देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प पाहण्यासाठी १९९२मध्ये केंद्र सरकारचे एक पथक इथे येऊन हा उपक्रम पाहून गेले होते, त्यानंतर केंद्रीय स्तरावर एक अध्यादेश काढून देशाच्या अनेक भागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात यावा, असे सुचवण्यात आले होते. सोलापूरमध्ये अशा प्रकारचा एक उपक्रम सुरू झाला होता. देशाच्या अन्य भागांत हा उपक्रम खरोखरच पोहोचला असता तर अनेक भागातील ग्रीन कव्हर वाढण्यास त्याची चांगली मदत झाली असती, असे स्मृतिवन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विवेक वेलणकर सांगतात.
– – –
गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या योजना, उपक्रमांअंतर्गत १०० कोटीच्या वर झाडे लावली गेली असतील. त्यापैकी जेमतेम २५ कोटी झाडे जंगली असती तर राज्याचे हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) वाढलेलं असायला हवं होतं, राज्यात पर्यावरणाचं संतुलन उत्तम राहायला हवं होतं. पण तसं झालेलं दिसत नाही. असं का झालं, या वृक्षारोपणात काय गडबड झाली, असा प्रश्न अनेकांना पडत असेल, पण त्याच्या फार खोलात कोणी जात नाही. तेवढ्यापुरता विचार करून तो विषय सोडून दिला जातो. रोपं लावली, रस्त्यातून जाताना दरीत, माळावर बिया फेकल्या की झालं निसर्गसंवर्धन अशी कल्पना याला कारण आहे. रोपाचं झाड बनेपर्यंत आणि खर्या अर्थाने ते ‘आत्मनिर्भर’ बनेपर्यंत त्याची देखभाल करावीच लागते. ते न केल्यास वृक्षारोपण हा देखाव्याचा फोटोबाज उपचार बनून बसतो आणि झाडांची संख्या हा नुसताच आकडेफुगवटा.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी झाडे लावायची आणि ती सांभाळायची मनापासून इच्छा आणि गांभीर्य असलेले लोकही असतात. पण, ती कशी लावावीत आणि कुठे लावावीत, याचे नेमके मार्गदर्शन मिळत नाही. झाड लावणं हा नुसता इव्हेंट असता कामा नये, त्यामध्ये लोकांच्या भावना गुंतायला हव्यात, आपण लावलेले झाड कसे आहे, त्याची वाढ कितपत झाली आहे, याविषयीची ओढ निर्माण व्हायला हवी.
अशी ओढ आणि झाडाबरोबर नातं तयार झालं की ते किती घट्ट बनतं आणि त्यातून काय चमत्कार घडतो, ते पुण्यातल्या गांधी भवन भागात पाच एकराच्या परिसरात बहरलेल्या स्मृतिवनाकडे पाहिल्यावर कळतं. ओसाड डोंगरावर काही नागरिकांनी एकत्र येऊन निसर्गसेवक या संस्थेच्या माध्यमातून स्मृतिवन नावाची संकल्पना राबवायचं ठरवलं होतं १९८७ साली, ३४ वर्षांपूर्वी. ही कल्पना लोकांना आवडली आणि तिच्यात लोकांचा गंभीर सहभाग अशा प्रकारे वाढला की आज या ठिकाणी नैसर्गिक जंगल निर्माण झालेलं आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शहराच्या मध्यभागात नागरिकांच्या प्रयत्नामधून निर्माण झालेल्या या नैसर्गिक जंगलामध्ये आता प्राणी, पक्षी मुक्तपणे संचार करण्यासाठी येऊ लागले आहेत.
काय आहे स्मृतिवन उपक्रम…
१९८७ मध्ये ज्ञानप्रबोधिनीची पाच एकर जागा असणार्या डोंगरावर नैसर्गिक जंगल करण्याचं ठरले. निसर्गसेवक संस्थेचे तेव्हाचे प्रमुख श्री. वि. केतकर यांनी ती जागा १० वर्षे कराराने घेतली. त्यानंतर इथे जंगल उभे करण्याच्या कामासाठी एकतर झोळी घेऊन पैसे जमा करणे किंवा एखाद्या उद्योगपतीची मदत घ्यायची असे पर्याय समोर दिसत होते. मात्र इथे नागरिकांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन केले तर आपण अधिक लोकांपर्यंत पोहचू शकू, असा विचार सुरू झाला आणि स्मृतिवनाच्या संकल्पनेने आकार घेतला असे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विवेक वेलणकर सांगतात.
