माझा मानलेला परममित्र पोक्याने बारसंन्यास घेऊन हिमालयात जाण्याची घोषणा केल्यावर मला इतका मोठा धक्का बसला की मी त्यातून अजून सावरलेलो नाही. जोपर्यंत सरकार २४ तास बार खुले करण्यास परवानगी देत नाही, तोपर्यंत आपण संन्यासकृती मागे घेणार नाही, अशी पुरवणी मागणीही त्यांनी त्याबरोबर जोडली. पोक्याची ही बातमी सर्व चॅनलवरून वार्यासारखी व्हायरल झाल्यावर तर समर्थनासाठी त्याच्या बसण्याच्या अड्ड्यावर पियक्कडांच्या जमावाची तोबा गर्दी उडाली. सर्वांनी आपापला हवा तेवढा स्टॉक पिशव्या भरभरून विकत घेतला होता. त्याचं एक्स्चेंज नंतर सोयीने होणार होतं. मला राहवेना. मीही धावत धावत पोक्याच्या अड्ड्यावर आलो. पोक्या बाहेरच एका बाकावर मांडी घालून शून्यात नजर लावून तांबडे बाबांसारखा आसनस्थ बसला होता. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याबरोबर समाधीतून तो जागा झाला. मी म्हटलं, पोक्या हे काय वेडेपण आहे. अरे, विचार पटले नाहीत म्हणून कोणी संन्यास घेऊन हिमालयात जात नाही. कितीतरी राजकीय नेत्यांनी संन्यास घेण्याच्या घोषणा केल्या, पण आलेच ना शेवटी राजकारणात. आपल्या विश्वामित्रांची तपश्चर्या मेनकेने भंग केलीच ना! अर्जुनाचा त्रिदंडी संन्यास तुला माहीत आहे ना! मग तू अशा नको त्या कारणांसाठी संन्यास घेण्याची भाषा का बरं करतोस?
पोक्याच्या चेहर्यावरचे भाव बदलले नाहीत. त्याचे सुजलेले लाल लाल गाल काकोडकरांच्या कादंबरीतल्या नायिकेसारखे आरक्त झाल्यासारखे मला वाटले. पण ते त्याचा संतापाचा पारा चढल्याचे निदर्शक होते. मी म्हटले, पोक्या शांत हो. माझा तुला बाहेरून पाठिंबा आहे. मात्र तुझे डबल ढोलकीसारखे धोरण सोडून दे. कधी पाठिंबा, कधी छुपा विरोध, कधी पोलिसांशी तर कधी बारमालकांशी संगनमत असं चालणार नाही. बारबालांच्या मागे राहून काय मिळवलंस? बदनाम मात्र झालास. आपली अर्थव्यवस्था आज मोठ्या प्रमाणात पिणार्यांच्या लटपटत्या पायावर उभी आहे, हे त्रिवार सत्य आहे. पण याचा अर्थ बार चोवीस तास उघडे ठेवून ती भरभक्कम करण्याचा तुझा अर्थशास्त्रीय विचार आपल्या सामाजिक संस्कृतीला छेद देणारा आहे, असं नाही तुला वाटत? आपल्यासारख्यांचा या संकटांच्या काळात देशहिताला थोडाफार हातभार लागतो, इथपर्यंत ठीक आहे. पण संन्यास घेण्याचे आततायी विचार तू मनात आणू नकोस. तुझ्या समस्त पियक्कड बांधवांना आज इथे तुझी गरज आहे. तुझं काम त्या समाजसेवी सिनेनटाएवढंच महत्त्वाचं आहे. संन्यास घेऊन हिमालयात जाणं म्हणजे विक्रोळीच्या डोंगरावरील टपरीत टोळकं जमवून ढोसण्यासाठी जाण्याएवढं सोपं नाही. शिवाय हिमालयात थंडी केवढी असते माहीत आहे! तुला तिथे संन्यासवस्र अंगावर असताना गरम कपडेही घालता येणार नाहीत की पायात गरम मोजे आणि तोंडाला कानटोपीही गुंडाळता येणार नाही. कुडकुडून तुझ्या शरीराचे लाकूड होऊन गाडला गेलास तर गंगेतही वाहात येणार नाहीस. मला तर तुझी खूप भीती वाटते.
पण एवढे सारे बोलूनही पोक्याच्या तोंडून हुं की चूं निघत नव्हता. त्याने तोंडात बार तर भरला नसेल ना, हा माझा संशय अखेर खरा ठरला. तो बाजूला जाऊन तोंड धुवून आल्यावर थोडासा माणसात आला. तरीही त्याचा संन्यास घेण्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता. तो म्हणाला, बरेच दिवस माझ्या मनात ही संन्यास घेण्याची कल्पना घोळत होती. त्यासाठी मी माझ्या मापाची भगवी पायघोळ कफनी शिवून घेतली. दहा कप्पे असलेली झोळी शिवून घेतली. या खडावा, ही छाटी, या रुद्राक्षांच्या माळा, हा कमंडलू या बाकाच्या खाली असलेल्या पिशवीत कशा खच्चून भरल्या आहेत, हे पाहिलंस तर तुला माझ्या पूर्वतयारीची कल्पना येईल. मी फक्त बाता मारत नाही. कपड्यांचेही तीन-तीन सेट आहेत. अंतर्वस्त्रं आहेत ती वेगळीच. पण आता मागे हटणे नाही. हा अन्याय मी उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही…
ते सगळं ठीक आहे, पण पोक्या तिथे इतकं गार वातावरण असतं की तुला अंगात धुगधुगी येण्यासाठी तुझ्या आवडीचा स्टॉक न्यावाच लागेल. त्यासाठी दोन-तीन झोळ्या तरी काखेला माराव्या लागतील. तिथे पाण्याचे बर्फच होत असल्यामुळे अर्थातच ‘ऑन द रॉक’च प्राशन करावी लागेल. एका वेगळ्याच नशेत तू जाशील. अनेक साधूंमध्ये गांजा, अफू पिण्याचे प्रमाण वाढल्याच्या बातम्या आपण वाचतो. तिथे हिमालयात तर तुझ्यासारख्या आणखी एकाची भर त्यात पडेल. आम्हाला कितीही दुःख झाले तरी तुझ्या रास्त मागणीचा विचार करता आम्ही तुला जड अंतःकरणाने निरोप देतो. तरी माझं अंतर्मन मला सांगतंय तू परत येशील, तू परत येशील, तू परत येशील!