अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभ राशीत, केतू तूळ राशीमध्ये, रवि-बुध-प्लूटो मकर राशीत, शनि-नेपच्युन-शुक्र कुंभ राशीत, गुरु मीन राशीत, चंद्र तुळेत त्यानंतर वृश्चिक आणि अखेरीस धनु राशीत. १६ फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत, १४ फेब्रुवारीला रवि कुंभेत. दिनविशेष : १६ फेब्रुवारी विजयस्मार्त एकदशी, १७ फेब्रुवारी रोजी भागवत एकादशी.
– – –
मेष : शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. रवि-शुक्र राश्यांतर व शुक्राचे मीन राशीतील राश्यांत यामुळे चांगला काळ येईल. कीर्तनकार, प्रवचनकारांना उत्तम अनुभव येतील. खर्च वाढेल, पण त्याचा ताण येणार नाही. नोकरीत कौशल्य पणाला लावा. राजकारण, कायदा, विज्ञान संशोधन या क्षेत्रांत काळ उत्तम राहील. व्यवसायात नव्या संधी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने चिडचिड होईल. नवीन गुंतवणुकीचा विचार पुढे ढकला.
वृषभ : शनि आणि रवी महिनाभर सोबत राहणार असल्याने राजकीय आणि सरकारी मंडळींकडून त्रास होईल. आर्थिक देवाणघेवाणीत पारदर्शकता ठेवा. पतप्रतिष्ठा जपा. कुटुंबात वादविवाद घडतील. कोर्टकचेरीच्या कामाला उशीर होईल. शनि-मंगळाची दृष्टी सप्तम भावावर असल्याने व्यवसायात भागीदाराशी हेवेदावे निर्माण होतील. स्वराशीच्या गुरूमुळे आर्थिक आवक उत्तम राहील. अनपेक्षित आनंददायक घटना घडतील, घरातले वातावरण चांगले राहील. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल.
मिथुन : आर्थिक स्थिती भक्कम राहील, पण पैसे कसेही खर्च करणे टाळा. नोकरी-व्यवसायात बाजू भक्कम राहील. नवीन व्यवसायाची संधी चालून येईल. शनिसोबत रवी असल्याने उत्तम कामगिरी होईल. गुरु-शुक्राच्या दशमस्थानातील भ्रमणामुळे भाग्योदय होईल. टूर, ट्रॅव्हल, सौंदर्य प्रसाधने, मेकअप आर्टिस्ट, चित्रकार यांना चांगला आर्थिक लाभ होईल, नव्या कामाच्या संधी दाराशी येतील. नावलौकिक मिळेल. विवाहासाठी उत्तम काळ. शनि-मंगळाची दृष्टी षष्ठम भावावर असल्याने आरोग्य सांभाळा.
कर्क : वडिलोपार्जित मालमत्ता, जागा खरेदी-विक्री, कुटुंबासोबत देवदर्शन, सहल, यामुळे हा काळ उत्तम जाईल. भाग्य भावात गुरुमुळे चांगल्या संधी चालून येतील, भविष्यात त्यामधून चांगले आर्थिक लाभ मिळतील. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. तिथे मनासारख्या घटना न घडल्यामुळे नाराज व्हाल. सामाजिक कामासाठी वेळ द्याल. पत्रकार, लेखकांसाठी चांगला काळ राहील.
सिंह : जनसंपर्क, समाजसेवा, कायदा या क्षेत्रात विपरीत अनुभव येतील. शत्रूपासून दोन हात दूरच राहा. अचानक धनलाभ होईल. दुसर्या बाजूला खर्च वाढेल. सरकारी सेवेत जपून राहा. कामाच्या ठिकाणी कटकट होईल. कोणताही निर्णय थंड डोक्याने घ्या, नोकरीत वेगळे अनुभव येतील. थंड डोक्याने घ्या. संततीकडून चांगली बातमी कानावर येईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण हवे.
कन्या : वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. नव्या महागड्या वस्तूची खरेदी होईल. गुरु-शुक्र सप्तमात आल्यामुळे नोकरी, कला, कायदा या क्षेत्रात काम करणार्यांना चांगले रिझल्ट मिळतील. षष्ठ भावात येणारा रवी शनिसोबत राहणार असल्याने युनियन लीडरांचे वरिष्ठांबरोबर वाद होतील. नोकरांकडून त्रास होईल. महत्वाच्या कामाला उशीर होईल. व्यवसायवृद्धी होण्याची शक्यता आहे. पत्नीकडून चांगले सहकार्य मिळेल.
तूळ : काही पाप ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ-अशुभ घटनांचा अनुभव येईल. गुरु आणि शुक्राच्या विपरीत राजयोगामुळे आप्तेष्टांकडून लाभ होतील. वारसा हक्काने एखादा लाभ होईल. अंगाशी आलेला एखादा विषय मार्गी लागेल. संततीकडून शिक्षणात समाधानकारक कामगिरी होणार नाही. हृदयविकारग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी सट्टा, जुगार, शेअर मार्वेâट यापासून दोन हात दूरच राहा.
वृश्चिक : घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. नोकरीनिमित्ताने विदेशात जावे लागेल. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात चांगले यश मिळेल. प्रेमप्रकरणात वादाचे प्रसंग निर्माण होतील. तुटेपर्यंत ताणू नका. संततीसाठी उत्तम काळ. कथाकार, पत्रकार, संपादकांसाठी उत्तम काळ आहे. नव्या विषयांवर संशोधन होईल. त्याचा फायदा होईल. शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम काळ राहील.
धनु : प्रगतीचा काळ आहे. नोकरी, उद्योगात अधिकारप्राप्तीचा योग आहे. समाजसेवकांचा सन्मान होऊ शकतो. काहींना कानदुखी, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. भागीदारीतून चांगली कमाई होईल. विद्यार्थीवर्गाला मेहनत घ्यावी लागेल. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. नोकरवर्गाकडून सहकार्य मिळेल, त्यामुळे काम सोपे होईल.
मकर : व्यसनाच्या प्रेमात पडू नका. शत्रूवर मात कराल. नोकरीत मोठी जबाबदारी खांद्यावर येईल. पण त्यामुळे काही वादही घडतील. १५ आणि १६ तारखेच्या गुरु-चंद्र नवपंचम योगामुळे व्यवसायातील भागीदार, जोडीदार, यांच्यात चांगले वातावरण राहील. संततीला मैदानी खेळात यश मिळेल. बुद्धीकौशल्याच्या जोरावर बाजी मारून न्याल. नवे घर खरेदी करण्याचा विचार मार्गी लागेल.
कुंभ : धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात चांगला काळ राहील. शेअर बाजारात मोठा घाटा होऊ शकतो. त्या वाटेल जाणे तूर्तास टाळा. व्यवसायात मनासारखी आर्थिक उलाढाल होईल. खिशात चांगले पैसे राहतील. घरात वाद घडतील. शनि मंगळाची सप्तम भावावर दृष्टी असल्याने काम नियोजनपूर्वक करा, जोखीम घेऊन ते पूर्ण करा, नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
मीन : संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. चांगले लाभ मिळतील. शेतकर्यांना चांगले लाभ होतील. शनिची धनस्थानावर दृष्टी असल्याने आर्थिक बाजू भक्कम राहील, नेमके नियोजन करा. जुनी येणी मिळण्यास उशीर होईल. खर्च करताना काळजी घ्या, चुकून दिशाभूल झाल्यास मोठा तोटा होऊ शकतो. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. सुटीच्या दिवशी सहकुटुंब सहलीसाठी बाहेर पडाल.