सरकारी नोकरी, प्राध्यापक या झमेल्यात न पडता आपल्याला ज्यामधून आनंद मिळेल, जे काम मन लावून आणि आवडीने करू शकू असा विचार मनात पक्का झाल्याने नाटकाच्या लेखनानंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये हा हा म्हणता तीन कादंबर्यांचं लिखाण मी पूर्ण केलं. यातली एक कादंबरी आहे ती महाकाव्य शिवप्रताप या नावाची, छंदोबद्ध कादंबरी… अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आहे ती… या ६५० पानांच्या कादंबरीत १९ वृत्तं असून तीन हजार श्लोक लिहिलेले आहेत. शाळेत आठव्या इयत्तेमध्ये असल्यापासूनच लिखाणाचा चांगला सराव झाला होता, त्यामुळे मला महाकाव्य शिवप्रताप लिहीत असताना कधीही अडचण आली नाही.
– – –
कॉलेजात शिकत असताना स्वामी विवेकानंदांच्या ‘डू व्हॉट यू एंजॉय’ या वाक्याने माझ्या मनात पक्के घर केले होते. त्यामुळे पदवी हातात पडली की आपण कुठेही नोकरी करायची नाही, मनाला पटेल ते करायचे, त्यामध्ये रमायचे असा पक्का निश्चय केला होता. चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीऐवजी दुसरे काय करता येईल, याचा विचार त्या वयातच डोक्यात घोळत असायचा. पुण्यातल्या स. प. महाविद्यालयातून बीएचे शिक्षण सुरू असताना पहिल्याच वर्षी संगीत चंद्रप्रिया हे नाटक मी लिहिलं, तेव्हा माझं वय होतं १७ वर्षं. हे नाटक मी लिहिलं, मीच दिग्दर्शित केलं आणि रंगभूमीवर आणलं, तिथेच मनाशी निश्चय झाला की आपण लेखक आहोत, आयुष्यभर लेखनच करायचं. ही कला मनासारखं काम करण्याची संधी देते. एकाच शहरात राहून आपण मनाने विश्वसंचार करतो. ऐन करियरच्या उंबरठ्यावर असताना मी हा मार्ग जाणीवपूर्वक निवडला आणि स्वत:ला लेखक म्हणून घडवायला सुरुवात केली.
माझे वडील डॉ. किरण मोघे सरकारी सेवेत कार्यरत आहेत, त्यांनी स्वामी विवेकानंदांवर पीएचडी केली आहे, आजीला धार्मिक कविता करायचा छंद होता. त्यामुळे माझ्यात आपसूकच वाचनाची गोडी निर्माण झाली होती. लेखनगुणही उपजत आले असावेत.
सात वेळा बदलल्या शाळा
वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे शालेय शिक्षण घेत असताना सात वेळा शाळा बदलाव्या लागल्या. त्यामुळे बीए झाल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या असत्या आणि त्यामधून सरकारी नोकरी मिळाली असती तरी त्यात मन लागले नसते, हे मी अगदी खात्रीने सांगतो. इतिहास, तत्वज्ञान हे माझे आवडीचे विषय, त्यामुळे प्राध्यापक होण्याचा विचार केला असता तरी त्याला कितपत गती मिळाली असती, याबद्दल मनात आजही साशंकता आहे. शिवाय प्राध्यापक होण्यासाठी पाच वर्ष खर्च करावी लागली असती, पोस्ट ग्रॅजुएशन, एम फिल, पीएचडी, नेट-सेट यात खूप वेळ गेला असता. अंगात उपजतच असणार्या लेखनकलेचा गुण कदाचित मागे पडला असता. प्राध्यापक होऊन त्यातून काय साध्य झाले असते हेही माहिती नाही. त्यामुळे योग्य काळातच तो विचार मी मागे सोडून दिला.
मी लेखक कसा झालो?
पाचवीत असतानाची गोष्ट असेल, वडील मला रत्नागिरी ग्रंथालयात घेऊन गेले होते. तिथे व्हिएतनामचे स्वातंत्रयुद्ध आणि महानायक ही दोन पुस्तके माझ्या नजरेस पडली. ती घेतली, वाचून काढली आणि तिथेच माझे इतिहासाच्या पुस्तकांवर प्रेम जडले. इतिहासाच्या पुस्तकांचे भरपूर वाचन सुरू झाले, त्यामधून इतिहासाची प्रचंड आवड निर्माण झाली.
