पेपर चाळता चाळता सारंगला ’ती’ बातमी दिसली आणि तो प्रचंड दचकला. ’सुजाता शरद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन’. त्याने पुन्हा एकदा बातमीचे शीर्षक नीट वाचले तरी देखील त्याची खात्री पटत नव्हती. बातमीसोबत दिलेला सुजाताचा फोटो त्याच्या डोळ्यापुढे धुरकट व्हायला लागला आणि त्याच्या हातातून पेपर गळून खाली पडला. अरे काय आहे हे? गेल्याच आठवड्यात सुजाताला ’बेस्ट मॅनेजर’ म्हणून ती काम करत असलेल्या ’श्यामसुंदर अर्बन’ बँकेचा पुरस्कार मिळाला होता. तिच्या आग्रहावरून सारंग खास वेळ काढून तिथे गेला होता. किती आनंदी दिसत होती सुजाता. तिच्या नवर्याच्या चेहर्यावरून तर आनंद ओसरत नव्हता. समारंभानंतर तो दोघांना कौतुकाने ’रॉयल पाम्स’ला जेवायला घेऊन गेला होता. भविष्यातल्या प्लॅन्सवर दोघे किती भरभरून बोलत होते. नव्या घरासाठी दोघांनी केलेले सेव्हिंग, नव्या गाडीसाठीची जुळणी आणि मुख्य म्हणजे घरात चिमुकला पाहुणा आणण्याची तयारी. ’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ ह्या प्रश्नाचे उत्तर जणू त्याच्या टेबलवर त्या दिवशी उपस्थित होते, सुजाता आणि शरदच्या रूपाने.
खरं तर सुजाता आणि सारंगचे एक प्रकारे रक्ताचे नाते होते असे म्हणायला हरकत नाही. कुलाबा मर्डर केस सोडवत असताना त्याच्यावर गोळीबार झाला होता आणि योग्य वेळी मदत मिळाल्याने त्याला हॉस्पिटलला हलवण्यात आले. मात्र तातडीने सर्जरीची आवश्यकता होती आणि त्याच्या दुर्मिळ रक्तगटाचे रक्त मिळणे अवघड झाले होते. योगायोगाने सुजाताचे बाबा पायाला दुखापत झाल्याने त्याच हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरांनी केलेल्या आवाहनाला सुजाताने लगेच प्रतिसाद दिला. ऐनवेळी सुजाता मदतीला धावली आणि सारंगचे प्राण वाचले असे म्हणायला हवे. त्या दिवसापासून सारंगने एखाद्या बहिणीपेक्षा जास्त तिची काळजी घेतली होती. अगदी रोज घरी येणे-जाणे होत नसले तरी आठ दहा दिवसातून एखादा फोन किंवा कुलाबा बाजूला जाणे झाले तर तिच्या बँकेत चक्कर मारणे हे मात्र तो आवर्जून करत असे. सुजाता बदलापूरला स्थायिक झाली आणि मग अंतर पडत गेले ते गेलेच. फक्त मध्ये मध्ये फोनवरच्या गप्पाच काय त्या उरल्या.
सारंगने घाईघाईने अप्पांना- सुजाताचा बाबांना- फोन लावला. फोन अपेक्षेप्रमाणे त्यांच्या एका मित्राने घेतला. त्याच्याकडून सारंगला सर्व काही रात्रीच आटपल्याचे कळले. आता काही वेळातच राख गोळा करायला जाणार असल्याचे त्यांचा मित्र सद्गदित स्वरात म्हणाला. सारंगने मग बिलकुल वेळ न घालवता आपली ब्रेझा बाहेर काढली आणि सरळ बदलापूरची वाट धरली. सुजाता बदलापूरला बदलून आली तेव्हा एक दोनदा तो इकडे आला होता, पण त्याला देखील आता बरेच महिने लोटले होते. शहराचा तो भाग तर प्रचंड बदललेला जाणवत होता. शेवटी कसातरी पत्ता शोधत तो तिच्या घरी पोहोचला. दार सताड उघडे होते आणि आप्पा विमनस्कपणे समोरच्या सोफ्यावर बसले होते. शेजारी बहुदा त्यांचे दोन तीन मित्र अथवा नातेवाईक बसलेले होते. आप्पांनी सारंगकडे पाहिले आणि त्यांना पुन्हा एकदा जोरदार हुंदका आला.
