प्रबोधनकारांनी सातारा सोडण्याची कहाणी हा त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. पण फक्त तेवढंच नाही. ती त्यांच्या निस्पृह त्यागाचीही कहाणी आहे. स्वत:च्या लेखणीवर प्रचंड विश्वास असणार्या एका महान संपादकाच्या कर्तृत्वाची यशोगाथाही आहे. हे यश पद, प्रतिष्ठा आणि पैशाने मोजता येण्याच्या पलीकडचं आहे.
– – –
सातारा सोडणं हा प्रबोधनकारांच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग होता. त्याचे जास्तीत जास्त संदर्भ नोंदवणं आवश्यक आहे. हा प्रसंग १९२४ सालच्या मे महिन्याच्या शेवटी घडला असावा, असा निष्कर्ष ‘प्रबोधन’मधले या विषयावरचे संदर्भ वाचताना काढता येतो. कारण १ जून १९२४च्या अंकात ‘प्रबोधन’मध्ये प्रबोधन प्रिंटिंग प्रेसचा पुण्यातला पत्ता छापला आहे. तांत्रिक कारणांमुळे प्रकाशनाचं ठिकाण मात्र सातारा रोड हेच नोंदवलेलं आहे. हा प्रसंग घडल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी धनजीशेठने प्रबोधनकारांकडून काही रक्कम येणं बाकी असल्याच्या कारणावरून सातार्यातल्या कोरेगाव कोर्टात दिवाणी फिर्याद दाखल केली. प्रबोधनकारांनी स्वत: कोर्टात जाऊन केस लढवली. त्या सगळ्याची कहाणी त्यांनी नोव्हेंबर १९२७च्या ‘प्रबोधन’मध्ये लिहिली आहे. `प्रबोधन कार्यातली विघ्ने’ या लेखात १९२४ साली सातार्यात घडलेल्या प्रसंगाचे अनेक संदर्भ आले आहेत. म्हणून या लेखातला संबंधित भाग जसाच्या तसा पुढे दिला आहे. प्रबोधनकारांच्या शब्दात ही कहाणी वाचायलाच हवी,
प्रबोधन कार्यांतली विघ्ने मनांत एक व जनांत एक ही प्रवृत्ति जनसेवकांत नसावी, हें माझें ठाम मत असल्यामुळे काही गोष्टीचा जाहीर खुलासा करून, प्रबोधन कार्यांतील विघ्नांचा माझ्या आश्रयदात्यांना परिचय करून देणे आज भाग पडलें आहे. असे केल्यानें मजवर व्यावहारिक बावळटपणाचा आरोप आला तरी परवडला, पण अप्रामाणिकपणाचा दोष मला क्षणभरहि सहन होणार नाही. लोकमत प्रबोधनाच्या व्यसनापायी मी सर्वस्वाला किती व कसा मुकलों आहे, याची वाच्यता करून, आत्मश्लाघेच्या पातकाचा धनी मी होऊ इच्छित नाही. तथापि व्यवहाराच्या सरळ चार गोष्टी उघड करून, आश्रयदात्यांच्या तद्विषयक कल्पनांवर प्रकाश पाडणें माझें कर्तव्य आहे.
`मानसिक दास्याविरुद्ध बंडा’चा उच्चार करतांनाच, प्रत्यक्ष आचार म्हणून सरकारी सेवावृत्तीची आकर्षक रौप्यश्रृंखला मी एका क्षणांत तोडिली. कायदेबाजी आणि कज्जेदलाली यांविषयी माझे विचार प्रबोधनाच्या वाचकांना नव्याने सांगणें नको. माझे कोणी कितीहि नुकसान केलें, कितीहि निंदा केली अगर छळ केला, तरी वादी अथवा फिर्यादी नात्यानें कोर्टाची पायरी न चढण्याचा माझा कृतसंकल्प आहे. लुच्च्या लोकांनी या निश्चयाचा गैरफायदा घेऊन मला आजपर्यंत दीड दोन हजार रुपयांची ठोकर दिलेली आहे. उलट्या पावलानें चालणार्या जगांत माझी सरळ सुलट वृत्ति मूर्खपणाची ठरत आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. तथापि लोकसेवक या नात्यानें प्रतिपादन करीत असलेली माझी मतें कायदेबाज कज्जेदलालांना चुकीची किंवा बेमाणुसकीची वाटत असल्यास, त्यांत दृष्टीचा विरोध विशेष असल्यामुळे, अपराधाचा वाटा केव्हांहि पदरांत घ्यायला माझी ना नाही.
