□ महाराष्ट्राच्या ‘नीती आयोगा’वर म्हणजे ‘मित्र’वर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती बिल्डर अजय आशर यांची नियुक्ती.
■ अहो, आयोगाचं नावच ‘मित्र’ आहे, शिवाय या मित्राला नगरविकास खात्यात ढवळाढवळ करण्याचा मोठा दांडगा अनुभव आहे.
□ राज्य सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवरील निर्बंध हटवले.
■ आप क्रोनॉलॉजी समझिए… हे सरकार कोणासाठी काम करतं? गुजरात राज्यासाठी… प्लॅस्टिक उत्पादक-व्यापारी कुठले आहेत? गुजरातमधले. तिथे निवडणुका असताना महाराष्ट्राकडून ‘मदत’ तर होणारच ना!
□ महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा इशारा.
■ आणि त्याचवेळी ‘कन्नड रक्षण वेदिके’चे गुंड राजरोसपणे महाराष्ट्रात जत तालुक्यात घुसून, झेंडे फडकवत गावकर्यांची माथी भडकवत होते! हे सरकार करणार महाराष्ट्राचं रक्षण?
□ गॅस सिलिंडरचे दर (कधीतरी) कमी होतील. तुम्हाला (कधीतरी) रोजगार मिळतील. पण, तुमच्या शेजारी रोहिंगे आणि बांगलादेशी आले, तर तुम्ही काय बंगाल्यांना मासे खाऊ घालणार का? : परेश रावल.
■ गुजरातला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तिथे काही मिरच्यांची वाळवणं टाकली जात नाहीत, मासेमारी केली जाते, मांसमच्छी खाणारे भरपूर गुजराती बांधव आहेत, हे ढोकळा, फाफडा, खिचडीच्या अनावश्यक प्रचारबाजीमुळे विसरलेले दिसतायत रावल महोदय!
□ भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या मध्य प्रदेशातील शिक्षकाचे निलंबन.
■ अरे, असा कसा गाढव तू? मोदींच्या प्रचारसभेला तरी हजेरी लावायची होतीस, सतरंज्या घालायच्या होत्यास, खुर्च्या लावायच्या होत्यास; प्रमोशन झाले असते.
□ ठाण्यातील विकासकामांना कोट्यवधींचा निधी, मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलणार, असा प्रचार.
■ ठाण्याने शिवसेनेला पहिले घवघवीत यश दिले होते आणि तेव्हापासून ते शिवसेनेचे ठाणे आहे आणि शिवसेनेचेच ठाणे राहणार… निवडणुका होऊ द्या, म्हणजे कळेल बाप पळवणार्या टोळीला.
□ महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली विकासकामे थांबवता येणार नाहीत : उच्च न्यायालयाचा मिंधे सरकारला दणका.
■ ती कामे सुरू करण्यात आपलाही सहभाग होता, याची तरी जरा बाळगायची होती ना… तमा हो!
□ गरिबांना लुटणारे आता भ्रष्टाचार संपवल्याबद्दल आपल्याला शिवीगाळ करत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ त्या खासगी असूनही सरकारी भासवलेल्या पीएम केअर्स फंडाचा हिशोब दिला गेला का हो मोदीजी? देणगीदारांच्या नावांसह? आणि नोटबंदी नावाचा देशातला आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळाही आता दाबला जात नाहीये… तोही काँग्रेसनेच केला असणार म्हणा!
□ लोकशाहीबाबत काय करायचे ते आम्हाला कोणी सांगायची गरज नाही : भारतीय प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रांत सुनावले.
■ भाषण फार उत्तम केलेत रुचिरा ताई; फक्त वेळ मिळाला की ‘काश्मीर फाइल्स’वर टीका करणारे इस्रायली ज्युरीप्रमुख नदाव लॅपिड आणि इस्रायलचे राजदूत यांच्यावर ट्विटरवर तुटून पडलेले आपल्या देशातले लोकशाहीचे खंदे पुरस्कर्तेही कोणत्या भाषेत व्यक्त होतात ते पाहून घ्या… जग हसतं हो अशाने या गांधी-नेहरूंच्या देशाला!
□ प्रियकरासाठी बायकोने जेवणातून विष देऊन केली पतीची हत्या; सासूलाही याच मार्गाने संपवले असल्याचा संशय
■ सगळे कोणत्या धर्माचे आहेत? काही लव्ह जिहाद वगैरे टोक काढून विष ओकण्याची संधी आहे का? आपल्यातल्याच नराधमांनी केलेल्या खुनाची कोण चर्चा करणार?
□ कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील ४० गावांना पाणी देऊन महाराष्ट्राला डिवचले.
■ काही काळजी करू नका. मोदीजी कर्नाटकातल्या ८० गावांना पाणी देऊन ती महाराष्ट्राला जोडून घेतील!
□ मुख्यमंत्री नवस फेडायला गुवाहाटीत जातात, तर मग बेळगाव महाराष्ट्रात यावं, म्हणून नवस का करत नाहीत? : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल.
■ असा नवस केला तर नवसाने मिळवलेलं औटघटकेचं राज्य ती घटका पूर्ण होण्याआधीच हातातून जाईल, याची त्यांना नीट कल्पना आहे उद्धवजी!
□ प्रोटोकॉलच्या नावाखाली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण कशाला करता : खा. उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षाला घरचा अहेर.
■ पण, हे दोन्ही छत्रपती इकडे आंदोलन करू, तिकडे आंदोलन करू असं सांगत आहेत; ते खासदारकीवर लाथ मारून या महाराष्ट्रद्रोहींची साथ सोडत का नाहीत? त्यातही कसला प्रोटोकॉल तर नाही…
□ भारतीय हद्दीत चीनने निवारे उभारलेले असताना केंद्र सरकार गप्प का? काँग्रेसचा सवाल.
■ चीनचा संबंध आला की दातखीळ बसते वाचाळवीरांची!