आप्पांना सावरत सारंगने पुन्हा एकदा चौकशीचे सोपस्कार पार पाडले. सकाळी नेहमीप्रमाणे सर्व काही उरकून सुजाता बँकेत गेली आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरी आली. येताना आठवड्याची भाजी, दूध अशी खरेदी देखील करून आली होती. संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आणि शरद सोसायटीत पाय देखील मोकळे करून आले. रात्री जेवायची तयारी करत असताना सुजाता अचानक कोसळली. शरदच्या हाका ऐकून शेजारी पाजारी धावले, तोवर खूप उशीर झाला होता. सर्वांना आलेली शंका वरच्या मजल्यावरच्या डॉक्टर तुपेंनी आल्या आल्या सत्यात बदलली आणि शरद सुन्न झाला. सर्व काही ऐकून घेत असतानाच सारंगला अचानक शरदची आठवण झाली.
’आप्पा अहो शरद कुठे आहे?’ त्याने काळजीच्या सुरात विचारले.
’सुजाताचे अंत्यसंस्कार उरकून आलो आणि त्याने रात्री विष पिण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात निभावले. डॉक्टरांनी औषध दिलंय. त्याच गुंगीत झोपलाय तो आत,’ विषण्णपणे आप्पा म्हणाले.
’आप्पा, सुजाताला असा एकदम हार्ट अटॅक कशाने आला असेल? कसले दडपण होते का तिच्यावर? काही मानसिक त्रास? दगदग?’
’असे काही नाही. उलट दोन आठवड्यांपासून स्वत:ची फार काळजी घ्यायला लागली होती ती. दिवस गेले होते रे तिला..’ हुंदका दाबत आप्पा म्हणाले आणि सारंगच्या काळजावर सर्रकन एक ओरखडा उमटला.
सारंग मुंबईला परतला ते हृदयावर दुःखाचे ओझे घेऊनच. पण ’काळ हेच सर्व दुःखावरचे औषध आहे’ म्हणतात तेच खरे. सारंगने स्वत:ला कामात गुंतवून घेतले आणि हळूहळू तो सावरत गेला. सुजाताच्या मृत्यूचे दुःख काहीसे मागे पडत गेले, सुजाताच्या सततच्या आठवणी विरळ होत होत्या. मध्ये एक दोन वेळा शरदशी फोनवर चर्चा झाली तेवढीच. आणि आज आता पुन्हा इतक्या दिवसांनी तिची आठवण उसळी मारून वर आली होती. एका केस संदर्भात चर्चा करण्यासाठी तो इन्स्पेक्टर भोसलेला भेटायला कुलाबा पोलीस स्टेशनला गेला होता. तर भोसले नेमका बाहेर जाण्याच्या गडबडीत. बरं, चर्चा तर करणे अत्यावश्यक होते. त्यावर केसचे बरेच काही अवलंबून होते.
’सारंग, एक काम कर. तुला वेळ असेल तर माझ्याबरोबर तू पण चल. चर्चा होईल आणि माझे काम पण होईल.’
’चालला कुठे आहेस पण तू?’
’कमिशनर साहेबांचे एक महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी बदलापूरला निघालोय.’ भोसलेने बदलापूरचे नाव घेतले आणि सारंगच्या हृदयाला का कोण जाणे पुन्हा पीळ पडला.
– – –
’अरे वा! मुंबईचे तडाखेबाज गुप्तहेर सारंग दर्यावर्दी आणि धडाकेबाज इन्स्पेक्टर राजाराम भोसले आज जोडीने आमच्या चौकीत? भाग्य उजळले आमचे’ हसत हसत त्यांचे स्वागत करत बदलापूर चौकीचे इनचार्ज यादव म्हणाले आणि तिघेही हास्यविनोदात बुडाले. त्यांचा दंगा अजून बराच काळ चालला असता पण अचानक हवालदाराने येऊन मोडता घातला.
’सर, गोळ्यांची वेळ झालीये सर…’
’आण बाबा आण.. शरीराची काळजी घ्यायलाच हवी.’
