—-
प्रबोधनकारांसारखा अफाट उद्योगी माणूस पनवेलसारख्या छोट्या शहरात मावू शकत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कर्मभूमीने म्हणजे मुंबईने त्यांना ओढूनच आणलं. त्यांच्या शिक्षणाची फरफट सुरू झाली आणि ते मुंबईत पोचले. अनेक उद्योग करत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच खांद्यावर घेतली. मुंबईत एकटं राहताना त्यांच्या पोटोबाची काळजी घेतली ती गिरगावातल्या घरगुती खानावळींनी. तिथे त्यांनी स्वतःबरोबरच कितीतरी फुकट्या मित्रांनाही जेवू घातलं. पण त्यांनी फक्त खाल्लं आणि खिलवलं नाही, तर त्याबद्दल लिहिलंही. पण खाद्यजीवनाबद्दलचं त्यांचं लिहिणं नेहमीचं रसास्वाद टाइप किंवा रेसिप्या सांगणारं नव्हतं. त्यांनी त्यांच्या बारीक नजरेतून टिपलेलं जेवणामागचं समाजकारण सांगितलं. त्यातून शंभर वर्षांपूर्वीचा मुंबईतल्या खाद्यसंस्कृतीचा आपल्याला माहीत नसलेला इतिहासच समोर येतो.
१९४४ मध्ये `जुन्या आठवणी’ लिहिताना प्रबोधनकार पहिल्याच वाक्यात आपल्याला धक्का देतात. `जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातात होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकर्याच पुरवत असत आणि गोर्या लोकांच्या खाणावळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे.’ वर्षानुवर्षं चहा आणि पाव या गोष्टी जणू इराणी हॉटेलांनीच मुंबईला पुरवल्या आहेत, असं वाटावं इतकं कौतुक घोळून घोळून सांगितलं गेलंय. कारण मुळात मुंबईचा इतिहास प्रामुख्याने अमराठी नजरेनेच ढुंढाळला जातो. त्यात मुंबईतल्या मराठीभाषक भंडारी समाजाचं हे कर्तृत्व कधीचंच झाकोळून गेलंय. आजच्या तरुण पिढीच्या भंडार्यांनाही हे काही माहीत असण्याची शक्यता कमीच. पण कोणीतरी हे शोधून काढायला हवं.
प्रबोधनकारांनी हा लेख लिहिलाय तेव्हा म्हणजे १९४४मध्येच भंडारी हॉटेलांचं हे कल्चर संपल्यात जमा होतं. तेव्हा फोर्ट ते गिरगाव पट्ट्यात फक्त तीन चार हॉटेलं उरली होती. या हॉटेलांमध्ये चहाबरोबरच नॉन वेज जेवणाचीही चोख सोय असायची. प्रबोधनकार सांगतात की त्यामुळे ब्राह्मणांची पंचाईत व्हायची. मांसाहार होतो तिथे चहा कसा प्यायचा अशी समस्या त्यांच्यासमोर असावी. त्यावर उपाय म्हणून ब्राह्मणांनी एक दोन छोटी चहाची हॉटेलं `गल्लीकुच्चीत’ सुरू केली होती. ही हॉटेलं छुपी होती, म्हणजे कुडाच्या पडद्याआड चार पाचजणं हळूच जाऊन चहा पिऊ शकतील इतकीच व्यवस्था असायची. त्यामुळे ब्राह्मण गुपचूप जाऊन तिथे चहाची तलफ भागवत. तिथे ब्राह्मण सोडून इतरांना प्रवेश नव्हता. त्यामागे सोवळ्या ओवळ्याच्या खुळचट कल्पना होत्या. त्या काळात उघडपणे हॉटेलांमध्ये जाऊन चहा पिणं किंवा काही खाणं हे निषिद्ध मानलं जात होतं. दारूच्या गुत्त्यांत शिरणार्यांकडे कुत्सितपणे पाहत, तितकंच हॉटेलमध्ये जाणार्यांकडेही पाहत असं प्रबोधनकारांनी सांगितलंय.
