अशी आहे ग्रहस्थिती
राहू आणि हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ-वृषभेत, शुक्र-रवि सिंहेत, बुध (वक्री)- कन्येत, केतू-तुळेत, शनि आणि प्लूटो (वक्री)- मकरेत, गुरु आणि नेपच्युन (वक्री) मीन राशीत, चंद्र-कुंभेत, त्यानंतर मीन, मेष राशीत आणि सप्ताहाच्या अखेरीस वृषभ राशीत.
दिनविशेष – १० सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा, १३ सप्टेंबर रोजी पितृपक्ष प्रारंभ आणि अंगारक संकष्टी चतुर्थी.
मेष – आगामी काळ खास करून तरुणवर्गाला रोमांचकारी अनुभव देणारा रहाणार आहे. मेष लग्न असणार्या मंडळींचे कुठे प्रेमाचे गुफ्तगू सुरु असेल तर त्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीच्या जोडीदाराबरोबर आऊटिंगसाठी बाहेर जाताल. संगीत, कला, साहसी खेळ या क्षेत्रात काम करणार्या मंडळींना खास अनुभव येतील. येत्या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. नोकरीत उत्तम काळ राहील. धार्मिक कार्यासाठी प्रवास घडले. आठवड्याची सुरवातच एका छोट्या प्रवासाने होणार आहे. एकंदरीत येणारा आठवडा चांगला जाईल.
वृषभ – आर्थिक स्थिती उत्तम असेल. वक्री पंचमातील बुध त्यामुळे खिशात पैसे रहातील. शेअर बाजार, लॉटरी, गेम्स यामधून चांगला फायदा पदरात पडेल. लाभेश गुरु (वक्री) आणि बुध (वक्री) त्यामुळे जुनी येणी अनपेक्षितरित्या वसूल होतील. रोमँटिक अनुभव येतील. चांगल्या अनुभवाची मेजवानी देणारा काळ राहणार आहे. विक्री शनि भाग्यात त्यामुळे धर्म, कर्म, परोपकार या माध्यमातून मानसिक समाधान मिळेल. विवाह इच्छुक मंडळींना पितृपक्षाच्या तोंडावर बातमी मिळेल.
मिथुन – एखादी स्थावर मिळकत, नव्या वस्तूची खरेदी होईल. बुधाचे वक्री भ्रमण सुखस्थानातून होत आहे. कामाच्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहाराची काळजी घ्या. वक्री गुरु नेपच्युनचा बुद्धीबरोबर दृष्टियोग होत आहे, त्यामुळे काळजी घ्या. पितृपक्ष सुरु आहे, त्यामुळे घाईत कोणत्या कागदावर सही करू नका. छोटेखानी प्रवास घडेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती रहाणार आहे. शेजार्यांबरोबर गाठीभेटीचा योग जुळून येत आहे. चंचल स्वभाव वाढलेला दिसेल. काही मंडळींना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जुने आजार उफाळून येतील एखादी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
कर्क – येणार्या काळात चांगले अनुभव येतील. कामाच्या ठिकाणी चांगली स्थिती राहणार आहे. कोणत्या कारणामुळे जर आर्थिक कोंडी झालेली असेल तर त्यामधून सुटका होईल. मंगळाचे लाभतील भ्रमण, शुक्राचे धनस्थानातील भ्रमण, त्यामुळे लाभाची स्थिती राहणार आहे. जमीन-जुमला, प्रॉपर्टी यामधून पूर्वी केलेल्या व्यवहाराचे पैसे पदरात पडतील. संततीसाठी उत्तम आठवडा राहणार आहे. सप्तमातील वक्री शनी आणि प्लूटो कौटुंबिक वातावरणात खोडा घालतील. घरात काही ना काही कारणामुळे कुरबुरी होतील. त्याकडे दुर्लक्ष करा, म्हणजे आठवडा चांगला जाईल हे निश्चित.
सिंह – सप्ताहाची सुरवातच विपरीत राजयोगाने होणार आहे. रवीचे लग्नातील स्वराशीतील भ्रमण, सोबत दशमाधिपती शुक्र, योगकारक मंगळ दशमभावात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवाल. आपल्या इच्छेनुसार सकारात्मक बदल घडतील, त्यामुळे उत्साह आणि जोश वाढलेला दिसणार आहे. सरकारी नोकरदार मंडळींना उत्तम आठवडा जाणार आहे. महिलांना पोटात सूज, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे झाले.
