अभिनेत्री असण्याखेरीज एक व्यक्ती म्हणून स्मिता जिवाला जीव देणारी, दुसर्यासाठी डोळ्यात पाणी आणणारी होती. असे अनेक प्रसंग आहेत तिच्या वागण्यातून तिचं मोठेपण सांगणारे… वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी स्मिता हिंदी मराठी चित्रपटसृष्टीसाठी केवळ अभिनयसम्राज्ञीच नव्हती तर आयडॉल असूनही तिच्या आयुष्याचा डाव अर्ध्यावरती मोडून पडला.
– – –
ते दिवस १९८१ च्या वर्षअखेरचे होते. महेश भट स्मिताकडे आले होते आणि त्यांनी ‘अर्थ’ चित्रपटामधील ‘कविता सन्याल’ची भूमिका तिच्या हाती सोपवली होती. ‘अर्थ’मध्ये तिच्यासमोर होती शबानाची ‘पूजा मल्होत्रा’! या चित्रपटाचा कथानायक होता कुलभूषण खरबंदाचा ‘इंदर मल्होत्रा’! स्मिताने स्क्रिप्ट वाचून होकार कळवला. तिला भूमिकेचे गडद टोन आवडले होते पण तिच्या मनात एक प्रश्न होता की महेश भटने आपल्याला कविता सन्यालची भूमिका का दिली असावी? पूजा मल्होत्राचा रोल आपल्याला का ऑफर केला नसेल? या प्रश्नाने तिला बेजार केले, कारण या भूमिकेची वीण तिच्या रिअल लाइफशी साम्य राखणारी आहे की काय असं तिला वाटे. ‘अर्थ’मधील इंदर मल्होत्राची पहिली पत्नी पूजा त्याच्या आयुष्यात सुखनैव असूनही कविता सन्यालच्या रूपाने दुसरी स्त्री त्याच्या आयुष्यात येते अशी कथेची प्राथमिक मांडणी होती. नेमक्या याच काळात विवाहित राज बब्बरच्या आयुष्यात तिने प्रवेश केला होता. यामुळे स्मिताने काही पत्रकारांजवळ सांगितलं होतं की, ‘अर्थ’मधील ही नकारात्मक भूमिका देऊन महेशने माझ्यातील स्त्रीला हरवले आहे, पण माझ्यातील अभिनेत्री माझ्यातल्या स्त्रीवर नेहमीच मात करत आलीय. याही वेळेस माझ्यातील अभिनेत्रीच जिंकेल!’ आणि तसंच झालं. अत्यंत डार्क शेड असणारी खलनायकी अंगाची ही भूमिका स्मिता अक्षरशः जगली. शबाना आणि स्मितामधील अभिनयाचे लाजवाब द्वंद्व यात पाहायला मिळालं. अर्थात शबानाची भूमिका नायिकेची होती, तिनेही त्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आणि तिला ‘अर्थ’साठी राष्ट्रीय पुरस्कारासोबत फिल्मफेअरदेखील मिळालं. मात्र सर्वत्र चर्चा स्मिताच्या अभिनयाची झाली! योगायोग असा झाला की १९८२मधील ‘अर्थ’च्या सहा महिने आधी स्मिताचा अमिताभसोबतचा ‘नमक हलाल’ आला होता आणि त्याने तिकीटबारीवर टांकसाळ पाडली होती!
एप्रिल १९८२मध्ये आलेल्या ‘नमक हलाल’मध्ये स्मिताचं एक गाणे होतं, ‘आज रपट जाये तो हमे ना उठय्यो…’ मूळ स्क्रिप्टमध्ये हे गाणं नव्हतं. प्रकाश मेहरांनी हे नंतर अॅड केलं होतं. स्मिता या गाण्याच्या पिक्चरायझेशनवर अत्यंत नाखूष होती. मात्र तिने मेहरांना शब्द दिलेला असल्याने फक्त नाराजी कळवली आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे गाणे शूट करू दिलं. सिनेमा हिट झाला आणि गाणीही हिट झाली. स्मिताची ही अदा पब्लिकला खूप भावली, पण नेहमीप्रमाणे काही क्रिटिक्सनी तिच्यावर यातल्या उथळ चित्रिकरणाबद्दल टीका केली. लोकांनी मात्र अमिताभचा अर्जुनसिंह आणि स्मिताची पूनमची भूमिका डोक्यावर घेतली. या वर्षातच स्मितासाठीचा सरप्राईज रोल असलेला अमिताभ-दिलीपकुमार यांच्यासमवेतचा ‘शक्ती’ रिलीज झाला होता, त्याने मोठा गल्ला जमा केला! यातली रोमाची भूमिका स्मिताने का स्वीकारली असा सवाल तिला काही समीक्षकांनी केला, पण तिच्या स्वभावाप्रमाणे ती शांत राहिली, ती कुणाच्याही तोंडाला लागली नाही.