शाळेत असल्यापासूनच मला मोठे उतारे, कविता लिहिण्याची आवड होती. अकरावीत प्रवेश घेतला तेव्हा एक ऐतिहासिक काळावर बेतलेली काल्पनिक कादंबरी लिहावी, असा विचार डोक्यात सुरू झाला होता. एके दिवशी लिखाण सुरू केले आणि काही दिवसांत ८०० पाने लिहून पूर्ण झाली, तेव्हा मला कळलं लेखन हाच आपला पिंड आहे, तोच आपला मार्ग आहे. त्या लिखाणामुळे आत्मविश्वास वाढला.
दोन वर्षांत तीन कादंबर्या
सरकारी नोकरी, प्राध्यापक या झमेल्यात न पडता आपल्याला ज्यामधून आनंद मिळेल, जे काम मन लावून आणि आवडीने करू शकू असा विचार मनात पक्का झाल्याने नाटकाच्या लेखनानंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये हा हा म्हणता तीन कादंबर्यांचं लिखाण मी पूर्ण केलं. यातली एक कादंबरी आहे ती महाकाव्य शिवप्रताप या नावाची, छंदोबद्ध कादंबरी… अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आहे ती… या ६५० पानांच्या कादंबरीत १९ वृत्तं असून तीन हजार श्लोक लिहिलेले आहेत. शाळेत आठव्या इयत्तेमध्ये असल्यापासूनच लिखाणाचा चांगला सराव झाला होता, त्यामुळे मला महाकाव्य शिवप्रताप लिहीत असताना कधीही अडचण आली नाही, वृत्तछंद घेतले की आपोआप त्यामध्ये ओळ सुचत जायची. सर्वात महत्वाचं म्हणजे या पुस्तकाला दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना आहे. पुण्याच्या पुरंदरे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या कादंबरीला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
अवघ्या १० मिनिटात होकार…
इतक्या लहान वयात लिहिलेली ही पद्यरूप कादंबरी इतक्या मोठ्या प्रकाशनसंस्थेने कशी स्वीकारली, याचीही एक रोचक कहाणी आहे. महाकाव्य शिवप्रतापचे लिखाण पूर्ण झाले होते. मी पुरंदरे प्रकाशनाशी संपर्क साधला, त्यांनी मला भेटण्याची वेळ दिली. त्या दिवशी तिथे प्रकाशनाचे प्रमुख अमृत पुरंदरे यांची गाठ पडली. त्यांनी हा ग्रंथ पाच मिनिटांत चाळल्ाा. त्यानंतर मला त्यातल्या ज्या कविता आवडतात त्या सादर करायला सांगितलं. तेव्हा मी १८ वर्षाचा होतो. कविता सादर केल्यानंतर मी वृत्तछंदाची वैशिष्ट्यं त्यांना सांगितली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात त्यांनी हे काव्य प्रकाशित करत असल्याचे मला सांगितले. त्यामुळे मी कमालीचा खूष झालो.
त्यानंतर अमृतरावांनीच माझी बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी भेट घालून दिली. त्यांच्यासमोर १५ मिनिटे या महाकाव्यातील काही भाग सादर करण्याची संधी मिळाली. तो ऐकून त्यांनी कौतुक केले आणि तुमच्या हातून अशाच उत्तमोत्तम कलाकृती घडोत असा आशीर्वाद दिला. बाबासाहेबांनी महाकाव्य वाचल्यानंतर दोन महिन्यांनी या पुस्तकाला प्रस्तावनाही दिली. या पुस्तकाचे प्रकाशन झाले तेव्हा, मराठी सारस्वतात एक चमत्कार घडला असल्याचे सांगताना हे काव्य अनेक पिढ्या गाऊन वाचून जागे ठेवतील, असे बाबासाहेबांनी नमूद केले.
गडकरींची शाबासकीची थाप
देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री यांना या पुस्तकाच्या निमित्ताने भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली. इतकेच नाही तर हे पुस्तक ऑडिओ स्वरूपात आणले तर ते अगदी सहजपणे नव्या पिढीपर्यंत पोहचेल, अशी सूचनाही केली. येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. याखेरीज गौतम बुद्धांवरील ‘तथागत’ आणि लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्यावरील कादंबर्याही लिहून झाल्या आहेत. त्या प्रकाशनच्या मार्गावर आहेत. आयुष्याची गाडी अवघ्या विसाव्या वर्षांपर्यंत पोहोचत असताना या तीन कादंबर्या लिहून पूर्ण करू शकलो, त्यामुळे आत्मविश्वास दुणावला आहे.
