कोविडकाळात लागू असलेल्या निर्बंधांमुळे सध्या बेस्ट आणि इतर परिवहन मंडळांच्या बसगाड्यांमध्ये स्टँडिंग प्रवासी घेण्यास मनाई आहे. मात्र, याचा फटका अनेक गजबजलेल्या बस स्टॉपवर तिष्ठत उभ्या असलेल्या प्रवाशांना बसतो आणि त्यांचे अनेक तास रिकाम्या बसची वाट पाहण्यात मोडतात. उदाहरणार्थ, मी रोज सकाळी नऊच्या सुमारास मुंबई अहमदाबाद हायवेवरील काशीमिरा या चौकातून कलानगरसाठी बस पकडतो.
या स्टॉपवर केवळ मिरा-भायंदरमधीलच नव्हे, तर वसई विरारकडून येणारे प्रवासीही बससाठी उभे असतात. भायंदर किंवा मिरा रोड स्टेशनांवरून सुटणार्या बसगाड्या या स्टॉपवर यायच्या आधीच भरलेल्या असतात. त्यांच्यातली एकही इथे थांबत नाही. मग प्रवाशांवर चढ्या दराने खासगी वाहनांतून प्रवास करण्याची वेळ येते. हाच प्रकार परतीच्या प्रवासात कलानगर येथेही पाहायला मिळतो. मुंबईहून बोरिवलीपलीकडच्या भागांसाठी थेट बसगाड्या नाहीत. त्या कलानगरवरूनच मिळतात. तिथेही मुंबईतून भरून आलेल्या बस थांबत नाहीत.
मुंबईकरांना लोकलप्रवासाची मुभा मिळेपर्यंत दिवसातून काही फेर्या थेट काशीमिरा येथून किंवा कलानगरवरून सोडल्या तर या स्टॉपवरच्या प्रवाशांचा आणि पुढच्याही स्टॉपवर तिष्ठावे लागणार्या प्रवाशांचा वेळ वाचेल. कोविडकाळातल्या प्रवासाच्या हालअपेष्टा कमी होतील. माननीय परिवहन मंत्री याची दखल घेतील काय?
– उदय मोरे,
अमर पॅलेस, मिरा रोड