भारत-पाकिस्तान आशिया कप क्रिकेट सामन्यासाठी मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या आम्ही दोघे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिळालेल्या फ्री पासेसच्या गठ्ठ्यातील दोन पास मिळवून दुबईला अगदी व्हीआयपी कोट्यातील सर्व सुखसोयी मिळवून गेलो होतो. राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये होती. खाण्यापिण्याच्या सर्व पाहुणचाराची लयलूट होती. मुंबई आणि नवी दिल्लीत ईडीने अनेक फॅसिलीटी दिल्या असल्या, तरी आम्ही मूळचे सडाफटिंग असल्यामुळे ती वृत्ती काही जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी लपून राहात नाही. कोणतीही गोष्ट एन्जॉय करताना कसलीही लाजभीड बाळगायची नाही हा आमचा कणखर बाणा. त्यातून भारत-पाकिस्तान क्रिकेटची प्रत्येक मॅच म्हणजे नवं महायुद्धच असतं. त्याचा थरार आणि खुन्नस याचा जोश आगळाच. सीमेवर लढताना जवानांच्या अंगात देशभक्तीचा जितका जोश असतो, तितकाच जोश आणि जल्लोष या मॅचच्या वेळी प्रत्येक भारतीयाच्या मनात उफाळत असतो. वीस-वीस षटकांच्या मॅचमधील प्रत्येक षटक, त्यातील प्रत्येक चेंडू म्हणजे भारतीयांचा श्वास आणि निश्वास असतो. आपल्या हातात काही नसलं तरी दुष्मनाला ठेचून काढण्यासाठी आणि पार भुईसपाट करण्यासाठी आपलेही हात शिवशिवत असतात.
त्या दिवशी हजारो भारतीय चाहत्यांनी खच्चून भरलेलं व ‘इंडियाऽऽ इंडिया’ आणि ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या गजराने दणाणून जाणारं स्टेडियम, प्रेक्षकांच्या हातात लहरणारे तिरंगे आणि तिरंगी मेकपने लक्ष वेधून घेणारे कितीतरी भारतीय चेहरे जणू भारतातच ही मॅच सुरू आहे, असंच दर्शवत होते. आमच्या बाजूलाच अमित शहा यांचा बीसीसीआय अध्यक्ष असलेला सुपुत्र आणि त्याचे मित्र आसनस्थ झाले होते. पारडे वर-खाली होत सामना पुढे पुढे जात होता. दोन्ही संघ सावधपणे खेळत होते. भारतीय संघ ताकदवान असला तरी पाकिस्तानचे खेळाडूही तुल्यबळ वाटत होते. आरडाओरडा करत मैदानावर तमाशा न करणारा आणि अखिलाडू वृत्तीचं प्रदर्शन न करणारा पाकिस्तान संघ आम्ही प्रथमच बघत होतो. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला फलंदाजी दिली त्याचवेळी सामना आपण जिंकणार हे प्रत्येक भारतीय गृहीत धरून चालला होता. पाकिस्तानचा डाव १४६ धावांत आटपल्यावर सावधगिरीने बॅटिंगने करत लक्ष्य गाठण्याची किमया करणं प्राप्त होतं. पण पाकिस्तानी गोलंदाजांनी आपल्या भरवशाच्या खेळाडूंना खिंडीत गाठलं आणि पुन्हा खेळाचं पारडं वरखाली होऊ लागलं.