देणे घेणे सर्वांनाच असतें. पण तेवढ्यासाठीं कोर्टाची पायरी केव्हां चढावी आणि केव्हां चढू नये याचाहि काही विवेक आहे. हा विवेक ज्यांच्या गांवीं नाही, ही माणुसकीची वृत्ति ज्यांना अजिबात पारखी झालेली आहे, अशा मित्रांनीं एकदम शत्रुत्वाचा झगा पांघरून प्रबोधन कार्यांत विघ्नें उत्पन करण्याचे केलेले काही प्रयत्न वाचकांना आज श्रुत करीत आहे. या व्यवहारांत माझ्या वैयक्तिक संसाराचा संबंध मुळीच नाही, हे आधीच स्पष्टपणें सांगितलेलें बरें.
सातारा रोडवर छापखान्याचा धंदा ११ महिने झाला. त्याच्या भागिदारीची कामधेनु दूध देण्यास निदान दोन वर्षे तरी घेईल, तोपर्यंत माझा संसारखर्च चालण्यासाठीं कूपरच्या फॅक्टरीकडून दरमहा १०० रुपये अलाऊन्स मला मिळावा आणि त्याबाबत सर्व इंग्रजी पत्रव्यवहार, जाहिरातखातें, चित्रकलाखातें, हीं मी एकतंत्री चालवावी, असें ठरले होतें. त्याप्रमाणें माझीं कामेहि झाली. याशिवाय १९२३चे कूपरचे कौन्सिल इलेक्शन, मॅनिफेस्टो व इतर सर्व मतप्राप्तीची लेखन छपाईची कामें करण्याबाबत रोख रुपये ५०० ठरले होतें. परंतु अलाऊन्सच्या नांवावर किंवा कोणत्याहि सबबीबर स्वतःच्या संसारासाठीं ११ महिन्यांत मी कूपरच्या एका दीडकीलाहि स्पर्श केला नाहीं. प्रबोधन पाक्षिकाच्या कंपोज छपाईचा वाजवी खर्च मी रोख भरीत होतों. त्यासाठीं लागणारा कागद मी मुंबईहून खरेदी करून नेलेला होता. सातारच्या छापखान्यांत प्रबोधन बिनखर्ची छापला जात असे अशी कोणाची समजूत असल्यास ती निव्वळ गैरसमजूत होय. इतकेच नव्हे तर प्रबोधनानें सातारा प्रेसला रोख भरलेल्या रकमांपैकी १७ अंक छपाईची वाजवी बिलें वजा जाता ८४ रुपये सातारा प्रेसकडून प्रबोधनाचे अझून येणें आहे.
पुढें कूपरशाही कटकटीला कंटाळून मी जेव्हां तेथील व्यापाला कायमचा रामराम ठोकला, त्यावेळीं मी मुद्दाम मुंबईहून बोलाविलेल्या बी.कॉम. ऑडिटरनें नामंजूर केलेल्या, किंवा इतर काही कारणांमुळे छापखाना किंवा फॅक्टरी यांच्या खातीं खर्ची न घालतां येणार्या काही रकमा मला स्वत:च्या नांवावर चढवून घेणे भागच पडले. त्यांची बेरीज ४५० रु. झाली. भाऊराव पाटलांच्या सांगण्यावरून केशवराव व्िाचारे यांना हातउसने दिलेले ५० रुपये; (हे अझून परत यायचेच आहेत!) श्री. जाधवराव हे नामदार दिवाण होऊन सातारा येथे आले होते, त्यावेळीं मानपत्राच्या आणि दौर्याच्या भानगडींत पाडळी ते सातारा स्पेशल मोटरच्या फेर्यांचा खर्च अजमासे २५ रुपये; कीर्तनकार जलसेवाले यांना वेळोवेळीं दिलेल्या १० ते १५ रुपयांच्या कित्येक बिदाग्या; अनाथ प्रेतसंस्कार, वगैरे अनंत भानगडीचे खर्च केवळ कारखाना व छापखाना यांच्या नांवासाठी मला करावा लागला, त्यानें ही रक्कम फुगली.
