राजकारणातल्या माणसांच्या राजकारणातल्या आणि राजकारणापलीकडच्या सुरस आणि चमत्कारिक आठवणींचा खजिना
—-
महाराष्ट्रात आजवर असंख्य निवडणुका झाल्या, पण संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी आणि अत्यंत चुरशीने लढली गेलेली एकच निवडणूक झाली ती १९८० साली.
१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभर आणीबाणी लागू केली आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. इंदिरा गांधी यांच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ निर्माण करण्यात तुरुंगातील नेत्यांना यश आले. त्यातूनच हे नेते एकत्र झाले आणि त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली. १९७५ साली लागू केलेली आणीबाणी १९७७ साली इंदिरा गांधींनी उठवली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीत सर्व देशभर काँग्रेसचा दारूण पराभव करीत जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला. खुद्द इंदिरा गांधी यांचा रायबरेलीतून तर त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव झाला. पण इंदिरा गांधी सहजपणे हार मानणार्या नेत्या नव्हत्या. त्यांनी पुढच्या तीन वर्षांत जनता पक्षात पराकोटीचे मतभेद निर्माण केले. तेही त्यांचा पराभव ज्यांनी केला होता, ते राजनारायण आणि ज्येष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांना हाताशी धरून. यातूनच जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर ज्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, ते चौधरी चरणसिंग हे पंतप्रधानपदी राहणार नाहीत याची काळजी इंदिरा गांधी यांनी घेतली. मी काँग्रेसचा पाठिंबा तुम्हाला देते, तुम्ही पंतप्रधान व्हा, असे आश्वासन देत त्यांनी चरणसिंग यांना पंतप्रधानपदी बसवले आणि पंधरा दिवसांतच चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तो काढताना इंदिरा गांधी यांनी जे वक्तव्य केले ते सगळ्यांनाच चक्रावून टाकणारे होते. ‘हमने सरकार बनाने के लिए चरण सिंग जी को सपोर्ट किया था, सरकार चलाने के लिये नहीं’, असे म्हणत त्यांनी चरणसिंग सरकार पाडून टाकले.
लागोपाठ सत्तेवर आलेली दोन सरकारे पडल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी लोकसभा बरखास्त करून नव्याने निवडणुका जाहीर केल्या. या नव्या निवडणुकीत जनता पक्षाचा तर पराभव करायचाच, पण काँग्रेसमधील अनेकांनाही पराभूत करून पूर्ण पक्षावर आणि सरकारवर आपले नियंत्रण ठेवायचे, अशी व्यूहरचना त्यांनी आखली. त्यांच्या या रचनेत काँग्रेसमधील ज्यांचा पराभव करायचा अशा नेत्यांत एक नाव होते ते यशवंतराव चव्हाण यांचे. चव्हाण यांच्याविरोधात लढण्यासाठी तितक्याच ताकदीच्या आणि लोकप्रियता असलेल्या नेत्याची गरज होती. त्या दृष्टीने इंदिरा गांधी यांच्या डोळ्यासमोर पहिले नाव आले ते सातारचे छत्रपती घराण्याचे सध्याचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या आजी सुमित्राराजे भोसले यांचे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी यशवंतरावांच्या विरोधात लढावे, अशी विनंती इंदिरा गांधी यांनी त्यांना केली. यशवंतराव चव्हाण आणि आमचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढणे आम्हाला शक्य नाही असे सांगून सुमित्राराजे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. मग इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांच्या विरोधात लढण्यासाठी मोठ्या हक्काने शब्द टाकला तो वसंतदादा पाटील यांना. पण यशवंतरावांबरोबर माझे संबंध भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध लढणे शक्यच नाही, पण मी तुम्हाला लढणारा उमेदवार देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी आपली पत्नी शालिनीताई यशवंतरावांना चांगली टक्कर देईल, असे स्पष्ट केले. इंदिरा गांधींनी शालिनीताई पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आणि त्या सातारच्या मैदानात उतरल्या. उत्कृष्ट वक्तृत्व ही त्यांची खासियत होतीच, शिवाय त्यांचे माहेर सातारा जिल्ह्यात होते. या दोन गोष्टींचा वापर करून ‘मी सातारची माहेरवाशीण आहे, मला मते देऊन माझे माहेरपण साजरे करा’ असे महिला मतदारांना भुलवणारे वक्तव्य करीत त्यांनी सारा सातारा जिल्हा पिंजून काढला. आपल्या भावांच्या मदतीने निवडणुकीत मोठी यंत्रणा उभी करून पुरुष मतदारही आपल्याकडे वळतील अशी व्यूहरचना त्यांनी केली. जवळपास तीन आठवडे संपूर्ण सातारा मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्यासारख्या त्या फिरल्या. या मतदारसंघातून प्रत्येक निवडणुकीत साडेचार पाच लाख मतांनी निवडून येण्याची यशवंतरावांची परंपरा असल्याने त्यांचा प्रचार तुलनेने धीम्या गतीने सुरू होता. शालिनीताई मात्र प्रचारात खूप पुढे निघून गेल्या होत्या. आपण जिंकणारच अशी खात्री त्या देत होत्या.
अखेर मतमोजणीचा दिवस आला. यशवंतराव चव्हाण निवडून आले, पण नेहमीसारखे पाच लाखांचे मताधिक्य त्यांना लाभले नाही. त्यांचे मताधिक्य ४८ हजारांपर्यंत खाली आणण्यात शालिनीताई यशस्वी झाल्या होत्या.