यात घरच्यांची साथ फार मोलाची आहे. मी सगळ्या रूढार्थाने यशस्वी करीअर्सपैकी काही निवडलं असतं, तर त्यांना जेवढा आनंद झाला असता आणि त्यांचं जेवढं पाठबळ मिळालं असतं, तेवढंच त्यांनी माझ्या पूर्णवेळ लेखनाच्या निर्णयाला दिलं आणि तेही खूप आनंदाने. नुकत्याच पूर्ण केलेल्या तथागत आणि उर्मिला या ऐतिहासिक कादंबर्यांचे लिखाण करत असताना भरपूर संदर्भग्रंथाचे वाचन केले, त्यामधून नोट्स काढल्या. या दोन्ही पुस्तकांसाठी तीन ते चार महिने रोज सहा ते सात तास संशोधनासाठी जायचे. काही संदर्भ मिळवण्यासाठी ८-१० दिवस मी सिक्कीमच्या भागात देखील जाऊन आलो. भगवान गौतम बुद्धांवरील तथागत या ५१२ पानाच्या कादंबरीचे लेखन पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा काळ लागला. त्यात रोज तीन तासांचा वेळ लिखाणासाठी द्यायचो. उर्मिला या ३८० पानी कादंबरीच्या लिखाणासाठी व महिन्याचा कालावधी गेला. आता या दोन्ही कादंबर्या प्रकाशनच्या मार्गावर आहेत.
पूर्णवेळ लेखक म्हणून काम करत असल्यामुळे मला इतर कशातून वेळ काढावा लागत नाही. माझ्याकडे भरपूर वेळ उपलब्ध असतो. एखादा विषय हातात घेतला की त्यावर दिवसरात्र काम सुरू असते. म्हणून ते काम वेळेत पूर्ण होऊ शकते. महाकाव्य शिवप्रतापचे लिखाण पूर्ण करण्यासाठी मला सलग ५० दिवस लागले. लेखक असणे हेच करियर करत असताना वेगळीच मजा येते. संदर्भग्रथांचे वाचन, त्यांचा अभ्यास, जुने संदर्भ शोधणे, डोक्यात असणार्या संकल्पनेमध्ये ते बसवणे हे काम खूपच आव्हानात्मक वाटते. दोन वर्षांमध्ये तीन कादंबर्या लिहून पूर्ण केल्यामुळे मनाला थोडेफार समाधान मिळाले असले, तरी ते पुरेसे नाही… गेम ऑफ थ्रोन्स, लॉर्ड ऑफ रिंग्स यांसारख्या महाकादंबर्या इंग्रजीत आहेत. तशाच प्रकारच्या कादंबर्यांची चार ते पाच भागाची मालिका असणार्या पुस्तकाचे लिखाण करण्याचा इरादा आहे.
मराठीत पुस्तकांचा खप मर्यादित आहे. त्यामुळे अनेकांना लेखक म्हणून आर्थिकदृष्ट्या यशस्वी होता आले नसेल याची जाणीव मला आहे. पण एका दशकात मराठीमध्ये किमान दोन लेखक यशस्वी होऊ शकतात- त्याला थोडा वेळ लागू शकतो, यावर माझा विश्वास आहे. माझ्या स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचा अनुभव, गेल्या दहा वर्षांत झालेला नव्या कादंबर्यांचा खप, पुस्तकाची जाहिरात करण्याची पद्धत यांचा अभ्यास केल्यानंतर माझे हे मत तयार झाले आहे.
पुस्तक फक्त लिहून चालत नाही, त्याची नीट जाहिरात आणि विक्रीही करावी लागते. मराठीत याचा परीघ फार छोटा आहे. त्यामुळे, स्वयंपूर्ण होण्यासाठी पुस्तकाचे प्रकाशन, वितरण या क्षेत्रातही काम करणार आहे. पुस्तकाचे विपणन, विक्री यासाठीची व्यावसायिकता, कौशल्ये आवश्यक असतात. त्यांचा अनुभव देखील भविष्यात घेण्याची इच्छा आहे.