छापखाना सोडतांना माझ्या ११ महिन्यांच्या अलौन्सची गोष्ट तर कोणी बोलेच ना, पण कारखान्यातले कटकरी कारभारी, `जाते वखत ठाकरेसाबने खाजगीके वास्ते जितनी रक्कम खर्च किये होगी, उतनी सब वसूल किये बगर नही जानें देंगे’, अशी भाषा बडबडत आलें. निष्कारण तंटेबखेडे होऊ नयेत आणि गोडीनें जुळलेला व्यवहार शांततेत तुटावा, मग त्यासाठी माझे स्वत:चें कितीहि नुकसान झालें तरी पत्करलें, ही माझी प्रवृत्ती असल्यामुळे, माझ्या संरक्षणासाठी मुद्दाम रात्रंदिवस आजूबाजूला बसलेल्या व हिशोब, चार्जशीट वगैरे तयार करण्यांत मदत करणार्या किनईचे डॉ. पाटणकर, पंत पराडकर, भाऊराव पाटील वगैरेच्या प्रतिबंधाला न जुमानता, मी ४५० रुपयांची प्रो नोट तयार करून एका पत्रासह भाऊराव पाटलांच्या हस्तें कूपरकडे पाठवून दिली. `परस्पर व्यवहाराचा प्रस्तुत होत असलेला शेवट आणि त्याला घडलेली कारणें विचारांत घेता, येथून एक कवडीचाहि निमित्ताळा न राहता आलों तसा परत जावे असे मला वाटते. म्हणून माझ्या नांवें फिरत असलेल्या ४५० रुपयांची ही प्रॉमिसरी नोट मी आपणास लिहून देत आहे. तिचा स्वीकार व्हावा.’ असा मजकूर या पत्रांत होता.
कूपरने माझ्या अलाउन्सचा कसलाहि विचार न करतां डोळे मिटून त्या नोटीचा स्वीकार केला. नोटीसीची मुदत १४ जून १९२७ला पुरी होत होती. म्हणून फर्स्ट क्लास ऑनररी मॅजिस्ट्रेटच्या न्यायदानाची तागडी सरकारतर्पेâ हातीं धरणार्या कूपर खानबहादुरांनी मागचा पुढचा, खर्याखोट्याचा, न्याय अन्यायाचा कसलाहि विचार न करतां, योग्य वा अयोग्य पण देणें मी नाकारीत नाहीं, सवडीनें देतो, या खास निरोपाला धाब्यावर बसवून, केवळ हातांत प्रॉमिसरी नोट एवढ्याच सबबीवर, १३ जून १९२७ रोजी कोरेगांव कोर्टात दिवाणी फिर्याद दाखल केली. (मुकदमा नं. २२१)
मुकदम्याची तारीख १९ ऑगस्ट १९२७ होती. मी दोन दिवस आधी सातारा येथे गेलो. त्यावेळीं कूपरतर्फे तडजोडीचा अट्टाहास करण्यांसाठीं अनेक प्रतिष्ठितांच्या आणि वकिलांच्या मजकडे येरझारा सुरू झाल्या. प्रस्तुत फिर्याद वकिलाच्या नजरचुकीनें लागली, कूपरची त्याला सम्मतीहि नाही, वगैरे अनेक बाष्कळ सबबी पुढे मांडून, तुम्ही कोर्टातच जाऊं नका, आम्ही सर्व व्यवस्था परस्पर मिटवून टाकतो, इत्यादि अत्याग्रहाची बोलणीं मी कोरेगांवच्या मोटारींत पाऊल ठेवला तरी चाललीच होती.