अशा जुनाट प्रतिगामी वातावरणात सखुबाई नावाच्या गिरगावातल्या भटवाडीत राहणार्या एका ब्राह्मण विधवा बाईंनी सार्वजनिक खानावळ सुरू करण्याचं धाडस केलं. प्रबोधनकार सांगतात की हिंदूंमधला तो तसा पहिलाच प्रयत्न होता. एका विधवा बाईने स्वतंत्र धंदा करणं ही गोष्टच तेव्हा बंडखोरीची होती. प्रबोधनकारांच्या शब्दांत सांगायचं तर त्यामुळे `शहाणासुरत्यांच्या भावना जखमी व्हायच्या.’ अशा भावना दुखावणार्यांचं प्रबोधनकारांनी कायम कौतुक केलं. भले आज त्याचं आपल्याला कौतुक नसेल. कुलाब्याच्या प्रसिद्ध `लिओपोल्ड कॅफे’च्या बाहेर १८७१ सालची स्थापना असल्याचा मोठा बोर्ड आहे आणि खोताच्या वाडीतल्या `माधवाश्रमा’ची स्थापना १९०८ची. त्यामुळे सखुबाईंनी आपलं धाडसी पाऊल यामधल्या काळात कधीतरी उचललेलं असणार. अधिक बारीक जायचं, तर प्रबोधनकारांनी तिची खानावळ अनुभवलीय, म्हणजे हे कधीतरी १९०४नंतर झालेलं असावं.
इराण्यांची, ख्रिश्चन, मुसलमान आणि पारशांची हॉटेलं मुंबईत आधीपासूनच होती. पण मराठी पद्धतीचं घरगुती जेवण देणार्या खानावळी या त्या काळातल्या मुंबईची गरजच होती. कारण विसाव्या शतकाच्या सुरवातीला मुंबईत येणारे मराठी चाकरमानी पुरुष हे एकटेच असायचे. कुटुंब गावीच असायचं. एकतर इथे आलेले बहुतेक लग्न न झालेले तरुण होते. मुंबई परवडतही नव्हती. गावाशी बंध आतून जोडलेले होते. बोटीने येणंजाणं अडचणीचंही होतं. पुढे बोटी बंद पडल्या आणि एसटी सुरू झाल्या तेव्हा कोकणी चाकरमान्यांच्या बायका मुंबईत बिर्हाडं करून राहू लागल्या. तोपर्यंत गावच्या किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये सडाफटिंग तरूण घोळक्यानेच राहत होते. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था केली ती सखुबाईंनी.
खानावळ सुरू करताच पहिला पेच आला तो जातिभेदाचा. प्रबोधनकार सांगतात, `खाणावळीत बामण येणार तसे इतर अठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या जातवार पंगती मांडायच्या तर मलबार हिलचं अंगणसुद्धा पुरायचं नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत.’ त्यावर सखुबाईंनी कडक भूमिका घेतली- जेवण हवं असलेल्या प्रत्येकासाठी ही खानावळ आहे. मी ब्राह्मण ओळखत नाही की जातपात मानत नाही. मी सगळ्यांना एकाच पंगतीत वाढणार. पाटाला पाट आणि ताटाला ताट भिडवून. ज्यांना गरज आहे त्यांनी यावं. गरज नसेल तर खुशाल भुकेलं राहावं. मला त्याची पर्वा नाही. कोणी कटकट केली तर त्याला मी भरल्या ताटावरून ओढून हाकलून देईन.
सखुबाईंचा आदेश जारी होताच सगळे ब्राह्मण-बाह्मणेतर खानावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेवू लागले. शेकडो पानं उठू लागली. सगळ्यांनी पोटभर जेवावं, यासाठी सखुबाईंचा आग्रह असायचा. सणाच्या दिवशी गोडधोड असायचं. त्यात कुणी कमी जेवला तर त्याला सुनावत. कुणी आजारी असेल तर त्याच्या घरी साबुदाण्याची पेज पोचवत. नोकरी गेल्यामुळे कुणाचं बिल थकलं तरी त्याला बोलावून जेवू घालत. दरमहा सात आणि साडेसात असे दोनच भाव असत. सातवाल्यांना ताक आणि साडेसातवाल्यांना दूध किंवा दही, इतकाच फरक असायचा. बाकी सगळं जेवण सारखं. त्यामुळे सखुबाईंची खानावळ गजबजती राहिली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गिरगावात आणखी तीन चार ब्राह्मण विधवांनी खानावळी सुरू केल्या. त्यात झावबा वाडीतल्या भीमाबाई आणि मुगभाट लेनच्या चंद्रभागाबाई यांच्या खानावळीही खूप चालत. या सगळ्या खानावळी सखुबाईंनी घालून दिलेले नियम पुढे पाळतच सुरू राहिल्या.