ही कल्पना अशी होती की नुसताच अनेक रोपं लावण्याचा समारंभ करायचा नाही तर कोणाच्या तरी स्मृतीसाठी झाड लावायचं आणि त्या झाडाची जमेल तशी काळजी घ्यायची. आपल्या जग सोडून गेलेल्या सुहृदाच्या आठवणीसाठी झाड लावल्यावर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी माणूस आपसूक घेतो. त्यात त्याच्या भावना गुंतलेल्या असतात. या उपक्रमाला सुरुवात झाली तेव्हा म्हणजे १९८७च्या मार्च महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती एच. के. फिरोदिया यांनी पत्नीच्या आठवणीसाठी तिथे पहिले झाड लावले. तेव्हा हा उपक्रम पुढे नेण्यासाठी लोकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांची वर्गणी काढली गेली. त्यात त्याठिकाणी खड्डा खणायचा, त्यात त्या व्यक्तीच्या आवडीचे रोप लावायचे, त्याचा फोटो काढायचा. झाड कसं वाढतंय याची माहिती त्यांना द्यायची. काही वेळेला काही कारणामुळे लावलेल्या झाडाचा मृत्यू झाला, तर ते त्या व्यक्तीला कळवायचे आणि त्याठिकाणी दुसरे झाड लावायचे, अशी साधारण मांडणी होती. सुरुवातीचे सहा महिने अनेकजणांनी तोंडी प्रचार केला आणि त्याचा वेग इतका वाढला की ही संकल्पना पुण्यापुरती मर्यादित न राहता तिच्यात देशाच्या कानाकोपर्यातील मंडळी सहभागी झाली.
पुण्यातल्या भांडारकर संस्थेमध्ये जपानी प्राध्यापक फुकाझावा अध्ययनाचे काम करीत होते. काही काळाने ते पुन्हा जपानला परतले, त्यानंतर तिथेच त्यांचे निधन झाले. आपल्यावर हिंदू पद्धतीने अंत्यविधी व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांची पत्नी आणि मुलगा १४व्या दिवशी पुण्याला आले. या स्मृतिवनामध्ये येऊन त्यांनी त्याच्या आठवणीमध्ये वडाचे झाड लावले, ते आज चांगले बहरले आहे. चंद्रकांत किर्लोस्कर गेले त्यानंतर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या कर्मचार्यांनी इथेच वृक्षारोपण केले. पु. ल. देशपांडे, सुनीताबाई यांच्यापासून ते जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर अशा अनेक मंडळींनी इथे येऊन वृक्षारोपण केले आहे. अगदी वडापासून ते चाफ्यापर्यंत अनेक औषधी वनस्पतींचा समावेश असणारी अनेक झाडे इथे लावली गेली. त्यांची देखभाल करत करत ती वाढत गेली. २००५पर्यंत इथला संपूर्ण परिसर २०००पेक्षा अधिक झाडांनी व्यापला गेला. थोडक्यात हाऊसफुल्ल झाला…
आपण लावलेले झाडे किती मोठे झाले आहे, त्याला फुले, फळे आली का, याच्या उत्सुकतेपोटी या उपक्रमात सहभागी झालेल्या मंडळींची पावले आपसूकच इकडे वळू लागली. आजही ही मंडळी न चुकता नेमाने इथे येत असतात. उन्हाळ्याच्या मोसमात इथे सावली आणि गारवा असतो.
देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प पाहण्यासाठी १९९२मध्ये केंद्र सरकारचे एक पथक इथे येऊन हा उपक्रम पाहून गेले होते, त्यानंतर केंद्रीय स्तरावर एक अध्यादेश काढून देशाच्या अनेक भागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात यावा, असे सुचवण्यात आले होते. सोलापूरमध्ये अशा प्रकारचा एक उपक्रम सुरू झाला होता. देशाच्या अन्य भागांत हा उपक्रम खरोखरच पोहोचला असता तर अनेक भागातील ग्रीन कव्हर वाढण्यास त्याची चांगली मदत झाली असती, असे वेलणकर सांगतात.
दरवर्षी राज्यात कोट्यवधी झाडे लावली जातात, त्यापैकी किती जगतात याचा लेखाजोखा मात्र कुणाकडेच नाही. त्यामुळे नागरिकांचा आणि सरकारचा सहभाग ५० टक्के ठेऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जाऊ शकतो. नागरिकांकडून याची सुरुवात करायची. झाडे जशी जगातील, त्या प्रमाणात राज्य सरकारने त्या संस्थेला अनुदान द्यायचे. हिरवाई हवी असेल तर वृक्षारोपणात नागरिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा स्वयंस्फूर्त सहभाग राहिला म्हणजे हा उपक्रम हमखास यशस्वी होऊ शकेल, असे वेलणकर म्हणतात. नागरिकांचा अशा प्रकारचा सहभाग असला तर सर्वात महत्वाचे म्हणजे वृक्षारोपणात पारदर्शकता राहील, ते महत्वाचे.