एकनाथ शिंदे
आतल्या आत घुसमटत राहणे
अगदी असह्य झाले आता
बेईमानीला कधीच नसतो
सार्या जगात कुणीही त्राता
खर्याचे खोटे करण्यासाठी
धरली नाठाळांची साथ
ते तर सारे बाजारबुणगे
मला मारतील कधीही लाथ
काय मिळवले गद्दारीने
चार दिवसांचा मोठेपणा
नाचून नाचून दमलो आता
पिचत आला मोडका कणा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
उलथापालथ होईल काही
मला अंधुक आशा वाटते
माझे घोडे दामटेन पुढे
आयत्यावेळी आभाळ फाटते
एकाच आशेवर मी राहातो
दिल्लीत सारी गणिते जमतात
राज्यात परत आल्यावरती
थोबडे बघून घोडे दमतात
हातात घास येता येता
आमच्यातलेच लावतात दृष्ट
मीठ-मोहर्या टाकल्या ओवाळून
धुमसत राहतात मित्रही दुष्ट
—– —– —–
नरेंद्र मोदी
सतरा शिव्यांचा हिशोब कसा
अजून मला लागत नाही
आकडेमोड करून थकलो
मला परफेक्शनची घाई
हातात घेतला कॅलक्युलेटर
आठवत होतो काँग्रेस सभा
तरीही दोन कमीच पडतात
नाही चालणार सवता सुभा
यापुढे काँग्रेसच्या सभेत
मी नक्की रोबोट पाठवीन
तो करील अचूक मोजणी
सार्या शिव्या डोक्यात साठवीन
—– —– —–
शरद पवार
राजीनामा देऊन मी तर
दिली मोठी धोबीपछाड
मलाच कोंडीत पकडत होते
आमचे-त्यांचे काही लबाड
आता चेंडू त्यांच्या कोर्टात
बॅटही नको लढण्यासाठी
भित्यापाठी ब्रह्मराक्षस
लागेल आता लवकर पाठी
माझ्या वाटेला जात नाहीत
ज्यांना कळतात माझे डावपेच
तुम्ही फक्त बघत राहा
कशी त्यांची होते खेचाखेच
—– —– —–
अमित शहा
मी विचारले बॉडीगार्डना
कितने आदमी थे रे सांबा
तो म्हणाला, मुंबई है ये
मारू नका फुकट बोंबा
मुंबई म्हणजे आपली जान
तिच्यासाठी जीव कुर्बान
कोणी कितीही धडपडले तरी
आम्हीच मिळवू सोन्याची खाण
पाहून त्यांची वज्रमूठ सभा
कधी मात्र भरते धडकी
अजून भाजायला हवीत नक्की
भाजपमधली कच्ची मडकी