अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, शुक्र-मंगळ धनूमध्ये, रवी-शनी-बुध-प्लूटो मकरेत,
१३ फेब्रुवारीनंतर रवी-नेपच्युन-गुरू कुंभेत, हर्षल-मेषेत.
दिनविशेष – १६ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती.
मेष – चंगळवादी आणि विलासी वृत्तीमध्ये येत्या आठवड्यात वाढ होणार असल्यामुळे जपून पावले टाका. मंगळाच्या शुक्राबरोबर भाग्यस्थानात होणार्या युतीमुळे ही परिस्थिती निर्माण होणार आहे. पैसे खर्च करताना खूप दक्षता घ्यावी लागणार आहे. १३ फेब्रुवारीपासून रवीचे लाभातील भ्रमण अनपेक्षित शुभ घटनांचा अनुभव देईल. विद्यार्थीवर्गास मनासारखी फळे मिळतील, त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. नोकरदार वर्गाला कामात बदल दिसेल, एखादी नवीन जबाबदारी येऊ शकते. ती पूर्ण करताना योग्य ती काळजी घ्या. हिशेब तपासनीस, अकाउंट्स या ठिकाणी काम करणार्यांना कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील.
वृषभ – एखादे प्रलोभन दाखवले जाईल, पण त्याला बळी पडू नका. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. शुक्राची मंगळाबरोबर युती असून अष्टम भावामध्ये आहे. त्यामुळे स्वभाव रोमँटिक होऊ शकतो. पाय घसरू देऊ नका. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवाच. विद्यार्थ्यांना एखादे नवीन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. शिष्यवृत्तीची संधी चालून येऊ शकते. उच्चशिक्षणात योग्य मार्ग सापडेल. १३ फेब्रुवारीनंतर दशमात येणार्या रवीमुळे गृहसौख्य आणि पतप्रतिष्ठा मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील. १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी होणारा गुरू-रवी-चंद्र यांचा नवपंचम योग आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अनुकूल राहील.
मिथुन – आगामी आठवड्यात लक्षात राहणार्या घटनांचा अनुभव येईल. काही अनपेक्षित घटनांमधून आर्थिक लाभ होईल. बुधाचे मकर राशीतील राश्यांतर, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी होणारा चंद्र-मंगळ-शुक्र समसप्तक योग यामुळे हा आठवडा चांगला जाणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर चांगले जुळेल, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. लांबच्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत. व्यावसायिकांना चांगला लाभ होणार आहे. एखाद्या घटनेमुळे काहीजण भावनिक बंधनात अडकण्याची शक्यता आहे. रस्त्यावर चालताना कुत्र्यांपासून सावधानता बाळगा.
कर्क – पौर्णिमेनंतर बदलणारी ग्रहस्थिती पुढील काळात शुभस्थिती निर्माण करणार आहे. रवी-गुरू अष्टमात कुंभेत असणार आहेत. वारसाहक्काच्या मालमत्तेत लाभ होतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी काही बदलांना सामोरे जावे लागेल. एखादी जागा मोकळी झाल्यामुळे तिथे वर्णी लागेल. षष्ठात मंगळ-शुक्र असल्यामुळे जीवनशक्तीचा अपव्यय होईल. सरकारी सेवकांनी चुकीच्या मार्गाने काम करणे टाळावे, अन्यथा मोठा त्रास मागे लागू शकतो. वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींसाठी लाभदायक काळ आहे.
सिंह – येणारा आठवडा उत्तम जाणार आहे. रवीची शनीच्या तावडीतून १३ फेब्रुवारीला सुटका होणार आहे. सप्तमात कुंभेतील राश्यांतर झाल्यामुळे येणार काळ वरदानच ठरणार आहे. विवाहेच्छूंचे लग्न जमण्याचे योग आहेत. महिलांना ओटीपोटाचे त्रास होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि आर्थिक उन्नती होईल. भागीदारीच्या व्यवसायात असणार्या मंडळींना चांगले लाभ मिळतील. कोर्ट केसमध्ये आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या आजाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे चमचमीत खाणे टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गैरसमजुतीमधून वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यातून मानसिक आजाराला निमंत्रण मिळू शकते.
