अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, मंगळ-केतू-रवी वृश्चिकेत, बुध धनु राशीत, शनी-प्लूटो-शुक्र मकरेत, गुरू-नेपच्यून कुंभेत, हर्षल (वक्री) मेषेत, चंद्र कुंभेत त्यानंतर मीन आणि सप्ताहाच्या अखेरीस वृषभेत.
दिनविशेष – १४ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी, १६ डिसेंबर रोजी धनुर्मास आरंभ, १८ डिसेंबर रोजी दत्तजयंती, दिवसभर पौर्णिमा.
मेष – येत्या आठवड्यात संमिश्र स्वरूपाचे अनुभव येणार आहेत. मंगळ-केतू-रवी अष्टमात आहेत, त्यामुळे गुप्त कटकारस्थान करण्याचे धाडस केलेत तर लेने के देने पड जायेंगे. सावध राहा. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा मोह चांगलाच महागात पडू शकतो. सरकारी खात्यात नोकरी किंवा राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर उच्च ठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर बढती मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. बेजबाबदारपणाचे वागणे टाळा. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळतील, त्यामुळे गाडी रुळावर येईल. आरोग्याची काळजी घ्या, रक्तदाबाच्या संदर्भात सावध राहा.
वृषभ – शुक्राचे शनीबरोबर राजयोगकारक भ्रमण होत असल्यामुळे या आठवड्यात अनेक शुभघटनांचा अनुभव येईल. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करत असाल तर या काळात नवा मार्ग सापडेल. कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. सप्तमातील केतू-मंगळ-रवी यांच्या युतीमुळे वैवाहिक मतभेद घडतील. काही कारणामुळे कलहाची स्थिती देखील निर्माण होऊ शकते. व्यवसायात भागीदार असेल तर त्याच्याबरोबर देखील वादाचे प्रसंग घडतील. परिस्थिती पाहून वागा.
मिथुन – रेल्वे, टपाल खाते, बँक या ठिकाणी काम करत असाल तर हा आठवडा शुभ घटनांचा अनुभव देणारा ठरणार आहे. धार्मिक यात्रेच्या निमित्ताने प्रवास घडतील. त्रिक स्थानात विपरीत राजयोग निर्माण झाल्यामुळे आनंदाचा काळ राहील. षष्ठातल्या मंगळ-केतू आणि रवीच्या युती योगामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. शत्रूवर सहजपणे मात कराल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारप्राप्तीचे योग आहेत. खेळाडूंना बक्षीस मिळवण्याची संधी चालून येईल. राजकीय व्यक्तींसाठी उत्तम काळ.
कर्क – अनपेक्षित लाभाचा, भाग्यवर्धक सुखद घटनांचा काळ या आठवड्यात अनुभवायला मिळेल. चंद्राचे मंगळाबरोबरचे भाग्यातील भ्रमण, मंगळ-चंद्र-रवी नवपंचमयोग यामुळे हे योग जमून येत आहेत. सप्तमात असणार्या शुक्र-शनी-प्लूटो यामुळे कौटुंबिक सुखात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे निराश व्हाल. घरात एखाद्या चांगल्या कामात वृद्ध व्यक्तीकडून अडचण निर्माण होईल. शिल्पकार, चित्रकार यांच्यासाठी उत्तम काळ राहणार आहे. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी, शास्त्रशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.
सिंह – घरातले स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. सुखस्थानातील अंगारक योग आणि रवी-केतू यांचा ग्रहणयोग यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. सप्तमातील गुरू अनेक गोष्टींमध्ये मदतनीस म्हणून काम करेल. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात सकारात्मक पाऊल पडेल. मात्र, काही ठिकाणी अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी जादाचे अधिकार मिळतील. पण विरोधक त्रास देतील. जमिनीच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा, अन्यथा सरकार दरबारी त्रास होऊ शकतो.
कन्या – या आठवड्यात आरोग्याची काटेकोरपणे काळजी घ्या. खासकरून महिलांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शारीरिक व्याधीमुळे दवाखान्याची पायरी चढावी लागू शकते. मंगळाची चतुर्थदृष्टी षष्ठम भावावर असल्यामुळे आजारपण पटकन लक्षात येणार नाही. पराक्रम स्थानातील रवी-मंगळ-केतू सामर्थ्यवान बनवतील. अधिकार गाजवाल. हातून एखादे चांगले काम घडेल. लेखक, पत्रकार, यांना चांगला काळ. एखादी बिंग फोडणारी बातमी मिळेल.
