गिरणी कामगारांचा संप ही मुंबईतल्या मराठीजनांच्या मनाला झालेली भळाळती जखम. या संपाने गिरण्या उद्ध्वस्त करून टाकल्या, गिरणगाव नष्ट करून टाकले, गिरणी कामगारांच्या घरादारांवर अक्षरश: नांगर फिरले. त्या वाताहतीतून सावरताना अर्ध दशक खर्च झालं गिरणी कामगारांचं. या संपाचे नेते होते डॉ. दत्ता सामंत. तुटेपर्यंत ताणता कामा नये, हा साधा नियम डॉ. सामंत विसरले आणि त्यांनी संप चिघळत ठेवला. त्यांच्या नेतृत्त्वावर कामगारांनीही अनाठायी विश्वास ठेवला आणि कायमचा घात करून घेतला. या काळात हा संप मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सामोपचाराची होती. डॉ. सामंत यांचा अहंकाराचा फुगा अधिक फुगवू नये, ते घातक ठरेल, असा इशारा देणारे हे व्यंगचित्र पाहा. त्यांना संपात साथ देणार्या, चिथावणी देणार्या नेत्यांनाही नंतर ते ऐकेनासे झाले, माझी हवा आहे, असं म्हणत राहिले. हा भ्रमाचा फुगा नंतर हजारो कामगारांच्या आयुष्यात प्रचंड मोठा स्फोट घडवत फुटला… आज मुंबईच्या निवडणुका जवळ आल्याबरोबर असे थोड्या थोड्या दिवसांनी रंग, दिशा, आकार असं सगळंच काही बदलणारे फुगे आकाशात विहरू लागले आहेत… त्यांच्यात हवा कोण भरते आहे, ते मुंबईकरांना निश्चित माहिती आहे… डॉ. सामंतांचा फुगा फुगवून एकदा जिव्हारी फटका खाल्लेले मुंबईकर अशा मौसमी फुग्यांमध्ये हवा भरायला जाणार नाहीत, हे निश्चित.