‘महाराष्ट्रात आढळलं वैदिकपूर्व काळातील शिवलिंग; उंची ऐकून तुम्ही पण व्हाल अवाक!’ या मथळ्याची बातमी यूट्युबवर प्रसारित करण्यात आली आहे. यात वैदिकपूर्व काळ हे ठीक आहे, कारण वेदांचा काळ हा फार फार तर पाच हजारांहून जास्त वर्षे जुना नाही. त्या मानाने सातपुडा डोंगर रांगा खूप जुन्या असून त्या नर्मदेच्या प्रवाहाने झिजून त्यांना आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात काही ठिकाणी डायनोसॉरसांची अंडी सापडतात. याचं कारण सातपुडा प्रामुख्याने अवसादी खडकांचा (सेडिमेंटरी रॉक्स) बनला आहे.
अवसादी खडकांमध्ये वालुकाश्म (सँडस्टोन), चुनखडक (लाईमस्टोन आणि चॉक) असे प्रकार असतात. त्यातील चुनखडी (चॉक) आणि फरशीचा दगड हे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. बरेच वेळा भूजलात यातील घटक विरघळून गुहा तयार होतात. ह्या गुहांतून भूजल ठिबकत असते. त्यातील कार्बोनेटे घट्ट होऊन त्यांचे वरून खाली असे जे स्तंभ होतात, त्यांना स्टॅलाक्टाईट असे म्हणतात. तर हे ठिबकणारे पाणी जिथे पडते तिथे खालून वर असे जे स्तंभ तयार होतात, त्यांना स्टॅलाग्माईट असे म्हणतात. या नैसर्गिक संरचना असून ह्या हिमालय आल्प्स पर्वतांमध्ये बर्फात तयार होतात. हिमालयात यांना स्वयंभू शिवलिंगे म्हणतात. अमरनाथ हे याचे उत्तम उदाहरण आहे.
अमेरिकेतील कार्ल्सबाड केव्ह्ज हे याचे जगप्रसिध्द उदाहरण आहे. तिथे तो राष्ट्रीय ठेवा म्हणून जपून ठेवले आहे. सातपुड्यात अनेक ठिकाणी अशा गुहा आहेत. संगमरवर हे चुनखडकाचे रूपांतर होऊन तयार होतात. त्यामुळे भेडाघाट परिसरातही अशा गुहा सापडण्याची शक्यता आहे. तिथेही असे आविष्कार असतील. प्रश्न हा आहे की आपण अजूनही या नैसर्गिक अविष्कारांना देवत्व देत राहणार का, की त्यांच्यावर अभिषेक करून ते नष्ट करणार? जिथे काळ्या पाषाणातील मूर्ती अभिषेकाने झिजतात, तिथे चुनखडकातील आविष्कार कसे टिकतील? दही हे आम्ल आहे, त्यात चुनखडक झपाट्याने विरघळेल, हे लक्षात घ्यायला हवे. दह्यात दूध मिसळले की तेही आंबतेच. सध्या देवांचा बाजार मांडलाय त्यात अशी भर टाकणे योग्य होणार नाही.
सातपुड्याच्या रांगा ह्या भारतातील बर्याच जुन्या पर्वतराजीचे झिजून उरलेले अवशेष आहेत. त्यात जिथे जिथे चुनखडकांचे विविध प्रकार आहेत, तिथे तिथे भूजलामुळे होणारी झीज आणि त्यामुळे निर्माण होणार्या गुहा आहेत. त्या संख्येने खूप असणार. हीच परिस्थिती त्यामानाने अलिकडच्या हिमालय, आल्प्स आदी पर्वतांमध्ये आढळते.
आजपर्यंत आदिमानवाचा आणि त्याहूनही आधीच्या पूर्वजांचा जो अभ्यास झाला आहे, त्यावरून मानवाचे पूर्वज वस्ती करून स्थिरावले, हा काळ जास्तीत जास्त वीस हजार वर्षांपूर्वीचा आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार हा कमी जास्त होतो. मानवी उत्क्रांतीच्या सुमारे ३० लाख वर्षांच्या काळात माणूस हा गुहांमध्येच राहात आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तो अगदी अपवादानेच एका गुहेमध्ये जास्त काळ राहात असे. एकाच गुहेत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या मानवी टोळ्यांनी वास्तव्य केले, असेही पुरावे आहेत. आता नव्या तंत्रज्ञानामुळे तर ह्या मानवी टोळ्या एकाच मानवी उपजातीच्या होत्या की वेगवेगळ्या उपजातींच्या (सबस्पेसीज) होत्या, हेही सांगता येणं शक्य झालं आहे.
एकीकडे विज्ञानाची अशी घोडदौड सुरू असतांना तिकडे दुर्लक्ष करून जनतेची फसवणूक करून अशी प्रसिद्धी एका सुशिक्षित व्यक्तीने मिळवणे योग्य नाही. जरा डोळे उघडे ठेऊन विज्ञानाची मदत घेतली असती तर हे स्वयंभू शिवलिंग नाही, ही बाब हे इतिहासकार जगाला सांगू शकले असते. सध्या झटपट प्रसिद्धीसाठी आणि सवंग लोकप्रियतेसाठी माणसं कुठल्या थराला जातात याचं ही बातमी हे उत्तम उदाहरण आहे. एका मोठ्या वृत्तसेवेने तरी ही बातमी छापण्यापूर्वी तिची खात्री करून घ्यायला हवी होती, असे वाटते.