□ शेती कायदे पुन्हा लागू होऊ शकतात, कृषिमंत्री तोमर; टीका झाल्यावर असे बोललेच नसल्याची सारवासारव
■ हे सरकार वैर्यांचेच आहे, शेतकरी राजा सावध राहा!
□ देशाचे ऐक्य अबाधित ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कच्छमध्ये आवाहन
■ खरोखरच गंभीरपणे असं वाटत असेल तर उत्तर प्रदेशाची निवडणूक धार्मिक तेढ न पसरवता लढवून दाखवा.
□ जनशक्तीपुढे हुकूमशाहीचा टिकाव लागत नाही – ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका
■ जनशक्तीत फूट पाडण्याचा ब्रिटिशांकडून घेतलेला कावा किती दिवस उपयोगी पडणार?
□ कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचा मुलांच्या आकलनावर विपरीत परिणाम; अभ्यास तोंडपाठ, पण लेखनात सपाट
■ आता यावर लस कोण शोधणार?
□ ओमायक्रॉनच्या शिरकावानंतरही मुंबईकर बेफिकीर, लाखो फिरतायत विनामास्क, ८३ कोटींचा दंड वसूल
■ एखाद्या दिवशी भक्तिभावाने दिवे लावले की ओमायक्रॉन ‘ओ माय गॉड’ म्हणून धूम पळ काढेल, अशी खात्री आहे त्यांना.
□ वर्क फ्रॉम होममुळे अनेकजण गोलमटोल झाले, सरासरी एक किलोने वजन वाढले
■ मोदीभक्तांना हे सांगू नका! त्यांना यातही मोदीजींचा मास्टरस्ट्रोक दिसेल!!
□ भारतीय जनता पक्षाने कमी रकमेच्या देणग्या स्वीकारायला सुरुवात केली; मोदींनी दिले १००० रुपये
■ खिशात पैसे असतील तर एखाद्या गरिबाला खायला घाला, कोरोनाग्रस्ताला मदत करून त्याची दुवा घ्या; देशसेवेच्या नावाखाली ‘मालक’ उद्योगपतींची सेवा करणार्या आणि बेहिशोबी फंड गोळा करून बसलेल्यांना आणखी गब्बर बनवू नका!
□ अफगाणिस्तानमध्ये महिलांना एकटीने फिरायला बंदी, सोबत नातेवाईक पुरुष हवाच
■ थोडे थांबा, आपले संस्कारी तालिबानही आत्ता पाटीवर गिरवत असतील हा धडा. कॉपीमास्टरच आहेत ते!
□ भारतीय संगीताला विमानाची दारं खुली करा- अनु मलिक
■ पाश्चिमात्य आणि पाकिस्तानी धुना चोरून भागले, आता भारतीय संगीताच्या पूजेला लागले!
□ सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ गाण्यावर मथुरा, वृंदावनच्या संतमहंतांना आक्षेप
■ लोकांना माहितीही नसलेलं गाणं माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद! असलं सगळं पाहायला वेळ कसा मिळतो या नामधारी संतमहंतांना?
□ गुन्हेगार उत्तर प्रदेशातून पलायन करताहेत- अमित शाह
■ केंद्रीय विनोद मंत्री बनत चालले आहेत अमितभाई, आपल्या पुण्यातून दमदार सुरुवात केली त्यांनी या स्टँड अप कॉमेडीची.
□ योगी सरकारचा आदेश झुगारून काँग्रेसतर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये हजारो मुलींचा सहभाग
■ नारीशक्ती भारी पडणार तिथे.
□ पाकिस्तानमध्ये १०० खासदार करबुडवे, १६१ खासदारांकडे बेहिशोबी संपत्ती
■ या बाबतीत भारतीय-पाकिस्तानी भाई भाई म्हणायला हरकत नाही.
□ मोदींच्या दिमतीला १२ कोटींची मर्सिडीज रोजचे बदलते कपडे, मेकअप, मश्रूम, कॅमेरे वगैरेंचा खर्च
■ काढला तर त्यापुढे मर्सिडीज चिल्लर आहे… एकटा माणूस कितीजणांसाठी रोजगार निर्माण करतोय ते पाहा. चांगलं काही दिसतच नाही का?
□ चंडीगडमध्ये भारतीय जनता पक्षाची १५ वर्षांची सत्ता ‘आप’ने संपुष्टात आणली… कमळ कोमेजलं…
■ या कृतघ्न लोकांना मोदीजींच्या त्यागाची, त्यांनी केलेल्या विकासाची काही कदरच नाहीये मुळी.
□ दिवसा लाखोंच्या सभा आणि रात्री संचारबंदी हा तर्काला न पटणारा अजब प्रकार : खासदार वरूण गांधींचा भाजपला घरचा अहेर
■ लोकांमध्ये विनामास्क फिरायचं आणि बंदिस्त स्टुडिओत कॅमेर्यासमोर मास्क लावण्याचा ड्रामा करायचा, अशी सर्वोच्च शिकवण आहे तुमच्या पक्षाची वरूण भाऊ!
□ कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो व्यापक हितासाठी; कुटुंब कल्याण खात्याचा अजब खुलासा
■ अगदी बरोबर. आपण स्वत:चे ढोल पिटण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्यांवर केवढा विश्वास टाकला, याची आठवण लस घेणार्याला कायम होत राहते तो फोटो पाहिल्यावर.