• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शेन वॉर्न : जंटलमन्स गेमचा बंडखोर अवलिया

- अभिजीत कुलकर्णी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 10, 2022
in फ्री हिट
0

वॉर्नची कला फक्त त्याच्या मनगटातच नव्हती तर त्याला त्याच्या तल्लख मेंदूचीही तेवढीच साथ होती. फलंदाजाला गारद करण्यासाठी वॉर्न कसा सापळा लावायचा हे बघणं हा पण एक अनुभव असायचा. त्याच्या भात्यात लेग स्पिन, गुगली, फ्लिपर, स्लायडर असे कितीतरी बाण असताना तो प्रत्येक अ‍ॅशेस मालिकेच्या आधी आपण कुठल्यातरी नवीन मिस्ट्री बॉलवर काम करत असल्याचं जाहीर करायचा. या वक्तव्यांमध्ये अतिशयोक्तीचाच भाग जास्त असायचा, पण त्यामुळे इंग्लिश फलंदाजांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायची आणि वॉर्नचं काम व्हायचं.
– – –

शेन वॉर्न गेला ही बातमी शुक्रवारी संध्याकाळी आली आणि त्याने अ‍ॅशेसमध्ये आपल्या पहिल्याच चेंडूने आकस्मिक दांडी उडवल्यावर माईक गॅटिंगची जशी बोबडी वळली तशीच गत त्याच्या कित्येक चाहत्यांची झाली असणार…
क्रिकेट नामक ‘जंटलमन्स गेम’मध्ये वॉर्नच्या आधी आणि नंतर कित्येक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने ठसा उमटवला असला तरी, मैदानावर आपल्या फिरकीने आणि बाहेर आततायी वागण्याने सतत प्रकाशझोतात राहणार्‍या वॉर्नचं वलय काही वेगळंच होतं. भुर्‍या रंगाचे केस, चेहर्‍यावर सनस्क्रीन क्रीमची थप्पी लावून हसर्‍या चेहर्‍याचा शेन वॉर्न जेव्हा त्याच्या छोट्याश्या रन-अपजवळ उभा राहायचा, तेव्हा भल्या-भल्या फलंदाजांच्या हृदयात धडकी भरायची. त्याच्या पदार्पणापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या मार्‍याची मदार जलद गोलंदाजांवरच असायची व त्यांचे फिरकी गोलंदाज हे शक्यतो इतरांना विश्रांती देण्यासाठीच गोलंदाजीला येत. वॉर्न ह्या नियमाला अपवाद ठरेल असं भविष्य जर कोणी त्याच्या १९९२ साली भारताविरुद्धच्या कसोटी पदार्पणानंतर वर्तवलं असतं तर त्याला लोकांनी वेड्यात काढलं असत. त्या मालिकेत दोन कसोटीत मिळून २००च्या वर धावा देत, त्याने फक्त एक खेळाडू बाद केला होता… अँड त्याला लगेच संघातून डावलण्यात आलं होतं. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची कामगिरी जरी सुधारली तरी, वॉर्नच्या आख्यायिकेची सुरवात त्याने गॅटिंगला टाकलेल्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ने झाली आणि पुढील दीड दशक त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं.
प्रभावी फिरकी गोलंदाजाला प्रतिस्पर्धी फलंदाज काय करू शकेल आणि आपल्याला त्याला चकवायला काय करावं लागेल हे आकलन सतत करत राहावं लागतं. पण वॉर्नच वैशिष्ट्य असं होतं की त्याच्याविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्ध्यालाच तो आता काय करेल हा गहन प्रश्न पडायचा आणि त्यातच तो अर्धी बाजी मारून जायचा. वॉर्नची कला फक्त त्याच्या मनगटातच नव्हती, तर त्याला त्याच्या तल्लख मेंदूचीही तेवढीच साथ होती. फलंदाजाला गारद करण्यासाठी वॉर्न कसा सापळा लावायचा हे बघणं हा पण एक अनुभव असायचा.
त्याच्या भात्यात लेग स्पिन, गुगली, फ्लिपर, स्लायडर असे कितीतरी बाण असताना तो प्रत्येक अ‍ॅशेस मालिकेच्या आधी कुठल्यातरी नवीन मिस्ट्री बॉलवर काम करत असल्याचं जाहीर करायचा. या वक्तव्यांमध्ये अतिशयोक्तीचाच भाग जास्त असायचा, पण त्यामुळे इंग्लिश फलंदाजांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायची आणि वॉर्नचं काम व्हायचं.
एकदा स्वत:च्या गोलंदाजीबद्दल बोलताना वॉर्न म्हणाला होता, ‘फिरकी गोलंदाजीच्या कलेचा एक भाग म्हणजे फलंदाजाला असे वाटत राहिला पाहिजे की आता काहीतरी विशेष घडणार आहे.’ वॉर्नचा चेंडू किती फिरेल किंवा तो आता कुठलं वैविध्य दाखवेल ही भीती फलंदाजांच्या मनात इतकी घर करून राहायची की ते आपला नैसर्गिक खेळ विसरून जायचे आणि त्याच्या सापळ्यात अडकायचे. इतकंच नव्हे तर वॉर्न फलंदाजांच्या सवयी, मानसिकता आणि इतर कमकुवतपणाचा इतका सखोल अभ्यास करायचा की त्याला कोणाला स्लेज करताना काय म्हणायचं, कोणाला काहीच म्हणायचं नाही हे त्याला नक्की माहीत असायचं. त्याच्या अपील करण्याच्या पद्धतीने तर अंपायर्सवर पण दबाव बनत असे आणि त्याचा फायदा त्याला बरेच वेळा झाला.
