काहीही झालं तरी या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करणारच, अशी धमकी कर्मवीर भाऊराव पाटलांनी धनजीशेठ कूपरना भर चौकात दिली. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठीचा कानमंत्र घेण्याकरिता दुसर्याच दिवशी त्यांनी प्रबोधनकारांकडे पुण्याला धाव घेतली.
– – –
प्रबोधनकारांनी १९२४ सालीच सातार्यातला धनजीशेठ कूपर यांचा सोन्याचा पिंजरा सोडून पुण्याला बस्तान हलवलं होतं. प्रबोधनच्या स्वाभिमानापायी त्यांनी आर्थिक स्थैर्य सोडून खडतर आव्हानांना तोंड देण्याचा निर्णय घेतला होता. पण धनजीशेठने १९२७ साली कोर्टात केस करून प्रबोधनकारांना अडचणीत आणलं. त्यात प्रबोधनकारांनी शरण न जाता धनजीशेठवरच डाव उलटवल्याचा सगळा वृतांत आपण त्यांच्याच शब्दात वाचला आहे. पण धनजीशेठने हे का केलं असावं, याचं कारण शोधताना १९२६च्या मुंबई इलाख्याच्या लोकल लेजिस्लेटिव कौन्सिलच्या म्हणजे प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांकडे जावं लागतं.
१९२३च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांसाठीच धनजीशेठने प्रबोधनकारांना सातार्यात आणलं होतं. तेव्हा प्रबोधनकारांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होतं. प्रबोधनमध्ये आपलं वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांनी धनजीशेठला प्रचारासाठी व्यावसायिक मदत केली. पण त्यासाठी ठरलेला मेहनतान्यावरही त्यांनी पुढे सातारा सोडताना ठोकर मारली. प्रबोधनकार हे सारं विसरून प्रबोधनच्या पुण्यातल्या धावपळीत गुंतले होते. तिथे त्यांना रोजच नव्या संकटांचा सामना करावा लागत होता. तिथे त्यांना सातार्याचा भूतकाळ उगाळण्यासाठी फुरसत नसावीच.
पण आपला विश्वासघात झाल्याचं शल्य कर्मवीर भाऊराव पाटील यांना मात्र कायम होतं. मुळात धनजीशेठचा भलामोठा लोखंडी नांगरांचा कारखाना कर्मवीर अण्णांमुळेच उभा राहिला होता. पुढे धनजीशेठच्या बगलबच्च्यांनी कारस्थानं करून कर्मवीर आणि प्रबोधनकार दोघांनाही बाहेर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण केली. तेव्हा व्यावसायिकदृष्ट्या धनजीशेठ जिंकले होते. पण प्रत्यक्षात या दोन सहकार्यांना दुखावून त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला होता. त्यातले प्रबोधनकार सातारा सोडून निघून गेले होते. पण कर्मवीर तर सातार्यातच होते. बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी निस्पृहपणे झटत होते. त्यांच्या नैतिक सामर्थ्यामुळे ते एक शक्ती बनले होते, असं प्रबोधनकार सांगतात. दुसरीकडे धनजीशेठ श्रीमंत असले तरी त्यांची लोकप्रियता घटत चालली होती.
कर्मवीर अण्णा यांनी शिक्षणाच्या कामात स्वतःला समर्पित केलेलं असलं तरी ते हाडाचे राजकीय कार्यकर्ते होते. ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीतलं त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. त्यामुळे निवडणूक आली की त्यांच्यातला कार्यकर्ता जागा होत असे. प्रबोधनकारांनी त्यांचं नेमकं वर्णन केलं आहे, ते असं, `राजकीय क्षेत्रात दोन प्रकारचे चळवळ्ये असतात. काही थोडे किंग बनण्याच्या ईर्ष्येने फुरफुरलेले असतात, तर काही किंगमेकर्स म्हणजे आपल्या इच्छा-श्रम-मात्रे ठरवू त्याला किंग म्हणजे सत्ताधारी खासदार, आमदार किंवा नामदार बनविण्यातच समाधान मानणारे असतात. भाऊराव पाटील या दुसर्या वर्गातला चळवळ्या होता. `कर्मवीर अण्णा किंगमेकर होतेच, पण प्रबोधनकारही याच प्रकारात मोडणारे होते. दोन्ही किंगमेकरनी १९२६च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत धनजीशेठनाही ताकद दाखवून दिली.
