चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।धृ।।
सात वाजता घरातसून भायर म्या पडलंय ।
इमानतळाच्या रस्त्यात दोन तास अडलंय ।
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।१।।
दोन तास मगे चेकिंग करण्यात गेले ।
सामानात गावला चायची बुकी
बटर आणि पेले ।
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।२।।
साडे अक्राक इमानाक पयलो पाय लावलय ।
जसा काय आर्मस्ट्रोगाबरोबर
चंद्रावर पयलो झेंडो रोवलंय ।
हडकुळ्या हवाई सुंदरीन निराशाच केल्यान ।
तरी पण बायलेन डोळे वटारून बघल्यानं ।
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।३।।
इमनातल्या नाश्त्याक ना चव ना ढव ।
चाय पण तशीच, फिकी नि बेचव ।
खाणा कमी नि कागदच जास्त ।
दिवा पॅसेंजरची भेळ कितीतरी मस्त ।
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।५।।
बसतय तवसर उठुचा इला ।
आकाशातून घर गावचा बघूचाच रवला ।
पट्ट्यावरची बॅग दिससर जीव अरधो गेलो ।
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।६।।
इमानान ईलय मगे,
रिक्षान डबल भाडा
घेतल्यानं
खड्डे सगळे मोजीत मोजीत
देवगड एकदाचा गाठल्यानं ।
खुळ्यात काढून माका
फुकटचा लेक्चर पण दिल्यानं ।
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो ।
उंबय तो देवगड प्रवास माझो पैलो ।।७।।
उंबय ता चिपी इमाना सुरू झाली खरी!
पण वेळ आणि पैसो वाट लागता पुरी!
एकाच खेपेत हौस झाली पुरी ।
त्या पावस आपली दिवा सावंतवाडीचं बरी ।
– अवि बोडस
——————–
भरजरी शेल्याला रफू
(जुन्या गाण्यांच्या मुखड्यांवर व्यावहारिक मल्लीनाथीचा हास्यप्रयोग!)
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे…
आणि गवळ्याकडून सकाळी दूध कोणी घ्यावे?
जेथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहाते-
‘परत जाण्यासाठी रिक्षाचे पैसे देशील ना?’
या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या-
गृहपाठ केला नाही तरी चालेल, असे वचन द्या… तरच येतो.
घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा…
मी कुठे झुलवतोय, तुझ्या वजनानेच तर तो गदागदा हलतोय!!
विसर गीत, विसर प्रीत, विसर भेट आपुली-
सगळं विसरेन पण हॉटेलच्या बिलाचं काय?
धुंद येथ मी स्वैर झोकतो मद्याचे प्याले-
तरीही इतकं चांगलं गातोय, म्हणजे मालात खोट असावी.
जे वेड मजला लागले तुजलाही ते लागेल का?-
म्हणजे दोघेही एकदम येरवड्याला जाऊ!!
लळा जिव्हाळा शब्दच खोटे, कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही-
आजोबा-आजीही असंच काहीसं म्हणायचे!!
जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता त्यांचे काय जाय-
एक कॅज्युअल लीव्ह!