(दोन लहान मुलं शाळेच्या आवारात गळ्यात हात टाकून फिरताय.)
पहिला : आपलं नाव काय ठेवुयात? ह्या खेळात?
दुसरा : म्हणजे बघ, मी मोका साधून तुला मदत करत राहणार आणि तू बिचारा भाबडा न कळणारा असा कायतरी. अशी दोन जणं राहतील ह्या खेळात.
पहिला : मग नाव काय ठेवायची? आपल्या दोघांना? ते पण सांग ना!
दुसरा : सगळं मीच ठरवू का? तू पण सुचव ना!
पहिला : मग मोकावरून मोकाशी ठेवू, अन दुसरं बघ, काय येत नाही म्हणजे अडाणी ठेवूयात का?
दुसरा : चालेल, भारी नावं शोधलीत तू! मग मी मोकाशी आणि तू अडाणी!
अडाणी : पण नेमका खेळ कसा खेळायचा?
मोकाशी : मी महापौर असणार आणि तू…
अडाणी : (कुठूनशी एक बाटली शोधून आणतो. तीत काही भरल्यासारखं करतो. नि महापौराकडे घेऊन येतो) मोकाशी महापौर साहेब, ही तुम्हाला भेट आणली.
मोकाशी : अरे व्वा! काय आहे हे? आणि कशाबद्दल आणलंय?
अडाणी : हे जगातलं सर्वात उंची अत्तर आहे. खास धोत्र्याच्या फुलांपासून मिळवलं जातं हे! तुम्ही मागच्या भुयारी गटारच्या टेंडरमधी बाकी लोकांचे प्रस्ताव उडवलेत, त्याबद्दल भेट!
मोकाशी : अरे याची खरंच गरज नव्हती, एखादा सूट शिवला असता तर समजू शकलो असतो. बरं असू दे आता!
अडाणी : मोकाशी साहेब, तुम्ही मला घाईने का बोलावलंत?
मोकाशी : आमच्या डोक्यात बोटिंग क्लब जो बरा चालूय, तो दुसर्या कुणास द्यायचा विचार आहे.
अडाणी : मी आहे की! मी चालवतो!
मोकाशी : पण तुमच्याकडे त्यासाठी एकही अनुभवी माणूस नाही असं ऐकलंय?
अडाणी : जा बाबा, असले प्रश्न विरोधकांनी विचारायचे असतात ना? तू का विचारतो?
मोकाशी : सॉरी! आपण खेळात तिसर्याला घेतलंच नाहीय! जाऊदे! आम्हाला शहरातल्या टॉय ट्रेन चालवायचा कंटाळा आलाय…
अडाणी : तो ड्रायव्हरला आला पाहिजे… तुम्हाला कसा…?
मोकाशी : (रागाने बघतो.) गेल्या सत्तर वर्षांत इथल्या महापौरांनी टॉय ट्रेनकडे अक्षम्य दुर्लक्ष केलंय, आम्हाला ती जागतिक दर्जाच्या सोयी सुविधायुक्त करायची आहे.
अडाणी : योग्य विचार मोकाशी साहेब! मुळात प्रशासनानं वेळ आणि मनुष्यबळ यात गुंतवायलाच नको. तुम्ही हा कारभार माझ्याकडे द्या! मी तुम्हाला त्याबदल्यात दोन पायजमे शिवून आणतो.
मोकाशी : आपण भारी अवघड अवघड शब्द बोलतोय ना?
अडाणी : मग? अशी भाषा बोलता यायला तास अटेंड करायला पाहिजे, असं थोडंच असतं? आपण हिंडता हिंडता तिन्ही भाषा सहज शिकू!
मोकाशी : (पुन्हा भूमिकेत शिरत) आमच्या वॉर्डातले रस्ते कपड्यांसारखे रोज नवे बनवले पाहिजे यासाठी काही टेक्निक?
अडाणी : त्यात काही अवघड नाही, रस्ता असा बनवतो की रात्रीपर्यंतच तो उखडला जाईल, मग त्याचं दुरुस्तीचं टेंडर मलाच द्या. मी रोज खड्डे बुजवत दुरुस्त्या करत राहील! नाहीतर असं का करत नाही? एक टोल मी बांधतो, रोज पैसे गोळा करतो नि दोनेक खड्डे पण बुजवतो.
मोकाशी : ठरलं. आमच्या वॉर्डातले सगळे रस्ते तुझ्याकडं. त्यावर तू बिनधास्त टोल बांध. आणि आमच्या वॉर्डातल्या लोकांना वीजबिल कळतंच नाही. वितरण कंपनी काय बिल छापते काय माहित!
अडाणी : मग वीज वितरण माझ्याकडेच द्या! मी छान, सुंदर कागदावर बिलं छापून देईन. आणि आकडे असे मोठे टाकीन की लोकं बाकी काही बघणारच नाहीत.
मोकाशी : व्वा! व्वा!! मग वीज वितरण तुझ्या कंपनीला! लगेच पाणीपुरवठा करण्याचं काम तुलाच देऊन टाकतो, चालेल?
अडाणी : पळेल! त्या बदल्यात तुम्हाला तीन गॉगल अन चार वॉच फ्री! फक्त मला तीन गोष्टी आणखी द्या, म्हणजे माझी कामं जोरात चालू रहातील.
मोकाशी : कुठल्या तीन गोष्टी?
अडाणी : तो मागं तडीपार चिनी भाई होता ना? त्याच्याकडं बक्कळ पैसा आहे. तो भांडवल म्हणून वा व्याजानं मला देईल, तुम्ही त्याला दुष्मन म्हणायचं नाही. हे नंबर एक!
मोकाशी : आणि…?
अडाणी : तुमच्या पतसंस्थेकडून मला विनातारण पाहिजे तेवढं कर्ज देत जा! कागदपत्रांच्या झंझटी ठेऊ नका. हे नंबर दोन!
मोकाशी : अजून काही बाकी आहे का?
अडाणी : शेवटचं नंबर तीन! सगळे टेंडर काढण्याआधी मलाच अप्रोच करा. फायदा असेल ते सगळे मीच घेईन, एखादा थातुरमातुर दुसर्याला द्या. नाहीतर असं का करत नाही? तुमच्या ऑफिसमध्ये मी माझा एखादा माणूस बसवतो, तो मला सांगेलच कुठलं टेंडर माझ्या कामाचं आहे ते?
मोकाशी : मी असताना अजून दुसरा कुठला माणूस शोधतोय अडाण्या?