ग्रहस्थिती : राहू -मेषेत, मंगळ – वृषभेत, रवि-बुध-शुक्र (अस्त)-कन्येत, केतू- तुळेत, शनि (वक्री)-प्लूटो (वक्री)-मकरेत, गुरु-नेपच्युन दोन्ही वक्री मीनेत. १७ ऑक्टोबर रोजी मंगळ मिथुनेत, १९ ऑक्टोबर रोजी शुक्र तुळेत, १८ ऑक्टोबर रवी तुळेत, २७ ऑक्टोबर रोजी बुध तुळेत. दिनविशेष – ९ ऑक्टोबर- कोजागिरी पौर्णिमा, १३ ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी, २२ ऑक्टोबर- धनत्रयोदयाशी, २४ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन, २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, २६ ऑक्टोबर बलिप्रतिपदा- दिवाळी पाडवा, भाऊबीज.
मार्मिकचा यापुढील अंक हा दिवाळी अंक असल्याने पुढील चार आठवडे साप्ताहिक स्वरूपात मार्मिक प्रकाशित होणार नाही.
त्यामुळे दिवाळीपर्यंतचे राशीभविष्य एकत्र देत आहोत. दिवाळी अंकात संपूर्ण वर्षाचे राशीभविष्य असेलच… ते चुकवू नका.
मेष – दिवाळीच्या अगोदर कामाच्या निमित्ताने तुमची भरपूर धावपळ होणार आहे. मंगळ पराक्रम भावात राहणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाला चांगले यश मिळणे थोडे कठीण वाटते. त्यामुळे आपल्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या म्हणजे झाले. दशम भावात असणारा वक्री शनी त्यानंतर सप्तम भावात येणारे शुक्र आणि रवी यामुळे पुढल्या १५ दिवसांच्या अवधीत आपल्या स्थितीमध्ये सुधारणा झालेली दिसेल. नोकरीच्या कामाच्या ठिकाणी आपल्या अधिकार क्षेत्रात वाढ झालेली दिसेल. आपल्याला मानाची जागा मिळू शकते. त्यामुळे आपला उत्साह वाढलेला दिसेल. एखादा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये अनपेक्षित वाढ झालेली दिसेल. काही शुभ घटनांचा अनुभव येईल. कलेच्या क्षेत्रात घवघवीत यश मिळालेले दिसेल. सिनेकलाकार, नृत्य, गायन या क्षेत्रात काम करणार्या कलाकारांसाठी चांगला काळ रहाणार आहे. संततीला उत्तम यश मिळेल. व्यय भावातील वक्री गुरु व नेपच्युनमुळे अध्यात्म क्षेत्रात चांगली प्रगती कराल. मानसशास्त्राचा अभ्यास करणार्या मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. प्रवासात नव्या ओळखी होतील. नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
वृषभ : आपला स्वभाव जर मजा मस्ती करणारा असेल तर त्यामध्ये काही काळासाठी बदल करा. नव्या कल्पना सुचतील आणि त्या आकाराला येताना दिसतील. गुरु-बुध-शुक्र-रवी असा दृष्टियोग आहे. त्यामुळे बर्याच गोष्टी पदरात पडल्या आहेत. १८ आणि १९ तारखेला होणारे शुक्र आणि रवीचे राश्यांतर सोबत केतू यांचे त्रिकुट षष्ठम भावात असणारा आहे. आर्किटेकट, डिझायनर, इंजिनीयर या मंडळींच्यासाठी एखाद्या पेटंटवर काम होईल. नोकरीच्या ठिकाणी आपला दबदबा वाढलेला दिसेल. गोड बोलून आपले काम मार्गी लावण्यात यश मिळेल. रवि-शुक्र युती त्यामुळे कापड व्यवसाय, सुगंधी द्रव्य, या व्यवसायात असणार्या मंडळींना चांगले दिवस अनुभवयास मिळतील. संततीकडून कौतुकास पात्र होईल असे काम पार पडेल. लाभातील गुरु चांगले यश मिळवून देईल. दिवाळीच्या आधीचा काळ गोड घटनांचा अनुभव देणारा राहणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी होणारे मंगळाचे राश्यांतर हे धन भावातून होणार आहे, त्यामुळे बोलताना लगाम ठेवा. तिखट, चमचमीत पदार्थ खाणे टाळाल तर बरे होईल. आरोग्याच्या तक्रारींपासून लांब राहाल.
