचित स्कायलॅब कोसळण्याविषयी २४ तास चर्चा चालवल्या असत्या आणि त्यात वैज्ञानिक सोडून सगळ्यांना सहभागी करून घेतले असते. ज्योतिष्यांच्या पॅनेलने तारखा दिल्या असत्या आणि तोडगेबाजांनी लाइव्ह होमहवन देखील करून दाखवले असते… स्कायलॅबची ही धास्ती नाणावलेल्या व्यंगचित्रकाराच्या नजरेतून किती वेगळे रूप धारण करते, याचे दर्शन घडवणारे हे १९७९ सालातील ‘मार्मिक’चे मुखपृष्ठ पाहा. त्यात बाळासाहेबांनी जनता पक्षाचे सरकार नावाची नावाची स्कायलॅब (भारतीय राजकारणातली ही एक प्रयोगशाळाच होती, जिची फळे आपण आज भोगत आहोत) कोसळणार, हे अचूक भाकित केलेलं आहे. बाळासाहेबांनी त्यांचे ‘लाडके’ तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या चेहर्यांवरचे भाव काय अफलातून टिपले आहेत. आता २०२३ सालात पडणारा उपग्रह महाराष्ट्रातले बेकायदा आणि कृत्रिम सरकार पडण्याचे संकेत देतो की काय, ते पाहायचे.