याच वर्षी राजकुमार कोहलीच्या ‘बदले की आग’ या तद्दन फालतू सिनेमात ती झळकून गेली. खंडीभर नटनट्यांची जंत्री आपल्या सिनेमात घेण्याची वाईट खोड राजकुमार कोहलीला होती, ती या सिनेमात प्रकर्षाने जाणवली. खरे तर हा सिनेमा केवळ सुनील दत्तच्या आग्रहाखातर स्मिताने केला होता. आपण कुठल्याही रोलला आपल्या परीने न्याय देतो हे तिने यातून दाखवून दिले होते. १९८२मध्ये आलेला स्मिताच्या नऊ सिनेमापैकीच एक होता सुनील दत्तचाच ‘दर्द का रिश्ता’. एका कॅन्सरपीडित मुलीच्या संघर्षाची कथा यात होती, त्याला करुणेचा झालर होती. त्यामुळे हा सिनेमा लो बजेट असूनही उत्कृष्ट कथामूल्ये आणि संयत अभिनयाच्या जोरावर हिट झाला होता. यातला स्मिताचा रोल चांगलाच भाव खाऊन गेला होता. १९८१-१९८२ असे पूर्ण दीड-दोन वर्षे चित्रीकरण चाललेला स्मिता राज बब्बरचा ‘भीगी पलकें’ २४ ऑगस्ट १९८२ला रिलीज झाला. या सिनेमाने सणकून मार खाल्ला. सिनेमा चालला नाही, मात्र त्यांच्यातील प्रेमाला रंग चढत गेला.
स्मिता, नसिर, फारूक शेख या त्रयीचा ‘बाजार’ हा देखील याच वर्षातला होता. आर्थिक अडचणीत सापडलेल्या दांपत्याने आपल्या मुलीचा सौदा करून तिला आखाती देशातील लांडग्यांच्या हवाली करण्याचा प्रक्षोभक विषय यात होता. दिग्दर्शक विजय तलवारने या सिनेमाची जी स्टारकास्ट निवडली होती, ती अत्यंत सबळ असल्याने सिनेमा खूप गाजला. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात याचे स्क्रीनिंग झाले. यातल्या अभिनयासाठी समीक्षकांनी मुक्तहस्ते स्मिताचे मनसोक्त कौतुक केले. याच वर्षी राजेश-शत्रुघ्नबरोबरचा ‘नादान’ आणि ज्युली फेम विक्रमबरोबरचा ‘सितम’ हे स्मिताचे दोन पडेल सिनेमे येऊन गेले, पण त्याने स्मिताच्या कारकिर्दीत काही फरक पडला नाही; कारण असे काही सिनेमे ती वर्षाकाठी करायची ते केवळ बॉलिवुडच्या चंदेरी दुनियेच्या मुखवट्याच्या समाधानासाठी! सर्वसामान्य प्रेक्षकाला समांतर सिनेमाशी काही देणंघेणं नसतं, तो केवळ दोन घटकांया करमणुकीसाठी थिएटरमध्ये आलेला असतो. त्याच्यासमोर आपलीही छबी असावी, या हेतूनेच तिने या भूमिका केल्या होत्या.
१९८२मध्ये स्मिताचे उपरोल्लेखित नऊ चित्रपट आले होते. या सर्व चित्रपटांवर एक नजर टाकली तरी यातील भूमिकांमधील विविधता लक्षात येते. या नऊ चित्रपटांतील एकाही भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. १९८७मध्येही स्मिताचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले होते. तिला खरा गौरव प्राप्त झाला होता १९८१मध्ये. या साली येऊन गेलेल्या झोपडपट्टीतील विखारी जीवनाचे उघडे नागडे जळजळीत सत्य मांडणार्या ‘चक्र’मधील अम्माच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९८१च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअरसाठी ‘नसीब’साठी हेमा मालिनी, ‘उमराव जान’साठी रेखा, ‘सिलसिला’साठी जया बच्चन, ‘एक दूजे के लिये’साठी रती अग्निहोत्री अन् ‘बसेरा’साठी राखी या दिग्गज देखण्या बाहुल्या नॉमिनेट झाल्या होत्या. मात्र त्यांना मात देत स्मिताने फिल्मफेअरच्या पुतळीवर आपले नाव कोरलं. ‘चक्र’मुळे तिला दोन्ही सन्मान मिळाले. रेखाच्या नशिबी मात्र हे भाग्य आलं नाही. ‘उमराव जान’साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण त्या वर्षीचे फिल्मफेअर तिला मिळवता आलं नाही, ते स्मितानं जिंकलं!
