त्या दिवशी सक्काळी सक्काळी माझा मानलेला परममित्र पोक्या तणतणतच घरी आला तेव्हा मी ओळखलं की स्वारीचं काहीतरी बिघडलं आहे. आल्या आल्या तो टेबलावर हात आपटत चित्कारला, टोक्या हे सगळं काय चाललंय? त्या दाढीवाल्यांना मुख्यमंत्री केल्यापासून कोणताही निर्णय घेताना त्यांची नजर दिल्लीकडे का असते? महाराष्ट्राचा अपमान होत असताना या शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेल्या गद्दारांची त्याविरुद्ध आवाज करण्याऐवजी दातखिळी का बसते? ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या स्वाभिमानगीताला राज्यगीताचा दर्जा देताना दिल्लीला बोचणारे एक कडवे गाळताना त्यांना लाज कशी वाटत नाही? हा महाराष्ट्राचा अपमान नाही काय? मी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेतलं आणि त्याला विचारलं, पोक्या या गीताविषयी तुला काय माहिती आहे?
– आपल्या शाहीर साबळेंनी गायलंय ते खड्या आवाजात. आजही ते ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. महाराष्ट्राविषयीचा स्वाभिमान जागा होतो. मला ते तोंडपाठ आहे. आणखी काय पाहिजे!
– हे बघ पोक्या, या गीताचे गीतकार राजा बढे, संगीतकार श्रीनिवास खळे आहेत, हे आणि अठ्ठावीस बोलीभाषांमध्ये ते गायलं गेलं आहे, हे तुला माहीत आहे का?
– नाही. त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण या राज्यकर्त्यांनी जो अपमान केला आहे त्यांना क्षमा नाही. त्याविरुद्ध मी काय करू?
– पोक्या, प्रमुख नेत्यांच्या तू या गैरप्रकाराबद्दल मुलाखती घे. आपण त्या सर्व प्रसारमाध्यमातून व्हायरल करू.
– आताच त्या दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांकडे जातो. निघतोच… पोक्या तसाच तणतणत सायकलवरून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर थेट पोहोचला आणि त्यांच्या दालनात घुसलाही.
– ओऽऽ मुख्यमंत्री, महाराष्ट्रगीताला राज्यगीताचा दर्जा देताना त्यातील ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे शब्द असलेलं कडवं का गाळलंत? कोणाचे आदेश आले होते?
– ते मला तसं सांगता येणार नाही. जसे त्यांचे आदेश येतात, त्याप्रमाणे मला करावं लागतं. सगळे निर्णय कोण घेतं हे तुम्हालाही माहीत आहे. मी फक्त सह्या करतो.
– महाराष्ट्राचा अपमान करून मजा बघत राहायचे हेच धंदे ही भाजपची नेतेमंडळी करतात ना? आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसता. महाराष्ट्राचा अपमान होत असताना तुमची दातखिळी का बसते?
– मी त्यांचा बंदा आहे. प्रिय मोदीजी मला देवासमान आहेत. त्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. मी त्यांचा माणूस आहे.
– लक्षात ठेवा, स्वर्गातून शाहीर साबळे तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. येतो मी. मला उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घ्यायला जायचंय…
– नमस्कार फडणवीसजी…
– मी शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी हे कडवे गाळण्याचे कारस्थान केलं असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. मी माझी तपास यंत्रणा कामाला लावली आहे.
– तुमच्या संघाच्या प्रार्थनेतलं एक जरी कडवं गाळलेलं चालेल का?
– या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र तोपर्यंत हे सरकार टिकायला हवं.
– असे धंदे केले तर तुमचं सरकार कधीच टिकणार नाही. मराठी माणसाचे तळतळाट भोवतील या सरकारला. आता ते दीपक केसरकर या प्रश्नावर काय दिवे उजळतात ते ऐकायला जातो.
– नमस्कार दीपकजी, टेन्शनमध्ये दिसताय.
– नो टेन्शन. कर नाही त्याला डर कशाला? आपण राज्यगीताचं कडवं गाळल्याचा जाब विचारायलाच आलात ना?
– हो.
– काय असतं बघा. एखाद्या घटनेचा सर्व अँगलनी विचार केला तरच आपण सत्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो. घटना घडण्यापूर्वीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे, नाहीतर तिचे दुष्परिणाम अटळ असतात.
– पण हे कडवं गाळण्याचं कारस्थान कुणाचं आणि त्यामागचा हेतू काय असू शकतो?
– हेतू वगैरे शब्द म्हणजे ते हायपॉथेटिकल इश्यू पोलिटिकलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा एक सार्वबाधित विचार होऊ शकतो. पण त्यावरून आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही. विख्यात मानसशास्त्रज्ञ पोकॉक याबद्दल काय म्हणाला होता माहीत आहे?
– तुम्ही मला मुद्द्याचं सांगा. पोकॉक की कोकॉक नको.
– ते तेवढं सोपं नाही. त्यासाठी डीप जाऊन विचार केला पाहिजे.
– तुम्ही विचार करत बसा. मला बावनकुळे यांच्याकडे जायचंय.
– नमस्कार, प्रतिक्रियासम्राट आदरणीय बावनकुळे साहेब.
– बावन्न पत्त्यांतील हुकुमाचा पत्ता मी बरोबर ओळखतो. तुमचा प्रश्न फजूल आहे. ती टायपिंग मिस्टेक असू शकेल किंवा टायमिंग मिस्टेक असू शकेल. होतं असं कधी कधी. त्यामुळे तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठू नका. आणि ते कडवं गाळण्याचे आदेश जर दिल्लीवरून आले असतील, तर आम्ही काहीच बोलू शकत नाही. त्यांचा त्यामागे निश्चितच काही चांगला हेतू असू शकेल.
– इतका कोडगेपणा राज्यकर्त्यांच्या अंगी येतोच कसा?
– मोदीसाहेब १० तारखेला मुंबईत येतच आहेत. त्यावेळी मी या विषयावर खोलात जाऊन चर्चा करीन.
– कसले पुळचट नेते आहेत तुमचे. येतो मी. मला मुनगंटीवारांकडे जायचंय. नमस्कार मुनगंटीवार साहेब. तुम्ही तरी या कृत्याबद्दल काहीतरी दिलासा देणारं बोलाल अशी आशा आहे.
– मी काही बोलावं अशी घंटी डोक्यात अजून वाजलेली नाही. हे कर्म कोणी केलं याची माहिती अधिकृतपणे मिळत नाही, तोवर यावर काही बोलणं म्हणजे आगाऊपणा ठरेल. मी नीट माहिती घेतो आणि महाराष्ट्राला माझ्याकडील माहिती देतो.
– पण आयत्यावेळी कच खाऊ नका, मला किरीटजींकडे जायचंय. नमस्कार किरीटजी, ते महाराष्ट्र गीतातील…
– तो माझा विषय नाही. ईडीबिडीविषयी असेल तर बोला. आधीच मी नको तिथे हात घालून अवलक्षण करून घेतलं आहे. यापुढे अधिक बेअब्रू नको. या तुम्ही.
मी म्हणालो, पोक्या, लांबी वाढली म्हणून कडवं कापलं असं हे आता सांगतील. पण, महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही.