मी तिथे काढलेल्या अडीच वर्षांच्या काळात नाममात्र नोकरी केली, पण बर्याच गोष्टी शिकलो. त्या जोरावर कालांतराने सिनेमात कधी निर्माता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून थोडेफार कामही केले. ज्या ग्राफीक सेक्शनमध्ये मी अनेकांची क्रेडिट लिस्ट तयार केली, त्याच सेक्शनमध्ये पुढे माझ्या नावाचेही कार्ड बनले गेले. ‘टुरटुर’च्या भव्य यशानंतर आणि ‘हमाल! दे धमाल’च्या रौप्य महोत्सवानंतर दोन वेळा माझाही तिथे इंटरव्ह्यू झाला. त्यासाठी लिहावी लागणारी कार्डस लिहायला असाच कोणीतरी माझ्यासारखा स्वप्न पाहणारा कलावंत त्या सेक्शनमध्ये येऊन बसला असेल.. पुढे कधीतरी कळेल, त्याच्या आयुष्यातही ‘दूरदर्शन केंद्र’ किती महत्वाची भूमिका करून गेले आहे ते.
– – –
१९७६ ते १९७८ या काळात वरळीचे दूरदर्शन केंद्र हे एखाद्या तांत्रिक महाविद्यालयासारखे होते. त्यावेळच्या तमाम प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगकर्मींची ती फॅक्टरी होती. कामही करा, पैसेही कमवा आणि स्वत:ला आजमावून पाहा… कित्येक रंगकर्मी तिकडे तिथल्या विविध डिपार्टमेंटमध्ये कामाला होते तर कित्येक रंगकर्मी कामानिमित्त तिथे येऊन हजेरी लावत आणि नवीन कामे मिळवत… मी तिथल्या ग्राफिक सेक्शनमध्ये ग्राफिक डिझायनर होतो. मला खरे तर तिथल्या नोकरीपेक्षा एकूण टेलिव्हिजन किंवा सिनेमा मेकिंग तंत्रात रस होता. त्यातून काही शिकता येतं का पाहायचं होतं. त्यामुळे संधी मिळताच इतर अनेकांप्रमाणे मीही डीडीला, म्हणजे दूरदर्शन केंद्रावर ग्राफिक सेक्शनमध्ये ‘कॅज्युअल’ म्हणून नोकरी स्वीकारली.
दूरदर्शन केंद्राच्या मागच्या बाजूला त्या प्रचंड उंच टॉवरला लागून एक कँटीन होते… तिथून चहा घेऊन टॉवरच्या खाली गवतात बसून तो गप्पा मारत प्यायची सवय सर्व स्टाफला आणि तिथल्या टेक्निशियन्सना लागली होती… साडेसहाला संध्याकाळचे टेलिकास्ट सुरु होण्यापूर्वीची संध्याकाळ झाली की एखाद्या महाविद्यालयाच्या कँटिनसारखा माहौल तिकडे तयार होई. कुठेही नजर टाकलीत तर कोणी ना कोणी ग्रूप करुन बसलेला असायचा… एका बेंचवर याकूब सईद आणि बबन प्रभू चहा घेत ‘हास परिहास’वर चर्चा करताना दिसत… तर दुसर्या ठिकाणी पुण्याहून आलेला सुधीर गाडगीळ अरुण काकतकरबरोबर क्रिएटिव्ह चर्चेत रमलेला असे… तिसरीकडे जगदीश ठाणकर, अजित नाईक, नरेन जावळे या कॅमेरामनच्या ग्रूपबरोबर सुधीर पाटणकर, श्याम खांडेकर हे फ्लोअर मॅनेजर्स ड्युटीपूर्व चहा झोडताना दिसत… टॉवरच्या चार कोपर्यात चार ग्रूप बसलेले असत… त्यात एक ग्रूप मीना वैष्णवी, वीरेंद्र शर्मा, सुधा चोप्रा या हिंदी डिव्हिजनचा असायचा तर दुसरीकडे सुमन बजाज, नयना दासगुप्ता वगैरेंचा इंग्लिश डिपार्टमेंटचा असायचा…
तिसरीकडे एडिटिंग डिपार्टमेंटमधले डेव्हिड धवन, विधू विनोद चोप्रा, रेणु सलुजा, बिजॉन दासगुप्ता (आर्ट डायरेक्टर) वगैरे बसलेले असत… त्यातमध्ये एक आमचा ग्रूप. त्यात बुवा (रवींद्र साठे), बी. पी. (बी. पी. सिंघ), बबन (दळवी) आणि मी असा एक ग्रूप. बुवा पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून साऊंड रेकॉर्डिंगचा डिप्लोमा घेतलेला निष्णात ध्वनिमुद्रक होता. तसाच बी. पी सिंघ हाही फिल्म इन्स्टिट्यूटचा प्रशिक्षित कॅमेरामन, तर बबन दळवी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा आणि मी जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टचा विद्यार्थी. ते तिघेही पर्मनंट आणि मी कॅज्युअल (म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर) पण आमची घट्ट मैत्री… शिवाय आमच्यात जाऊन येऊन असणारे बरेच होते. विलास वंजारी त्यातला एक… तो नेहमी असायचाच असे नव्हे, पण असला तर भरपूर वेळ असायचा.. तेवढ्या वेळात चहाचे प्रमाण वाढायचे… कधीमधी विनय आपटे झंझावातासारखा यायचा… एका हातात चहाचा कप, दुसर्या हातात सिगारेट… झपाझप गप्पांचे दोन डाव टाकायचा… त्या चहाच्या ग्लासमध्येच सिगारेट विझवून पटकन सटकायचा… तो आला कधी गेला कधी कळायचेच नाही… शांतपणे बोलत बसलेला विनय आपटे कोणालाच कधी दिसला नाही…
संध्याकाळी सातच्या बातम्यांची मोठी टीम पाचनंतर चहासाठी टॉवरखाली जमायची… त्यात श्याम खांडेकर, सुधीर पाटणकर या फ्लोअर मॅनेजर्सबरोबर बातम्या सांगणार्या भारती आचरेकर, स्मिता तळवलकरपासून ते अगदी ‘फुलराणी’ गाजवत असलेली भक्ती बर्वेही त्यात असे. आणखी एक जबरदस्त बोलका ‘सावळा चेहरा’ त्यात होता. तिचे नाव ‘स्मिता पाटील’… ९० टक्के इंग्लिश आणि १० टक्के मराठीत बोलणारी ही एक एनर्जी ब्रँड उत्साहमूर्ती होती… कोणत्याही विषयावर कोणाशीही पंगा घ्यायला तयार असायची. एरवी अतिशय आधुनिक कपड्यात वावरणारी ‘ती’, साडीमध्ये बातम्या सांगताना अगदी टिपिकल ‘ग्रामीण महाराष्ट्रा’चा ब्रँड वाटायची. या सगळ्यांचे बॉस म्हणून तिथे असलेले विश्वास मेहेंदळे अत्यंत प्रसन्न वदने, हसत खेळत थोडा वेळ हजेरी लावून जायचे.. कँटिनच्या एखाद्या कोपर्यात ‘गजरा’ या गाजलेल्या कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर कधी रत्नाकर मतकरींबरोबर, तर कधी सुरेश खरेंबरोबर चहा नाष्त्याची मैफिल जमवत.
आमचं ग्राफिक डिपार्टमेंट स्टुडिओ ‘ए’च्या बाजूला होते… सर्वात मोठ्ठा होता तो स्टुडिओ ‘ए’… मोठे सेट्स आणि मोठे कार्यक्रम तिथेच रेकॉर्ड (म्हणजे शूट) व्हायचे, आणि कधी लाईव्ह टेलिकास्टही तिथूनच व्हायचे… सातच्या आणि रात्री साडेनऊच्या बातम्याही तिथूनच टेलिकास्ट व्हायच्या… या बातम्यांचे लाइव्ह टेलिकास्ट व्हायचे… ज्योत्स्ना किर्पेकर, प्रदीप भिडे, भक्ती बर्वे यांच्या बातम्या लाइव्ह असायच्या. आमच्या ग्राफिक डिपार्टमेन्टमध्ये ‘परमार’ बॉस होता तर चव्हाण, राजा स्वामी, बबन दळवी, बिनल पटेल वगैरे सीनियर्स होते… स्वामी आणि दळवींना नाटक सिनेमात भरपूर रस होता. त्यामुळे सिनेमावर कधी तावातावाने चर्चा होत, तर कधी मोठमोठ्याने वाद होत असत… स्वामीचा मुद्दा दळवी शांतपणे खोडून काढायचा प्रयत्न करीत असे, त्यामुळे स्वामी कधी कधी एक्साइट होवून मोठ्याने बोलत… असे झाले की मग स्टुडिओतून कोणीतरी येऊन ‘शूऽऽ आवाज नको’… असे सांगून जाई. या वादात अवधूत परळकर (न्यूज एडिटर), भारतकुमार राऊत हेही जाता येता सहभागी होत. ही सर्व मंडळी ग्राफिक्ससाठी आमच्या सेक्शनमध्ये येत असत… त्यातसुद्धा विनय आपटे झंझावातासारखा येई आणि चालू वादात आपले दोन मुद्दे टाकून तेवढ्या वेळात दोन कॅप्शन तयार करुन झपकन निघून जाई. या सर्वात जयवंत मालवणकर (दामूअण्णा मालवणकरांचे चिरंजीव), विजय सुखटणकर, सुधीर कोसके आणि ‘मो पा’, म्हणजे मोहन पाटील शांत असत…