हे सगळं करत असताना, वॉर्नमध्ये फलंदाजांभवतीचा सापळा आवळेपर्यंत संयम दाखवण्याची क्षमता होती आणि ते त्याच्या यशामागचा मोठं रहस्य नक्कीच आहे.
कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण १०००च्या वर बळी मिळवणार्‍या व विश्वविजयी ऑस्ट्रेलियन संघाचा अविभाज्य घटक असलेल्या या अवलियाचं पाहिलं प्रेम मात्र ऑस्ट्रेलियन रूल्स फुटबॉल होतं. नो स्पिन ह्या त्याच्या आत्मचरित्रात वॉर्न लिहितो की सेंट. किलडाच्या अंडर-१९ संघाच्या निवड चाचणीत अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. पण तिथेही सगळं आलबेल होतं असं नाही. वॉर्नच्या बंडखोर वृत्तीमुळे त्याच्यावर बरेच वेळा शिस्तभंगाचे आरोप झाले. पण त्या दरम्यान त्याला नुकताच फसवणुकीच्या आरोपावरून शिक्षा भोगून आलेल्या टेरी जेन्नरच मार्गदर्शन मिळालं आणि तो कमीतकमी स्वतःच्या खेळाबद्दल तरी जास्त गंभीर झाला.
पण वॉर्नला चौकटीत जगणं मान्यच नव्हतं. गोलंदाजी करत असतांना प्रतिस्पर्ध्यांना नियमांचा निर्बंध न ठेवता स्लेज करणं, घरी बायको आणि तीन मुलं असा संसार असताना जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात बायकांशी संबंध ठेवणं, डोपिंगमध्ये पकडलं गेल्यावर आईने दिलेल्या औषधांचं कारण देणं आणि हे करत असताना आपण काहीच चुकीचं करत नसल्याचा विश्वासाने वागणं फक्त त्यालाच जमू शकत होतं. आणि त्याच्या दोन दशकाच्या क्रिकेट कारकीर्दीत आणि त्यानंतरही, वॉर्न नामक हे गूढ उकलणं हे फलंदानांनाच काय, तर त्याच्या सहकार्‍यांना आणि चाहत्यांनाही जमलं नाही.
१९९२ साली भारताविरुद्ध पदार्पण करणारा अप्रभावी वॉर्न, स्पिन खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या गॅटिंगला ‘बॉल
ऑफ द सेंचुरी’ने भांबावून सोडणारा वॉर्न, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मॅचफिक्सिंग प्रकरणात फसणारा वॉर्न किंवा निवृत्त झाल्यानंतर वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहिलेला वॉर्न. ह्यातला कुठला वॉर्न खरा होता हे सांगणं खरंच कठीण आहे.
२००० साली जेव्हा त्याला ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार नेमण्यान आलं, तेव्हा वॉर्न पुढे कधी तरी देशाचं नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती. पण लवकरच मद्याच्या धुंदीत इंग्लंडमधील एका नर्सला अश्लील मेसेज पाठवल्याचे प्रकरण पेपरात छापून आल्यावर त्याची उचलबांगडी करण्यात आली. ह्या प्रकरणाचा आपल्या खेळाशी काही संबंध नाही असा युक्तिवाद करण्याचा वॉर्नने बराच प्रयत्न केला, पण त्याची नवनवीन प्रकरण बाहेर येत राहिल्याने त्याला पुन्हा कधी ती जबाबदारी देण्यात आली नाही.
आपल्यातले नेतृत्त्वगुण वॉर्नने शेवटी आयपीएलच्या पहिल्या हंगामात दाखवून दिले. नवख्या खेळाडूंना हाताशी धरून त्याने राजस्थान रॉयल्सला विजेतेपद तर मिळवून दिलंच, पण त्याने हेरलेले काही खेळाडू अजूनही नाव गाजवत आहेत.
निवृत्तीनंतर मात्र वॉर्नची जीवनशैली अजूनच बेफाम झाली होती आणि त्याच्या विविध प्रकरणांचे किस्से आणि त्याने काही आजी माजी खेळाडूंना ठेवलेली नावं सारखी चर्चेत येत राहिली. वॉर्न खेळत असताना आणि त्यानंतरही शोमॅनच राहिला.
फुटबॉलमधील मॅराडोना आणि वॉर्न यांच्यात याबाबतीत बरंच साम्य आहे. दोघांनाही मैदानावर खेळताना बघणं हा एक अद्भुत अनुभव होता, पण त्याचबरोबर त्यांचं मैदानाबाहेरचं आयुष्य रंगबिरंगी असूनही काहीसं केविलवाणं वाटावं असंच होतं. मॅराडोनाप्रमाणे वॉर्न कधी ड्रग्सच्या पुरता आहारी गेला नाही, पण सरते शेवटी त्याची जीवनशैली मॅराडोनाप्रमाणेच त्याच्या आकस्मिक निधनाला कारणीभूत ठरली हे म्हणणं चुकीचं होणार नाही. पण मॅराडोनाप्रमाणेच मैदानावर प्रेक्षकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध करण्याची क्षमता वॉर्नमध्ये होती ह्यात कुठलंही दुमत असणं शक्य नाही.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

चांदीच्या अनोख्या दागिन्यांची निर्मिती

Next Post

चांदीच्या अनोख्या दागिन्यांची निर्मिती

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.