• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली…

- प्रभाकर प. वाईरकर (चित्रकथा)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2022
in चित्रकथा
0

आशा, इच्छा-आकांक्षांच्या इंधनावरच मानवाचे जगण्याचे इंजिन व्यत्ययाविना इप्सित स्थळाकडे मार्गक्रमण करीत असते, पर्वताएवढे चढउतार आले तरीही. ते पूर्णत्वास नेण्यासाठी तो धडपडतो, पळतो, स्पर्धा-युद्धामध्ये दोन हात करतो, ढोरमेहनत… स्वत:च्याच घामाने तुडुंब भरलेल्या पात्रात पैलतीर गाठण्यासाठी स्वत:ला झोकून देतो आणि न्याय-अन्यायाच्या सीमेवर उभे राहून क्षणभर चमकणारी वीज मुठीमध्ये गच्च पकडून तो ललकारी देतो.
१९व्या शतकाच्या मध्यावधीत भारतभूमीतल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अन्यायकारक आणि जुलमी राजवटीत अशीच काहीशी परिस्थिती भारतीयांची झाली होती. पारतंत्र्यामुळे दाबलेल्या इच्छा-आकांक्षांचा ज्वालामुखी बंगालच्या भूमीत क्रांतिकारी, विद्रोही मंगल पांडेच्या रूपाने जागृत झाला १८५७ साली. ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात सैनिक म्हणून त्यांची रुजवात झाली होती… ब्रिटिशांच्या अन्यायाचे प्रतिबिंब त्यांना जागोजागी पेरलेल्या सुरुंगाप्रमाणे भासू लागले. त्याचे पर्यवसान मंगल पांडे यांनी एका ब्रिटिश अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला करण्यामध्ये झाले. अनेक वर्षांच्या अन्यायी ब्रिटिश राजवटीच्या सोनेरी महालाला एका भारतीयाने लावलेली पहिली चूड. हीच क्रांतीची मशाल घेऊन इंग्रजविरोधी लढ्यात पहिली भारतीय स्त्री राणी लक्ष्मीबाई (मणिकर्णिका तांबे) हिने उडी घेतली. नाना पेशवे (बाळाजी बाजीराव) आणि तात्या टोपेंनीही इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटले. या पारतंत्र्यविरोधी आंदोलनाचे लोण संपूर्ण भारतभर पसरायला लागले. नवनवीन क्रांतिकारकांचे नेतृत्व उदयास येऊ लागले.
लाल-बाल-पाल या त्रिमूर्तींनी परदेशी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा नारा लावून आसमंत दुमदुमून सोडले. इंग्रज भारतातून धनद्रव्याची लूट कशी करतात हे जनतेला पटवून देण्यात अर्थतज्ज्ञ दादाभाई नवरोजी यशस्वी झाले. बंडखोरी, असहकार, स्वातंत्र्याची आस यांनी जसा जंगलामध्ये वणवा पेटावा आणि ओले-सुके जे मार्गात येईल ते फस्त करीत जावे त्याप्रमाणेच क्रांतिकारकांनी पेटवलेल्या स्वातंत्र्याच्या वणव्यामध्ये प्रत्येक भारतीय आहुती देण्यास तयार झाला.
इन्कलाब झिंदाबाद… भारतमाता की जय… वंदे मातरम… या घोषणांनी ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ भारतावर अधिराज्य करण्याच्या इंग्रजांच्या ईर्ष्येला तडे जायला लागले. सत्याग्रह, स्वदेशी आंदोलन, भारत छोडो आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ इत्यादींनी इंग्रजांचे लंडनमधील तख्तही हादरायला लागले. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बाबू गेनू यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये अर्पण केली. त्याच होमकुंडात प्रखर क्रांतिकारक, साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दा. सावरकरांनी स्वत: व त्यांच्या कुटुंबीयांनीही समिधा म्हणून अर्पण करून होमकुंड अधिक तेजस्वी आणि प्रखर केले. जहाल क्रांतिकारक नेते सुभाषचंद्र बोस बंदूकधारी सैनिक घेऊन इंग्रजांच्या सत्तेच्या अभेद्य किल्ल्यावर तुटून पडले. राजगोपालाचारी, चंद्रशेखर आझाद, सरोजिनी नायडू, अरुणा असफअली, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादि स्वातंत्र्यवीरांनी लेखणीतून, जळजळीत विचारातून आणि कृतीतून इंग्रजांचा भारतावरील युनियन जॅक खाली खेचायला सुरुवात केली…