‘मो पा’ म्हणजे एक नंबरचा अबोल प्राणी… अबोल म्हणजे किती? अख्ख्या वर्षभरात तो एखाददुसरे संपूर्ण वाक्य बोलत असे… अख्ख्या वर्षभरात… हो.. त्याचे ‘हो’ ‘बरं’ ‘ठिकाय…’ असे शब्द तीनचार महिन्यातून एकदा उच्चारले जात… बाकी सर्व वेळ तो खुणेनेच बोले… तेही मोजकेच… कामात तो इतका परफेक्ट होता की त्याला काही सांगावे किंवा विचारावेच लागत नसे.. असा हा ‘मो पा’… बाकी आमचे ग्राफिक डिपार्टमेन्ट म्हणजे चित्रकारांचे आणि रसिकांचे… त्यामुळे कँटिननंतर सर्वात महत्त्वाचे तितकेच विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे आमचे ग्राफिक सेक्शन… आपल्या प्रोग्रॅम्सची प्रसिद्धी, त्याच्या टेलिव्हिजन जाहिराती, कॅप्शन, टायटल्स, इलस्ट्रेशन्स, पोस्टर्स हे सर्व इथे केले जात असे. सुरुवातीच्या काळात प्रक्षेपणात तांत्रिक बिघाड खूप व्हायचे, मग मध्येच प्रक्षेपण बंद पडायचं. त्यावेळी ‘सॉरी फॉर दि ब्रेक’ची कार्टून्स केली जात… जयवंत मालवणकर, बबन दळवी, राजा स्वामी ते करीत असत… नंतर ते प्रमाण कमी झाल्यानंतर आणि ह्या लोकांच्या गैरहजेरीत मीही ते करीत असे… ‘सॉरी फॉर दि ब्रेक’ची कार्टून्स खूप गाजली. त्याबद्दल उत्सुकताही होती. बरीचशी कार्टून्स तयार असत… अगदी आयत्यावेळी ती चटकन दाखवली जात… त्यामुळे त्याचे कौतूक खूप होत असे… संध्याकाळी सहानंतर दूरदर्शन केंद्र अर्धं रिकामं होत असे… मग वर्दळ असायची ती लाइव्ह बातम्या आणि एकूण तयार कार्यक्रमांच्या टेलिकास्टची… त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटमध्ये एखाददुसरा स्टाफ पुरत असे.
भक्ती बर्वे आणि मी…
सात ते साडेदहा हा तसा शांततेचाच काळ असे… त्यामुळे कधी कधी एकटा त्या डिपार्टमेंट राहावे लागे… मला सतत टेबल वाजवायची आणि शिट्टी वाजवत (शीळ वाजवत) काम करायची सवय होती… एकदा ‘सात’च्या बातम्या सुरु झाल्या. बातम्या सांगायला भक्ती बर्वे होती… चुकून कसा कुणास ठाऊक स्टुडिओ ‘ए’चा दरवाजा थोडा उघडा राहिला. त्याला लागूनच आमचे ग्राफिक डिपार्टमेंट आणि त्यात एकटा ‘शीळ’ वाजवत काम करीत बसलेला मी… बातम्या सुरु झाल्या… सुरुवातीची सिग्नेचर ट्युन संपली… लाइव्ह फुटेज दाखवून झाले, तेव्हा जाणवले की कुठच्यातरी कोपर्यातून एक बारीकशी शीळ वाजतेय आणि तीही बातम्यांबरोबर टेलिकास्ट होतेय… आतल्या लोकांना कळेना ती कुठून वाजतेय. वरच्या टेलिकास्ट रूममधून खालच्या फ्लोअर मॅनेजर्सना हेडफोनवर सूचना दिल्या जाऊ लागल्या. मोठं टेन्शन झालं होतं ते, न्यूजरीडर भक्ती त्या शिळेमुळे बातम्या सांगताना विचलित तर होत नाही ना? पण ती तशी होत नव्हती. मी इकडे रंगात येऊन एकापेक्षा एक गाणी शिट्टीवर वाजवत सुटलो होतो. दरवाज्याला शिल्लक राहिलेली ती गॅप कोणाला कळत नव्हती. त्यातून छानपैकी ‘शीळ-वादन’ आत जात होते. महाराष्ट्रातले सजग प्रेक्षक पुढच्या पाच मिनिटात जागे झाले आणि टीव्ही सेंटरचे फोन खणखणू लागले. बातम्याना शीळवादनाचे पार्श्वसंगीत प्रथमच ऐकवले जात होते… तो दरवाजा तसाच थोडा उघडा होता हे मला माहितीच नव्हते, शिवाय बाहेर चाललेली शोधाशोधही मला कळली नव्हती… अखेर १५ मिनिटांच्या त्या बातम्या संपल्या आणि भक्ती बर्वे बाईंनी आरडाओरडा करुन स्टुडिओ डोक्यावर घेतला… काय झालं म्हणून मीही बघायला गेलो तर त्यावेळी मला कळले की स्टुडियोचा दरवाजा उघडाच होता.. शिवाय आत शिट्टी कोण वाजवत होतं यावर रागारागाने चर्चा चालली होती… सगळा प्रकार माझ्या लक्षात येताच मी आमच्या सेक्शनमध्ये गुपचूप जाऊन बसलो आणि दरवाजा आतून लावून घेतला…
