वर्षा बंगल्याच्या प्रशस्त हॉलमधील सोफ्यावर जाऊन बसण्याची एकाने विनंती केली. हातात सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट अशा थाटात सुपारी चघळत शंकरराव चव्हाणांनी भाऊंचे स्वागत केले. कडक शिस्तीचा खडूस हेडमास्तर म्हणून चव्हाणांची ख्याती. पण भाऊंसमोर ते अगदी भावासारखे अदबीने, प्रेमाने बातचीत करू लागले. तास-दीड तासांची मॅरेथॉन मुलाखत झाली. भाऊंच्या हातात कागद किंवा पेनही नाही. सारे स्मरणात ठेवून उद्याच्या अंकात शब्द नि शब्द छापून येणार ही भाऊंची खासीयत.
– – –
शुभ बोल रे नार्या तर नार्या म्हणतो मांडवाला आग लागली. अशा मथळ्याखाली नीळकंठ (भाऊ) खाडिलकर यांनी नवाकाळ दैनिकात अग्रलेख लिहून नारायण राणे यांची चंपी केली. यावर राणे समर्थक भयंकर संतापले. त्यांनी नवाकाळ कार्यालयात घुसून धुडगूस घातला. टेबलखुर्च्यांची मोडतोड करून केबिनच्या काचा फोडून टाकल्या.
मी फोटो घेण्यासाठी गेलो तेव्हा कर्मचारी भयभीत झालेले पाहिले. त्यांना पुन्हा कामकाज सुरू करण्याची इच्छा होती, पण बसायला एक टेबल की खुर्ची धड नव्हती. चालता फिरताही येत नव्हते. सर्वत्र फुटलेल्या काचांचा सडा पडलेला. पण, अग्रलेखांचा बादशहा डगमगला नाही… त्यांनी जयश्री, वासंती, रोहिणी या तिन्ही मुलींच्या सोबतीने पुन्हा कार्यालय सुरू केले.
गिरगावात मुगभाट लेनमधील शेणवी वाडीत भाऊंचे दोन मजली टुमदार घर. तळमजल्यावर प्रिंटिंग प्रेस, पहिल्या मजल्यावर संपादकीय कार्यालय आणि वर भाऊंच्या कुटुंबाचे निवासस्थान. मराठी मालकाचा मराठी भाषेतील नवाकाळ म्हणजे मराठी माणसाचा अभिमान! गिरगावची शान. प्रचंड खपाचं लोकप्रिय दैनिक निव्वळ भाऊंच्या अग्रलेखासाठी लोक वाचत. त्यांच्या फटकार्यांनी अनेकांना घायाळ केले. तसेच गिरणी कामगार कष्टकर्यांसाठी त्यांनी जिवाचे रान केले. गुणीजनांना भरभरून प्रसिद्धी दिली आणि कौतुकाची थापही मारली. राणे हे त्यांच्यापैकीच एक. ते नगरसेवक असल्यापासून मुख्यमंत्री होईपर्यंत नवाकाळने दिलेली प्रसिद्धी ते विसरले आणि संतापले. असो. तो अग्रलेखाचा विषय आहे.
नवाकाळ शंभर वर्षांचा झाला आहे. ते एकमेव दैनिक असे आहे जेथे एकही फोटोग्राफर नोकरीवर नाही. फोटोंची त्यांना गरजच भासली नाही. इतर दैनिकांत लाख-सव्वा लाख रुपये पगारावर पाच फोटोग्राफर ठेवलेले असतात. त्यामुळे माझीही तशी अपेक्षा असावी असा त्यांचा समज असावा. म्हणून तर एका अग्रलेखात भाऊंनी माझ्या फोटोग्राफी कौशल्याचा उल्लेख करून असा फोटोग्राफर नोकरीवर ठेवणे मला परवडण्यासारखे नाही, असे म्हटलेले आहे. अर्थात त्यांच्या दैनिकात माझं नाव येणे हेच माझ्यासाठी लाखमोलाचे होते.
