इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर उफाळलेल्या लोकक्षोभावर स्वार होऊन जनता पक्ष या कडबोळ्याचं सरकार आलं आणि काँग्रेसमध्ये असल्यापासून पंतप्रधानपदाची आस धरून बसलेले मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांना एकीकडे काश्मीर आणि दुसरीकडे ईशान्य भारत अशा दोन संवेदनशील आघाड्यांवरच्या समस्यांचा सामना करायला लागला आणि ते बुचकळ्यात पडले… इथे बाळासाहेबांच्या कुंचल्याने साकारलेले मोरारजी किती जिवंत दिसत आहेत आणि त्यांच्या चेहर्यावरचा ‘क्लूलेस’ भाव किती अफाट पकडला आहे रेषांनी… आताच्या साहसी केंद्रस्थ नेत्यांना आपण असे सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवतो, असं वाटत असलं तरी तेव्हाची भुतं आजही गाडली गेलेली नाहीत, ती अजूनही जिवंत आहेत आणि संधी पाहून डोकं वर काढतात, याचं भान ठेवलेलं बरं!