दीड वर्षाहून अधिक काळ मनाविरुद्ध लॉकडाऊन झालेली रंगभूमी आता अनलॉक झाली आहे. घरी बसून ओटीटी व टेलिव्हिजनवरील त्याच त्याच ‘दे धक्का’ मालिकांना कंटाळलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी एकदंत क्रिएशनचे ‘मी, स्वरा आणि ते दोघं!’ हे नवं कोरं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे.
जाहिरातक्षेत्रात स्वतःची वेगळी वाट चोखाळणारा नीतीश पाटणकर हा तरूण दिग्दर्शक या नाटकाचं दिग्दर्शन करतोय, तर या नाटकाचे लेखन आदित्य मोडक याने केलं आहे. सिनेमा, मालिकांमध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता सुयश टिळक अनेक वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर दिसणार आहे, तसेच लोभस व्यक्तिमत्व असलेली रश्मी अनपट, विनोदी अभिनेते विजय पटवर्धन आणि चित्रपट, मलिका व रंगभूमीवर ठसा उमटविणार्या अष्टपैलू अभिनेत्री निवेदिता सराफ अशा कलाकारांची मैफल या नाटकात अनुभवता येईल. नाटकाचे संगीत सारंग कुलकर्णी, नेपथ्य संदेश बेंद्रे आणि प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून वेशभूषा शाल्मली पटोले यांनी केली आहे, चंद्रकांत लोकरे हे नाटकाची निर्मिती करत असून गौरव मांजरेकर हे सहनिर्माता आहेत.
निर्माते चंद्रकांत लोकरे म्हणाले की कोविडनंतर नाटकाची आर्थिक गणितं बदलली आहेत आणि पन्नास टक्के प्रेक्षकसंख्येच्या मर्यादेमुळे जमा कमी पण खर्च तेच राहिले आहेत. नाट्यरसिकांना गेल्या काही वर्षांत चांगल्या दर्जाची व उत्तम निर्मितीमूल्यं असलेली नाटकं पाहण्याची सवय झाली आहे. आता नाटकखर्चात काटकसर केली तर रसिक प्रेक्षकांशी प्रतारणा करतोय असं वाटेल, म्हणूनच वेगळा विषय आणि एन्टरटेन्मेंट व्हॅल्यू असलेलं हे नाटक माझ्याकडे आलं तेव्हा या अनिश्चिततेच्या काळातही मी हात मोकळा सोडून चांगल्या दर्जाच्या नाट्यनिर्मितीचे शिवधनुष्य उचलले आहे.
निवेदिता सराफ म्हणाल्या, सध्या माझी दोन नाटके एकाच वेळी रंगमंचावर सुरू आहेत. अशा वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळणं हे भाग्यच आहे. या नाटकाच्या लेखक-दिग्दर्शकांचं हे पहिलंच नाटक आहे. या तरूण पिढीसोबत काम करताना आपणही एक कलाकार म्हणून व माणूस म्हणून इव्हॉल्व्ह होत जातो. मंजू ही व्यक्तिरेखा नाटकाचा कर्ता-करविता आहे. नाटकाची गोष्ट ती घडवते. माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा यातील माझी भूमिका पूर्णतः वेगळी आहे. हि स्त्री सर्व कुटुंबासाठी झिजली आहे आणि तिला स्वतःसाठी जगायचं आहे. आता ती स्ट्राँग, बंडखोर झाली आहे. यातील काही गोष्टी माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेरच्या आहेत, त्यामुळे एक चॅलेंज म्हणून मला ही भूमिका करावीशी वाटली. नाटक पाहिलेल्या एका मुलीने अशी सासू किंवा आई मला हवी होती, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली होती.
सुयश टिळक म्हणाला, या नाटकातील कपिल ही माझी व्यक्तिरेखा मला जवळची वाटते. मी पुण्याचा असल्यामुळे, लहापणापासून असे अनेक कपिल मी पाहिलेले आहेत. केवळ तोंडात शिव्या आहेत म्हणून आपण कित्येक वेळा एखाद्या माणसाला ‘जज’ करतो, पण तो माणूस वाईटच असेल असं नाही. कपिल फटकळ, शिवराळ असला तरी तो मनाने निखळ आहे. रोमँटिक अभिनेता या माझ्या ओळखीला छेद देणारी ही भूमिका आहे. बाहेरून अतरंगी तर आतून हळवा असणारा, दुसर्यांच्या मनाचा विचार करणारा मुलगा असं हे कॅरेक्टर आहे. प्रायोगिक रंगभूमीपासून सुरुवात करून मी मालिका, सिनेमाक्षेत्रात स्थिरावलो. पण व्यावसायिक रंगभूमीवर संस्मरणीय भूमिकेतून आपण प्रेक्षकांसमोर यावं, हे माझं स्वप्न होतं. ते या नाटकातून पूर्ण होतंय.
लेखक, आदित्य मोडक म्हणाला, या नाटकातली मंजुषा ही मनाविरुद्ध संसारात पडल्यावर, निसटलेलं जगण्यातील सुख-आनंद शोधणारी एक स्त्री आहे. जोडीदाराच्या वियोगानंतर आयुष्याला सेकंड चान्स देण्याच्या प्रयत्न करतेय. त्याचबरोबर आजच्या पिढीतल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पण रिलेशनशिपबद्दल कन्फ्यूज असलेल्या आपल्या स्वरा या मुलीच्या आयुष्याला आकारही तिलाच द्यायचा आहे. स्वराचा मस्तमौला ऑफिस कलीग कपिल आणि मंजुषाचा भित्रट वर्गमित्र यश या चौघांतील नातेसंबंध सांगणारं हे नाटक आहे. प्रेमभंग झालेल्या, लग्न झाल्यावर काही महिन्यातच घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकलेल्या अनेक मुली समाजात दिसतात. आईने स्वतःचे व मुलीचे लग्न जुळवताना योजलेली भन्नाट कल्पना या नाटकात आहे, जी प्रेक्षकांना वेगळी वाटेल आणि आवडेल, असा मला विश्वास वाटतो.