अनेक इंग्रजी-मराठी दैनिकांत पहिल्या पानापासून फोटोला ठळक प्रसिद्धी देतात, मग भाऊ फोटोला महत्त्व का देत नाहीत? त्यांच्या अग्रलेखाशेजारी आपल्याही फोटोला मान मिळावा, असे मला मनोमनी वाटत असे. त्यांना भेटण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केला, पण व्यर्थ गेला. मग मी काढलेले काही वैशिष्ट्यपूर्ण फोटो मी त्यांना भेटून दाखवले आणि त्यामागील बातमीही रंगवून सांगितली. काही फोटो पाहून भाऊ प्रभावित झाले आणि त्यांनी ते नवाकाळमध्ये प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली.
तळागाळातील लोकांसाठी भाऊ लिहीत आणि त्याला अनुसरून फोटो काढण्याचे काम मला सांगत. ते सांगतील ते काम मी चोख करत होतो. पण अशा गोरगरीब, पीडित लोकांचे फोटो काढून पैसे कसे मागायचे? मी मागितले नाही तरी भाऊंनी मला ते दिले. माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक मानधन ते देत. माझ्याकडून फोटो बिल मागून घ्यायचे आणि त्यावर सही करून वहिनींना लगेच द्यायला सांगायचे. त्यावेळी वहिनी पैशाचा व्यवहार सांभाळीत. अनेकदा ते फोटोच्या दोन प्रती मागवत. दुसरा फोटो ते शिवनेरचे संपादक विश्वनाथ वाबळे यांना द्यायला सांगत. भाऊंचे ते खास मित्र होते. फोनवरून एकमेकांच्या अग्रलेखाविषयी चर्चा करायचे. कधी दोघांचा अग्रलेखाचा विषय एकच असायचा.
इतर वृत्तपत्रांत रात्री अकरा वाजेपर्यंत फोटो दिला तरी तो छापून येत असे, पण रोज संध्याकाळी चार वाजण्याच्या आत फोटो मिळाला पाहिजे असा नवाकाळचा दंडक होता. त्यामुळे माझी खूप धावपळ व दमछाक व्हायची. चार वाजता दिलेले फोटो त्याच दिवशी रात्री नऊ वाजता नवाकाळमध्ये प्रसिद्ध होत. दुसर्या दिवशीची तारीख असलेला नवाकाळ आदल्या रात्रीच विक्रीला यायचा, त्यामुळे वाचकांनाही त्याची सवय लागलेली. अनेक वाचक रात्री नऊ वाजताच प्रिंटिंग प्रेसबाहेर नवाकाळची वाट पाहात थांबत.
पेपर प्रिंटिंगला गेला की भाऊ मला केबिनमध्ये बोलवत. सोबत पत्रकार सुरेश नगरसेकर. मोरे, कांबळे ही रात्रपाळीची माणसेही गप्पा मारायला जमायची. मला आठवते, त्यावेळी जयश्रीताईंचा मुलगा चार पाच वर्षांचा असेल- तो प्रेसमध्ये खूप मस्ती करायचा. भाऊ म्हणायचे, हा जयश्रीला काम करू देत नाही. त्याला पाळणाघरात ठेवायचे आहे. कुणी ओळखीचे आहे का बघा. ठाकूरद्वार येथील गंगाराम खत्री वाडीतील घाणेकर बाईंच्या पाळणाघरात माझा मुलगा होता. मी त्यांना विचारले, नीळकंठ खाडिलकरांच्या नातवाला तुमच्याकडे ठेवाल का? यावर त्या घाबरल्याच. इतक्या मोठ्या घरचा मुलगा ठेवायचा आणि त्याला काही दुखलं खुपलं तर पंचाईत व्हायची. त्यांनी नम्रपणे नकार दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो मुलगा म्हणजे नवाकाळचा संपादक रोहित पांडे साहेब. आता खूप मोठा झालाय.
भाऊंच्या सहवासातील ते सुवर्णदिन विसरता येत नाहीत. एकदा फोन करून त्यांनी मला बोलावून घेतले. म्हणाले, कॅमेरा आणला आहेस ना. चल मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांची वेळ घेतली आहे. मी मुलाखत घेईन आणि तू फोटो काढ.
