• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पाऊले चालती… मुजर्‍यांची वाऽऽट

- घनश्याम भडेकर (शूटआऊट)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2022
in शूटआऊट
0

मुजरा डान्सरना खूष करायला आलेल्या श्रीमंतांनी पोलिसांना कसे खूष करता येईल अशा प्रयत्नात होते नव्हते ते सर्व पैसे संपवले. या सर्व घटनेचे फोटो काढून मी प्रसिद्ध केले असते, तर त्या तिघा अधिकार्‍यांचे काय झाले असते? त्यापेक्षा त्यांना जागे केलेले बरे. कारण मला पोलिसांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. त्याच्या प्रेमापोटी मी तडक डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जोशी यांना आँखो देखा हाल सांगितला.
– – –

खरं तर मी नाकासमोरून चालणारा धार्मिक श्रद्धाळू माणूस. ‘श्रद्धा आणि सबुरी ठेव’ असे सांगणार्‍या साईबाबांच्या दर्शनासाठी दर गुरुवारी ग्रॅन्टरोड येथील साईधाम मंदिरात मी जात असे. आरती झाली की तीर्थप्रसाद घेऊन कपाळावर अंगारा लावून साईंचे नामस्मरण करत निघावे तर हाकेच्या अंतरावर घुंगुरांचा छम… छम… छन्न… आवाज साथीला तबला पेटी आणि सारंगीचे सूर आसमंतात वातावरण धुंद करू पाहायचे…
‘शिर्डीस ज्याचे लागतील पाय’ म्हणणार्‍यांचे पाय भलत्याच भक्तीकडे वळायला लागायचे… कुठे बाबांचा पवित्र प्रसन्न दरबार आणि कुठे बायांचा हाऊसफुल्ल बाजार! किती किती तरी विरोधाभास होता इथे. `पाकिजा’मधील `इन्ही लोगों ने… इन्ही लोगों ने…’ आणि रेखाचे `सलामे इश्क मेरी जान! जरा कबूल कर लो, तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो’ अशा श्रवणीय गाण्यांचा आवाज कानी पडताच कुणाचे तेथे लक्ष जाणार नाही!
काँग्रेस हाऊससमोरील नूर महंमद बेग महंमद कंपाऊंडमध्ये तीन मजल्याच्या चार इमारती. प्रत्येक खोलीतील नाच आणि गाण्याची बरसात चालू होती. देवाच्या राज्यात गंधर्वकन्या नृत्य करीत तसे येथील मेनका, रंभा, उर्वशी नृत्याविष्कार सादर करत असायच्या…
हा काय प्रकार आहे, हे विचारल्यावर कळलं की हा `मुजरा’!
आँ? आम्ही आ वासून ऐकत बसलो. आम्हा मर्‍हाटमोळ्यांना मावळ्यांचा मुजरा माहीत होता. इथं भलताच मुजरा चालू होता. आमच्यातली स्वयंभू अंगभूत गुणवैशिष्ट्ये जागृत झाली. मी अरूण ताम्हणकरांना फोन लावून मला झालेला दृष्टांत सांगितला. ते म्हणाले. गुड… गुड…. लगेच कर कव्हरस्टोरी… फोटोसुद्धा घेऊन ये.
१९८२ साली `श्री’ साप्ताहिकाचा सेल दीड लाखाच्या आसपास होता. ताम्हणकर संपादक होते आणि मला चित्रकार, छायाचित्रकार, पत्रकार अशा तीन पदांवर नोकरीवर ठेवलेला. एकाच पगारात तीन माणसांची कामं मी एकटाच करत होतो. अर्थात आम्हीही त्यावेळी उमेदीच्या काळात पैशाकडे न पाहता आलेल्या संधीचं सोन करायचं असं ठरवलेलं. मी लागलो कामाला… आजवर मुजरा नृत्यावर मराठी वृत्तपत्रांतून फारसं कुणी डिटेलमध्ये लिहिले नव्हते. अधिक माहितीसाठी मी कॅमेरा घेऊन बाहेर पडलो तेव्हा काम जिकिरीचे असल्याचे जाणवू लागले. फोटो मिळावे म्हणून मलाच अनेकांच्या पुढे झुकून मुजरे करावे लागले, पण कुणी हूं की चूं बोलेना. सगळाच मामला `नाजुक’.
अधिक माहितीचे तर सोडा, पण एखाद-दुसरा फोटोही काढता येणार नाही अशी एकाने तंबी दिली. या इमारतीतल्या नृत्य करणार्‍या गोर्‍यागोमट्या, देखण्या मुली बाहेरगावाहून आणलेल्या. स्थानिक कुणी नाही. कुणी खुशीने आलेल्या, तर कुणाला पैसा, गाडी, बंगला, सोनं यांचं आमिष दाखवून आणलेल्या. चांगल्या घरातील मुली परिस्थितीमुळे इथे येतात आणि मुजरानृत्यावर लाखो रुपये कमावतात, असं कळलं. साहजिकच त्यांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची अजिबात गरज वाटत नव्हती. उलट कुठे फोटो छापून आला तर गावची माणसं गावी गेल्यावर बहिष्कार टाकतील अशी त्यांना भीती.