सखुबाईंनी जातिभेदाला पहिली थप्पड दिली, असा गौरव प्रबोधनकारांनी केलाय. पण हे सगळं मान्य नसलेले काही कर्मठ ब्राह्मण होतेच. त्यांच्या हट्टामुळे त्यांचीही सोय सखुबाईंनी केली. एका अंधार्या खोलीत काही ब्राह्मण सोवळं नेसून जेवायला बसत. त्या खोलीला सखुबाई विटाळशीची खोली म्हणत. बाहेरच्या मोठ्या पंगतीत मागणी असली की खोलीतल्यांकडे वाढप्यांचं दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळे ते ओरडून हवं ते वाढायला सांगत. जास्तच ओरडा झाला की सखुबाई सांगायच्या, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा. सोवळ्या जेवणार्यांनी तक्रार केली तर त्या स्पष्टच सांगायच्या, `मोठ्या पंगतीचं काम टाकून तुमच्याकडे `पेशल’ पहाणार कोण? तुम्हाला सगळे `पेशल’ पाहिजे तर ते मला जमणार नाही. तुम्हाला वाढप्याच्या सोयीसोयीनेच घेतलं पाहिजे. चांगलं सगळ्यांसोबत गुण्यागोविंदाने बसून जेवावं, गप्पागोष्टी कराव्यात. कशाला बसताय तिकडे अंधार्या खोलीत?’
सखुबाईंच्या तोंडचा दांडपट्टा सतत सुरू असायचा, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कुणी जायचं नाही. कुणी काही बोललं तर त्यांचं एक पेटंट वाक्य होतं, `चूप, मध्येच मला एंटरप्रॅट करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंदावर्खर! माझ्या खाणावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जडज झाले समजलात.’ जेवण सुरू असताना सखुबाई कमरेवर हात ठेवून पंगतीतून शतपावली करत फिरत. प्रत्येकावर काही ना काही टिप्पणी, टिंगल सुरू असायची. एखाद्या रांगेत एकमेकांना चिटकून चारपाच ब्राह्मण बसलेले बघितले की सखुबाई त्यांच्या सोवळ्याची टिंगलटवाळी करत. ते इतकं बेफाम असायचं की पुढच्या वेळेस ते एकाच जातीची पंगत मोडून सरमिसळ करून बसत.
सखुबाईच्या `नैतिक धैर्याची’ ही कहाणी सांगून प्रबोधनकार आपल्या लेखाचा शेवट असा करतात, `तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाजसुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखुबाईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्त्व हिंदू सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.’ प्रबोधनकार असं म्हणालेले असले तरी सखुबाईच्या या प्रयोगाला महाराष्ट्रातल्या समाजसुधारणेच्या इतिहासात डावललेलं आहेच. मुख्य प्रवाहातल्या इतिहास लिहिणार्यांना हा इतिहास महत्त्वाचा वाटत नाहीच. सर्वसामान्य लोकांनी घडवलेली लोकल किंवा सबाल्टर्न हिस्ट्री कायम दुर्लक्षित राहतेच. या सखुबाई कोण होत्या, हे शोधणं आणि त्यांना इतिहासात स्थान देणं आज अवघडच आहे. पण प्रबोधनकारांनी नोंदवलं म्हणून आपल्याला असं काही झाल्याचं कळलं तरी.
अर्थातच सखुबाईंच्या या प्रयोगाला काळाच्या मर्यादा होत्या. अस्पृश्य, भटके, आदिवासी हे गिरगावातल्या सगळ्याच पांढरपेशा समाजाच्या मेंदूच्या शेकडो कोस दूर सहाजिकच असणार. अर्थातच म्हणून सखुबाईंच्या धाडसाचं मोल कमी होत नाही. पण शाळेत असताना पनवेलमधल्या महार सुभेदारांच्या घरात जाऊन चहा पिणार्या प्रबोधनकारांचं महत्त्वही लक्षात येतं. म्हणूनच धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात लिहिलेला एक प्रसंग इथे नोंदवायला हवा. महाडमधल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये रावबहादूर बोलेंच्या अध्यक्षतेत सभा झाली. त्यात प्रबोधनकारांचं भाषण प्रक्षोभक झाल्याचं कीर सांगतात. लोकांच्या आग्रहावरून सभेच्या आयोजकांनी देवराव नाईक आणि प्रबोधनकार ठाकरे यांना महाराच्या हातचं पाणी प्यायला देऊन त्यांचं सत्व पाहिलं. कीर लिहतात, `ते तत्त्ववीर सत्त्वास जागले.’
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)