नीतेश राणे
तीन दिवस टाकले आत
माझ्याच जाळ्यात मीच फसलो
आत भरपूर आहे आराम
म्याँव म्याँव आवाज काढत बसतो
पक्षी-प्राण्यांच्या आवाजाची
सतत प्रॅक्टीस करत असतो
घशाचीही वाट लागते
एक कावळा खिडकीत बसतो
उद्या होईन मी नकलाकार
देशात नाव होईल झटकन
घरात शिरतील पक्षी-प्राणी
हाकलून देईन त्यांना पटकन
नारायण राणे
माझा लाडका नीतेश पुत्र
पोलीस कोठडी पाहून आला
केंद्रीय मंत्री झाल्यावरती
इज्जतचा फालुदा झाला
तरी त्याला सांगत होतो
आता गुंडागर्दी सोड
म्हणायचा आदर्श तुम्हीच दादा
तुमचा वारसा वाटतो गोड
याच्यामुळेच मी अडचणीत
भाजपवाले देतील नारळ
जपतील त्यांची `शुद्ध?’ प्रतिमा
आघाडीही करील सरळ
देवेंद्र फडणवीस
पणजी निकालात काय होईल
याचीच मनात वाटतेय धास्ती
जुगार खेळून झालो कृतघ्न
याचीच मनात दाटलीय भीती
पर्रीकरांचाच मतदारसंघ
गोव्यात त्यांनीच रुजवला पक्ष
त्यांच्या पुत्राला तिकीट नाकारुन
बदनाम माणसाकडे आमचे लक्ष
पक्षाशी जो प्रामाणिक राहिला
त्यालाच आम्ही देतो धक्का
आता पाहायचा कधी मिळतो
पणजीत पाठीवरती बुक्का
निर्मला सीतारामन
स्वप्नांची तर सौदागर मी
स्वप्ने खा अन् त्यावर जगा
स्वस्ताईची भीक का मागता
आत्मनिर्भर होऊन बघा
केले ना मी रिमोट स्वस्त
घ्या गरीबांनो टीव्ही मस्त
स्वस्त झाला मोबाइल चार्जर
सेलफोन घेऊन पडा स्वस्त
तेच ठरवतात सारे काही
मला देऊन मोठेपणा
केले मला मंत्रीणबाई
गरीब जनता करे ठणाणा
योगी आदित्य
उत्तर प्रदेशात पायाखालची
वाळू चालली सरकत सरकत
मंदिराच्या नावाखाली तर
आमची झाली बरकत बरकत
वाढली फक्त गुंडागर्दी
कसलाच नाही झाला विकास
सहकारीही सोडून गेले
युपीत पक्ष झाला भकास
हिंदुत्वाच्या नावाखाली तर
चालले आहेत आमचे धंदे
शेतकर्यांना चिरडून तृप्त
आम्ही मोदींचे तर बंदे