अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, शनि-प्लूटो मकरेत, गुरु-मंगळ-शुक्र-नेपच्युन कुंभेत, रवि मीनेत, बुध-हर्षल मेषेत. राहू-केतू राश्यांतर – राहू मेषेत, केतू तूळ राशीत १२ एप्रिल २०२२ पासून. रवि राश्यांतर मेष राशीत, १५ एप्रिल २०२२. दिनविशेष – १० एप्रिल रोजी रामनवमी. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. १५ एप्रिल गुड फ्रायडे, १६ एप्रिल हनुमान जयंती.
– – –
मेष – आठवडा शुभदायी आहे. गुरु-राहू-केतू या तीन बलाढ्य ग्रहांचे राश्यांतर उत्साह वाढवेल. राहूच्या लग्नातील राश्यांतरामुळे कामे झटपट मार्गी लागतील. मंगळ आणि धनाधिपती शुक्र देखील लाभात असल्याने आर्थिक आवक वाढून अनपेक्षित लाभ मिळेल. आनंदाच्या भरात अधिकची धावपळ होईल. तिचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. स्वाभिमानाला बगल द्या. विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळतील.
वृषभ – नव्या व्यावसायिक संधी चालून येतील. १२ आणि १३ एप्रिलचे राहू-केतू तसेच गुरु-रवीचे राश्यांतर, योगकारक शनि भाग्यात, दशमात शुक्र-मंगळ अशी उत्तम ग्रहस्थिती असल्यामुळे चांगले अनुभव येतील. अनपेक्षित लाभ होतील. विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्याच्या संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. कोर्टकचेरीच्या कामात निराशा होईल. वायफळ खर्च टाळा. वादविवाद टाळा, नाही तर पोलीस चौकीची पायरी चढावी लागेल.
मिथुन – बुध लाभात, सोबत रवि-राहू, त्यामुळे अनपेक्षितरित्या घबाडप्राप्तीचा योग जुळून येत आहे. १८ महिन्यांपासून झालेला आर्थिक-मानसिक त्रास कमी होईल. प्रवासाचे, व्यवसायवृद्धीचे, नवीन वास्तूचे योग आहेत. शुभघटनांचा काळ आहे. रामनवमी, हनुमान जयंती या काळात घरात आनंद राहील. १३ आणि १४ या तारखा विशेष लाभदायक. सट्ट्यातून मोठा फायदा होईल.
कर्क – वडिलोपार्जित संपत्तीतून चांगले लाभ मिळतील. चंद्राचे शुक्र-मंगळ-गुरुबरोबरचे समसप्तक योग लाभदायी ठरेल. १४ एप्रिल रोजी भाग्यात येणार्या गुरुमुळे धार्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल. विवाहेच्छुकांची लग्ने जमतील. मौजीबंधन आणि अन्य शुभकार्यांसाठी उत्तम काळे. राहूच्या दशमातील भ्रमणामुळे उद्योग-व्यवसायात वजन वाढेल. कौटुंबिक अथवा व्यावसायिक हेवेदावे टाळा. सप्तमातील शनि-प्लूटो आणि दशमातील राहू यांच्यामुळे वैवाहिक जोडीदार आणि व्यावसायिक भागीदार फारसे सकारात्मक राहणार नाहीत, काळजी घ्या.
सिंह – मानसिक अस्वस्थता कमी होईल. रवि-गुरु-राहू-केतू यांच्या राश्यंतरामुळे मनासारखी फलप्राप्ती देणारा अनुभव येईल. रवीच्या भाग्यातील राश्यांतरामुळे प्रसिद्धीप्राप्तीचा अनुभव मिळेल. धार्मिक कार्यात आघाडीवर राहाल. गुरुतुल्य व्यक्तीची भेट होईल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. भाग्यातील राहूमुळे विचारक्षमता बदलेल. कुटुंबियांसोबत सलोखा ठेवा. विद्यार्थ्यांना चांगल्या संधी चालून येतील. पण द्विधा मन:स्थितीमुळे गोंधळात पडाल.शांतपणे विचार करून निर्णय घ्या. भागीदारी व्यवसायात आंधळा विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका.
कन्या – धावपळीचा काळ आहे. बुध अष्टमात, षष्ठात मंगळ आणि शुक्र. तब्येत सांभाळा. १४ एप्रिलच्या गुरूच्या राश्यांतरामुळे वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. मन आनंदी राहील. चांगले आर्थिक लाभ मिळतील. षष्ठातील मंगळामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खाण्यापिण्याचा अतिरेक टाळा. नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल. विमा एजन्ट, खाण कामगार, यांच्यासाठी लाभदायक काळ. हातून काही गैरकाम होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते.
तूळ – राहूकेतूच्या राश्यांतरामुळे वैवाहिक जोडीदार, व्यावसायिक भागीदारांच्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. पंचमातील मंगळ-शुक्र युती, सप्तमात रवि-राहू-बुध यामुळे बाहेरख्यालीपणापासून सावध राहा. विवाहाच्या बाबतीत निर्णय घेताना खबरदारी घ्या. खेळाडूंना चांगले यश मिळेल. मातुल घराकडून विशेष लाभ मिळतील. नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
वृश्चिक – गुरु व राहू-केतूच्या राश्यांतरामुळे नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी चांगली स्थिती राहील. इस्टेट एजन्ट, बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी चांगले दिवस आहेत. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी प्रवास करावा लागेल. पंचमातील मीन राशीतील गुरुचे भ्रमण शिक्षणक्षेत्रातील मंडळींसाठी विशेष लाभदायक ठरेल. नोकरीत अनपेक्षित बदल घडून येतील. एखादी मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडेल.
धनू – ‘दुखभरे दिन बिते रे भय्या, सुख भरे दिन आयो रे’चा अनुभव येईल. नोकरीत बदल होईल. सरकारी कर्मचार्यांची बदली होऊ शकते. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहील. लांबचा प्रवास होईल. प्रवासात फसवणुकीची दाट शक्यता आहे. कानाचे दुखणे उद्भवू शकते. भावाला आर्थिक मदत करावी लागू शकते. शेअर, कमिशन, सट्टा या माध्यमातून लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर – उत्तम धनयोग जुळून येत आहे. राश्यांतर करून कुंभेत आलेला मंगळ आणि योगकारक शुक्र यामुळे भांडवलदारांना व्यवसायात चांगले लाभ मिळू शकतात. शेअर बाजारातून आर्थिक बाजू भक्कम होईल. कलाकार, लेखक, वकील, यांना चांगला फायदा होईल. साडेसाता असली तरी बदलती ग्रहस्थिती पथ्यावर पडणार आहे. न डगमगता पावले टाका. यश पदरात पडेल. नोकरीनिमित्ताने स्थान परिवर्तन झाले तर उत्कर्ष होईल.
कुंभ – व्यवसायात नवीन संधी चालून येतील. सकारात्मक विचारांचा फायदा होईल. प्रवासात जुन्या मित्रांची गाठभेट पडेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. कौटुंबिक सौख्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. लेखक, पत्रकारांना चांगले दिवस आहेत. पैशाच्या अडचणी दूर होतील. कर्जाची प्रकरणे मार्गी लागतील.
मीन – ‘पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा.’ सर्वच बाबतीत यश मिळणार आहे. संततीसौख्य मिळेल, शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास घडेल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. धार्मिक क्षेत्रात आघाडीवर राहाल. अन्नदान घडेल. चैन, मौजमजेसाठी प्रवास होतील. खर्च टाळा. परदेशात गरजेपेक्षा अधिक पैसे खर्च करू नका. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या.