उद्या महात्मा गांधी यांची जयंती आहे. तुमचा त्यांच्याबद्दलचा आदरभाव या सदरातून वाचला आहे. गांधीजींचा तुम्हाला भावलेला सर्वात मोठा गुण कोणता?
– किरण जोशी, भिलवडी
सत्याचे प्रयोग.
न्यूज चॅनेलांवरचे अँकर द्वेषाला खतपाणी घालतात, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यांचं चेकाळून बोलणं तुम्हीही पाहिलं असेलच. असं का वागत असतील हे अँकर?
– मनीषा सुके, मालवण
तुम्ही पाहता म्हणून.
नामीबियामधून भारतात आणलेले चित्ते आता एकमेकांशी काय बोलत असतील?
– विराज गोखले, पुणे
आपल्याला फारच ‘चित्ता’ बनवलं यार.
मराठीत एकीकडे सुमार विनोदी सिनेमा हिट होतो आणि दुसरीकडे दर्जेदार, विचारांना चालना देणारा, हसवता हसवता अंतर्मुख करणारा उत्तम सिनेमा एका आठवड्यात मान टाकतो… हे अपयश कुणाचं? काय चुकतंय नेमकं?
– राहुल शानभाग, कोल्हापूर
रसिकांचं.
ज्या गतीने महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले जातायत, ते पाहता तुमचा मराठी नाट्यउद्योगही उद्या गुजरातेत नेला जाईल, अशी भीती नाही का वाटत तुम्हाला?
– पैगंबर खान, राजापूर
नाही. गुजराथ्यांना मराठी भाषिक माणूस आवडत नाही.
जगात कुठेही पाहायला मिळणार नाहीत असे, महिन्या दोन महिन्याच्या आत खड्डे पडणारे रस्ते बनवण्यासाठी महाराष्ट्रात नेमकं काय तंत्रज्ञान वापरलं जात असेल, तुम्हाला काही अंदाज आहे का?
– राजाराम बर्वे, अंधेरी
यांचं तंत्रज्ञान नाही माहिती, पण चांगले रस्ते बांधायला इच्छाशक्ती हवी एवढं माहित आहे.
तुम्हाला जगातल्या वाटेल त्या देशात कायमस्वरूपी राहण्याची मुभा मिळाली, तर
१. तुम्ही भारतात राहाल का?
२. भारत सोडणार असाल तर कोणत्या देशात जाल?
– प्रफुल्लता कांबळे, सायन
भारतातच राहीन… जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहां.
मराठी नाटक आणि हिंदी सिनेमा या दोन्हीकडे तुम्हाला समान तोलामोलाची चांगली भूमिका मिळाली आणि दोन्हीमधलं एकच काहीतरी स्वीकारायची वेळ आली, तर काय स्वीकाराल?
– अनिरुद्ध जोपळे, अंबड
सिनेमा.
कोणत्या झाडाला फेरे मारल्यावर चांगली बायको मिळेल?
– अशोक परशुराम परब, ठाणे
कल्पवृक्षाला.
एका डॉलरला लवकरच १०० रुपये मोजावे लागलीत, असे दिसते. हा शतकमहोत्सव तुम्ही कसा साजरा करणार? दिवा लावून की थाळ्या वाजवून?
– सायली ठोंबरे, धानोरी
कपाळ बडवून साजरा करणार.
मुलाखती घेणारे नवशिके रिपोर्टर कलावंतांना काय वाट्टेल ते बावळट आणि आचरट प्रश्न विचारत असतात… तुम्हाला कुणी असा प्रश्न विचारला होता का? काय होता तो प्रश्न?
– नेमीनाथ अवघडे, मोरगाव
हो विचारतात ना… नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला किंवा चित्रपटाच्या प्रीमियरला येऊन विचारतात सध्या नवीन काय???
डोक्याला खूप ताप झालेला आहे, मन:स्थिती वाईट आहे, अशावेळी रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करता?
– सरिता मावळणकर, आडगाव
चित्र काढतो.. गाणं ऐकतो.
तुम्हाला शास्त्रीय संगीताची इतकी आवड आहे. तुम्हाला कोणत्याही वेळी, कुठेही, कितीही वेळा ऐकायला आवडते अशी शास्त्रीय संगीतातील रचना कोणती?
– बॅरी परेरा, सांताक्रूझ
किशोरी अमोणकरांचा बागेश्री
उस्फूर्त विचार विवेकी असतो का?
– नागेश पांडे, गंगापूर रोड, नाशिक
विचार उत्स्फूर्त असला तरी विवेकी असेलच असे नाही…