आम्ही निघालो, पण नवाकाळ ऑफिसखाली टॅक्सी मिळेना. माझ्या स्कूटरवरून येण्याचे त्यांनी ठरवले. मला धक्काच बसला. अग्रलेखाचा बादशहा माझ्या मागे बसणार या कल्पनेनेच मी सुखावून गेलो. माझ्या जुन्या बजाज चेतक स्कूटरवर भाऊ एका बाजूने बसले. गिरगावातून वर्षा बंगल्याच्या दिशेने जाताना अनेकजण भाऊंना हातवारे करून नमस्कार म्हणत होते.
चौपाटीच्या सिग्नलवर स्कूटर उभी होती तेव्हा एक वाहतूक पोलीस जवळ आला. माझ्या तर छातीत धडकी भरली. कारण लायसन्स घरी ठेवले होते. त्याने भाऊंना वाकून नमस्कार केला आणि नवाकाळ रोज आठवणीने वाचतो म्हणाला.राजभवनाच्या दिशेने वर्षा बंगल्यावर रस्ता चढत असताना आजूबाजूच्या गाड्यांतून जाणारी माणसं भाऊंना पाहून अभिवादन करण्यासाठी हातवारे करत. अशी अचानक येणारी माणसं पाहून मी भांबावून गेलो. माझं टेन्शन वाढत गेलं. त्यात जुनी स्कूटर. ती नेमकी आजच बिघडावी? वाटेत दोनतीन वेळा ती बंद पडली. भाऊंना खाली न उतरवताच मी पुन्हा पुन्हा किक मारू लागलो. रस्ता चढणीचा असल्यामुळे ती मध्ये मध्ये नाटकं करू लागली. मी घामाने ओलाचिंब झालो. इथेच गाडी उभी करून टॅक्सीने जावे म्हटले तर पार्किंगला जागा नव्हती. पोलिसांनी लगेच टो करून नेली असती.
फटाक फटाक फटाके उडवीत गाडी वर्षा बंगल्याच्या गेटजवळ आली, तेव्हा पूर्वसूचना असल्यामुळे पोलीसही आमची वाट पाहातच उभे होते. त्यांनी भाऊंना सलाम केला. भाऊंनी विचारलं, तुमचे प्रश्न मांडतो नवाकाळमधून ते वाचता की नाही?… त्यांनी हो हो रोज… असे म्हणत भाऊंना प्रतिसाद दिला.
कडक सुरक्षा असतानाही आमची कोणतीही चौकशी नाही, अंगझडती नाही की कॅमेर्याच्या बॅगची तपासणीही नाही. वर्षा बंगल्याच्या प्रशस्त हॉलमधील सोफ्यावर जाऊन बसण्याची एकाने विनंती केली. हातात सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट अशा थाटात सुपारी चघळत शंकरराव चव्हाणांनी भाऊंचे स्वागत केले. कडक शिस्तीचा खडूस हेडमास्तर म्हणून चव्हाणांची ख्याती. पण भाऊंसमोर ते अगदी भावासारखे अदबीने, प्रेमाने बातचीत करू लागले. तास-दीड तासांची मॅरेथॉन मुलाखत झाली. भाऊंच्या हातात कागद किंवा पेनही नाही. सारे स्मरणात ठेवून उद्याच्या अंकात शब्द नि शब्द छापून येणार ही भाऊंची खासीयत.
चहापान, पानसुपारी झाल्यानंतर भिंतीवरील सत्यसाईबाबांच्या तसबिरीला नमस्कार करून मी भाऊंच्या पाठोपाठ निघालो. दारापर्यंत निरोप द्यायला चव्हाण आले होते.
स्कूटरवरून कसे जाणार? मी गाडी देतो, चव्हाण म्हणाले. पण भाऊंनी नकार देऊन स्कूटरवरून जाणे निश्चित केले. पुन्हा मोठ्याने फटाक आवाज आणि स्कूटर स्टार्ट झाली. येताना उतरणीचा रस्ता असल्यामुळे गाडी मुकाट चालली. मी सुखरूपपणे भाऊंना घरी पोहोचवले आणि देवाचे आभार मानले. या कटू अनुभवानंतर मी नवी कोरी होंडा अॅक्टिव्हा स्कूटर घेतली.
काही वर्षांनंतर पुन्हा वर्षावर जाण्याचा योग आला. यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांची वेळ ठरवून पुन्हा स्कूटरने प्रवास. यावेळी मला फुल कॉन्फिडन्स होता. कारण गाडी नवी चकाचक होती. पण चिंता होती ती भाऊंची. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. त्यांचे वयही अधिक होते. नुकत्याच आजारपणातून उठलेल्या माणसाला स्कूटरवरून फिरवणे धोक्याचे होते. परंतु भाऊंचा उत्साह पाहून माझ्याही मनावरचे दडपण नाहीसे झाले. मी सावकाश, संथ गतीने कॅमेरा सांभाळत स्कूटर हळूहळू चालवत वर्षा बंगल्यावर नेली.
भाऊंना पाहून सरांना आनंद झाला. दोघांची गळाभेट झाली. प्रकृतीची विचारपूस झाल्यानंतर भाऊ म्हणाले, पंत बघा नुकतीच माझ्यावर बायपास सर्जरी झाली, पण मी दुसर्यांसारखा अंथरुणावर लोळत पडलो नाही. लगेच कामाला लागलो असे म्हणत त्यांनी शर्टाची सर्व बटणे काढली आणि छातीवरील शस्त्रक्रियेचे टाके दाखवले. जोशीही एक दोन तीन मोजत राहिले. हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा होता. सुंदर फोटो टिपता आला असता. टाके पाहून मन सुन्न झाल्यामुळे फोटो काढायचे राहूनच गेले. एक चांगला फोटो काढण्याची संधी हुकली याची खंत आजही मनाला टोचते आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांची मुलाखत घेण्यासाठी भाऊ वर्षा बंगल्यावर गेले, तेव्हाही मी सोबत होतो. पवार साहेबांची असाइनमेंट म्हणजे बोअर काम. त्यांचे शंभर फोटो काढा. सर्व एकसारखेच दिसणार, कारण ते कधीच अॅक्शन देत नाहीत. त्यांना फोटोग्राफरांचे फार वावडे असावे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या केबिनमध्ये जाऊन मी फोटो काढत असे. तेव्हा ते फोटोपूर्वी टेबलावरच्या सर्व फायली, कागदपत्रे झाकून बाजूला काढून ठेवत. फोटोत काहीही आक्षेपार्ह दिसणार नाही याची खबरदारी घेत. म्हणून कदाचित तेल लावलेला पहेलवान असे त्यांच्याबद्दल भाऊ नेहमी म्हणत असावेत. ते कधीच कुणाच्या हाती काही लागू देत नाहीत ते खरं आहे.
याउलट भाऊंना फोटोची भलतीच हौस! दोन चार महिन्याआड स्वत:चे फोटो काढण्यासाठी ते नेहमी बोलवत. एक दोन नव्हे, एका बैठकीत किमान पन्नास फोटो व्हायचे. त्याचे बिलही मोठं व्हायचं. पण ते लगेच पैसे देत. सर्व फोटोंत चेहरा हसरा दिसायला हवा, असा आग्रह. कामाचा ताण असला किंवा मूड नसला तर तसे चेहर्यावर दिसू नये म्हणून ते जयश्री, रोहिणीताईंना बोलावून हास्यविनोद करायला सांगत. मग भाऊ खळखळून हसायचे आणि मी पटापट फोटो टिपायचो. चेहरा गंभीर ठेवून फोटो काढलेले त्यांना आवडत नसे.
अनेक बारकावेही त्यांनी मला समजावून सांगितले. जे जेजे स्कूलमध्येही कुणी शिकवले नव्हते. डोळ्यांखालील त्वचा आणि मानेखालील सुरकुत्या पाहून माणसाचं वय कळतं असे ते म्हणत. म्हणून अनेक फोटोंत त्यांनी गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला दिसतो. मानेखालील घड्या दिसू नयेत म्हणून हातात नवाकाळ घेऊन त्यांनी अनेक फोटो काढून घेतले आहेत.
पूर्वीच्या काळी लोक फोटो स्टुडिओत जाऊन एखाददुसरा फोटो काढून घेत. तो फ्रेम करून वर्षानुवर्षे भिंतीवर टांगून ठेवत. आता फोटोग्राफरला घरी बोलावून शेकड्याने फोटो काढून घेतात. पूर्वीचा काळच वेगळा होता. आता नवा काळ आला. पूर्वी लोकांना स्माइल प्लीज म्हणावे लागे, आता लोकच स्माइल करून पोझ देतात.