‘कसल्या गोळ्या रे?’ भोसलेंनी उत्सुकतेने विचारले.
’अरे दोन तीन दिवस जरा दगदग झाली त्यामुळे मग बीपी वाढला. डॉक्टरने गोळ्या दिल्यात.’
’जपून राहा साहेब. तब्येत उत्तम तर सगळे उत्तम,’ सारंग काळजीने म्हणाला.
‘खरे आहे बाबा. ही आजकालची कोवळी पोरं अशी पटापट हृदयविकाराने जाताना पाहिली की काटाच येतो अंगावर. अरे हे काय वय आहे का रे मरणाने गाठण्याचे?’
’माझी एक मानलेली बहीण नुकतीच हार्ट अटॅकने गेली. बदलापूरचीच होती. अवघे तीस वय असेल,’ सारंग दुःखी स्वरात सांगता झाला.
’बदलापूरला कोणाची नजर लागली आहे का काय? अरे, आज सकाळीच आमच्या समोरच्या बिल्डिंगमधल्या देशमुखांची मुलगी हार्ट अटॅकने गेली. तिचे वय देखील असेच सत्तावीस अठ्ठावीस असावे,’ चुटपुटत्या स्वरात यादव म्हणाले.
’सुजाता म्हणजे बँकवाली ना रे?’ भोसलेनी विचारले.
’हो. बहुदा यादव साहेब ओळखत असतील तिला,’ बोलता बोलता सारंगने आपल्या मोबाइलमध्ये समारंभात काढलेला सुजाताचा फोटो यादवांना दाखवला.
’मोठी गोड छोकरी आहे हो. पण कधी भेटल्याचे आठवत नाही,’ मान हालवत यादव म्हणाले आणि अचानक त्यांनी पुढे केलेला मोबाइल पुन्हा मागे घेतला, ’सारंग, ह्या मुलीबरोबर आहे तो कोण?’
’तिचा नवरा शरद. ओळखीचा आहे?’
’ओळखीचा नाही पण ह्याला मी कुठेतरी पाहिले आहे. अरे हो! ह्याला मी एकदा रेखाबरोबर बघितले होते. त्यामुळे चांगला लक्षात राहिला. सानेंचा ’जावईशोध’ मुलीने कमी केला असे मी हसत हसत बायकोला म्हणालो देखील.’
’रेखा म्हणजे?’
’तीच आज सकाळी गेली ती..’ खिन्न स्वरात यादव म्हणाले आणि सारंग एकदम चमकला. त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात तावून सुलाखून निघालेल्या मनाने आणि मेंदूने त्याला जणू इशारा दिला. दोन तरुणींचा अकाली मृत्यू होणे आणि त्या दोन्ही शरदच्या परिचयातल्या असणे हा योगायोग असेल? असेल तर विलक्षण योगायोग म्हणायला हवा. त्याला जाणवलेली शंका त्याने बोलून दाखवली आणि यादव, भोसले देखील विचारात पडले.
’यादव साहेब, तुमची हरकत नसेल तर आपण ह्यात लक्ष घालायचे का?’
’तुझ्या डोक्यात काय आहे सारंग?’
’मला तिचा मृतदेह बघता आला आणि घरच्यांशी बोलता आले तर बरे होईल. काही धागेदोरे हाताला लागतायत का, हे चाचपता येईल.’
’ठीक आहे. मी दर्शनाला जाणारच आहे. तेव्हा माझे सहकारी म्हणून तुम्ही आलात तर काम होईल.’
साधारण तासाभरात यादव साहेब दोघांना घेऊन सानेंच्या घरी दाखल झाले. पांढर्या चादरीत गुंडाळलेल्या त्या सुंदर, निष्पाप चेहर्याला पाहून सारंगला सुजाताची प्रकर्षाने आठवण झाली आणि त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
पहाटे जॉगिंगला म्हणून गेलेली रेखा बागेच्या एका बाकावर मृतावस्थेत आढळली होती. रेखा जायची त्या वेळेला बागेत फारशी वर्दळ नसायची. सकाळी सातच्या सुमाराला तिचे असे बराच वेळ बसून राहणे एका आजोबांना खटकले आणि हा सगळा प्रकार उघड झाला. रेखाचे आई वडील काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. एक तरुणी- बहुदा रेखाची बहीण असावी- ती त्यांना सतत सावरत होती, धीर देत होती. एकूण रागरंग बघून यादवांनी बोलता बोलता रेखाच्या मामाला हाताशी धरले आणि काहीतरी खायला घालण्याचा उद्देशाने घराखाली आणले. चहाचे दोन घोट झाले आणि त्यांनी विषयाला हात घातला.