त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राने माझ्या शिट्टीच्या पार्श्वसंगीतात बातम्या ऐकल्या.
दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळच्या स्टाफ मिटिंगमध्ये चर्चेसाठी एकच विषय… बातम्या चालू असताना शिट्टी कोणी वाजवली…? बरं ती वाजवली तरी टेलिकास्ट कशी झाली? स्टुडिओतून ती घराघरात कशी पोचली?.. ही गोष्ट शेवटपर्यंत कोणालाच कळली नाही.. अखेर त्यातल्या त्यात शिट्टी सुरात तरी वाजवली गेल्यामुळे काही तक्रारी कौतुकात बदलल्या आणि तो विषय कोणीही न सापडल्यामुळे सोडून दिला गेला.
आजही ही गोष्ट माझ्याशिवाय आणि आता तुमच्याशिवाय कोणालाच माहिती नाही…
अशा अनेक तांत्रिक गोष्टींच्या गंमतीजंमती दूरदर्शन केंद्रात घडत… अनेक महान हस्ती सहज तिकडे वावरताना दिसत. हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील कित्येक दिग्गज तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत… ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक स्टार मंडळी तिथे येत… ती येऊन गेली की आमच्या गप्पांना ऊत येत असे… मी, रवी साठे, बी. पी. सिंघ आणि दळवी, आम्ही ड्युटी संपली तरी कित्येक तास गप्पा मारीत बसलेले असू.
‘जैत रे जैत’चा मी पहिला श्रोता…
रवी साठे ‘रवींद्र’ या नावाने मराठी सिनेमात पार्श्वगायन करायचा (सरकारी नोकरीत असल्याने त्याला साठ्ये हे आडनाव लावता येईना… पण ‘रवींद्र’ म्हणजे कोण हे सर्वांना माहिती होते). शिवाय ‘घाशिराम कोतवाल’मध्ये परिपार्श्वकाच्या भूमिकेत गाजत होता. ‘सामना’मधील ‘कुणाच्या खांद्यावर’ या गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली… त्याच्या गप्पांमधून डॉ. जब्बार पटेलांच्या नव्या म्युझिकल चित्रपटाविषयी बरेच ऐकायला मिळे… एकदा रवींद्रने असेच मला स्टुडिओच्या मिक्सिंग सेक्शनमध्ये नेले आणि म्हणाला ‘चल… तुला जब्बारच्या नव्या मराठी चित्रपटातली नवी कोरी ताजी ताजी गाणी ऐकवतो… चल ‘… मी रवीबरोबर त्या टीव्ही सेंटरच्या मिक्सिंग स्टुडिओत गेलो. नुकत्याच मिक्स होऊन आलेल्या गाण्याची टेप रवी साठेकडे होती. ती मशिनला लावून मग जादूगाराच्या पोतडीतून एकेक गोष्टी बाहेर पडाव्यात तशी गाणी बाहेर आली… पहिलं गाणं होतं ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुनाचा वाजं जी’.. दुसरं होतं ‘डोंगरकाठाडी ठाकरवाडी’ आणि तिसरं रवीचं सोलो ‘पीक करपलं… एकापेक्षा एक भन्नाट गाणी…’डॉक्टरांच्या नवीन सिनेमाची गाणी.. बाळासाहेबांचे संगीत.. कवि महानोर…’ रवीने गाण्यांची ओळख करुन दिली.. तिन्ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकली.. त्यांचं शूटिंग व्हायचं होतं.. बाहेर यायची होती.. पहिल्या मोजक्या श्रोत्यांपैकी मी होतो… प्रचंड आवडली… त्यावर मग आम्ही बरंच बोललो.. रवी त्या सिनेमाचा