अशी आहे ग्रहस्थिती
रवि कर्केत, बुध सिंहेत, केतू तुळेत, मंगळ-हर्षल-राहू मेष राशीत, शनि (वक्री)-प्लूटो मकरेत, गुरू (वक्री)-नेपच्युन मीन राशीत, ११ ऑगस्ट रोजी मंगळ वृषभेत, ७ ऑगस्ट रोजी शुक्र कर्केत, चंद्र वृश्चिकेत, त्यानंतर धनु, मकर राशीत.
दिनविशेष – ८ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी, ९ ऑगस्ट रोजी मोहरम, ११ ऑगस्ट नारळी पौर्णिमा- रक्षाबंधन.
—–
मेष – आगामी काळ दिलासादायक राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. संततीच्या बाबतीत शुभवार्ता कानावर पडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभघटना कानी पडतील. मंगळाची ११ ऑगस्ट रोजी राहू-हर्षल यांच्या तावडीतून सुटका होईल. वक्री गुरूमुळे मनाची एकाग्रता टिकून राहील. उद्योगात बिघडलेली गाडी रुळावर येईल. १५ आणि १६ ऑगस्ट रोजीच्या रवि राश्यांतरामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल होतील, मन आनंदी राहील. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा.
वृषभ – धरलं तर चावतंय, सोडलं तर पुढे पळतंय अशी स्थिती राहणार आहे. शुक्राचे कर्केत आणि मंगळाचे वृषभ राशीतील राश्यांतरामुळे रोमँटिक अनुभव येतील. त्यात जास्त अडकू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. बदललेल्या मंगळामुळे स्वभावात वेगळे बदल होतील, त्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कृषी, विज्ञान, कायद्याच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. पती-पत्नीतील वाद मिटतील. नातेसंबंध पूर्वपदावर येतील. मघा नक्षत्रातील बुधामुळे अस्वस्थता जाणवेल. शुभकार्यात अडचणी येतील.
मिथुन – संमिश्र अनुभव येतील. खूप काही आले आणि वाटण्यात गेले, अशी स्थिती निर्माण होईल. कामे झटपट मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कामानिमित्ताने छोटा प्रवास घडेल. प्रवासात काळजी घ्या. संततीच्या कलागुणांना वाव मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. व्ययातील मंगळामुळे खर्चिक वृत्तीमध्ये अचानक वाढ होईल. पैसे जपून वापरा. कृत्तिका नक्षत्रात व्यय भावात मंगळ येत असल्याने आरोग्यसमस्या डोके वर काढतील, दक्षता घ्या.
कर्क – अडकलेली कामे मार्गी लागतील. मंगळ शुक्राचे राश्यांतर चांगले अनुभव देईल. नव्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. आता नाही तर परत कधी नाही. घरात शुभकार्ये होतील. शुभघटना घडतील. आर्थिक आवक चांगली राहील. खास करून मैदानी खेळाडूंना चांगले यश मिळेल. शिक्षकांना चांगला फायदा होईल. धनस्थानातील बुधावर मंगळाची चतुर्थ दृष्टी असल्याने आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात नुकसान होईल. सावध राहा.
सिंह – व्यावसायिकांना प्रवास करावा लागेल. काहींना परदेशात जावे लागेल, त्यातून काम आणि वेगळ्या सहलीचा अनुभव मिळेल. योगकारक मंगळामुळे महत्वाकांक्षा वाढीला लागेल. कामाचा व्याप वाढेल. स्थावर मालमत्तेच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागतील. वक्री गुरू महाराजांचे चांगले सहकार्य मिळेल. महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. पोटाचे आजार उद्भवतील. मंगळ-बुध केंद्र योगामुळे संयमाने बोला. क्षुल्लक गोष्टीमुळे काम बिनसेल.
कन्या – पैसे खर्च करण्याची हौस जागी होईल आणि ती पूर्ण देखील कराल. शुक्राच्या लाभातील राश्यांतरामुळे ती इच्छा पूर्ण होईल. हवे ते सहज पदरात पडेल. सप्तमातील वक्री गुरू, नेपच्युनमुळे व्यावसायिक भागीदार किंवा नवा व्यवहार करताना सावध राहा. फ्रॉड कॉलपासून सावध राहा. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते. वक्री शनि, प्लुटोची शुक्र रविवर दृष्टी आहे, त्यामुळे जवळचे लोकच निंदा करत नाहीत ना, हे पाहा. महत्वाकांक्षा पूर्ण होईल, प्रयत्न सोडू नका. नातेसंबंधातून लाभ मिळतील.
तूळ – आगामी काळ शुभ आहे. व्यापारात यश मिळेल. अर्धवट कामे पुढे सरकू लागतील. अनपेक्षितपणे प्रसिद्धीच्या झोतात याल. साहित्य-कला क्षेत्रात चांगले यश मिळेल. अनोळखी महिलांपासून दोन हात लांबच राहा. फसवणुकीचे प्रसंग घडतील, काळजी घ्या. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याच्या प्लॅन कराल. पैसे बेताने खर्च करा.
वृश्चिक – नोकरदारांना चांगल्या संधी मिळतील. सरकारी कर्मचारी, राजकारणी, उद्योगपतींना चांगला काळ आहे. नवी संधी आली तर बिनधास्त पुढे जा. यश नक्की मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ राहील, अपेक्षित यश मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. नोकरीत बदलीचे योग आहेत, महिन्यभरासाठी घरापासून दूर जावे लागेल.
धनु – विपरीत राजयोग जुळून आल्याने विरोधकांवर सहज मात कराल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. मेडिकल क्षेत्रात अनुकूल काळ आहे. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. मंगळाचे वृषभेतील भ्रमण आणि शुक्र अष्टम भावात असल्याने बाहेरख्यालीपणा करू नका. व्यसनापासून दूर राहा. वक्री गुरुचे पाठबळ मिळाल्याने कामे सुरळीत पार पडतील.
मकर – येत्या आठवड्यात व्हॅलंटाईन डेचा अनुभव येईल. मंगळ सप्तमात, कर्वेâत राश्यांतर करणारा शुक्र, शुक्र-मंगळ लाभयोग. अनपेक्षितपणे प्रेमात पडाल. घरात शुभकार्ये होतील. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. विवाहेच्छुकांचे लग्न ठरेल. शनि-राहू-केतूचा केदार योग दुधात मिठाचा खडा टाकू शकतो. क्रीडाप्रेमींसाठी अनुकूल काळ आहे. सप्तमातील शुक्रामुळे चंचलता वाढेल. दाम्पत्य जीवनात नाराजीचे प्रसंग येतील.
कुंभ – साडेसातीचा काळ, त्यात शनि-मंगळ नवपंचम योग. त्यामुळे चढ-उत्ाार जाणवतील. कामावर परिणाम होईल. खर्च वाढला तरी आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन वास्तू घेण्याचे योग जुळून येतील. आरोग्याची काळजी घ्या. खानपानावर नियंत्रण ठेवा. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. भागीदारी व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील.
मीन – कलाकारांसाठी काळ उत्तम आहे. गुरु-शुक्र-रवि नवपंचम योगामुळे मुलांसाठी हा आठवडा खूपच प्रेरणादायक आहे. अनपेक्षितपणे महत्वाच्या कार्यात वर्णी लागेल. महिलांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काहींना अर्धशिशीचा त्रास होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. नवी गुंतवणूक काळजीपूर्वक करा. वाहन चालवताना काळजी घ्या.