• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्फुरण देणारा, अंतर्मुख करणारा!

- सुनील सुकथनकर (व्हायरल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 10, 2022
in व्हायरल
0

प्रिय मित्र नागराज,
काल ज्या साधेपणाने तू सिटीप्राईडमधला प्रिमियर शो स्वत:च तुझ्या खास शैलीत, मराठीत कंडक्ट करत होतास, ते पाहणं खूप भारी होतं! ‘झुंड’ हिंदी चित्रपट आहे, हे विसरायला लावणारं. ‘झुंड’ने अंगात स्फुरण निर्माण केलं, गप्प केलं, अंतर्मुख केलं, अनेकदा भरूनही आणलं.
परवाच तुझ्या ट्रेलरवर शुभेच्छा दिल्यावर एका अनोळखी माणसाने ‘तुम्ही आणि सुमित्रा भावे ‘झुंड’सारखा चित्रपट करू शकला नाहीत, कारण तुमची ती लायकीच नाही’ अशा आशयाची कमेंट केली! त्यामुळे असेल, पण आमच्या अनेक चित्रपटांशी ‘झुंड’ची नाळ मनात जुळत गेली. ‘१० वी फ’मधली पोरं आणि सर आठवले. ‘जिन्दगी जिंदाबाद’मध्ये ओम पुरींबरोबर अभिनयाला पडद्यावर उभी राहिलेली मुंबईतली रस्त्यावरची पोरं आठवली, ‘डे ड्रीम’ या लघुपटातली पुण्यातल्या कचरा वेचणार्‍या मायलेकांची जोडी आठवली, वेगवेगळ्या लघुपटांच्या निमित्ताने पालथ्या घातलेल्या मुंबई, पुणे, चंद्रपूर, भरतपूर इथल्या अनेक वस्त्या, अनेक ठिकाणचे भंगार-अड्डे आठवले, धुळे-नंदुरबार जवळचे पाडे आठवले.
पण आमचे हे प्रयत्न मेनस्ट्रीममध्ये येणारे नव्हते. संपूर्ण समाजावर त्यांचा मोठा परिणाम झाला असं म्हणता येणार नाही.
तू ‘फँड्री’मध्ये एका विद्रोहाच्या ठिणगीशी शेवट केलास. ‘फँड्री’ च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी दिल्लीत तू तयार होत होतास. पण नितीन आगेच्या हत्येच्या नुकत्याच आलेल्या बातमीने तू व्यथित होतास. पुढच्या चित्रपटाचा विषय हाच आहे, हे तू तेव्हाच सांगत होतास. ‘सैराट’चा विदीर्ण करणारा शेवट पाहून सुन्न होणारे अनेक होते आणि फक्त नव्या, ताज्या जोडीची संगीतमय कहाणी ऐकून हरखणारेही काही होते. ‘सैराट’ ला विक्रमी यश मिळालं.
‘पावसाचा निबंध’ आणि ‘वैकुंठ’मधून तू तुझं वेगळ्या जगाचं दर्शन घडवणं चालूच ठेवलंस. पण ‘सैराट’च्या यशातून तू साक्षात अमिताभ बच्चन या मोठ्या नायकाला ‘तुझ्या’, तू निर्माण केलेल्या सृष्टीत यायला लावलंस.
‘झुंड’ त्यामुळे महत्त्वाचा ठरतो.
‘पळशीची पी.टी.’सारखा चित्रपट एका धनगर मुलीच्या धावपटू बनण्याच्या स्वप्नाचा चुराडा होताना दाखवतो. ‘म्होरक्या’ एका गावकुसाबाहेरच्या पोराला परेडचं नेतृत्त्व नाकारलं जाताना दाखवतो. ‘कस्तुरी’मधला छोटा पोस्टमॉर्टमच्या दुर्गंधीत सुवास शोधत रहातो. या आणि अशा सर्व चित्रपटांचं तुझ्या चित्रपटांशी नातं आहे. पण आपल्या प्रेक्षकांना त्यांचा थांगपत्ता नाहिये!
म्हणून मला ‘झुंड’ यशस्वी व्हायला हवा असं वाटतं.
‘झुंड’मधल्या वेगवान मॉन्टेजेस आणि बेभान करणार्‍या अनेक प्रसंगांबरोबरच विजय सरांसमोर मनोगत व्यक्त करणार्‍या एकेका ‘खर्‍या’ मुलाचा, नाटकीपणापासून दूर असं मनोगत सांगणारा चेहरा दिसत जातो. तसे प्रसंगही नजरेसमोर येत रहातात.
समाजमाध्यमांना आता चित्रपट आणि कलावंतांच्या चाहत्यांचं रूपांतर कोंबड्यांप्रमाणे झुंजत बसणार्‍या ‘भक्तां’मध्ये करायचंय. प्रिमियरनंतर तू बाऊन्सर्सच्या साखळीत हरवलास म्हणून गार्गीचा निरोप घेऊन निघताना तू मागून येऊन अनपेक्षितपणे मारलेली मिठी मला खूप आपुलकीची वाटली.
प्रत्येक चित्रपट आपापलं जातवास्तव घेऊनच येत असतो. विषय-आशय मांडणी सगळ्यांत एक राजकारण दडलेलं असतं, असायलाच हवं. अगदी टाईमपास म्हणून बनवले गेलेले चित्रपटही यापासून दूर राहू शकत नाहीत. प्रश्न एवढाच उरतो की त्या त्या जातीतल्या प्रस्थापित व्यवस्थेतल्या हिणकस गोष्टींना तो चित्रपट सवाल करतो की फक्त त्या त्या जातीची खोटी फुगवलेली ‘अस्मिता’ गोंजारतो!
तुझा चित्रपट या कसोटीवर कधीच खोटा ठरत नाही!!
तू, गार्गी- सगळ्या टीमचं खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
जाताजाता आपल्या साकेत कानेटकरच्या दमदार पार्श्वसंगीताचं आवर्जून कौतुक. गाण्यांचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मांडणीशी जुळवून घेत क्लिंट ईस्टवुडच्या वेस्टर्नचा धमाका नागपूरच्या वस्तीत आणून सोडलाय! वेल प्लेड सेकेट्यू!
आणि सुधाकर, त्याचा तरंगता कॅमेरा आणि तू- हे पण एक कूल कॉम्बिनेशन आहे..! कालच्या कार्यक्रमातलं अतुलचं विधान खूप छान होतं. ‘झुंड’ प्रदर्शित झाल्यावर आता नागराजच्या मनातल्या अनेक नव्या योजना मोकळ्या होतील!’
तुझ्यासारखा कवी चित्रपटाच्या या व्यवहारी जगात कसा टिकाव धरतो, हेही एक आश्चर्यच आहे. समाजमाध्यमांच्या या गरळ ओकणार्‍या वास्तवापासून तुझं अलिप्त असणं हे तुझ्या चांगुलपणाचंच द्योतक आहे.
चित्रपटदुनियेची जाती-पोटजातीत विभागणी करायला टपलेल्या विविध भक्तांनो, आधी उठा आणि निरनिराळे चित्रपट आळस न करता पहाल मग बोला !!
स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
एके काळच्या अँग्री यंग मॅनच्या तोंडून ‘थोडा झुक के माफी मांग लेता तो क्या मर जाता?’ हा संवाद ऐकून तुझ्या सुमित्रामावशींना नक्कीच आनंद झाला असता.

– सुनील सुकथनकर

Previous Post

धन्यवाद नागराज…

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.