हे मुखपृष्ठचित्र आहे १९७२ सालातलं. हे साल आज अनेकांच्या लक्षात असेल ते दुष्काळी साल म्हणून. या काळात देशात अनेकांना अमेरिकेतून आलेल्या लाल गव्हाचे पदार्थ खावे लागले होते, अन्नधान्याची टंचाई होती. अर्थव्यवस्था बाराच्या भावात गेली होती. त्या काळात आपल्या आर्थिक अवनतीचा आलेख हे कसलंही शिखर नाही, याची जाणीव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना करून देणारं हे व्यंगचित्र आहे… त्यात इंदिराजींच्या चेहर्यावर हतबल आश्चर्याची भावना दिसते आहे. हे आपल्यासाठी, देशासाठी लाजिरवाणे आहे, याची जाण त्यांना होती. त्याने त्या व्यथित झाल्या होत्या. त्यांची संवेदनशीलता मेलेली नव्हती… कट टू आजचा काळ. आज अर्थव्यवस्थेची अवस्था हीच आहे. रुपया तळाला गेला आहे. रुपयाला सावरायला सरकारची बटीक बनलेली रिझर्व्ह बँक अतिमौल्यवान डॉलर्स खर्च करते आहे. सेन्सेक्स हा भांडवली बाजाराचा निर्देशांक तळाला गेलेला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून अंग काढून घेतलेलं आहे… या सगळ्याचा विद्यमान सत्ताधार्यांवर काही परिणाम झाल्याचं दिसतंय का? त्यांनी देशाचे नेते असण्यापेक्षा शेअर दलालच असल्याच्या थाटात निवडणुकीच्या आधी लोकांना शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता, आज लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. काही फरक पडतोय सत्ताधार्यांना? कसा पडेल? ज्यांनी सत्तेला जाब विचारायचा ते कुंभस्नानाचं पावित्र्य, सिनेमातून दिसणार्या अर्धवट इतिहासातून घेतलेल्या वरवरच्या प्रेरणा आणि व्हॉट्सअप फॉरवर्डमधून दिसणार्या खोट्या गुलाबी चित्रात मग्न आहे… अशी प्रजा असेल तेव्हा राजा फिडल वाजवण्यात मग्न नसता तरच नवल होतं.