अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, चंद्र मिथुनेत त्यानंतर कर्क आणि सिंहेत, बुध-रवी कर्केत, शुक्र-मंगळ सिंहेत, केतू वृश्चिकेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू-नेपच्यून (वक्री) कुंभेत.
आठ ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या, नऊ ऑगस्ट रोजी श्रावणमास आरंभ.
—–
मेष – राशीस्वामींचे सिंह राशीतले राश्यांतर आणि त्यावर गुरूदृष्टी हा चांगला योग आहे. त्यामुळे नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी चांगला काळ आहे. प्रेमी युगुलांना मस्त अनुभव येतील. विवाह जमवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यास यश मिळेल. विद्यार्थीवर्गासाठी अनुकूल आठवडा. गुरू, चंद्र नवपंचम योग लहान भावंडांसदर्भात सुखवार्ता देणारा ठरेल. आर्थिक समस्या मिटतील. प्रवास लांबणीवर पडेल. प्रमोशन लांबणीवर पडेल. महिलावर्गासाठी उत्तम काळ.
वृषभ – सुख आणि आनंद काय असतो त्याचा अनुभव या आठवड्यात येईल. राशीस्वामी शुक्राचे सुखस्थानात होत असणारे आगमन गोचर, त्यामुळे सुख आणि आनंद देणारे योग जुळून येणार आहेत. सुनांनी सासूबाईसोबत मिळते जुळते घ्या, छोट्या कारणांसाठी उगाचच आकांडतांडव करू नका. अमावस्येजवळ मानसिक चिंता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहण्यास पसंती द्या. उधार उसनवारी वसूल होण्यास वेळ लागेल. विद्यार्थीवर्गाचा निर्णय लांबणीवर पडेल. भागीदार, लाईफ पार्टनर यांच्याबरोबर सामंजस्याने संवाद करा, फायद्यात राहाल.
मिथुन – राशिस्वामी बुध, रवी, बुध दिव्य योगात राहणार आहेत, त्यामुळे हा आठवडा फलदायी राहणार आहे. बुध-चंद्र परिवर्तन योगामुळे आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. थकीत रक्कम वसूल होईल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. अचानक कानाचा त्रास जाणवेल, त्यामुळे औषधोपचार करावे लागतील. षष्ठ स्थानातले केतू आणि मंगल केंद्र योग यामुळे रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे धावपळ कमी करा आणि काळजी घ्या. कामाच्या निमित्ताने धावपळ होऊ शकते.
कर्क – या आठवड्यात अनपेक्षित लाभ मिळणार आहेत. लॉटरी, शेअर बाजारात काहीतरी उलाढाल केलीत तर त्यामधून चांगली आवक होण्याचा योग आहे. आर्थिक पथ्य पाळा, कुणाला पैसे देऊ नका, मिळण्यास विलंब होईल. अमावस्या आर्थिक खर्चाची. कुणाची चेष्टामस्करी करताना जरा जपून. नकळत एखाद्याचा अपमान होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर हुज्जत घालू नका, तडकाफडकी निर्णय होईल आणि नोकरीवर पाणी सोडावे लागेल.
सिंह – पैशाचे योग्य नियोजन करा, अन्यथा होणारे नुकसान परवडणारे नसेल. राशीस्वामी रवीचे व्ययातले भ्रमण, धनेश आणि लाभेश बुध व्ययस्थानात त्यामुळे खिशाला चाट बसेल. प्रवासात पाकीट सांभाळा. एखाद्या कारणामुळे घरात वाद होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमधील आर्थिक व्यवहार पारदर्शी ठेवा, चुकून काही कारणामुळे भांडणाचे कारण होऊ शकते. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, बारीक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. महागात पडेल.
कन्या – काही कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. वक्री शनिची सप्तमावर दृष्टी, सप्तमेश गुरू वक्री मंगळाच्या दृष्टीत, त्यामुळे घरात एखाद्या जुन्या विषयाला फोडणी मिळू शकते, त्यामधून नवीन वाद निर्माण होतील. काळजी घ्या. विद्यार्थीवर्गाकडून निर्णय घेताना धरसोड होईल, त्यामुळे द्विधा मन:स्थितीत निर्णय घेऊ नका. मुलींनी प्रलोभनापासून लांब राहावे, फसवणूक होऊ शकते.
तूळ – अनपेक्षित लाभ मिळणार आहेत. राशिस्वामी शुक्र आणि धनाधिपती मंगळ लाभात असल्यामुळे आर्थिक समस्या सुटणार आहे. अमावस्या चिंतेची. घरातील पितृतुल्य व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. सरकारी नोकरीत असाल तर नियमबाह्य काम करू नका. आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, त्यात एखादी छोटी शस्त्रक्रिया होऊ शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, चुकून पोटाची अडचण निर्माण होऊ शकते.
वृश्चिक – एखादे महत्वाचे काम करण्यासाठी प्रयत्न सुरू असतील तर थोडे थांबा. तूर्तात या कामावर चर्चा करू नका आणि कामे पुढे ढकला. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. भाग्य साथ देत नाही असा विचार मनात येईल. विद्यार्थीवर्गाला संमिश्र अनुभवाचा काळ.
धनू – या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. परदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना फायद्याचा आठवडा. आर्थिक आवक मनासारखी राहणार नाही, त्यामुळे थोडे नाराज राहाल. ध्यानधारणेत रमाल. १० आणि ११ ऑगस्ट रोजी होत असणारा गुरू, चंद्र, मंगल, शुक्र संसप्तक योगामुळे एखादा विलक्षण अनुभव येऊ शकतो.
मकर – वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात काही चर्चा सुरू असेल तर सुसंवांदातून मार्ग काढा. कुटुंबासाठी सर्वाधिक वेळ खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणी थोडे नमते घ्या. उगाचच प्रतिक्रिया देऊ नका, भलतीच अडचण निर्माण होऊ शकते. त्यातून मनस्तापाचे प्रकार होऊ शकतात. मन शांत ठेवलं तर आनंदी राहताल.
कुंभ – तुमच्या निर्णयक्षमतेत आता वाढ होणार आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना योग्य विचार केला तर भविष्यात मोठा आणि चांगला फायदा होऊ शकतो. कुठल्याही मोहजालात फसू नका. अन्यथा पोलिसांचा ससेमिरा मागे लागू शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या. प्रवासात नव्या ओळखी होतील.
मीन – येत्या आठवड्यात ताणतणाव वाढणार आहे. एखादी नवीन चिंता मागे लागू शकते. अमावास्येच्या दिवशी घरात वादविवाद होण्याचे प्रकार घडू शकतात. परदेशगमनाचा योग दृष्टिपथात येईल. नातेवाईकांकडून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थीवर्गाची कामे खोळंबतील. परीक्षेत मनासारखे यश मिळण्यात अडचण येऊ शकते.