कन्या – बुधाच्या पंचमातील मकरेतील राश्यांतरामुळे मानसिक समाधान काय असते, याचा अनुभव येणार्या आठवड्यात येईल. गायन, वादन, अभिनय क्षेत्रात काम करणार्यांना यशप्राप्तीचा काळ राहणार आहे. सल्लागार मंडळींना देखील चांगले अनुभव येतील. नोकरी शोधणार्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. काहींना मामाकडून सहकार्य मिळेल. न्यायालयीन विषयांमध्ये सफलता मिळेल. चतुर्थातील मंगळामुळे घरासंदर्भातील कटकटी वाढतील. आईशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. भाऊबंदकीमधील विषय समजूतदारपणाने हाताळा. दलाली, ब्रोकरेजच्या माध्यमातून लाभ होतील.
तूळ – आरोग्याची काळजी घ्या. शुक्राचे पराक्रम स्थानातील सप्तमेश मंगळाबरोबरचे भ्रमण होत असल्यामुळे कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नी मध्ये काही कारणामुळे नाराजी असेल तर ती आता दूर होईल. बंधुवर्गाचे सहकार्य लाभेल. शनी-मंगळाची दृष्टी षष्ठम भावावर आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. प्रवासात नवीन ओळखी होतील. गायकांसाठी उत्तम काळ राहणार आहे. प्रकाराम स्थानात असल्या शुक्र-मंगळाच्या युतीमुळे नैतिक जबाबदारी बिघडू शकते. काही कारणामुळे असंतुष्टता जाणवेल.
वृश्चिक – राशिस्वामी मंगळाच्या द्वितीयातील भ्रमणामुळे सामाजिक बांधिलकी जपाल. राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मंडळींना एखादी जबाबदारी पार पडण्याची संधी मिळेल. घरामध्ये ज्येष्ठ असाल तर मानसन्मानाचे प्रसंग घडतील. आर्थिक उन्नती चांगली होईल. सुखस्थानात येणारा रवी, सोबत गुरू यांच्यामुळे कौटुंबिक सौख्यप्राप्ती होईल. शेतीवाडीच्या माध्यमातून लाभ होतील. उच्चपदस्थांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. पत्रकार, लेखक, कवी या मंडळींसाठी चांगला काळ आहे.
धनू – व्यावसायिकांना नवीन व्यवसायाची संधी चालून येईल. गुरूसोबत येणारा रवी पराक्रम भावात असल्यामुळे विद्यार्थीवर्गासाठी हा आठवडा शुभदायी राहील. प्रथितयश व्यक्तींबरोबर संवाद साधण्याचे योग आहेत. सरकारी पातळीवर सत्कार होईल. आध्यत्मिक प्रगती करण्यासाठी उत्तम काळ आहे, घरात धार्मिक कार्य पार पडेल. नोकरीत अपेक्षित ठिकाणी बदली मिळेल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. भावंडांची मदत होईल. प्रवासाचे योग आहेत.
मकर – एखादी मोठी जबाबदारी पूर्ण करण्याचे आव्हान समोर येऊ शकते, ती यशस्वीपणे पार पाडाल. राजकीय संघटना, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणार्या मंडळींसाठी येणारा काळ महत्वाचा राहील. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. साडेसाती सुरु असल्यामुळे अनपेक्षित खर्च वाढतील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. दानधर्म होईल. तीर्थयात्रा पूर्ण कराल. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ राहील.
कुंभ – १३ फेब्रुवारी रोजी होणार्या रवीच्या राश्यांतरामुळे सासरच्या मंडळींकडून लाभ होण्याची शक्यता आहे. विवाह जमण्यासाठी उत्तम काळ आहे. उद्योग-व्यवसायात मोठ्या प्रमाणात लाभ होतील. व्यावसायिक उत्कर्ष होईल. राजकीय मंडळींना चांगला फायदा होईल. कार्यक्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी उत्तम काळ आहे. काही मंडळींना परदेशगमनाचे योग आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनाही विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
मीन – पैसा जरा जपून खर्च करा… प्रवासात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. काही मंडळींना नेत्रपीडेचा त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. साहित्यिकांसाठी उत्तम काळ राहणार आहे. ठेकेदारांना सरकारी अधिकार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात धनलाभ होतील. परदेशातील व्यवहार फायदेशीर ठरतील. आयात-निर्यात व्यवसाय लाभदायक ठरेल. मित्राकडून चांगली गिफ्ट मिळेल. फिरतीची नोकरी असणार्यांना अतिशय लाभदायी आठवडा राहणार आहे.