अभिनेत्री असण्याखेरीज एक व्यक्ती म्हणून स्मिता जिवाला जीव देणारी, दुसर्यासाठी डोळ्यात पाणी आणणारी होती. असे अनेक प्रसंग आहेत तिच्या वागण्यातून तिचं मोठेपण सांगणारे. तिच्या नवीन घराचं काम सुरू असताना तिथे काम करणार्या कामगारांसोबत ती चहा प्यायला बसे. ती स्वत: त्यांना किटलीतून चहा ओतून देत असे. एक व्यक्ती म्हणून कितीजणांनी असं केलं असतं हा सवाल आहे. त्यात स्मिता तर एक नामवंत अभिनेत्री होती. अशीच एक आठवण स्मिताच्या मातोश्री सांगतात, ‘स्मिता शूटिंगच्या सेटवर असताना एक स्पॉटबॉय तिथे काम करत होता. त्याच्या घराचे पत्रे उडाले होते. तरीही आज काम केलं नाही तर पैसे मिळणार नाहीत म्हणून तो तिथे येत होता. हे जेव्हा स्मिताला कळलं तेव्हा तिनं पर्समधून पैसे काढून त्याला दिले आणि तू घराचे पत्रे लावून मगच कामाला ये असं सांगितलं.’ ही गोष्ट ती गेल्यानंतर कळली होती.
अगदी आपल्यापैकी एक वाटावा असा चेहरा घेऊन आलेल्या स्मिता पाटीलची अभिनयक्षमताच इतकी अफाट होती की तिने साकारलेल्या काही भूमिका लखलखत्या हिर्यासारख्या ठरल्यात. अर्थपूर्ण आणि दर्जेदार सिनेमांसाठी ओळखल्या जाणारया श्याम बेनेगल यांनी ‘भूमिका’ हा सिनेमा बनवला होता. चित्रपटसृष्टी आणि त्यातले लोक यांचं सही सही चित्रण करणारा हा सिनेमा त्या काळच्या हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या जीवनावर बेतलेला होता. या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आणि त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
स्मिताचं खाजगी आयुष्य कायमच एक गूढ बनून राहिलं. चित्रपटात बोल्ड दृश्य देण्यास संकोच न करणारी स्मिता रियल लाइफमध्ये एक शांत, संयमी महिला होती. दूरदर्शनवर बातम्या सांगणारी वृत्तनिवेदिका ते जगविख्यात अभिनेत्रीचा प्रवास वळणावळणाचा होता. स्मिताच्या कारकीर्दीची सुरुवातच फिल्म इन्स्टिट्यूटमधून झाली. त्यानंतर उमेदवारीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर तिने वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं होतं. एकदा बातम्या पाहात असताना श्याम बेनेगल यांना तिचे डोळे फार आवडले. ते एका चांगल्या अभिनेत्रीचे डोळे आहेत हे त्यांनी ताडले व आपल्या चित्रपटासाठी तिला बोलावले. बेनेगलनी तिला ‘चरणदास चोर’ या चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर मग स्मितानं कधीही मागे वळून पाहिलं नाही.
स्मिताच्या घरात समाजवादाचा, जेपींचा प्रभाव होता. तिचे विचार पुरोगामी होते आणि अर्थातच ‘स्मिता’च्या मनाचा एक कोपरा त्यातून घडत गेलेला. परिस्थिती व नवर्याने केलेल्या अन्यायाविरुद्ध घर सोडून जाणारी ‘उंबरठा’मधील सुलभा महाजन त्यातूनच साकार झाली. १९७७ हे वर्ष स्मिताच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरलं होतं. यावर्षीचे `भूमिका’ आणि `मंथन’ हे दोन सिनेमे लौकिकदृष्ट्या यशस्वी झाले. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसिरुद्दीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी यांच्यासारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून तिने स्वतंत्र ठसा उमटविला. स्मिताच्या `मंथन’ला हिन्दी सिनेजगतातील उत्तम सिनेमांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. गुजरातच्या दूध व्यापार्यांवर आधारित या सिनेमासाठी गुजरातेतील सुमारे पाच लाख मजुरांनी आपल्या दैनंदिन उत्पन्नापैकी प्रत्येकी दोन रूपये निर्मात्यांना दिले होते. हा चित्रपट गाजण्यामागे निर्माता, दिग्दर्शकांचा जितका हात होता तितकाच महत्त्वपूर्ण वाटा स्मिताच्या अभिनयाचा होता!