’रेखावर काही दडपण होते का? कामाचा काही ताण? मनावर काही ओझे?’
’नाही हो.. तुम्ही तर ओळखता होतात तिला. आपण बरे आणि आपले काम बरे. सकाळी दहाला ऑफिसला हजर आणि सहा वाजता घरी हजर.’
’तिच्या मित्र मैत्रिणी..’
’मित्र फारसे नव्हते. ऑफिसमध्ये सगळे पुरुष पन्नाशीच्या आसपासचे. सोसायटीत काही मित्र होते तेवढेच. तिचा स्वभाव तुम्हाला माहितीच. तिला एकटे राहायला फार आवडायचे. अबोल देखील होतीच.’
बोलता बोलता यादवांनी मामाला शरदचा फोटो दाखवला. पण त्यांनी त्याला काही ओळखले नाही. कधी पाहिल्याचे देखील त्यांना आठवत नव्हते.’
’तुम्हाला नक्की खात्री आहे?’ यादवांनी विचारले.
’अगदी नक्की. अहो नुकतीच आम्ही रेखासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती. असा देखणा तरुण नजरेतून नक्की सुटला नसता,’ मामा बोलत असताना ती वर दिसलेली तरुणी खाली आणि मामांना रेखाच्या आईने बोलावले आहे म्हणून सांगू लागली.
’ही तनुजा… सानेंच्या शेजारच्या अनगळांची मुलगी.’
’तनुजा, रेखा तुला काही बोलली होती का कधी? तिला होत असलेल्या एखाद्या त्रासाबद्दल किंवा एखाद्या मानसिक ताणाबद्दल?’
’नाही काका कधीच नाही. तसेही
ऑफिसमध्ये तिच्यावर ताण येईल असे कुठलेच काम नसायचे. उलट कधी कधी ’रिकामी बसून्ा मी आळशी होत चालले आहे’ असे म्हणायची ती.’
’तिचा एखादा जवळचा मित्र किंवा बाहेर काही..’ थोडेसे अडखळत यादवांनी विचारले.
’नाही काका. तसे काही नसावे. नाही तर ती मला नक्की बोलली असती,’ उत्तर देता देता तिने यादवांची नजर टाळली आणि सारंगने ते बरोबर हेरले. त्याने भोसल्यांना खूण केली आणि सिगारेटच्या बहाण्याचे भोसले मामांना घेऊन पुढे निघाले.
’तनुजा खरे काय ते सांग. तू उत्तर लपवते आहेस हे मला चांगले माहिती आहे,’ सारंगने दटावले.
’मी देवाशपथ सांगते, तिचे काही प्रकरण असेल किंवा मित्र असेल तर ते मला खरंच काही माहिती नाही.’
’मग उत्तर देताना नजर का टाळलीस तनुजा?’
’कारण.. कारण..’
’कारण काया तनुजा? बोल पटकन..’
’माझी एक मैत्रीण सांगत होती की, ती दोन दिवसांपूर्वी आयोडेक्स आणायला मेडिकलमध्ये गेली होती, तेव्हा तिथे तिने बहुदा रेखाला पाहिले. चेहर्याला स्कार्फ असल्याने ओळखीचा अंदाज बांधत असतानाच रेखा गाडी काढून निघून देखील गेली. ती गाडी पण निळ्या रंगाची रेखा वापरायची तशी स्कूटीच होती.’
’काय घेतले तिने मेडिकलमध्ये?’
’प्रेग्नसी चेकिंग किट,’ मान खाली घालत तनुजा पुटपुटली आणि दोघेही चमकले.
’ह्या माणसाला कधी पाहिले आहेस?’ शरदचा फोटो दाखवत सारंगने तिला विचारले आणि तनुजा प्रचंड दचकली.