कन्या – कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता निर्णय घेतल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावधपणे पावले टाका. अतिउत्साह टाळा. प्रवासात खिशाला आर्थिक चाट लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला अपयश येण्याची शक्यता आहे. वक्री गुरूमुळे जनमानसात चांगली छाप पडेल. उद्योग क्षेत्राला फारसा अनुकूल काळ रहाणार नसला तरी आगामी कळत चांगले लाभ मिळालेले दिसतील. घेतलेले निर्णय लाभदायक ठरणार आहेत.
तूळ – आगामी आठवडा सुखात जाणार असला तरी सगळ्याच बाबतीत तुमची स्थिती मनासारखी रहाणार आहे. शनि (वक्री) सुखस्थानात वक्र दृष्टी दशमभावावर त्यामुळे उद्योगात मंदी आलेली दिसेल. अधिकारक्षेत्रात थोडी पिछेहाट झालेली दिसेल. अपेक्षापूर्ती होईल, पण समाधान होणार हानी. वक्री बुधामुळे प्रवासात तारांबळ उडेल. लग्नातील केतूमुळे संभ्रम निर्माण झालेला दिसेल. आपले मत पक्के करून निर्णय घ्या. वाहन त्रास देईल. घरात जर पाळीव प्राणी असतील तर ते आजारी पडतील.
वृश्चिक – आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे आपला दबदबा वाढणार आहे. केलेल्या कामाची पावती १६ सप्टेंबरनंतर मिळेल, यात वाद नाही. वक्री बुधामुळे आर्थिक आवक आणि अपेक्षित असणारा लाभ यामध्ये पेचाचा प्रसंग निर्माण करेल. पण आर्थिक स्थितीची चिंता राहणार नाही. विरोधक नाकं होतील. धार्मिक वृत्तीच्या मंडळींना विलक्षण अनुभव येतील. वक्री शनी, नेपच्युन प्लूटो नवपंचम योग यामुळे कोणताही व्यवहार करताना आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. काहीजणांना खांदेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
धनु – तुमच्यासाठी येणार काळ संमिश्र घटनांचा अनुभव देणारा राहणार आहे. उद्योग-व्यवसायासाठी लाभदायक आठवडा राहणार आहे. एखाद्या कामातून चांगला लाभ मिळू शकतो. लेखक, पत्रकार, मुद्रक अशा मंडळींसाठी अत्यंत लाभदायक काळ राहणार आहे. भाग्यातील रविमुळे घरात धार्मिक कार्ये घडतील. समाजात पत वाढवणारा एखादा प्रसंग घडेल. ११ ते १३ या कालावधीत नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. वक्री शनि धनस्थानात त्यामुळे पैसे जरा जपून खर्च करा.
मकर – तांत्रिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी उत्तम काळ रहाणार आहे. साडेसातीचा काळ सुरु असला तरी कामे वेगात पुढे जातील. प्रवासात नवीन ओळखी होतील. सामाजिक क्षेत्रात कामी करणार्या मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. राहू-केतूमुळे स्थिती काहीशी असमाधानकारक राहील, पण त्याकडे फारसे लक्ष न देणे योग्य राहील. गुरुकृपा राहील. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील.
कुंभ – ‘आ बैल मुझे मार’ अशी काहीशी अवस्था राहणार आहे. त्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. कर्ज काढून सण साजरा करण्याची परिस्थिती ओढवेल. आठवड्यातील पाच दिवस खूपच खर्चिक ठरणारे रहातील. काही मंडळींना परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. प्रवासात वस्तू सांभाळा. होमिओपॅथी, आयुर्वेद यामध्ये काम करणार्या मंडळींना घवघवीत यश मिळे. शेअर बाजारातून चांगला लाभ होईल.
मीन – आनंददायी स्वरूपाचा आठवडा जाणार आहे. काही मंडळींना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. अधिक धावपळ अंगाशी येऊ शकेल. उच्च रक्तदाब, असणार्या मंडळींनी विशेष काळजी घ्यायला हवी. संततिसाठी एकदम उत्तम आठवडा राहणार आहे. घरातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी एकदम उत्तम आठवडा राहाणार आहे. विवाह इच्छुक मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे.