• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चिंतन, मंथन आणि कुंथन

(संपादकीय ८ ऑक्टोबर २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in संपादकीय
0

‘देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता ही चिंतेची बाब आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांच्या हातात देशातली एक पंचमांश म्हणजे २० टक्के संपत्ती एकवटलेली आहे आणि त्याचवेळी ५० टक्के जनतेकडे जेमतेम १३ टक्के संपत्ती आहे, ही सांगाली स्थिती आहे का? देशातला मोठा समूह स्वच्छ पाणी आणि सकस आहारापासून वंचित आहे…’ हे जळजळीत उद्गार ना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आहेत, ना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांचे आहेत, ना भारतीय जनता पक्षात राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे धारिष्ट्य दाखवणारे सुब्रम्हण्यम स्वामी किंवा सत्यपाल मलिक यांचे आहेत; हे उद्गार आहेत दत्तात्रेय होसबाळे यांचे… हे कोण होसबाळे, साक्षात विश्वगुरूंच्या राजवटीवर टीका करणार्‍या या देशद्रोह्याला पाकिस्तानात पाठवा, यांच्यावर बहिष्कार टाका, त्यांचे अर्वाच्य शब्दांत ट्रोलिंग करून त्यांना आयाबहिणींवरून शिव्यांची लाखोली वाहा, असे नेहमीचे उपाय वापरून भाजपच्या ट्रोलटोळीला होसबाळे यांना नामोहरम करता येणार नाही… कारण ते काही विरोधी पक्षातले नेते किंवा डावे विचारवंत नाहीत; मोदी यांची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सहकार्यवाह आहेत. नवी दिल्लीत स्वदेशी जागरण मंचाच्या एका कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका करणारी भूमिका मांडल्याने अनेक भुवया उंचावल्या.
मात्र, होसबाळे यांच्या या प्रकट चिंतनाने काय साध्य होईल?
देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने विचार केल्यास, ‘काहीच नाही’, हे या प्रश्नाचे कटु पण खरे उत्तर आहे.
याचे कारण रा. स्व. संघाच्या जबाबदारी झटकण्याच्या धोरणात दडलेले आहे. भाजपमध्ये जे काही मोजके मूळ संघातून आलेले कार्यकर्ते उरलेले आहेत, ते सगळे संघाशी एकनिष्ठ राहून संघाला अपेक्षित समाजनिर्मिती करण्याचे व्रत घेतलेले लोक आहेत. मात्र, संघ कधीही भाजपचे अधिकृत पितृत्व घेत नाही. संघापेक्षा पंडित नेहरूंच्या उदारमतवादाचा पगडा ज्यांच्यावर अधिक होता, ते अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संघ आणि भाजप यांच्यातील हे समीकरण समजण्यासारखे होते; कारण वाजपेयी हे तुलनेने मवाळ आणि सर्वसमावेशक नेते होते- लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करून त्यांना पंतप्रधानपदावर नेमणे ही संघाची मजबुरी होती. आता तशी परिस्थिती नाही. संघाचा अजेंडा निष्ठुरपणे पुढे रेटणारे मोदी-शहा ही जोडगोळी देशाचा कारभार हाकते आहे, भाजपकडे संपूर्ण बहुमत आहे; तरीही सरसंघचालक मोहन भागवत काय किंवा होसबाळे काय- हे काय चालले आहे ते बरोबर नाही बरं का- एवढं सांगून तिथेच थांबणार आहेत. तिथेच खरी गोम आहे.
देशातल्या आजच्या दुरवस्थेची मुहूर्तमेढ २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच वेळी रोवली गेली होती. त्यांच्या स्वकेंद्री, अहंमन्य, इव्हेंटबाज व्यक्तिमत्त्वाने त्यांचा एक घातक कल्ट देशात तयार केला आणि त्यांना ज्यात गतीच नाही अशा अनेक विषयांत तज्ज्ञांना बाजूला ठेवून त्यांनी एकापेक्षा एक घातक निर्णय घेतले. नोटबंदीने या देशातील व्यवहारांचे कंबरडे कायमचे मोडून ठेवले. ती एक घोडचूक होती, हे सर्व प्रकारे स्पष्ट झाल्यानंतरही संघाने काय केले? मोदी-शहा यांनी देशातील संवैधानिक संस्था खच्ची केल्या, सतत फक्त आणि फक्त प्रचारच सुरू असल्यासारखे उथळ वर्तन देशात आणि परदेशातही केले. हा र्‍हास सुरू असताना होसबाळे काय करत होते? संघाचे प्रचारक कसे निर्मोही, निरलस, सेवावृत्तीचे कार्यकर्ते असतात, ते किती साधेपणाने जगतात, याची खूप कौतुके केली जातात. तेच कार्यकर्ते राजकारणात उच्चपदावर पोहोचल्यावर इतके गुलहौशी कसे बनतात? त्यांचे राहणीमान पंचतारांकित कसे बनते? आपल्याच करणीने देश आर्थिक संकटात लोटला गेलेला असताना सेंट्रल व्हिस्टा, बुलेट ट्रेन यांच्यासारखे भपकेबाज, अनुत्पादक आणि अनावश्यक प्रकल्प पुढे रेटून नेण्याची त्यांची हिंमत कशी होते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लोकांनी कुचेष्टेने ‘दोन उद्योगपतींचा सेवा संघ’ म्हणावे, इथपर्यंत मजल जात असताना संघाचा थिंक टँक काय करत होता?
स्वदेशी जागरण मंचाने वाजपेयी पंतप्रधानपदावर असताना काही धोरणांना विरोध दर्शवला होता. तेव्हा निर्गुंतवणुकीवर रूष्ट असलेल्या संघाने आज मोदींनी रेल्वे स्टेशनांपासून असंख्य सरकारी आस्थापनांचे खासगीकरण आणि थेट विक्री करणे चालवले असताना त्याला विरोध केलेला दिसलाच नाही. मूळ धोरण आखले आणि पार पाडले जात असताना काहीच बोलायचे नाही आणि त्या अर्थनिरक्षर धोरणांमधून देशाची अपरिमित हानी झाल्यावर चिंता व्यक्त करायची, याला काय अर्थ आहे?
राजकारणात एक ‘कुकरची शिट्टी’ वाजवण्याची युक्ती योजली जाते. आपल्या धोरणांमुळे काय होणार आहे, याची राज्यकर्त्यांना पूर्ण कल्पना असते. मात्र, लोकांचा असंतोष उफाळून येण्यासारखी परिस्थिती आली की सत्ताधारी वर्तुळातूनच कोणीतरी चिंता व्यक्त करतो, खरडपट्टी काढतो, कानउघाडणी करतो. यातून लोकांच्या मनात साठलेली वाफ निघून जाते… आत जे शिजायला घातले आहे, ते शिजतच राहते… होसबाळे यांचे वक्तव्य याच प्रकारचे आहे.
त्यांनी वर्णन केलेली देशाची चिंताजनक परिस्थिती हे मोदी-शहांच्या राजवटीचेच थेट फळ आहे. त्यामुळे जोवर संघ या जोडीला चाप लावताना दिसत नाही, तोवर हे चिंतन आणि मंथन जाहीर कुंथनापेक्षा अधिक मोलाचे मानता येणार नाही.

Previous Post

नया है वह…

Next Post

न्यूनगंडाचे निर्दालन करण्यासाठी…

Next Post

न्यूनगंडाचे निर्दालन करण्यासाठी...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.