सर्वधर्मसमभावी, अहिंसावादी असहकार भारत छोडो आंदोलनाचे जनक मोहनदास करमचंद गांधींचे नेतृत्व अगदी तळागाळातल्या लहानग्या नागरिकासहित सर्वधर्मीय जनतेने स्वीकारले. या सर्व नि:स्वार्थी सत्याग्रहींचे ध्येय आणि उद्दिष्ट एकच होते… देशसेवा… स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य. ज्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे इंग्रजांचे हात रक्ताने माखले होते, त्यांच्या बंदुका गांधीजींच्या अहिंसावाद व सत्याग्रह या दोन अस्त्रांनी निष्प्रभ झाल्या. दांडीयात्रेत चिमटीत उचलेले मीठ म्हणजे इंग्रजांना दिलेला इशाराच जणू, ‘निमूटपणे चालते व्हा, नाहीतर अहिंसेच्या चिमटीत धरून फेकून देऊ…’
स्वातंत्र्याची पहाट होता-होता मोहनदास करमचंद गांधी ‘महात्मा गांधी’ बनून काळाच्या पडद्याआड गडप झाले. स्वातंत्र्याचे अमृत पिण्यासाठी तहानलेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न पूर्ण झाले. बंधनमुक्त भारतात १५ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजता स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला… तिरंग्याच्या रूपात… पण…
लढाईविना भारताला स्वतंत्र मिळाले हे जागतिक अप्रूपच. त्यामुळे भारताची धोरणे, जडणघडण आणि इतिहास जाणून घेण्याची इतर देशांची उत्सुकता शिगेला पोहोचली. १९९७ साली जर्मनी येथील ईपीडी या संस्थेने भारतीय स्वातंत्र्याची ५० वर्षे, पर्यावरणातील बदल आणि प्रगतशील जग या विषयांवर आधारित व्यंगचित्रे प्रदर्शनासाठी पाठविण्याचे निमंत्रण दिले. जर्मनीतील रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इंटरनेट यांची ध्येये, व्यावसायिक नीतीमत्ता यांच्यावर लक्ष ठेवून त्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचे, त्यांचे प्रबोधन करण्याचे काम करणारी ही संस्था. प्रोटेस्टंट चर्च या संस्थेला सर्वतोपरी मदत करते. या स्पर्धेला एकूण १६ देशांतील व्यंगचित्रकारांनी हजेरी लावली. त्यात १० भारतीय व्यंगचित्रकारांची १६ व्यंगचित्रे निवडली गेली. पोनप्पा, सुरेश सावंत, विन्स, साबू, बैजू पार्थन, देव नाडकर्णी, माया कामथ, प्रभाकर वाईरकर, के. श्याम मोहन आणि शंकर राव. यानिमित्त्ााने व्यंगचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले.
मला भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव हा विषय अधिक आव्हानात्मक वाटला. १९४७ साली इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत मोकळा झाला. इंग्रजांच्या जाण्याने जणू नदी-नाले, डोंगर, झाडे-फुलांत आनंदाचे भरते आले. कात टाकल्यासारखे प्राणीमात्र चैतन्याने जीवनाचा नव्याने अर्थ शोधू लागले. नव्याने नवरी माप ओलांडून सासरी येते आणि लाजत, बुजत, गोंधळत परंतु मनात आंतरिक आनंदाने मोहरून नवीन संसार थाटते, तशीच काहीशी अवस्था नवस्वातंत्र्य अनुभवताना भारतवासीयांची झाली. भारतीय मन दुर्दम्य इच्छापूर्तीच्या डोहात आत्मिक समाधानाने विहार करू लागले.
