या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पश्चिम युरोपचा बहुतांश भाग उष्णतेच्या लाटेनं होरपळला आणि आता मोठ्या प्रमाणावर येणार्या पुरामुळे तिथे आपत्तीच आली आहे. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले. जर्मनी आणि बेल्जियमचे अनेक भाग तर पुरात बुडाले. लंडनमध्ये तर एका दिवशी सर्वाधिक उष्णता होती आणि त्यातच मोठं वादळ येऊन महिन्याभराचा पाऊस एका दिवसात पडला. चीनमध्ये मोठे पूर आले. अमेरिकेलासुद्धा जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांचा सामना करावा लागला, तर रशियात कायम गोठलेल्या बर्फाळ जमिनीचे विरघळणे सुरू झाल्याच्या घटना घडल्या. आपल्याकडे तर अतिवृष्टीनं झालेल्या प्रलयाच्या घटना ताज्या आहेत.
अवेळी पाऊस, चक्रीवादळ, ऋतुबदल आणि अनिश्चित असं लहरी हवामान ही आपल्या वातावरण बदलाची वैशिष्ट्यं झाली आहेत. हा काही जगाचा अंत आहे असं मला म्हणायचं नाही. पर्यावरण आणि हवामानबदल याकडे लक्ष वेधण्यासाठीच ही उदाहरणे दिली आहेत. निसर्ग कोपल्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचं नुकसान, विक्रमी पाऊस पडून अचानक पूर येणं, हे मुळात का घडायला लागलेले आहे, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. निसर्ग का कोपतो हे समजून घेतले तर आपल्याला पर्यावरणाचे महत्व समजून घेता येईल आणि पर्यावरणाचा र्हास थांबवता येईल. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात आपत्ती आल्यानंतर नाही तर आपत्ती येण्याअगोदर व्हायला हवी. पण आपल्याकडे निसर्गाने कितीही सूचना दिल्या तरी आपण त्या गावचेच नाही असे निगरगट्टपणे वागत असतो. प्रत्येक वेळेला आपत्ती आपल्या दोषामुळे नाही तर निसर्गाच्या लहरीपणामुळे आली म्हणून कातडीबचाऊ युक्तिवाद करत असतो. अर्थात निसर्ग माणसासारखा बिनडोक भावनाशील नसल्यामुळे त्याच्याकडे दयामाया नसतेच. त्यामुळे तो त्याचे काम त्याच्या पद्धतीने करत असतो. पण त्याचे परिणाम राजकारणी आणि धनदांडगे नाही, तर सामान्य माणसे भोगत असतात.