’मी एक दोनदा ह्या माणसाला रेखासोबत पाहिले होते. तिच्या ऑफिसचा क्लायंट आहे हा शरद,’ तनुजाने ओळख सांगितली आणि सारंगच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने भोसलेंना आवाज दिला आणि रेखाच्या ऑफिसमधले कोणी उपस्थित आहे का ते शोधायला सुरुवात केली.
’शर्मा साहेब, तुम्ही आणि रेखा एकाच ऑफिसात ना?’
’हो बरोबर.. खूप होतकरू मुलगी होती..’ कातर स्वरात शर्मा म्हणाले.
’ह्या फोटोतील तरुणाला ओळखता?’
’व्हेरी वेल.. हा शरद. आमचा क्लायंट आहे. आधी क्वचित कधीतरी त्याच्या ऑर्डर्स असायचा; मात्र आजकाल त्यांच्या कंपनीच्या जवळपास सर्वच ऑर्डर्स आमच्याकडे येतात.’
’काही खास कारण? आजकाल सगळ्या ऑर्डर तुम्हाला मिळायचे?’
’वेल… जे काही माझ्या कानावर पडले त्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही; पण
ऑफिसमध्ये अशी कुजबूज होती की, शरद आणि रेखा ह्यांचे काही चालू आहे.’
’यादव तुम्हाला काय वाटते? उचलायचे का ह्या शरदला?’
’पण कुठल्या संशयावरून? रेखाची
बॉडी क्लीन आहे. घातपात किंवा अपघाताचे एकही चिन्ह नाही. सगळी लक्षणं
हार्टअटॅकची आहेत.’
’सुजाताला देखील हार्टअटॅकच आला होता. शरदच्या पहिल्या बायकोला, तो ही अचानक. तिला देखील काही काळापूर्वीच आपण आई होणार असल्याची चाहूल लागली होती,’ ताडकन सारंग उद्गारला.
– – –
’शरद येऊ का आत?’
’अरे सारंग दादा या या..’
’डिस्टर्ब तर नाही ना केले?’
’बिलकुल नाही. हे काय जस्ट झोपेतून उठतो आहे.’
’मला वाटले सकाळी बागेत फेरफटका मारायला गेला होतास का काय..’
’छे! इतकी छान गाढ झोप लागली होती आज..’
’अरे? मग बाहेर तुझ्या चपलांना हिरवे गवत कसे काय चिकटलेले आहे?’ खाडकन सारंगने विचारले आणि शरदचा चेहरा एकदम पांढरा पडला.
’गवत? काय माहिती बा. काल रात्री पाऊस होता ना, सोसायटीतल्या बागेचे चिकटले असेल..’ उसने हसत शरद म्हणाला.
’असेल असेल.. बरं तुझी ओळख करून देतो. हे यादव साहेब. यांच्या मित्राची मुलगी रेखा साने आज अचानक वारली. त्यासाठीच इकडे आलोय आम्ही. म्हणलं वेळ आहे तर तुला भेटून जावे.’
’ओह! ऐकून वाईट वाटले. इतक्या लहान वयात हार्ट अटॅक म्हणजे..’
’तुला कसे कळले?
’काय?’
’तिला हार्टअटॅक आलाय ते? मी तर काही बोललोच नाही.’
’मी आपला सहज अंदाज लावला. तरुण वय होते ना..’
’पण मी वयाचा देखील उल्लेख केला नव्हता..’ सहनशक्ती संपलेल्या सारंगने आता एक खाडकन कानफटात लावून दिली शरदच्या. भोसलेंनी पुढे होऊन त्याला आवरले. तोवर अंगातल्या कपड्यानिशी शरदने दरवाज्याकडे धाव घेतली; मात्र त्याच्या दुर्दैवाने यादव सावध होते. एका आणखी कानफाडीतचा प्रसाद मिळाला आणि शरद शांतपणे कोचावर बसला.