स्मिताच्या जीवनात स्थिरता न येण्याचे कारण तिची इमेज अन् वैचारिक धारणा होती. अभिनयाव्यतिरिक्त स्त्री चळवळींशी जोडली गेल्याने, तसेच आपल्या आयुष्यातले क्रांतिकारक निर्णय काही वेळेस कुटुंबाशी अंतर राखत स्वतःच घेतल्याने व समांतर चित्रपटांतील तिच्या भूमिका अशाच असल्याने तीच खरी स्मिता असावी असा जगाचा समज झाला; प्रत्यक्षात तिला तसं व्हायला आवडलं असतं. केवळ चित्रपटांतून काम करणे इतकेच तिचे जीवनाचे ध्येय नव्हते. समाजसेवेचे बाळकडू तिला आई-वडिलांकडून मिळाले होते. त्यामुळे ती महिलांविषयक कार्य करणार्या अनेक संस्थांशी जोडलेली होती. आपल्या कमाईचा मोठा हिस्सा तिने या लोकांसाठी खर्च केला. अनेकांशी अगदी जवळून संपर्क ठेवला. सामाजिक कार्यकर्त्यांना मदत केली.
समाजातल्या सर्वच गोष्टींचा तिचा चांगला अभ्यास होता. त्यावर तिची स्वत:ची अशी मतं होती. आपण बरं की आपली स्टार व्हॅल्यू बरी, असा विचार त्या काळात अनेकजण करत असत. स्मिता त्याला अपवाद होती. तिला माणसांचा सोस होता आणि माणसांबरोबरच्या नात्यांतून मिळणार्या प्रेमाच्या ती शोधात असावी! याच ओढीतून तिने राज बब्बरशी लग्न केलं. मात्र तो निर्णय चुकला. त्यानं तिच्याशी प्रतारणा केली. वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी स्मिता हिंदी मराठी चित्रपटसृष्टीसाठी केवळ अभिनयसम्राज्ञीच नव्हती, तर आयडॉल असूनही तिच्या आयुष्याचा, संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडून पडला.
‘सिलसिला’साठी आधी यश चोप्रांनी स्मिताची निवड केली होती. तिच्याबरोबर नवीन निश्चल, परवीन बाबी अशी स्टारकास्ट निवडली होती. पुढे या चित्रपटाची स्टारकास्ट बदलण्यात आली. यश चोप्रांना ही गोष्ट थेट स्मिताच्या कानावर घालणं फारच जड जात होतं. त्यांनी आपल्या एका मराठी मित्राला ही गोष्ट स्मितास कळवायला सांगितली. त्यांनी स्मिताला ही गोष्ट सांगितली. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता स्मिताने त्यांना चक्क साईनिंग अमाऊंट परत केली. यश चोप्रा यावर म्हणाले होते, ‘या पैशांची मला काहीच गरज नाही. ते तुमच्याकडेच ठेवा.’ त्यावर स्मिताचे उत्तर बाणेदार होतं, ‘ज्या चित्रपटात मी भूमिका करत नाही त्या चित्रपटाचे कोणतेही पैसे मी घेणं लागत नाही.’ हे पैसे तर तिने परत केलेच केले, त्याचबरोबर तिने यशजींबरोबर कोणतीही नाराजी ठेवली नाही. तो विषय ती सहज विसरून गेली. तिच्या जाण्यानंतरही यश चोप्रासारख्या तद्दन व्यावसायिक व मोठ्या निर्मात्याने तिच्या प्रामाणिकपणाबद्दलची आठवण काढली होती.
तिच्याबद्दल राहून राहून एकच खंत वाटते. तिने साकारलेल्या ‘उंबरठा’मधल्या सुलभा महाजनला जे उमगले ते तिला का उमगले नाही? तिचा एक हट्टी निर्णय तिला आणि तिच्या करिअरला होत्याचं नव्हतं करून गेला. तिच्या अनेक भूमिका आजही आपल्याला आपलं रुक्ष जगणं सुलभ करून देताना कसं जगावं अन् कशासाठी जगावं याचं भान देतात. ‘कसम पैदा करनेवाले की’ या लांबलचक नावाच्या सिनेमात तिने मिथुनसोबत भूमिका केली होती. हा सिनेमा हिट झाला होता. यात स्मिताच्या तोंडी एक संवाद होता, ‘लोगों को अपनी चीजे छिनने देंगे तो लोग तुम्हारी जिंदगी तक छीन लेंगे!’ हा संवाद तिच्या आयुष्याला तंतोतंत लागू पडतो. मिर्च मसाला ते चक्र आणि मंडी ते अर्थ यातल्या तिच्या कसदार आशयघन भूमिका कितीही वेळा पाहिल्या तरी त्यांचं गारुड कमी होत नाही. तिचं असणं नसणं अजूनही मॅटर करत नाही कारण तिच्या शक्तिशाली भूमिका हेच तिचे अस्तित्व आहे, जे आपण पुन्हा पुन्हा अनुभवू शकतो. तिच्या सिनेमांच्या गोडीने समांतर सिनेमा जवळचा वाटू लागला हे काय कमी आहे का?
बॉलिवुडवरच्या प्रेमासाठी स्मितासारख्या कसदार अभिनेत्रीचे सिनेमे पुरेसे ठरावेत. सो लव्ह बॉलिवुड!