महान बुद्धिबळपटू बोरिस स्पास्कीचा जीवनपट संघर्षमय होता. बालपणी दुसर्या महायुद्धाची झळ सोसलेला हा नायक नंतर जगज्जेता झाला. पण कट्टर रशियन हे ब्रीद जपूनही देशवासियांच्या प्रेमाला पारखा झाला, कारण त्याची स्वतंत्र विचारसरणी. नुकताच जगाचा निरोप घेणार्या या चौसष्ट चौकटींच्या सम्राटाचा हा व्यक्तिवेध.
– – –
बुद्धिबळाचा तो डाव रंगतदार अवस्थेत उत्तरार्धाकडे वाटचाल करीत असतो. क्रॉन्स्टिन एक उत्तम डाव खेळतो, ज्यानं प्रतिस्पर्धी आणि प्रेक्षकही आश्चर्यचकित होतात. ही धक्कादायक चाल तो का खेळतोय, हा प्रश्न पडण्याआतच त्यांना उत्तरही मिळतं. क्रॉन्स्टिन स्वत:च्या वजीराचं बलिदान देतो. वरकरणी विचित्र वाटलेल्या, पण सखोल अभ्यासपूर्वक खेळलेल्या या चालीनं प्रतिस्पर्ध्याचा राजा त्वरित सापळ्यात अडकतो आणि क्रॉन्स्टिन सामना जिंकतो…
हे दृश्य आहे, १९६३च्या ‘प्रâॉम रशिया वुइथ लव्ह’ या चित्रपटाच्या प्रारंभीचं. जेम्स बाँड मालिकेतील हा दुसरा चित्रपट. हा प्रसंग जगज्जेता बुद्धिबळपटू बोरिस स्पास्की आणि डेव्हिड ब्रोन्स्टेन यांच्यातील गाजलेल्या खरोखरच्या बुद्धिबळ सामन्यावर बेतलेलं. १९६०च्या ग्रँड चेस स्पर्धेत या दोन प्रथितयश ग्रँडमास्टर्समध्ये तो ऐतिहासिक सामना झाला होता. चित्रपटात क्रॉन्स्टिन हा स्पास्कीप्रमाणे डाव रचतो. स्पास्कीची खासियत म्हणजे या चित्रपटात दाखवलेली किंग्स गॅम्बिट रणनीती त्यानं जेव्हा आखली, तेव्हा तो कधीच हरला नाही. उलट त्यानं नामांकित बुद्धिबळपटूंना धूळ चारली. याशिवाय सिसिलियन बचावपद्धती आणि रुई लोपेझ या रणनीतीनुसारही डाव रचण्यात त्याचा हातखंडा. स्पास्कीनं देदीप्यमान कारकीर्दीत व्हॅस्ली स्मायस्लोव, मिखाइल ताल, टिग्रँन पेट्रोसियान, बॉबी फिशर, अॅरनाटोली कार्पोव्ह आणि गॅरी कास्पारोव्ह यांच्यासारख्या विश्वविजेत्यांना किमान दोनदा नामोहरम केलं. अशा या महान रशियन बुद्धिबळपटूनं नुकतंच वयाच्या ८८व्या वर्षी जग सोडलं.
स्पास्कीचं एकंदर आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखंच रोमहर्षक आणि असंख्य संघर्षांनी व्यापलेलं. स्पास्कीचा जन्म लेनिनग्राडचा म्हणजे आताच्या सेंट पीटर्सबर्ग इथला. त्याचे वडील व्हॅसिली व्लादिमिरोव्हिच स्पास्की यांनी लष्करात नोकरी केली आणि नंतर ती सोडून ते चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून कार्यरत होते, तर आई इकाटेरिना ही शाळेत शिक्षिका. स्पास्की वयाच्या पाचव्या वर्षीपासून बुद्धिबळात रमू लागला. दुसर्या महायुद्धाची झळ या कुटुंबियांना सोसावी लागली. १९४१मध्ये जर्मनीच्या नाझी फौजांनी लेनिनग्राडला वेढा दिला, तेव्हा स्पास्की आणि त्याच्या भावंडांना शहराबाहेर हलवण्यात आलं. मग उरल पर्वतरांगांतील एका अनाथाश्रमात स्पास्कीचं बालपण गेलं. १९४७मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी स्पास्की लेनिनग्राडला परतला. सोव्हिएत स्पर्धेतील विजेत्या मिखाइल बॉटव्हिनिकला एका प्रदर्शनीय सामन्यात हरवून त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. पुढे जागतिक कनिष्ठ विजेतेपदापर्यंत त्यानं मजल मारली. केवळ १८व्या वर्षी ग्रँडमास्टर हा किताबही त्यानं प्राप्त केला. १९६० ते ७० या दशकात स्पास्कीनं चांगलाच दबदबा निर्माण केला. १९५६ ते १९८५ या कालावधीत सात वेळा जागतिक आव्हानवीराच्या (कँडिडेट्स) स्पर्धेसाठी पात्र ठरला. यापैकी तीनदा त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा मान मिळाला. १९६६मध्ये टिग्रँन पेट्रोसियानकडून विश्वविजेतेपदाच्या लढतीत तो हरला होता. पण या पराभवातून धडा घेत १९६९मध्ये स्पास्कीनं पेट्रोसियानलाच २३ डावांमध्ये १२.५-१०.५ असे पराभूत करून १०वा विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला. बुद्धिबळाच्या नकाशावर रशियाच्या वर्चस्वाचा तो सुवर्णकाळ, जो अनेक दशकं टिकला. पुढच्याच विश्वविजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या फिशरनं चमत्कार घडवला आणि स्पास्कीला १२.५-८.५ अशा फरकानं आरामात हरवून जगज्जेतेपद काबीज केलं. १९४८ ते १९९० या कालखंडात रशियाच्या बुद्धिबळ वर्चस्वाला एकमेव हादरा बसला, तो जिव्हारी लागणारा ठरला. (पुढे १९९३पासून पारंपरिक जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद आणि ‘फिडे’ जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद असे दोन विश्वविजेते होऊ लागले. ही परंपरा २००६पर्यंत चालली.)
दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट महासंघ या दोन महासत्तांमधील जागतिक वर्चस्वाचं हाडवैर शीतयुद्ध म्हणून नमूद केलं जातं. १९४७ ते १९९१ म्हणजे सोव्हिएट महासंघाचे विभाजन होईपर्यंतच्या काळापर्यंत ते टिकलं. त्यामुळेच १९७२च्या लढतीची स्पास्की वि. फिशर नव्हे, तर रशिया वि. अमेरिका अशी ओळखही निर्माण झाली. रशियाचा साम्यवाद (कम्युनिझम) वि. अमेरिकेची भांडवलशाही असाही हा लढा होता. जागतिक लक्ष वेधून घेणार्या स्पास्की-फिशर लढतीला म्हणूनच ‘फिडे’नं (मागील) शतकातील सर्वोत्तम लढत असं गौरवलं. फिशर रशियन वर्चस्वाविरुद्ध लढतोय, तर मी फक्त एक बुद्धिबळ सामना खेळतोय, या स्पास्कीच्या मतावर बरीच टीका झाली. दुसरीकडे, श्रीमंतीत वाढलेल्या वाह्यात फिशरनं आपल्या मागण्यांनी संयोजकांना वेठीस धरल्यानं अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ही लक्षवेधी लढत रद्द होण्याची भीती दिसल्यानं बक्षिसाची रक्कम सव्वा लाख डॉलरवरून दुप्पट करण्यात आली. तिकीटविक्री, दूरचित्रवाणी प्रक्षेपण यातील नफ्यामधील वाटासुद्धा फिशरनं मागितला होता. १ जुलैला दोन्ही खेळाडू कोणत्या मोहर्यांनिशी खेळणार हे ठरणार होते. परंतु फिशर आइसलँडला पोहोचलाच नाही. स्पास्कीनंही मोहरे निश्चित करण्यास नकार दिला आणि फिशरला दंड करण्याची मागणी केली. ही लढत ४ जुलैला सुरू झाली. पहिल्या डावाच्या वेळी फिशर अनुपस्थित राहिल्यामुळे रशियाकडून त्याच्यावर कारवाईची मागणी झाली होती. बुद्धिबळ स्पर्धेचं प्रथमच दूरचित्रवाणी प्रक्षेपण करण्यात येत होतं. परंतु पहिलाच डाव गमावल्यामुळे संतप्त फिशरनं जोवर चित्रिकरण स्थगित केलं जात नाही, तोवर खेळणार नाही अशी भूमिका घेतली. परिणामी लढतीची जागाही तात्पुरती बदलण्यात आली. फिशरनं सहावा डाव जिंकत आघाडी घेतली, तेव्हा स्पास्कीनं उभं राहून मुक्तकंठानं त्याचं कौतुक केलं.