”मला पहिल्यापासून स्वच्छंद आणि स्वैर जगण्याची सवय होती. मात्र घरच्यांच्या दबावापुढे झुकून मला लग्न करावे लागले. घरचे होते तोवर मी शांत होतो. पण आई बाबा गेले आणि माझ्यातला स्वच्छंदीपणा पुन्हा उसळ्या मारू लागला. कामाच्या नावावर मी सतत बाहेर राहायला लागलो. त्याचवेळी सुजाताचा एक जुना मित्र तिच्याच ब्रँचला जॉईन झाला. सुजाता एकदम बदलली. नवे ड्रेस, नव्या साड्या, मेकअप.. ते सगळे माझ्या डोक्यात जायला लागले होते. मी खूप प्रयत्न केले, चोरून तिचा फोन अनेकदा चेक केला. पण काही सापडत नव्हते. आता मी उघडपणे दारू, सिगारेट सुरू केली आणि माझे सुजाताचे वाद व्हायला सुरुवात झाली. मी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली; तिने माझ्या पूर्वायुष्याचे वाभाडे काढले. वाद वाढतच जायला लागले. त्यातच सुजाता प्रेग्नंट आहे असे तिने सांगितले आणि माझ्यातला सैतान जागा झाला. हे मूल नक्की माझे नाही ह्याची मला खात्री होती. सुजाता आणि ते मूल दोघांना नाहीसे करण्याचे विचार माझ्या डोक्यात घुमायला लागले. पण नामानिराळे राहून हे सगळे करायचे कसे?’
’त्याचवेळी मला मार्ग सापडला. मी पूर्वी केमिकल लॅबमध्ये काम केले असल्याने मला ’नायट्रोजन’ गॅसबद्दल चांगलीच माहिती होती. कुठलाही घातपात न करता सुजाताच्या शरीरातील ऑक्सिजन संपवायचा, तर नायट्रोजन हे प्रभावी शस्त्र होते. जे कोणाच्या लक्षात देखील आले नसते आणि त्याचा काही पुरावा देखील मागे उरला नसता. काही दिवस मी सुधारल्याचे नाटक केले. त्या रात्री मी जेवणाच्या आधी सुजाताला आयुर्वेदिक वाफारा गर्भवतीसाठी खूप फायद्याचा असतो असे सांगत नायट्रोजन हुंगायला लावले. नायट्रोजनच्या परिणामाने ‘ऑक्सिजन’ची पातळी घसरत गेली आणि… माझा कोणाला संशयदेखील आला नाही. मी केलेले आत्महत्येचे नाटक खूप फायद्याचे ठरले.’
’रेखाला का मारलेस चांडाळा?’ यादव उद्वेगाने म्हणाले.
’सुजाता गेली आणि काही दिवसात रेखा माझ्या आयुष्यात आली. तोपर्यंत मी पूर्णपणे वाया गेलो होतोच. रेखाला काही दिवस फिरवावे, कंटाळा आला की सोडावे असे मी ठरवले. त्यातच ती अबोल, एकटी राहणारी असल्याने आमच्याबद्दल कोणाला कळणार देखील नव्हते. मी तिच्या ऑफिसमध्ये देखील तिला फारशी ओळख द्यायचो नाही. ती ऑफिसमधून सुटली की मला पिक-अप करायची आणि आम्ही एखादे एकांत ठिकाण गाठायचो. एक दोनदा शेजारी कोणी नसताना मी तिला घरी देखील घेऊन आलो होतो. एकदा घरी आलेली असताना, मी तिला गुंगीचे औषध दिले आणि.. पण तिथेच मोठा घोळ झाला. रेखाची पाळी चुकली आणि ती घाबरली. घरी सर्व सांगते म्हणायला लागली. तिने असे काही केले असते, तर मी पूर्ण अडकलो असतो. डीएनए चाचणीत सगळे सिद्ध झाले असते. मी जाम घाबरलो होतो. मात्र त्या रात्री रेखाचा फोन आला की तिची भीती खोटी ठरली आहे आणि मी नि:श्वास सोडला. आता काही करून हे रेखाचे लचांड गळ्यातून सोडवायचे मी ठरवले. खात्रीशीर मार्ग मला माहिती होताच.. नायट्रोजन.. ह्यावेळी मी इन्हेलरची मदत घेतली आणि…’ पुन्हा एकदा सारंगचा हात उचलला गेला आणि कोचावरचा शरद थेट मागच्या खोलीच्या दारापर्यंत फेकला गेला.