निवडणुकीची धामधूम सुरू झाली होती. सातार्यातल्या तीन जागांसाठी चार उमेदवार होते. इंडियन नॅशनल पार्टीतर्फे सातार्यातले प्रतिष्ठित कार्यकर्ते रावजी रामचंद्र काळे उभे होते. ते कौन्सिलच्या पहिल्या निवडणुकीत निवडून आलेले होते. शिवाय काँग्रेसच्या अंतर्गतच प्रति सहकार पक्षातर्फे नानासाहेब देशपांडे उभे होते. हे दोघेही ब्राह्मण होते, अशी माहिती जयवंत गुजर सर धनजीशा कूपर यांच्या चरित्रग्रंथात देतात. ब्राह्मणेतर पक्षातर्फे धनजीशेठ कूपर आणि भास्करराव जाधव उभे होते. दोघेही १९२३ साली जिंकून आले होते. पण त्यांच्या भांडणात आचरेकर वकीलांसारखा तरुण तडफदार उमेदवार हरल्याचं मतदारांना वाईट वाटलं होतं. धनजीशेठ आणि भास्करराव मोठी पदं भूषवत होते, पण लोकांशी त्यांचा संपर्क मात्र कमी झाला होता.
निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना कर्मवीर अण्णा सातार्यातल्या मुख्य चौकातल्या एका दुकानात बसले होते. विषय निवडणुकीचाच होता. त्यांच्याभोवती नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. तेवढ्यात तिथून धनजीशेठ चालले होते. गर्दी बघून ते तिथे आले. कर्मवीर अण्णांशी थोडं बोलून कटुता कमी करावी अशी त्यांची इच्छा असावी. त्यांनी अण्णांना विचारलंही, काय भाऊराव, आमच्या पाठीशी आहात ना तुम्ही? पण ते कर्मवीर अण्णाच. आधीच विश्वासघाताची जखम भरलेली नव्हती. त्यात प्रचंड तापट स्वभाव. खोट्या स्मितहास्यासह विचारलेल्या या प्रश्नाने जखमेवर मीठ चोळलं गेलं. कर्मवीर अण्णांनी उत्तर दिलं, हो हो, तुमची पाठ सोडणार कशी? शब्दाला शब्द वाढत गेला. दोन्ही बाजूंनी जुना राग उफाळून आला. कर्मवीर अण्णांनी एकदम उसळून धमकीच दिली, खानबहाद्दूर, तुमची सारी संपत्ती नि जिल्ह्यातील दारू इरेला घाला. हा भाऊराव पाटील निवडणुकीत तुम्हाला पाठीवर पालथा घालणार आहे. असं भर चौकात जाहीर आव्हान दिलं. संध्याकाळच्या बाजाराच्या गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्यामुळे ही घटना पूर्ण सातारा शहरात पोहोचली आणि पुढे आणखीही जिल्हाभर पसरत राहिली.
कर्मवीर अण्णांच्या लक्षात आलं की आपण प्रतिज्ञा तर घेतली, पण ती पूर्ण करणं सोपं नाही. धनजीशेठने अनेक वर्षं सातारा शहराचं राजकारण आपल्या हातात ठेवलं होतं. नगरपालिकेपासून कौन्सिलपर्यंत निवडणुकांचा खेळ त्यांच्या इशार्यावर चालत असे. आता तर संपत्तीबरोबर सत्ताही त्यांच्या जवळ होती. अशावेळेस धनजीशेठ कूपरना हरवणं सोपं नव्हतं. कर्मवीर अण्णांना यावर एकच उपाय सुचला, प्रबोधनकार ठाकरे. ते दुसर्याच दिवशी सातार्याहून प्रबोधनकारांना भेटायला पुण्याला पोचले. त्यांनी प्रबोधनकारांना काय घडलं ते सांगितलं आणि म्हणाले, हवी ती युगत काढा. पण या निवडणुकीत कूपरला पाडलाच पाहिजे. जाधवरावाविषयी मला मोठे प्रेम आहे असे नसले, तरी दगडापेक्षा वीट मऊ. माझी प्रतिज्ञा खाली पडली, तर मग जिल्ह्यात पुन्हा तोंड दाखवायला नको. बोला, काय करणार ते.