ध्वनीसंकलक व ध्वनीमुद्रक होता.. (पुढे माझ्या पहिल्या चार सिनेमांचा ध्वनिमुद्रकही रवी साठेच होता)… माझ्यासारख्या अनेकांना मित्र म्हणून टीव्ही सेंटरने दिलेली रवी साठे ही एक अमूल्य देणगी आहे… आजपर्यंत ती पुरली आहे… तासंतास गप्पा आणि विविध प्रकारच्या माहितीचा आणि तांत्रिक ज्ञानाचा खजिना आहे रवींद्र साठे… तीच गत बबन दळवीची, लालबाग परळमध्ये त्याचं बालपण गेल्यामुळे त्याच्याशी माझे ट्युनिंग पटकन झाले. एखाद्या घनघोर चर्चेत बबन कधीच हरायचा नाही. ‘आइनस्टाइन’पासून ते परळच्या ‘मोहन रावले’पर्यंत, सगळे त्याच्याबरोबरच लहानाचे मोठे झाल्याप्रमाणे तो चर्चेत त्यांची नावे घ्यायचा. कधीकधी एखादा तावातावाने मुद्दा मांडू लागला की बबन ‘स्तानिस्लवस्की’ वगैरेंची नावे अशी काही तोंडावर फेकायचा की समोरचा त्याच्या या अगाध ज्ञानाच्या दडपणात आपला मुद्दा विसरुन जायचा.
स्मिता पाटीलची पार्टी…
एकदा असेच आम्ही सर्व टॉवरच्या खाली चहा पीत असताना… समोरुन अत्यंत उत्साहाने धावतच स्मिता (पाटील) आली… चेहर्यावर आनंद ओसंडत होता… लागलेली धाप आवरुन स्मिता म्हणाली.
‘हे गायज.. लिसन.. मला तुम्हाला एक जबरदस्त बातमी सांगायचीय… ‘
आम्ही सगळे तिच्याकडे वळलो… स्मिताने सांगायला सुरुवात केली, ‘मला श्याम बेनेगलची फिल्म मिळाली’.
टॉवरखाली बसलेल्या प्रत्येकाने जणू स्वत:लाच फिल्म मिळाल्यासारख्या टाळ्या वाजवल्या. स्मिताकडे पार्टी मागायच्या आधीच तिने जाहीर केले, ‘तुमच्या हातातल्या चहाचं बिल मी देणार..’ काही लोकांनी मिसळ आणि वडे मागवले होते, पण हुशार स्मिताने फक्त चहाचेच बिल भरले.
डेव्हिड धवनची धमाल…
दूरदर्शनच्या न्यूज सेक्शनमध्ये एकएक धमाल लोक होते. तिथल्या एडिटिंग सेक्शनमध्ये डेव्हिड धवन आणि रेणू सलुजा असे दोन इंग्रजी हिन्दी न्यूज विभागाचे एडिटर्स होते. डेव्हिड हा जबरदस्त विनोदी मुलगा, घार्या डोळ्यांचा, हसतमुख आणि गोल गुबगुबीत. कँटिनमध्ये चहाबरोबर धमाल कल्पनाविलास करायचा. हिन्दी कमर्शियल सिनेमांचे भ्रष्ट चित्र तोंडी उभं करून खूप हसवायचा. एकदा चहा पिऊन झाल्यावर आम्हाला तो त्याच्या एडिटिंग रूममध्ये घेऊन गेला.. ‘चलो तुम्हें कुछ दिखाना चाहता हूं’.. म्हणून ओढतच घेऊन गेला.. तेव्हा बातम्यांचे शूटिंग पण फिल्मवरच व्हायचे. आणि बातम्या सांगून आणि दाखवून झाल्या की महिन्याभरात प्रचंड स्टॉक साठत असे, तो कुठे ठेवायचा हा प्रश्नच असे. त्या कचर्यातून डेव्हिडने एक १५ मिनिटांची धमाल फिल्म एडिट करून ठेवली होती, ती आम्हाला दाखवली आणि हसून हसून आम्ही हैराण झालो. त्यात बड्या राजकीय नेत्यांचे चित्रीकरण होते, तसेच अनेक गावांचे, शहरातल्या विविध समस्यांचेही चित्रीकरण होते. त्या सर्व चित्रपट्ट्या एकत्र करून त्याने एक विडंबनपट तयार केला होता. उदा. इंदिराजी विमानातून उतरताहेत आणि स्वागत करणार्यांना हात मिळवताहेत, आणि समोरून हातात कचर्याची टोपली असलेला कामगार येतानाची पट्टी जोडून, जणू काय तो माणूस इंदिराजींना ती टोपली बहाल करतोय असे वाटावे. पुढचाच शॉट इंदिराजी समोरच्याकडून हातात गुच्छ घेऊन शेजारच्याला देताहेत, जणू काय त्या कचार्याच्या टोपलीचा गुच्छ झालेला आहे. अशा अनेक जोडकामांच्या गंमती त्यात होत्या.
