प्रबोधनकार सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात उतरण्यासाठी त्यांचं वाचन कारण ठरलं. लोकहितवादी, आगरकर, महात्मा फुले आणि रॉबर्ट इंगरसॉल या चार विचारवंतांच्या वाचनाने त्यांचा दृष्टिकोन घडवला होता.
– – –
प्रबोधनकारांनी ‘माझी जीवनगाथा’ मध्ये डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांचा उतारा देऊन ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची सगळी क्रोनोलॉजीच आपल्यासमोर ठेवली. इंग्रजी आमदानीत वकील, सावकार, कुलकर्णी आणि भिक्षुक यांनी शेतकरी ब्राह्मणेतर समाजाचं शोषण केलं. ते शोषक प्रामुख्याने ब्राह्मण होते. वर ते ब्राह्मणेतरांना कमी लेखत होते. त्यामुळे ब्राह्मण – ब्राह्मणेतरांमध्ये विषमता आणि दुरावा वाढत गेला, असं विश्लेषण सहस्रबुद्धेंनी केलंय. त्या उतार्यानंतर प्रबोधनकार लिहितात, ‘वयाच्या आठव्या वर्षीच अस्पृश्यता विध्वंसनाचे बाळकडू माझ्या आजीनेच पाजले होते. डॉ. सहस्रबुद्धे यांनी अत्यंत निस्पृहपणे वर्णन केलेल्या सामाजिक अन्यायांना प्रतिकार करण्याचा माझा निर्धार बळावला.’
प्रबोधनकारांच्या या निर्धाराला त्यांच्या वाचनाची पार्श्वभूमी होती. वाचन हे त्यांचं वेड होतं. त्यातून त्यांनी स्वतःला घडवलं होतं. त्याविषयी ते लिहितात, ‘लोकहितवादी, आगरकर, जोतिबा फुले, इंगरसॉल इत्यादी नवमतवादी क्रांतिकारकांच्या ग्रंथांचा माझा अभ्यास परिपूर्ण होऊन त्या चष्म्यातून माझे समाजनिरीक्षण काटेकोर चालू होते.’ त्यांनी इथे उल्लेख केलेल्या या चार सामाजिक विचारवंतांचा प्रबोधनकारांच्या विचारसरणीवर जबरदस्त प्रभाव आहे. ही विचारसरणी अनेक अर्थानी स्वतंत्र असली तरी त्याची प्रेरणा हे चार विचारवंत प्रामुख्याने आहेत. या चौघांच्या लिखाणाने त्यांना वेगळी दृष्टी दिली आहे.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या लिखाणाने प्रबोधनकार शाळेत असतानाच नादावले होते. त्यांच्या वडलांचे मामा राजाराम गडकरी यांनी देवासमुक्कामी त्यांना लोकहितवादींच्या वाचनाची दीक्षा दिली होती. तेव्हापासून त्यांना जातिभेद, अस्पृश्यता आणि ब्राह्मणी वर्चस्व यामुळे समाजाच्या होणार्या नुकसानीचं आकलन होऊ लागलं होतं. लोकहितवादींचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की त्यांनी दादरमध्ये असताना १९२०च्या सुमारात `लोकहितवादी संघ` नावाची संघटना सुरू केली होती. शतपत्रांतले लोकहितवादींचे जुने लेख दुर्मिळ झाले, तेव्हा त्यांनी ते ‘प्रबोधन’मध्ये छापले होते. शिवाय `लोकहितवादी` नावाचं एक साप्ताहिकही त्यांनी पुण्यातून चालवलं होतं.
लोकहितवादींच्या शताब्दीनिमित्त `प्रबोधन`मध्ये ते लिहितात, `लोकहितवादींनी हिंदुजनांच्या ज्या अनेक घाणेरड्या दोषांचे निर्भीडपणे आविष्कारण केले, त्या दोघांपासून अजूनही हिंदू समाज मुक्त झालेला नाही किंवा भिक्षुकशाही बंडही अजून शमलेले नाही. जातिभेदाची तीव्रता तर दिवसेंदिवस सारखी वाढतच आहे. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांत अजूनही अनंत अत्याचार करणारे भिक्षुकशाही नराधम रगड आहेत. अशा स्थितीत लोकहितवादींनी या सर्व भानगडींवर शरसंधान रोखून कठोर लेखनाचा मारा केल्यामुळे ते देशद्रोही कसे ठरतात? ज्यांना जनतेचा स्तुतिपाठ गाऊन त्यांच्या बेताल हुल्लडीवर देशभक्तीची नाटकें नाचविण्याची चिपळूणकरी खोड लागली आहे, असल्या सुवर्णसंधी देशाभिमान्यांपेक्षा लोकहितवादींचा स्वदेशाभिमान बराच वरच्या दर्जाचा होता, यात संशय नाही.` लोकहितवादींवर होणार्या टीकेचा परामर्श घेताना प्रबोधनकारांनी मांडलेले हे विचार आजच्या बनावट देशभक्तीचं शहाणपण शिकवणारे आहेत.