प्रबोधनकारांच्या डोळ्यासमोर सातारा जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती उभी राहिली. धनजीशेठला हरवणं हे सोपं नव्हतंच. त्यांची सावकारी आणि दारूचे अड्डे ही त्यांची निवडणुकीच्या रिंगणातली सगळ्यात मोठी ताकद होती. शिवाय त्यांचा मधाळ हास्याने समोरच्याला गारद करण्याचा स्वभाव. विरोधक कितीही तावातावाने भांडत आला, तरी त्याला गोड बोलून आपल्या बाजूला वळवण्याचं त्यांचं कसब वादातीत होतं. शिवाय हातात पैसा भरपूर. निवडणुकीच्या बाजारात तो खर्च करायलाही ते मागेपुढे बघत नसत. दुसरीकडे जाधवराव म्हणजे भास्करराव जाधव हे हिशेबी. गरज असेल तितकाच खर्च करणारे. भास्कररावांना धनजीशेठच्या विरोधात उभं करणं सोपं नव्हतं. कारण त्यांना एखादी योजना सांगितली की ते आधी त्यावर चर्चा करणार. आपल्या प्रतिष्ठेला शोभेल की नाही, याचा विचार करणार. त्यामुळे प्रबोधनकारांनी कर्मवीर अण्णांना थोडा सबुरीचा सल्ला दिला, निवडणुकांचा हैदोस येऊ दे चांगला रंगात. मग ऐनवेळी सुचेल ती युगत जाधवरावाच्या माथी मारण्याचा यत्न करू. सध्या मात्र आम्ही तुमच्या बाजूने आहो, एवढा दिलासा त्यांच्या कानी जाऊ दे. प्रबोधनकारांचा निरोप घेऊन कर्मवीर निघून गेले. पण प्रबोधनकार निवडणुकीची रणनीती ठरवू लागले. काट्यानेच काटा काढावा लागणार. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या लोकांच्या गुपचूप गाठीभेटी घ्याव्या लागतील. त्याशिवाय मार्ग दिसणार नाही.
प्रबोधनकारांनी दिलेला मंत्र घेऊन कर्मवीर अण्णा सातार्याला पोचले. भास्कररावांना कर्मवीर आणि प्रबोधनकार यांची ताकद माहीत होती. १९२३च्या निवडणुकीत त्यांनी ती अनुभवली होती. त्यामुळे अपेक्षित परिणाम झाला. भास्करराव प्रबोधनकारांना भेटण्यासाठी दोन तीनदा पुण्याला गेले. जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीवर तपशीलवार चर्चा झाली. भास्कररावांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रबोधनकारांनी पकडली, वाळवा केंद्रावर धनजीशेठचा प्रभाव होता. तिथे हल्ला केल्याशिवाय निवडणूक जिंकताच येणार नव्हती. त्यांनी ती गोष्ट भास्कररावांना सांगितली, वाळव्याला कूपर गचकत नाही, त्याला गचकवलाच पाहिजे. मग त्यासाठी आयत्या वेळी युगत सुचेल ती अंमलात आणली पाहिजे. मग त्यासाठी लागेल तो खर्च, इष्टानिष्टतेचा विचार न करता करायला तयार असाल, तर आम्ही या भानगडीत पडतो. नाहीतर रामराम. प्रबोधनकारांनी नेहमीप्रमाणे रोखठोक बोलणी केली. भास्कररावांना पराभव समोर दिसत होता, त्यामुळे त्यांनी त्याला होकार दिला.
या निवडणुकीतली एक आठवण पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणी या पुस्तकात बॅ. पी. जी. पाटील यांनी दिली आहे. ती अशी, कूपर हे कट्टर भांडवलदारांचे हस्तक व सरकार पार्टीचे चाहते असल्यामुळे सातारच्या राजकारणातून त्यांची उचलबांगडी करण्याचा विरोधी गटाकडून खूप प्रयत्न झाला. कर्मवीरआण्णा हे त्या गटाचे अध्वर्यू होते, हे सांगायला नकोच. गुरुवर्य केशवराव विचारे, आचरेकर वकील, भद्रे वकील, रा. बा. शिंदे वकील, भास्करराव जाधव, पांडुरंगराव आढाव, बाबासाहेब शिंदे (आखाडकर) व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा हा नेटका गट असे. इलेक्शनमधील भलेबुरे सर्व प्रकार घडत असत. सातारच्या गांधी मैदानावरील एका जाहीर सभेत आण्णा गरजले, `या कूपरला (Cooper म्हणजे दारूचे पिंप) दारूच्या ठेकेदाराच्या बच्च्याला दारूच्या पिंपातच बुडविले पाहिजे. त्याला वर येऊ देता कामा नये. सडेतोड टीका जाहीरपणे करायची हा आण्णांचा खाक्या असे. पण मनांत काहीही राग द्वेष धुमसत ठेवायचा नाही, ही त्यांची धारणा. तसे ते उघड्यावर दोन हात करणारे वीर होते. नथीतून बाण मारणारे शिखंडी नव्हते. लगेच पुन्हा कोठे कूपर भेटले की त्यांना स्वत:च सांगत, काय खानबहादूर, आम्ही काल तुमच्यावर खूप घसरलो होतो बरं का?