□ महाराष्ट्रातील मुस्लिमांसाठी ‘चला मराठी शिकू या’चा जागर. अंजुमन इस्लाम संस्थेच्या कॉलेजातील अधीक्षक मोहम्मद रेहान या तरुणाने तयार केले खास पुस्तक
■ तेही मराठीच आहेत की… फक्त धर्म वेगळा. आता मराठीच्या अस्मितेच्या बाता मारून मुलांना इंग्लिश शाळेत टाकणार्या आणि त्यांचं मराठी कसं ब्रोकन आहे, हे कौतुकाने सांगणार्या आईबापांसाठीही असं एखादं पुस्तक बनवा कुणीतरी.
□ जनसेवेचा निर्मळ झरा म्हणजे सुधीर जोशी. आदरांजली सभेत सर्वपक्षीयांची भावना
■ आता सार्वजनिक, राजकीय जीवनात झरे कमी, बिनझाकणाची गटारे अधिक.
□ मराठीचा अभिजात दर्जा गुजरातीने रोखला? दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार
■ आणि आमचे विरोधी पक्षाचे गुर्जरमिंधे नेते ढोकळा-फाफड्याचे बकाणे भरून गप्प दिसतायत… ही पार्सलं पहिल्या बुलेट ट्रेनने बुलेटच्या वेगाने गुजरातला धाडली पाहिजेत कायमची.
□ शालेय अभ्यासक्रमातून तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणे आवश्यक : सामाजिक संस्थेचा अहवाल
■ शालेय अभ्यासक्रमात मोबाइलच्या आणि व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्सच्या दुष्परिणामांचीही माहिती द्यायला हवी… ते अधिक घातक.
□ रेल्वेतील चतुर्थ श्रेणी नोकरभरतीसाठी सहा वर्षांपूर्वी झालेल्या परीक्षेत मराठी तरुणांची निराशा. ६ वर्षांत ३५ सुनावण्यांनंतर हायकोर्टाने आता याचिका फेटाळली… परप्रांतीयांची वर्णी
■ मराठी तरुणांनीही आता वरच्या श्रेणीचा विचार करायला हवा, व्यवसायांकडे वळायला हवं.
□ रशियाबाबत भारत तटस्थ. अमेरिकेच्या ठरावावरील मतदानात सहभाग नाही
■ पंडित नेहरूंना नावं ठेवण्यात हयात गेली आणि आता त्यांचाच अलिप्ततावाद स्वीकारायची पाळी आली… इथे केले ते इथेच फेडावे लागते.
□ रशियाच्या फौजांना युक्रेनचा कडवा प्रतिकार
■ एकेकाळी बलाढ्य अमेरिकेला व्हिएतनामने जेरीला आणले होते, खुद्द रशियन नागरिकांनी हिटलरच्या फौजांना काकडवून मारले होते, सैन्यावर विजय मिळवता येतो, नागरिकांवर नाही.
□ अमेरिकेतील मराठी शाळेत प्रवेशासाठी गर्दी. कॅलिफोर्नियात माय मराठीचा जागर
■ वाहव्वा! या शाळेत कधीतरी गोर्यांची मुलेही प्रवेश घेतील, अशी कामगिरी केली पाहिजे.
□ भाजपच्या तीन वाचाळवीरांना दणका. राणे पिता-पुत्रांवर गुन्हा. चंद्रकांत पाटील यांच्यावरही कारवाईचे आदेश. दिशा सालियनची बदनामी भोवली
■ ढवळ्यांशेजारी पवळ्याने स्वेच्छेने बांधून घेतलं, तर गुण लागणारच.
□ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; उपकार नको, हा आमचा न्याय्य हक्क आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ठणकावले
■ आता पोटात मुरडा येणारच केंद्राच्या. आपल्याकडे निवडणूक असती तर ऑपरेशन इंद्रायणी किंवा अशीच काहीतरी आरती ओवाळून घेत भिकेचा तुकडा टाकला असता त्यांनी.
□ रशियाच्या हल्ल्यामुळे साडेतीन लाख निष्पाप नागरिक विस्थापित
■ युद्धात मरतातही सामान्यजन, हालही सामान्यांचेच होतात आणि जीवही सामान्यांचेच जातात… जेव्हा उच्चपदस्थ मारले जाऊ लागतील, तेव्हा युद्धं थांबतील.
□ आघाडी सरकार पाडण्यासाठीच ‘ईडी’ची कारवाई – विजय वडेट्टीवार
■ ती एक शाखाच आहे त्यांची.
□ मुंबईतून सर्व काही मिळवून मराठीचा द्वेष करणे चांगले नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
■ खाल्ल्या थाळीत छेद करणार्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
□ मातृभाषा आईप्रमाणे जीवन घडवते- मोदी
■ उगाच आपल्या अपयशांचे खापर आता माय गुजराती भाषेवर फोडू नका…
□ संयुक्त राष्ट्रांत युक्रेनबाबतच्या ठरावावर भारत दुसर्यांदा तटस्थ
■ आता अमेरिकेच्या संतापझळांना तयार राहा. आड टाळला की विहीर अटळ
□ योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत आर्थिक नाकेबंदी झाल्याचा नाराज ब्राह्मण नेत्यांचा आरोप
■ आजच्या युगातही जातीपातीत आणि उच्चतेच्या भंपक कल्पनांमध्ये अडकून पडणार्यांना कधी ना कधी हे भोगावं लागतंच.
□ विरोधकांना हवा माझा शेवट – नरेंद्र मोदी
■ प्रचारासाठी वाट्टेल ते.
□ यूपी, गुजरातमध्ये नोकरशहांना रान मोकळे! कलम-३७० वरून राहुल गांधींची मोदींवर टीका
■ ज्यांच्याकडे राजकीय प्रज्ञा नसते, त्या अज्ञांचा कारभार बाबूभरोसेच असतो.
□ केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरात महाविकास आघाडी आक्रमक पवित्र्यात
■ इथे आक्रमक ममतादीदींचाच आदर्श ठेवला पाहिजे. लातों के भूत…
□ राज्यातील यंत्रणा कुचकामी; ईडी, सीबीआयच मोठे – नारायण राणे यांचे वक्तव्य
■ इकडचे उंदीर तिकडे कसे धूम पळाले ते सगळ्यांना माहिती आहे… त्यांच्यासाठी ते मोठेच असणार…
□ असभ्य भाषा टाळा. खासगी एफएमना सरकारचा इशारा
■ आम्ही राजकीय नेत्यांचाच आदर्श घेतो, असं त्यांनी सांगितलं तर काय करणार?
□ कोरोनाकाळात लोक केवळ भीतीनेच मरण पावले. जेवढा माणूस शिकलेला, तेवढा तो गाढव असतो. डॉक्टर नालायक आहेत. मारायच्याच लायकीचे आहे. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे
■ हे खूप शिकलेले आहेत ना!