या ऐतिहासिक लढतीनंतर स्पास्कीला दाहक चटके अनुभवायला मिळाले. देशवासियांचा क्षोभही त्याला सहन करावा लागला. पुढच्याच वर्षी राष्ट्रीय विजेतेपद मिळवूनही त्याला परदेशात सामने खेळण्यासाठी निर्बंध लादण्यात आले. १९७५मध्ये स्पास्कीनं प्रâान्सचं नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तो फक्त सोव्हिएट रशियाची बंधनं झुगारण्यासाठी नव्हे. तर मॉस्कोतील सोव्हिएट दूतावासात कार्यरत असलेल्या प्रâेंच नागरिकत्व मिळालेल्या मरिना शेचेरबाचोव्हाशी विवाहबद्ध झाल्यामुळे. मरिना ही त्यांची तिसरी पत्नी. त्यांचा पहिला विवाह नेडेझडाशी झाला, तो फक्त तीन वर्षं टिकला. मग त्यांनी लॅरिसाशी दुसरा विवाह केला, जो दीर्घकाळ टिकला. पण मरिनाशी विवाहानंतर त्यानं फ्रान्सचंही प्रतिनिधित्व केलं.
२०१०मध्ये स्पास्कीला पक्षाघाताचा झटका बसला. या कठीण कालखंडात आपल्याला नजरकैदेत ठेवल्याची भावना निर्माण झाल्यामुळे तो आणखी व्यथित झाला. पण प्रतिस्पर्ध्यांच्या चाली भेदण्याची त्याची क्षमता त्यावेळीही अबाधित होती. त्यानं गुप्तपणे योजना आखून फ्रान्स सोडलं आणि पुन्हा रशिया गाठलं. मग आपल्या मायदेशात गेल्यावर रशियाच्या प्रसारमाध्यमांसमोर आपण कसं बंदिवासातून पलायन केलं याची चित्तथरारक कहाणी ऐकवली. ‘‘मी फ्रान्समध्ये राहिलो, कारण स्वतंत्रपणे जगायचं होतं. पण मी रशियन आहे,’’ हे स्पास्कीनं या माध्यमातून बिंबवलं. स्पास्की कट्टर रशियन होता, पण सोव्हिएट विचारसरणी त्याला पूर्णत: मान्य नव्हती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिनच्या क्रौर्याचा तो साक्षीदार होता. त्यामुळे मार्क्सवादी विचारप्रवाहापासून त्यानं स्वत:ला दूर ठेवलं. बालपणीच्या यातनांमुळे त्यानं सत्ताधार्यांचा समर्थक होण्यापेक्षा वैयक्तिक विचारांवर प्रेम केलं. म्हणूनच स्पास्कीनं बुद्धिबळातील महानतेसोबत बंडखोर ही ओळखसुद्धा जपली.