तूळ – पदार्थ गोड लागला, म्हणून पोटाच्यावर खाऊ नका, अन्यथा आजारपणाला निमंत्रण देऊन बसाल. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. त्यात कोणतीही चूक करू नका. शुक्राचे योगकारक शनीबरोबर सुखस्थानात भ्रमण होत असल्यामुळे घरातील वातावरण छान राहील. संशोधक, व्यावसायिक, शेतीविषयक व्यवसाय करणारी मंडळी, सुका मेवा, मसाल्याचे पदार्थ याचा व्यवसाय करणारी मंडळी यांना हा काळ चांगला जाणार आहे. मेडिकल क्षेत्रात काम करणार्या मंडळींना लाभदायक काळ. वाहन चालवताना जपून राहा. डोळ्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. पौर्णिमा मानसिक त्रास देणारी राहील.
वृश्चिक – काहीही झाले तरी रागावर ताबा ठेवा. अन्यथा बनणारे काम बिघडू शकते. केतू-मंगळ अंगारक योग आणि केतू-रवी ग्रहणयोग यामुळे मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. कामाच्या ठिकाणी खूप श्रम होतील. कुटुंबासाठी हात मोकळा ठेवावा लागेल. आर्थिक आवक मात्र, चांगली राहणार आहे. अर्थिक कमाईसाठी अनुकूल काळ. प्रवासात नवीन ओळखी होतील. विवाहेच्छु मंडळींना चांगले स्थळ मिळण्याचे योग आहेत.
धनू – या आठवड्यात मनासारख्या घटना घडतील. नवीन नोकरी शोधात असाल तर नवीन संधी चालून येईल. कामाच्या निमित्ताने परदेशात प्रवासाचे योग येतील. षष्ठ भावावर मंगळ-केतूची दृष्टी आहे. अजून कोरोना गेलेला नाही त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नकोच. भान ठेऊन प्रवास करा, अन्यथा एखादे आजारपण मागे लागेल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. अचानकपणे दाताचा त्रास जाणवेल. शुक्र-शनीच्या द्वितीयेतील स्थितीमुळे धनप्राप्तीसाठी उत्तम काळ आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांसाठी उत्तम काळ आहे.
मकर – समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे. खास करून सामाजिक सेवा करणार्यांना हा आठवडा चांगला जाणार आहे. लाभातील रवी-मंगळ-केतूच्या योगामुळे अनपेक्षित लाभ होतील. शेअरमध्ये पैसे कमावण्यासाठी उत्तम आठवडा आहे. महागड्या वस्तूची खरेदी होईल. लेखक, गायक, वादक, प्रकाशक, यांना अनपेक्षित लाभ मिळतील. नवी नोकरी मिळवण्यासाठी प्रवास होईल. ब्रोकरेजचा व्यवसाय करणार्यांना अनपेक्षित चांगले लाभ मिळतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी एखादे बक्षीस मिळेल.
कुंभ – येत्या आठवड्यात खर्च वाढणार आहे. सुखस्थानात राहू, दशम स्थानातले मंगळ-केतू-रवी यामुळे नोकरदार मंडळी आणि राजकीय व्यक्ती यांना तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका बसेल. साडेसाती सुरू आहे. एखादा अपघात होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. न्यायालयात वाद सुरू असेल तर तो पुढे ढकला, अन्यथा विरोधात निर्णय जाऊ शकतो. विद्यार्थ्यांचे कौतुक होईल. गौरवचिन्ह, मानधन मिळेल.
मीन – राशिस्वामी गुरूचे व्ययात भ्रमण होत असल्यामुळे विदेशात व्यवसायाच्या संदर्भात चर्चा सुरू असल्यास त्यामध्ये चांगले यश मिळेल. त्यामधून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. धार्मिक आणि तीर्थयात्रांच्या माध्यमातून मानसिक समाधान मिळेल. सामाजिक कामात सढळ हाताने मदत कराल. आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थीवर्गास शुभ आणि लाभदायक आठवडा राहणार आहे.