अक्कलहुशारी आणि निर्भीड पत्रकारिता पूर्णपणे पणाला लावून मी कॅमेरा घेऊन लपून छपून मुजरा बघायला गादीवर लोडावर टेकून बसलो. तुम्ही रसिक असाल. खिसा गरम असेल तर इथे कुणालाही मुक्त प्रवेश असायचा. परवडत नव्हतं तरीही दीडशे रुपये मीसुद्धा उडवले. मीही मुंबईतील नसून पर्यटक आहे आणि पर्यटकांकडे कॅमेरा असतोच असा आविर्भाव आणून व्वा…व्वा… बहोत बढिया म्हणत हळूच बॅगेतून कॅमेरा काढला आणि चार पाच फोटो घेतले.
खिडकीतून खाली पाहिले तर बरेच तरुण दारू प्यायलेल्या अवस्थेत कच्छी बाजाच्या तालावर नाचत होते. चौकशी केली तर समजले की काही दिवसापूर्वी येथे मुजरा पाहायला आलेल्या अरबाने एका मुलीशी अतिप्रसंग केला म्हणून तिच्या मानलेल्या भावांनी त्याला ठार मारले होते. त्या खटल्याचा आज निकाल लागून सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्याबद्दल दारूची पार्टी होती.
अरे बापरे, फोटो काढण्याच्या भानगडीत माझाही अरब होईल या विचाराने मी काढता पाय घेतला. फोटो घेण्यासाठी मी अधूनमधून तेथे येत जात राहिलो. दरम्यान तबलजीशी माझी मैत्री झाली. मध्यंतरीच्या काळात पान खाण्याच्या निमित्ताने मी त्याला बाहेर घेऊन यायचो आणि माहिती काढायचो. परवा जलसा आहे तो चुकवू नका असे त्याने सांगितले. दोन नर्तकींची लग्ने जमलेली आहेत. समव्यवसायी मैत्रिणी अप्रतिष्ठित व्यवसाय सोडून नवा संसार सजविण्यासाठी वेगळ्या विश्वात प्रवेश करणार, म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी एक आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता, तोच हा जलसा.
यावेळी सर्व मुजरा डान्सर्सनी धंदा बंद ठेवला होता. फक्त खुल्या पटांगणात उभारलेल्या शामियान्यात खास निमंत्रितांची बसण्याची व्यवस्था होती. त्यांच्यापुढे सादर केलेल्या नृत्यप्रसंगी ढीगाने पैसा जमा झाला, तो सारा पैसा नववधूला आहेरादाखल दिला गेला. जलसा पाहण्यासाठी मी कॅमेरा घेऊन गर्दीमागे लपून उभा होतो. मध्यरात्र उलटून गेली. पहाट झाली पण रसिकांचा उत्साह ओसरला नव्हता. जलसा अधिकच रंगत चालला होता. उंची इंग्रजी दारू ढोसून बेहोष झालेले लक्ष्मीपुत्र हाताला बांधलेल्या गजर्‍याचा सुवास घेत नोटांची उधळण करीत होते. निमंत्रितांच्या खुर्चीवर पहिल्या रांगेत डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे तीन पोलीस निरीक्षक गणवेषात बसलेले होते. एका श्रीमंताने नाचणार्‍या मुलीला खुणावले. ती नाचत नाचत पोलिसांच्या जवळ गेली. श्रीमंताने पन्नास शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल पोलिसांच्या हाती दिले. पोलिसांनी त्या नोटा विशिष्ट लकबीने मुलीच्या हातात ठेवल्या. पोलिसांना कसे नादी लावले अशा थाटात श्रीमंत पुन्हा खुर्चीवर रेटून बसले.
मुजरा डान्सरना खूष करायला आलेल्या श्रीमंतांनी पोलिसांना कसे खूष करता येईल अशा प्रयत्नात होते नव्हते ते सर्व पैसे संपवले. या सर्व घटनेचे फोटो काढून मी प्रसिद्ध केले असते, तर त्या तिघा अधिकार्‍यांचे काय झाले असते? त्यापेक्षा त्यांना जागे केलेले बरे. कारण मला पोलिसांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. त्याच्या प्रेमापोटी मी तडक डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जोशी यांना आँखो देखा हाल सांगितला. जोशी साहेब भलतेच शिस्तीचे भोक्ते. त्यांनी पोलीस गाडी पाठवून त्या तीनही अधिकार्‍यांना बोलावून घेतले आणि माझ्यासमोर सोक्षमोक्ष केला.
तिघांचे म्हणणे असे की आम्ही पैसे नेले नव्हतेच तर देणार कोठून? माझे म्हणणे तुम्ही तुमचे पैसे दिलेच नाहीत. त्या शेठने तुमच्या हातात दिलेले पैसे तुम्ही उडवत होतात. ते त्यांना अखेरीस मान्य करावे लागले. एव्हाना पहाटेचे तीन वाजले. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याचे समजल्यावर कार्यक्रमस्थळी पळापळ झाली. निमंत्रितांच्या खुर्च्या रिकाम्या पडल्या. इमारतीवर केलेली नेत्रदीपक रोषणाई बंद करण्यात आली. सर्वत्र अंधार पसरला.
जलसा खालसा झाला.

Previous Post

शेअर निवडायचे कसे?

Next Post

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली…

Next Post

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.