जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी? असं विचारणार्या त्या निसर्गकवीला रानावनात शब्द शोधत फिरतांना सासरी गेलेल्या बहिणीची आठवण येते तेव्हा तो लिहितो,
आंब्याची आमराई
ही पिकून झाली सडा
सांगते भाऊराया
या बहिणीले गाडी धाडा
बहिणीला भाऊ
एक तरी ओ… असावा
थकल्या जिवाला
एका रात्रीचा विसावा…
कवी ना. धों. महानोर यांच्या बहिणीने ही कविता म्हणून दाखवली, तेव्हा त्यांना हुंदका आवरता आला नाही. राखी पौर्णिमेचा, रक्षाबंधनाचा दिवस. सवयीप्रमाणे त्या सासरी जायला निघाल्या आणि दादाच्या आठवणीने कंठ दाटून आला.
१९६६ साली पळसखेडच्या कु. कमला धों. महानोर लग्न करुन सौ. नलिनी श्रीकांत हाके झाल्या आणि सासरी इगतपुरीच्या घरी राहायला आल्या. समोरच माझे घर त्यामुळे परिचय वाढला. कविवर्य दादा आपल्या बहिणीला कमलबाई नावाने हांक मारायचा. त्याची तब्येत बरी नसतांनाही दोन महिन्यापूर्वी तो अचानक तिला भेटायला इगतपुरीला आला. सोबत पिशव्या भरून लाडू, पेढे, मिठाई, फरसाण, चिवडा आणि बरंच काही. घरातील सर्वांना नवीन कपडे, टॉवेल, पंचा आणि रुमाल देखील. दादा कमलबाईला म्हणाला, आता माझं वय झालंय, परत यायला जमायचं नाही, असं वाटलं म्हणून आज तुझ्यासाठी भारीतली साडी घेऊन आलो. ही माझी शेवटची भेट समज. वाईट वाटून घेऊ नकोस. रडायचं नाही, असं म्हणून तो संध्याकाळी पळसखेडला निघाला, तो परत आलाच नाही. त्याची साडी नेसूनच मी रक्षाबंधनाला जाणार होती. पण त्यापूर्वीच तो गेला साडीची आठवण ठेऊन. शेवटच्या भेटीत रानकवीला मृत्यूची चाहूल लागली होती. ते बहिणीला म्हणतात… माझ्या तब्येतीचे काय घेऊन बसलात. वहिनी (सौ.) गेली तसा मी जाईन. माझं होईल तसं तुझं होईल. काय करणार आपण? रामकृष्णही आले गेले. त्या विना जग का ओसची पडले. रामकृष्ण गेले. जग ओस पडले का? मग तुम्ही तुमच्या दु:खाचं कसं घेऊन बसता?
दादाचं कमलबाईवर खूप प्रेम. लहानपणी तिला मांडीवर घेऊन बसायचा आणि म्हणायचा, बघ, आपले आईबाबा काही शिकले नाहीत, ते शेतावर जातात. मागे मलाही जावं लागतं. मग तुला कोण शिकवणार? शाळेतल्या बाई शिकवीत असताना फळ्यावर नीट लक्ष दे. इकडे तिकडे बघू नकोस, समजलं नाही तर विचारून घे आणि तसा अभ्यास कर. नापास झालीस तर बाबा मारतील.
दादा हात धरून रोज शाळेत घेऊन जायचा. त्याच्या शिकवणीमुळे कमलबाई दर वर्षी पहिल्या नंबरवर पास व्हायची. बाबा माळकरी, धार्मिक वृत्तीचे. शेतावर मोट चालवायचे, तेव्हा दादा पाणी द्यायचा आणि बाबा नामदेव विठ्ठलाचे भजन म्हणायचे. त्यांचा दादाला खूप धाक असायचा. त्यांना घाबरून तो झाडाझुडपात लपून बसायचा आणि झाडाकडे पाहात कविता लिहायचा. एकदा तर बाबांनी रागाच्या भरात त्याच्या कवितेची वही जाळून टाकली होती. ते तापट स्वभावाचे होते. शेतीवाडी असताना तो सारखा लिहीत बसतो म्हणून अनेकदा मार खायचा.
शेतावर २० बैलजोड्या होत्या. शंभरावर गाई म्हशी होत्या. दूध, दही, ताक, तूप काढून बाबा विकायचे. उरलेले मजुरांना जेवणात वाढायचे. २०० मजूर शेतावर काम करायचे. गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, भेंडी, गवार, वांगी, केळी आणि डांगराचे अमाप पीक होते.
दादाच्या कविता वाचून मोठी मंडळी घरी येऊ लागली. एकदा स्वत: यशवंतराव चव्हाण पत्ता शोधत घरी आले. त्यांनी दादाच्या कवितांचे कौतुक केले, तेव्हा बाबांचे डोळे उघडले. मग त्यांनी कविता लिहायला वही आणून दिली. मुंबईला कुठे जायचे तिथे जा म्हणाले. तेव्हापासून दादाची गाडी सुसाट धावू लागली. महाराष्ट्रभर कवितावाचन, ग्रामीण गीतांचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले. राज्याबाहेरून, दिल्लीवरूनही त्यांना आमंत्रणे येऊ लागली. दादाला पद्मश्री मिळाली. दोनवेळा आमदारकी आणि मुंबईत प्रशस्त घरही. कवितेने काय दिले नाही? प्रसिद्धी पैसा नावलौकिक सर्व सुखं पायाशी आली.
यशवंतराव चव्हाण आजारी असताना त्यांनी शरद पवारांना बोलावून घेतले आणि म्हणाले, मी आता चाललो, तू नामदेवाचा सांभाळ कर, तो गुणी पोरगा आहे. शरदरावांनी त्यांना शब्द दिला आणि शेवटपर्यंत तो पाळला. दादाच्या कवितेला राजाश्रय मिळाला.