मिथुन : आपल्या आवडत्या लोकांच्या मनात चांगली जागा निर्माण कराल. त्यामुळे अपेक्षित कामामध्ये चांगले यश मिळालेलं दिसेल. कुटुंबासाठी भरपूर वेळ द्याल, शुभकार्यात सहभागी व्हाल. भद्रयोग आणि हंस योग यामधील बुध-गुरु त्यामुळे चांगली यशप्राप्ती होईल. नव्या घराचे स्वप्न साकार होईल. मंगळाचे भ्रमण, मंगळ-बुध केंद्रयोग यामुळे थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. काही विवंचनेत अडकू शकता. गुरुकृपा चांगली राहील, त्यामुळे फार त्रास जाणवणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल. प्रेमी युगुलांसाठी उत्तम काळ राहाणार आहे. शनि-मंगळ षडाष्टक योग यामुळे कामात दिरंगाई होऊ शकते. वेळकाढूपणा होईल. मानसिक अस्थिरता राहणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रासाठी उत्तम काळ राहणार आहे. भावंडांच्या गाठीभेटी होतील. कुशल संघटक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडाल.
कर्क : आपल्या दाम्पत्य जीवनातील वातावरण बिघडलेले दिसेल. मंगळाचे मिथुनेतून होणार्या राश्यांतरामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. पती-पत्नी यांनी वादाचे प्रसंग टाळावेत, तसे केले तरच दिवाळीचा आनंद द्विगुणित होताना दिसेल. सुखस्थानात होणारे खंडग्रास सूर्यग्रहण कुटुंबातील जिवलगांसाठी चिंताजनक वातावरण निर्माण करणारे आहे. घरात पाळीव प्राणी असतील तर ते हरवण्याचे प्रकार घडतील. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीच्या निमित्ताने विदेशात जावे लागले. लेखक वर्गासाठी नावलौकिक मिळवून देणारा काळ राहणार आहे. एखादे पारितोषिक मिळू शकते. बुध पराक्रम भावात राहणार असल्यामुळे वारंवार प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबात एखादी जुन्या विषयांवरील चर्चा उफाळून येईल. मात्र, त्यामधून काहीच साध्य होणार नाही. मंगळाच्या व्ययातल्या भ्रमणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे दिवाळीत आराम करावा लागू शकतो.
सिंह : आगामी काळात तुम्हाला संमिश्र स्वरूपाची फळे मिळताना दिसतील. ज्या मंडळींच्या कुंडलीत मंगळ लाभ भावात आहे, अशांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महिला वर्गाला या काळात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहणांमुळे आगामी काळात करियरबाबत अपयश मिळू शकते. मात्र, त्याने खचून न जाता प्रामाणिकपणे काम करत राहा. भविष्यात नक्की यश मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. मंगळाचे लाभतील भ्रमण हे वास्तू, जमीन याच्या व्यवहारातून चांगले लाभ मिळतील. आपले विचार दुसर्यांवर लादू नका. सल्लामसलत करून निर्णय घ्या. आपले निर्णय चुकू शकतात, त्यामुळे सावधपणे पाऊल टाका. वेळ पडली तर दोन पावले मागे जा. ते फायद्याचे राहील. धार्मिक यात्रा होतील. हटवादीपणा टाळा. धार्मिक यात्रा होतील. मार्वेâटिंगचे काम करणारी मंडळी, एजंट, ब्रोकर या मंडळींसाठी उत्तम काळ राहील. प्रवासाचे योग आहेत.
कन्या : आपल्याला आगामी काळ हा भरभरटीचा जाणार आहे. आर्थिक लाभ आणि करियरच्या दृष्टीने चांगली फळे मिळाल्याचे पाहायला मिळेल. क्रीडाक्षेत्रात असणार्या खेळाडूंना उत्तम काळ आहे. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. धनस्थानात होणार्या ग्रहणयोगामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. प्लूटो आणि नेपच्युन ग्रह वक्री आहेत, त्यामुळे प्रेमात अपयश मिळू शकते. गाठी-भेटी घेताना बोलताना थोडे भान ठेवा. सांभाळून राहा. जुन्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात एखादे काम सुरु असेल तर त्यामधून चांगला लाभ मिळू शकतो. त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक असेल. हातात पैसे आले म्हणजे त्याचा कसाही वापर करू नका. कोणाला उधार देण्याचे टाळा.
तूळ : काही अनपेक्षित खर्च उभे राहणार आहेत. त्यामध्ये आजारपण आणि औषधपाण्यावर खर्च होतील, त्यामुळे चिडचिड होईल. मन शांत ठेवा. समोर आलेल्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जा. कुटुंबासाठी पैसे खर्च करताल. सूर्यग्रहण आहे, त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. चुकून घाईमध्ये घेतलेला निर्णय चुकू शकतो. त्यामुळे मन:स्ताप करण्याचा प्रसंग येऊ शकतो. कायदे कानून पाळा. फसवले जाण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे बचके रहेना. पती-पत्नीचा देवदर्शनाला जाण्याचे योग जुळून येतील. व्यावसायीक मंडळींसाठी अत्यंत लाभदायक काळ राहणार आहे. नोकरीच्या निमित्ताने विदेशात जावे लागले.
वृश्चिक : गुरु लाभ भावात, रवि-बुध-शुक्र लाभात, त्यामुळे आगामी काळ तुम्हाला उत्तम जाणार आहे. अनपेक्षित लाभाचा काळ. आपल्या ध्यानीमनी नसलेले एखादे काम झटकन पूर्ण होऊन जाईल. विमा, पूर्वीची गुंतवणूक, फंड या माध्यमातून चांगला लाभ मिळेल. उसने दिलेले पैसे मिळतील. संततीकडून चांगले काम घडेल. सुखस्थानात असणार्या वक्री शनीमुळे कौटुंबिक खर्च वाढू शकतात. कामाचा वेग संथ राहील. मन चिंताग्रस्त राहील. शत्रूवर विजय मिळवाल. कामाचा ताण वाढेल, त्यामुळे शारीरिक दगदग वाढेल. जोडीदाराबरोबर सहलीसाठी विदेशात जाताल. सरकारी सेवेत असणार्या मंडळींना चांगला काळ अनुभवायला मिळेल. राजकारणी मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे.
धनु : तुमची दिवाळी उत्तम जाणार आहे. समाजात चांगली पत प्रतिष्ठा मिळेल. २५ तारखेला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण अनपेक्षित लाभ मिळवून देण्यास अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षित बदल घडतील. तिथे एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक प्राप्ती वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधाल, त्यामध्ये चांगले यश मिळेल. काही मंडळींना बंधुवर्गाबरोबर विपरीत अनुभव येतील. आपल्या व्यवसायाची घडी जर काही कारणामुळे विस्कटली असेल तर ती बसण्यास मदत होईल. नवीन वास्तू, वाहनाची खरेदी होईल. आपल्या मनासारखी कामे झाल्यामुळे आनंदी राहाल. महत्वाकांक्षा वाढेल.
मकर : आपल्या कामात स्थिरता राहणार नाही, त्यामुळे मन:स्वास्थ ठीक राहणार नाही. आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. मंगळाचे षष्ठम भावातील भ्रमण, त्यामुळे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरीत नवी जबाबदारी येईल. कामाच्या निमित्ताने देश-विदेशात प्रवास करावे लागतील. त्यामुळे दगदग होऊ शकते. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. महत्वाचा पत्रव्यवहार होईल. व्यवसायात असताल तर नवीन ऑर्डर मिळतील. कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या, कुठे चूक करू नका. रवि-शनी केंद्रयोगामुळे थोडा मन:स्ताप होऊ शकतो. सरकारी अधिकारीवर्ग बरोबर पंगा घेऊ नका, तो महागात पडू शकतो. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचे धाडस करू नका, ते अंगाशी येऊ शकते. शेअरबाजार, सट्टा यामधून चांगला लाभ होईल.
कुंभ : आपल्याला कामात झालेले नुकसान भरून निघेल अशी स्थिती आहे. साडेसाती सुरु आहे, त्याच्या झळा अधिक तीव्र होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या, चुकून एखाद्या अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आर्थिक बाजू हळूहळू सुधारताना दिसेल. १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी राश्यांतर करणारा शुक्र आणि रवि परिस्थिती सावरण्यास मदत करणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मंडळींकडून त्रास होऊ शकतो. मानापमानाच्या घटना घडतील. कामगार संघटनांच्या पुढारी वर्गासाठी त्रासदायक काळ राहणार आहे. कट कारस्थानापासून लांब राहा. संततीच्या बाबतीत शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होतील. ध्यानधारणा करण्यात मन रमवा.
मीन : आगामी काळात तुम्हाला सर्वच बाबतीत खबरदारी घ्यावी लागणार आहे. स्वास्थ आणि वैचारिक समस्या वाढलेल्या दिसतील. त्यामुळे शांत रहा आणि आनंदात वेळ घालवा. ग्रहणादरम्यान प्रवास करण्याचे टाळा, हा काळ थोडा कठीण आहे, त्यामुळे काळजी घ्या. म्हणजे झाले. बुधामुळे तुमच्या अनेक समस्यांचे निराकारण झालेले दिसेल. सुखस्थानात राश्यांतर करणारा मंगल करियरबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्याचे धाडस करेल. जमिनीची जुनी कामे मार्गी लागतील. शनी-मंगळ षडाष्टक योगामुळे कामात विलंब होताना दिसेल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीचे काम मिळेल.