स्वतंत्र भारताच्या निधर्मी सरकारची कमान पंडित नेहरूंनी सांभाळायला घेतली. अन्न-धान्य, औद्योगीकरण, नवीन रेल्वे प्रकल्प, विमानसेवा, नौकानयन, वीज, धरणे, संशोधन इत्यादी पायाभूत सुधारणांच्या बातम्या कानावर आदळू लागल्या. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राज्यव्यवस्थेत मनसोक्त स्वातंत्र आणि सुखसोयींमुळे काहींच्या ध्येय-धोरण, उद्दिष्टांमध्ये आणि आचरणामध्ये अकल्पित फरक जाणवू लागला. स्वातंत्र्यपूर्व काळातील देशसेवा, परोपकार, निःस्वार्थी वृत्ती या गुणांची जागा स्वार्थ, कपट, रंगेलपणा, भ्रष्ट आचरण या अवगुणांनी व्यापून टाकली. छोटेसे रोप लावावे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याची जडण-घडण करावी आणि फळांचा आस्वाद घेता-घेता झाड बांडगुळाने व्यापून जावं. बुंध्यापासून झाडाला रोटा लागून झाड मरणोन्मुख व्हावं, तशीच अवस्था पराकाष्ठा करून वाढवलेल्या स्वातंत्र्याच्या झाडाची झाली. भ्रष्टाचार, खाबुगिरी, घराणेशाही, जातीयवाद, वेगवेगळे घोटाळे, निवडणुकीतील हेराफेरी इत्यादींच्या विषारी फळांनी झाड कोलमडायला लागले. स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीला घराणेशाही, वशिलेबाजी, अनैतिक संबंध, कायदा हातात घेणारे, गुंडगिरी, स्वार्थी, पदाचा दुरुपयोग करणारे यांना राजकारणात व समाजकारणात अजिबात स्थान नव्हते. मात्र स्वातंत्र्याची पन्नाशी गाठताना सर्व मूल्यांचा र्‍हास होताना दिसला. वरील सर्व अवगुणांचे आगार असलेले राजकारणी बिनदिक्कतपणे आणि बेशरमपणे वावरू लागले आणि समाजधुरीण त्यांचे तुष्टीकरण करताना जागोजागी अळंब्याच्या छत्र्याप्रमाणे उगवलेले दिसू लागले.
देशभक्त वा राजकारणी रस्त्यामध्ये एक आणा जरी सापडला तर तो देशाच्या तिजोरीत टाकायचे. पण आज आधुनिक राजकारणी व समाजसेवक तीच तिजोरी ओरबारडायला लागले. समाजसेवक चारित्र्यसंपन्न असावा, हे मूल्य कसोशीने पाळले जायचे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवापर्यंत सार्वजनिक जीवनात बलात्कार, खून, दरोडे घातलेली व्यक्तीही उच्च मंत्रिपदाची हकदार ठरते. म्हणे, ‘ती व्यक्ती जोपर्यंत सर्वोच्य न्यायालयात दोषी ठरत नाही, तोपर्यंत ती अपराधी नाही.’ भ्रष्टाचार एवढा वाढला की पायात चंद्रकोरीसारखी झालेली स्लीपर घालणारा नागरिक नगरसेवक झाल्यावर एका वर्षात ब्रँडेड कारमधून पदयात्रा करू लागला. प्रशासन आणि व्यवस्थेच्या जेवणावळीत समाजविरोधी प्रवृत्तींना मानाचे पान दिले जाऊ लागले.
बाजारूपणा, दांभिकपणा व जीवनमूल्यांचा चक्काचूर करून स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने, आशा-आकांक्षा कशा प्रकारे मातीमोल झाल्या हे दर्शविण्यासाठी मी व्यंगचित्रात वाळूच्या घड्याळाचा उपयोग केला आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे निष्कलंक, त्यागी, नि:स्वार्थी जीवनमान, स्वत्वाच्या ज्योतीने इतरांचे जीवन प्रकाशमान करण्याची वृत्ती, याचे उदाहरण म्हणून महात्मा गांधींच्या प्रतीकांचा वापर केला आहे. अशा पूज्य प्रतीकांच्या त्यागाची कालपरत्वे भोंदू समाजधुरिणांनी कशी वासलात लावली आणि सफरचंदाच्या झाडाला काजर्‍याची फळे कशी लगडली हे या चित्रात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे…
आज जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत ते नकळत बोलून जातात, ‘इंग्रजांचाच काळ बारा होता!’

Previous Post

पाऊले चालती… मुजर्‍यांची वाऽऽट

Next Post

फुल्ल टाइमपास कॉमेडी!

Next Post
फुल्ल टाइमपास कॉमेडी!

फुल्ल टाइमपास कॉमेडी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.