कोर्टात कूपरचे फक्त वकील आणि कारकून आले होते. मी वकील दिला नव्हता. कारण यापुढे कोणत्याहि प्रसंगी वकीलाची दलाली पत्करावयाची नाही असा मी निश्चय केलेला आहे. देव आणि मानवांत जर भट दलाल नको, तर न्यायदेवता आणि मनुष्य यांत तरी वकील दलाल कशाला पाहिजे? मी आपली हकिकत तपशीलवार जज्जसाहेबांना श्रुत केली. त्यांना खर्याखोट्याचा तेव्हाच अंदाज लागला, समोरचे वकील जवळ जवळ नांवालाच उभे होते. देणें असतां घेण्याबद्दलच फिर्याद कां? देण्यांतून घेणें बजा करून बाकीची रक्कम प्रतिवादीला देणें तुम्हाला न्याय्य वाटत नाही काय? वगैरे अनेक प्रश्न समोरच्या वकिलांस जज्जसाहेबांनी विचारले.
`ह्या सर्व बाबी कूपर व ठाकरे हे एकमेकांस भेटले तर तेव्हांच मिटत्या. अझूनहि तसे व्हावे अशी माझी स्वत:ची फार इच्छा आहे. पण ठाकरेच तडजोडीला नाकबूल आहेत.’ या पलीकडे वकिलांनी अधिक काहीच उद्गार काढले नाहीत. जज्जसाहेबांनीसद्धा तडजोडीच्या सूचना केल्या. मी उत्तर केले, `प्रॉमिसरी नोट माझी आहे. सही माझी आहे. पाठीमागचा पुढचा विचार करून मी ती दिली आहे. मी जंटलमन म्हणवितो, वर्तमानपत्रकर्ता म्हणून लोकांच्यापुढे मला उभे रहावयाचे आहे. मी माझ्या सहीला खोटी पाडू इच्छित नाही. मेहेरबानी करून आपण मला सहा महिन्याच्या मुदतीची डिक्री द्यावी.’
जज्जसाहेब : तुमच्या ११०० किंवा १६०० रु. येण्याबद्दल वादीवर तुम्ही फिर्याद कां केली नाही?
मी : वादी किंवा फिर्यादी म्हणून कोर्टाची पायरी न चढण्याची मी शपथ घेतलेली आहे साहेब. आरोपी किंवा प्रतिवादी म्हणून कोटीत हजर राहणें इंग्रजी कायदा मला भागच पाडील.
जज्जसाहेब : वादीच्या तडजोडीला न जुमानतां डिक्रीसाठीं हट्ट घेणारा प्रतिवादी आपणच पहिले दिसता.
नंतर `प्रस्तुतची रक्कम मी नैतिकदृष्ट्या देणें लागत नाहीं. पण कायद्याच्या दृष्टीनें देणे लागतो,’ अशी कैफियत लिहून घेऊन जज्जसाहेबांनीं माझ्या आग्रहांप्रमाणें सहा महिन्यांच्या मुदतीची डिक्री पास केली.
प्रस्तुत खटल्याची कायदेबाजी एकाद्या भटानें भाट्यानें अगर तीनशेंड्या शेट्यानें लढविली असती तर त्याला महत्व देण्याचे मला किवा कोणालाच काही कारण पडतें ना. परंतु कूपर म्हणजे सरकारचे खानबहादूर. त्यांच्या न्यायबुद्धीची लांबी रुंदी जाडी खोली पूर्ण अजमावून मगच माबाप सरकारनें त्यांना, दुसरा-तिसरा वर्ग नव्हें तर, पहिला वर्ग ऑनररी मॅजिस्ट्रेटचीं वस्त्रे अर्पण केलेलीं. ब्राम्हणेतर पक्षाचे पुढारी. सातारा म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष. डि.लो. बोर्डात वर्क्स कमिटीचे चेअरमन. जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष. सातारच्या अज्ञान महाराजांच्या गडगंज इस्टेटीचे पहिले ट्रस्टी. अर्धा तप कारकीर्दीचे एमेलसी. जिल्ह्यांतील दारू ताडी विक्रीचे धुरीण कंट्राक्टर. लाखो भांडवलाच्या लोखंडी नांगरांचे बडे कारखानदार. इत्यादि इत्यादि वगैरे वगैरे महत्पदाच्या थोरवीनें थोरापेक्षां थोर अशा कूपरसारख्या जंटलमनने ही कायदेबाजी लढविण्यांत आपल्या मनाचा दाखविलेला हा क्षुद्रपणा पडद्याआड झाकून ठेवणे म्हणजे वृत्तपत्रकार या नात्यानें लोकांची आणि सरकारची दिशाभूल करण्यासारखे आहे.