आधी समाजसुधारणा, नंतर राजकीय स्वातंत्र्य, हा गोपाळराव आगरकरांनी दिलेला मंत्र प्रबोधनकाराना पूर्णपणे मान्य होता. त्यामुळे तो त्यांनी आयुष्यभर लिखाणातून मांडला. आगरकरांच्या बुद्धिनिष्ठेचा त्यांच्यावर प्रभाव होताच. त्यामुळे ते ब्राह्मणेतर पत्रकारितेला बुद्धिनिष्ठेचं अधिष्ठान देऊ शकले. लोकमान्य टिळकांच्या अनुयायांच्या झुंडशाहीला सडेतोड लेखणीतून उत्तर देण्याचा वारसा त्यांना एकप्रकारे आगरकरांच्या ‘सुधारक’ ने दिला होता. अर्थात प्रबोधन हे सुधारकच्याही दोन पावलं पुढे गेलं होतं, असं मत मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिताना रा. के. लेले यांनी व्यक्त केलं आहे.
आगरकरांच्या `सुधारक`चा सामाजिक सुधारणांना अग्रक्रम देणारा विचार प्रबोधन पुढे नेणार असल्याचं प्रबोधनकारांनी `प्रबोधन`च्या पहिल्याच अंकात स्पष्ट केलं होतं, `राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सर्व सुधारणा आपोआप होतील, या गोंडस तत्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्वास नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीच्या आचारविचारांनी चिडचिडलेली असताना राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे राजकारणाची जुगार खेळणार्या जुगारूंची सट्टेबाजी होय. अर्थात या जुगारांत येनकेनप्रकारेण हिन्दुस्थानच्या स्वराज्याचें तट्टू यदाकदाचित जिंकलेच, तर ती स्वराज्याची लाटरी म्हणजे मूठभर मोठ्या माशांना बाकीच्या अनंत धाकट्या मासोळ्यांना बिगरपरवाना गिळण्याचा सनदपट्टाच होय.`
महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या शिकवणुकीने त्यांना फक्त समाजाकडेच नाही, तर इतिहासाकडे बघण्याचीही नवी दृष्टी दिली. प्रबोधनकारांची वाटचाल ज्या सत्यशोधक चळवळीच्या दिशेने वळू लागली होती, तिची पायाभरणी जोतिबांनीच केला होती. जोतिबांनी ब्राह्मणांकडून बहुजनांच्या होणार्या शोषणाची मीमांसा केली होती. त्याचीच मांडणी अधिक सविस्तर आणि दणकटपणे प्रबोधनकारांनी केली. जोतिबांच्या लिखाणाचा, भाषेचा, शैलीचा प्रबोधनकारांवरचा प्रभाव स्वयंस्पष्ट आहे. धार्मिक क्षेत्रातली दलालांची दुकानदारी बंद करण्याचा जोतिबांनी दिलेला विचार ते पुढे नेताना दिसतात.
‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये त्यांनी पुढे लिहिलेला `सत्यशोधक जोतिबा` हा लेख त्यांच्यावरचा प्रभाव दाखवून देणारा आहे. त्यात ते लिहितात, ‘ओबडधोबड बोबड्या बोलांनी मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या उद्धारासाठी, त्या काळी उपलब्ध असलेल्या अवजड बोजड साधनानी नि भाषेनी, सत्यशोधक धर्माचा खटाटोप करणार्या जोतिबाचा ज्योतिप्रकाश वाजवी होता. सत्य, न्याय नि समता यांवर आधारलेला होता, त्याने केवळ शूद्रांदि अस्पृश्य समाजाचेच हित होत होते असे नव्हे, तर पृथ्वीरवच्या सर्व मानवजातीच्या उद्धाराच्या संघटनेचा संकेत होता. चालू घडीच्या समाजवादी तत्वांची बीजेच त्यात आढळतात.’