भारतीय प्रेक्षक पाकिस्तानी प्रेक्षकांच्या तुलनेने अधिक होते. त्यामुळे स्टेडियमभर प्रेक्षकांच्या हातात तिरंगे फडकत होते. भारतीय खेळाडूने षटकार किंवा चौकार ठोकला की स्टेडियमभर जल्लोष आणि तिरंग्यांची लाट लहरताना दिसायची. हार्दिक पंड्याने जबरदस्त फलंदाजी करत भारताला पराभवाच्या भीतीतून बाहेर काढले. शेवटच्या षटकात फक्त तीन चेंडू बाकी असताना त्याने मारलेला चौकार भारताला विजयश्री देऊन गेला. सारं स्टेडियम ‘इंडियाऽऽ इंडिया’च्या जयघोषाने दुमदुमलं. भारतीय प्रेक्षकांच्या हातातील तिरंगे फडकू लागले. तिरंगा हवेत फडकावून प्रेक्षक भारतीय संघाला सलामी देत होते. मी आणि पोक्याही तिरंगे फडकावत होतो. आमच्या रांगेत प्रत्येकजण तिरंगा हवेत फडकावत आनंद व्यक्त करत होते. कारण दहा वर्षांनंतर मिळालेला हा विजय रोमहर्षक आणि थरारक होता. तिरंगा नव्हता तो फक्त जय अमित शहा यांच्या हातात. या जल्लोषात त्यानेही सामील व्हावं म्हणून त्याच्या मित्राने स्वत:कडे असलेल्या दोन तिरंग्यांपैकी एक त्याच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. परंतु जयने मित्राचा हात झिडकारला आणि त्या मित्राचाच नव्हे, तर तिरंग्याचाही अपमान केला. चित्रवाणी कॅमेर्याने तर हे दृष्य टिपलेच, तसेच अनेक मोबाईलवरून ते ताबडतोब देशभर व्हायरल झाले. काही वाहिन्यांनी त्यावर टिप्पणी करत ते दाखवले, तर आमच्या पक्षाने पोसलेल्या अनेक वाहिन्यांनी ते अजिबात दाखवलं नाही.
स्वातंत्र्याच्या ७५व्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदींनी घर घर तिरंगा ही मोहीम देशभर नेहमीच्या प्रचारकी पद्धतीने राबवली. त्यांच्याच मित्राच्या आणि गृहमंत्र्यांच्या मुलाने भारताचा विजय झाल्यावर तिरंगा हातात घेण्यास नकार दिला आणि मित्राचा हात झिडकारून त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, ही घटना अमित शहा यांच्या या लाडक्या पुत्राचं मन किती ‘विशाल’ आहे हे सार्या जगाला दाखवून गेली. त्याच्या जागी एखादा लहान मुलगा असता तर त्यानेही मोठ्या हौसेने दुसर्याने दिलेला तिरंगा हसत हसत फडकावत भारतीय संघासाठी विजयाच्या घोषणा दिल्या असत्या, पण हे महाशय हिरमुसलेल्या तोंडाने नाईलाजास्तव हळूहळू टाळ्या वाजवण्याचं नाटक करत होते. हा मॅच पाहायला तरी कशासाठी आला होता? मॅच संपल्यावर घरोघरी नाचत, गात भारतीय संघाचा जल्लोष करत रस्त्यावरून जाणार्या माणसांची ओसंडून वाहणारी तुफान गर्दी आणि त्या गर्दीतही हातात झेंडे फडकावत चाललेले स्त्री-पुरुष पाहून जगभरातील भारतीयांना टीव्हीवर ही मॅच पाहताना अभिमान वाटला असेल, पण पिताश्री देशाचे गृहमंत्री असताना आपल्या या कृत्याने बापाचे आणि देशाचे नाव बदनाम करणार्या या संकुचित आणि कोत्या मनाच्या पुत्राचा उद्धार कोणत्या शब्दांनी करावा, असा प्रश्न पडतो.
अशी तिरसट मनोवृत्ती असलेली माणसं कधीच कसल्याही आनंदाचा उपभोग खुल्या मनाने घेऊ शकत नाहीत. अशा माणसांचे देशावर सोडा, स्वत:च्या पिताश्रींच्या हुद्द्यावर किती प्रेम असेल कोण जाणे! मला किंवा पोक्याला असा नुसता वयाने वाढलेला आणि अकलेने बुद्धू असलेला मुलगा असता आणि त्याने जर असं कृत्य केलं असतं तर त्याला आम्ही तिथल्या तिथे कानफटवला असता. शेवटी मोदी काय आणि अमित शहा काय दोघांच्याही अंगात एवढी गुर्मी असल्यावर त्यापैकी एकाच्या मुलामध्ये तिचा अंश उतरला असेल, तर त्याला दोष देण्यातही अर्थ नाही. कुठली झक मारली आणि त्यांच्या तिकीटाच्या कोट्यातून मॅच पाहायला गेलो याचा आता पश्चात्ताप होतोय.