या निवडणुकीनंतर चारच वर्षांनी देशभर पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांपूर्वी बर्याच गोष्टी घडून गेल्या होत्या. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या रक्षकांनी हत्या केली होती. राजीव गांधी नवे पंतप्रधान झाले होते. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांनी नव्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली होती. या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी असा आग्रह शालिनीताई पाटील यांनी धरला होता. पण सातारा मतदारसंघासाठीचा त्यांचा आग्रह वसंतदादा पाटील यांनी फेटाळून लावला आणि राजीव गांधींना सांगून दादांनी प्रतापराव भोसले यांना उमेदवारी मिळवून दिली. प्रतापराव निवडूनही आले, पण लोकांच्या लक्षात राहिली ती यशवंतराव विरुद्ध शालिनीताई यांची निवडणूक. अशी निवडणूक पुन्हा होणार नाही, ही लोकांची प्रतिक्रिया विचार करायला लावणारी होती.
जिवाभावाचे नाते जोडणारे पतंगराव कदम
नोव्हेंबर १९९२मध्ये मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलमध्ये माझी आई गंभीर आजारावर इलाज करण्यासाठी दाखल होती. आईच्या खाटेपासून तिसर्या खाटेवर शेवंताबाई सातपुते या आजीबाई त्यांच्यावरील इलाजासाठी दाखल होत्या. दोन दिवसांत आजीबाईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. त्याच दरम्यान एक गृहस्थ त्या खाटेजवळ आले. सोबत काही कार्यकर्ते आणि अधिकार्यांचा ताफा होता. उत्सुकतेपोटी मी तिथे जाऊन आजीबाईंकडे चौकशी केली असता कळले की त्यांना भेटायला आलेले गृहस्थ कोणी साधीसुधी असामी नव्हते, तर ते राज्याचे एका महत्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री पतंगराव कदम होते. आजीबाईंच्या नावावर झालेले रुग्णालयाचे सुमारे साडेतीन हजार रुपयांचे बिल पतंगराव यांच्या कार्यकर्त्यांनी भरले आणि वॉनलेस हॉस्पिटलमधून आजीबाईंची घरी रवानगी झाली.
आजीबाई म्हणजे शेवंताबाई सातपुते या पतंगराव कदम यांच्या सोनसळ या गावच्या. आजीबाई बिनधास्त कोणत्याही
हॉस्पिटलमध्ये कितीबी दिवस रहा, पैशाची काळजी करू नका, बिल पतंगा देईल. इतकी काळजी घेतली जातेय म्हटल्यावर म्हातारीबरोबरच सगळेच निर्धास्त होते. याला कारण म्हणजे पतंगराव कदम यांच्या मनात असलेली सर्वसामान्य आणि गरीब माणसांबद्दलची कणव. पतंगरावांच्या वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांत बालवाडीपासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या राज्यभर पसरलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे २० लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या सुमारे ४० हजाराच्या घरात जाईल. स्वतः पतंगराव रयत शिक्षण संस्थेत शिकले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काहीतरी भव्यदिव्य घडवायचे असा निर्धार करून पतंगराव कदम यांनी स्वतः स्थापन केलेल्या भारती विद्यापीठामार्फत शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले. पाठीवर हात ठेवून लढ म्हणा असे म्हणणारा आश्वस्त करणारा पाठीमागे कोणी असेल तर माणसे मोठी होतात. पतंगराव असेच मोठे झाले. भिलवडी वांगी मतदार संघातून विधानसभेवर सातत्याने निवडून येत मंत्री झाले. वेगवेगळ्या खात्यांची मंत्रिपदे भूषविण्याची संधी पतंगरावांना मिळाली. काहीतरी करून दाखवायचे या उर्मीतून मतदारसंघात सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. वेगवेगळ्या पाणी योजना राबवून तालुका सुजलाम् सुफलाम् बनविला. सहकारी बँका, सहकारी पतपेढ्या यांचे आणि सहकारी दूध योजनांचे जाळे विणून महिलांना दुधाचा धंदा करून घरबसल्या त्यांच्या हातात पैसा खेळता राहील याची व्यवस्था केली. पतंगराव कदम यांनी राजकीय जीवनात शिक्षण, सहकार, उद्योग अशा अनेक खात्यांचे मंत्रीपद भूषविले, पण मुख्यमंत्रीपदाने मात्र या नेत्याला नेहमीच हुलकावणी दिली.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ‘काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी नावाचे एक वेगळेच रसायन आहे. १९६७ सालापासून घासतोय, पण पक्षश्रेष्ठी मला मुख्यमंत्रीपदापासून नेहमीच लांब ठेवत आहेत’ असे सांगत पतंगरावांनी आपल्या मनातील खंत अनेक मान्यवरांसमोर व्यक्त केली. वयोमानानुसार पतंगराव दुर्धर आजाराने ग्रासले होते. एक दिवस अचानक सोनिया गांधी अन्य काही नेत्यांसमवेत मुंबई भेटीवर आल्या होत्या. पतंगराव खूप आजारी आहेत हे कळल्यावर सोनिया गांधी रुग्णालयात पतंगरावांची भेट घेण्यास गेल्या. पतंगरावांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. बहुदा आजची रात्र पतंगराव कशीबशी पार पाडतील, असे डॉक्टरांनी सोनिया यांना सांगितले. पुढच्या काही तासातच पतंगरावांचे निधन झाले आणि शिक्षण, सहकार, उद्योग क्षेत्रात खूप मोठे योगदान देणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला.
कायम सफारी वेषात वावरणारे पतंगराव भिलवडी वांगी या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला थेट नावानिशी ओळखायचे. मतदारसंघातील घराघरात जिवाभावाचे नाते निर्माण केलेले पतंगराव गेले आणि सारा मतदारसंघ हळहळला.
– सुरेन्द्र हसमनीस
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)