पोलीस निरीक्षक या पदावर काम करणारे सुनील शेटे यांनी कामाचा ताण असताना देखील त्यांच्यात दडलेल्या चित्रकाराला रंगरेषांच्या दुनियेमध्ये रमवले आहे, त्याची कला जिवंत ठेवली आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे दीड वर्षांपासून सुरू असणार्या लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करत वर्दीतल्या या चित्रकाराने १००च्यावर निसर्गचित्रांची निर्मिती केली आहे.
—
मनात आले आणि सहजशक्य झाले असे कधी घडते का, तर त्याचे उत्तर बर्याचदा आपल्याला नाही असेच मिळते. आपल्याला एखादी गोष्ट करायची खूप इच्छा असते, पण अनेकदा वेळ न मिळाल्यामुळे ते राहून जाते. आपल्याकडे एखादी कला असून आपण तिची आराधना करू शकलो नाही, याची रुखरुख मनाला लागते. एखादी व्यक्ती पोलीस खात्यात काम करत असेल तर तिला कला जोपासायला, त्यासाठी वेळ काढायला जमू शकते का? नाहीच ना. पण पोलीस निरीक्षक या पदावर काम करणारे सुनील शेटे यांनी कामाचा ताण असताना देखील त्यांच्यात दडलेल्या चित्रकाराला रंगरेषांच्या दुनियेमध्ये रमवले आहे, त्याची कला जिवंत ठेवली आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे दीड वर्षांपासून सुरू असणार्या लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करत वर्दीतल्या या चित्रकाराने १००च्यावर निसर्गचित्रांची निर्मिती केली आहे.
सुनील यांना शाळेत असल्यापासूनच चित्र काढण्याची आवड होती. शाळा संपली, कॉलेज सुरू झाले. औरंगाबादमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू होते, तेव्हा आपण जीडी आर्ट करून चित्रकार व्हायला हवे असे सारखे वाटायचे. पण आता इंजिनिअरिंगचे करियर निवडले आहे, ते अर्धवट सोडून कसे चालेल, असा विचार कायम मनात यायचा. जीडी आर्ट करता आले नाही याची सल कायम मनाला बोचत राहायची. पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आणि पुण्यात खासगी कंपनीत नोकरीचा श्रीगणेशा झाला. नोकरीनिमित्त गुजरात आणि अन्य राज्यात भ्रमंती सुरू झाली, त्यामध्ये चित्र काढायला, वेळ मिळेनासा झाला. कागद, पेन्सिल, रंग यांच्याबरोबरची मैत्री तुटू लागली होती. दरम्यान, १९९३मध्ये पोलीस खात्यात नोकरी मिळाली.
ते म्हणतात, १९९५मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यात रुजू झालो. तेव्हा, आता आपल्याला चित्रात मन रमवता येईल का, त्यासाठी वेळ देता येईल का, असे नाना प्रश्न माझ्या मनात घर करू लागले होते. मला कधी तरी चित्र काढायची लहर यायची, मी त्याची तयारी करायचो. पण अचानक काहीतरी काम यायचे आणि चित्राचा विषय तिथेच विरून जायचा. आपल्यातला चित्रकार जिवंत ठेवायला हवा, या ध्यासाने मला पछाडले होते.
२००५-२००६चे वर्ष असेल मी पुण्यात पोलीस विभागात विशेष सुरक्षा विभागात काम करत होतो. तेव्हा प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांची पुस्तके आणून अभ्यास सुरू केला. ऑगस्ट-सप्टेंबरचा महिना असेल मला कामाच्या गडबडीतून थोडा रिलॅक्स वेळ मिळाला. तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता मी कॅनव्हास, रंग, ब्रश, हातात घेऊन कामाला सुरुवात केली. चित्र तयार होत गेले तसतसा माझ्यातला आत्मविश्वास वाढत गेला. यापुढे आपण चित्र काढायला वेळ ठेवायचाच, असा पण मी केला. पण पुन्हा एकदा कामाच्या व्यापामुळे २००७मध्ये त्यात गॅप पडली. बाहेर फिरत असताना एखादे जिवंत निसर्गचित्र नजरेत पडले की ते कॅनव्हासवर उतरवायला हात शिवशिवायचे, पण कामाच्या व्यापामुळे ते मागे पडत गेले. २०१७मध्ये खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आणि तिथे माझ्यातला निसर्गचित्रकार जागा झाला. ही तिथल्या निसर्गाची किमया. तिथले वातावरण माझ्यासाठी टॉनिक बनले. २०१८ ते २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत मी ५०पेक्षा अधिक निसर्गचित्रं तयार केली. प्रक्षिण केंद्राच्या परिसरात काम करत असताना निसर्ग न्याहाळायचा, त्याच्या रंग छटा आपल्या डोळ्याच्या कॅमर्यामध्ये टिपायच्या. कामातून फुरसत मिळालीच तर एका छोट्या कागदावर पेन्सिलने चित्र तयार करायचे, घरी आले की फ्रेश व्हायचे आणि चित्र काढण्यात रमून जायचे. आपण काढलेले चित्र खरंच चांगले झाले आहे का, हे पाहायचे त्यामध्ये आवश्यक ते बदल करायचे, असा शिरस्ता अनेक दिवस सुरू आहे. एखादे चित्र १०-१५ दिवस अर्धवट राहायचे. पण ते वेळ काढून पूर्ण करायचेच. यात खंड पडला नाही. आता चित्र हाच माझा खरा ऑक्सिजन आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण होता. कोरोनामुळे प्रत्येकजण भयभीत झालेला होता, ताणतणावात होता. त्या वेळेचा मी सदुपयोग करून घेतला. आपले नेहमीचे काम सांभाळून चित्र काढण्यासाठी मी वेळ ठेवायचो. घरात बोर्डवर कॅनव्हास लावला, चित्र काढायला सुरुवात झाली की मन रिलॅक्स होऊन जायचे, डोक्यात कोरोनाचे कोणतेही विचार यायचे नाहीत. मन पूर्णपणे त्या चित्रात असल्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जायचा. त्या काळात चित्र हे माझ्यासाठी खरे टॉनिक असल्यामुळे मी कायम फ्रेश राहायचो. आजही दिवसभरात एखादे चित्र काढायला घेतले, तर डोक्यातले इतर विचार काही क्षणात हवेत विरून जातात.सुनील म्हणतात, चित्रकला हा माझा खरा आत्मा आहे, त्यामुळे आता हातात घेतलेली ही कला मला आयुष्यभर सुरूच ठेवायची आहे. भविष्यात निसर्गचित्रांचे प्रदर्शन भरवायचे आहे. भारतात ज्या ठिकाणी निसर्गाचे लोभस आणि भारावून टाकणारे रूप पाहायला मिळते, अशा ठिकाणांना भेटी देऊन तिथे लाइव्ह पेन्टिंग्स करण्याचा अनुभव घ्यायचा आहे. या कलेबरोबर नव्याने जुळलेली माझी मैत्री हाच माझा श्वास राहणार आहे…
– सुधीर साबळे
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)