त्यावेळी असे एकत्र बसून कितीतरी लोकांनी त्या टॉवरखाली बसून चित्रपटांची स्वप्ने पाहिली.. पुढे विधू विनोद चोप्रा, डेव्हिड धवन नामवंत सुपरहिट डायरेक्टर्स झाले. रेणु सलूजा राष्ट्रीय पुरस्कार विजेती संकलक झाली, स्मिता पाटील टॉपच्या हिरॉईन्समध्ये गणली जाऊ लागली.
बी. पी. सिंह, रवींद्र साठे वगैरे आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊन सेट झाले. अनेकांनी दूरदर्शन केंद्र सोडले व बाहेरच्या जगात स्थिर झाले. पण मनाच्या एका कोपर्यात प्रत्येकाने दूरदर्शन केंद्रातल्या त्या दिवसांना एक स्पेशल जागा ठेवलेलीच आहे.
पहिला ब्रेक
दूरदर्शनमधील अनेक कलाकार व तंत्रज्ञ घेऊन विनय धुमाळे एक मराठी चित्रपट करीत होता. पटकथा तेंडुलकरांची. सिनेमाचं नाव ‘चिमणराव गुंड्याभाऊ’, दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे, भारती आचरेकर आणि बरेच कलावंत त्यात होते. बी. पी, सिंह, कॅमेरामन आणि बबन दळवी आणि मी कला दिग्दर्शक. हा माझा पहिला चित्रपट. एक कला दिग्दर्शक म्हणून मला ब्रेक होता. संपूर्ण चित्रपट निर्मितीची प्रोसेस जवळून पाहायला मिळाली. हाच त्यातला फायदा. माझ्याप्रमाणे अनेकांनाच तो या ना त्या कारणाने पहिला चित्रपट होता. पुढे नाटक-सिनेमात वावरलेल्या अनेक सुपरस्टार्सना त्या काळात खर्या अर्थाने पहिले ब्रेक ‘दूरदर्शनने’ दिलेला दिसून येईल. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, भक्ती बर्वे या भावी सुपरस्टार्सना पहिली ओळख दूरदर्शननेच दिली.
ब्रेक के बाद…
मी तिथे काढलेल्या अडीच वर्षांच्या काळात नाममात्र नोकरी केली, पण बर्याच गोष्टी शिकलो. त्या जोरावर कालांतराने सिनेमात कधी निर्माता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून थोडेफार कामही केले. ज्या ग्राफिक सेक्शनमध्ये मी अनेकांची क्रेडिट लिस्ट तयार केली, त्याच सेक्शनमध्ये पुढे माझ्या नावाचेही कार्ड बनले गेले. ‘टुरटुर’च्या भव्य यशानंतर आणि ‘हमाल! दे धमाल’च्या रौप्यमहोत्सवानंतर दोन वेळा माझाही तिथे इंटरव्ह्यू झाला. त्यासाठी लिहावी लागणारी कार्ड्स लिहायला असाच कोणीतरी माझ्यासारखा स्वप्न पाहणारा कलावंत त्या सेक्शनमध्ये येऊन बसला असेल.. पुढे कधीतरी कळेल, त्याच्या आयुष्यातही ‘दूरदर्शन केंद्र’ किती महत्वाची भूमिका करून गेले आहे ते.