प्रबोधनकारांची जडणघडण बघता त्यांनी दिलेली ही पहिली तिन्ही नावं स्वाभाविक म्हणावी लागतात. पण चौथं नाव आपल्या परिचयाचं नसतं, त्यामुळे आपण भांबावतो. रॉबर्ट इंगरसॉल हे पाश्चात्त्य विचारवंतांपैकीही बिनीचं नाव नाही. पण त्यांचा प्रभाव प्रबोधनकारांवर आहे. `द ग्रेट अग्नोस्टिक` म्हणून ओळखले जाणारे इंगरसॉल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पाठिराखे होते. त्यांचा जन्म १८३३चा आणि मृत्यू १८९९चा. यादवी युद्धाच्या काळात त्यांची संघटित धर्म आणि त्याच्या देव संकल्पनेवरची टीका करणारी भाषणं अमेरिकेतल्या नव्या विचारांना दिशा देणारी ठरली होती.
इंगरसॉलच्या विचारांची ओळख छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना करून दिली होती. त्यांनी प्रबोधनकारांना वाचनासाठी केलेलं मार्गदर्शन असं होतं, `अमेरिकेतली आरपीए सीरीजची पुस्तके चांगली अभ्यास कर. इंगरसॉल्स रायटिंग्ज अँड स्पीचेस तर नेहमीच अभ्यासात असली पाहिजेत. इंगरसॉल वाचल्याशिवाय समाजस्रुधारणेची भाषा कोणी बोलू नये.` इंगरसॉलच्या ग्रंथांसह शाहू महाराजांनी सांगितलेला एकही ग्रंथ प्रबोधनकारांच्या संग्रही नव्हता. त्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी महाराजांनी प्रबोधनकारांना मदतही केली. प्रबोधनकारांना इंगरसॉलच्या विचारांची दीक्षा शाहू महाराजांनीच दिली. त्यानंतर प्रबोधनकार इंगरसॉलच्या स्फोटक आणि बुद्धिवादी विचारांनी भारले गेले. `आचार विचाराचे पूर्ण स्वातंत्र्य हा माणसाचा अधिकार आहे,` हा त्याचा विचार प्रबोधनकारांना फार आवडलेला होता.
`अमेरिकेचा जबरदस्त बुद्धिवादी सत्यशोधक` या लेखात प्रबोधनकार इंगरसॉलचा परिचय वाचकांना करून देताना लिहितात, `तळमळीचा नि साक्षेपी बुद्धिवादी सत्यशोधक मानवी जीवनाच्या किती खोल मूलग्राही तत्त्वविवेचनापर्यंत जाऊ शकतो, याचा पडताळा इंगरसॉलच्या ग्रंथाध्ययनानेच पडणारा आहे. सत्य म्हणजे काय, देवदेवतांचे थोतांड, पवित्र (?) धर्मग्रंथ काय आहेत?, आपले विमोचन कसे साधता येईल?, पुरुष स्त्रिया नि मुलांच्या मुक्तीचा मार्ग, भुताखेतांची प्राबल्ये, इत्यादि
इंगरसॉलच्या भाषणांचे केवळ मथळेच पाहिले, तर जागतिक बुद्धिवादाच्या फैलावासाठी या महापुरुषाने विवेचकशक्तीची केवढी विराट तपश्चर्या केलेली असेल, याचा तेव्हाच बोध होतो.` १९६८ साली जळगावच्या बातमीदार साप्ताहिकात या लेखापाठोपाठ प्रबोधनकारांनी इंगरसॉलच्या एका लेखाचा केलेला अनुवादही छापलेला आहे.
एखादा विचार कोळून पिणे, हा प्रबोधनकारांचा स्वभावधर्मच होता. ते या चारही विचारवंतांचं विचारधन कोळून प्याले होते. याचा अर्थ असाही नाही, की ते या चौघांपैकी कुणाचेही अनुयायी होते. त्यांना कोणत्याही एका विचारधारेच्या चौकटीत बसवणं शक्यच नव्हतं. ते स्वतःचा स्वतंत्र विचार शोधत राहिले. त्यावर इमाने इतबारे चालत राहिले. त्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं आणि त्यांनी स्वतःचा विचार घडवलं. त्यात प्रबोधनकारांना या चार महान विचारवंतांच्या वाचनाने सर्वाधिक मदत केली. हे ते कृतज्ञतापूर्वक नोंदवतात.`