ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ, शुक्र सिंहेत, प्लूटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, रवि, बुध कर्क राशीमध्ये, शनि कुंभ राशीत, नेपच्यून मीन राशीमध्ये. विशेष दिवस : ४ ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी, ८ ऑगस्ट रोजी कालाष्टमी.
मेष : विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ. शैक्षणिक अडचणी मार्गी लागतील. घरात किरकोळ वादात संयमाने घ्या. मित्रमंडळींसोबत वर्षा सहलीला जाल. संसर्गजन्य आजार टाळा. नोकरीत कौतुक होईल. वरिष्ठ खूष होतील, भविष्यात त्याची पावती मिळेल. कलाकारांसाठी चांगला काळ. व्यवसायात आपलेच म्हणणे पुढे नेणे टाळा. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. संततीसंदर्भात चांगली बातमी कानावर पडेल. काहींना अचानक धनलाभ होईल.
वृषभ : व्यवसायात अच्छे दिन येतील, नव्या ऑर्डर मिळतील, आर्थिक आवक चांगली राहील. रेंगाळलेले काम पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील, संयम ठेवा. कागदपत्रावर घाईघाईने सही करू नका, भविष्यात अडचण येऊ शकते. थकीत येणे वसूल होईल, तरी वायफळ खर्च करू नका. मित्रमंडळींशी चेष्टामस्करी नको. प्रवासात काळजी घ्या, मौल्यवान वस्तू जपा. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. आध्यात्मिक क्षेत्रात वेळ द्याल. प्रेमप्रकरणात जपून राहा, वाद टाळा. घरात धार्मिक कार्य घडेल.
मिथुन : शिक्षणक्षेत्रात काळ चांगला आहे. संशोधक, प्राध्यापकांना यश लाभेल. वाणीवर नियंत्रण ठेवा, गैरसमज, वाद टाळा. सामाजिक क्षेत्रात सबुरीने घ्या. मेडिकल क्षेत्रात चांगले दिवस. काहींना आर्थिक लाभ होतील. आठवड्याअखेरीस मौजमजेवर पैसे खर्च कराल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील. नवीन ओळखींचा फायदा होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. नोकरीत किरकोळ वादांकडे दुर्लक्ष करा.
कर्क : उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या प्रयत्नांत यश मिळेल. मनासारख्या घटना घडतील. नोकरीत चुका टाळा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरातले वातावरण चांगले राहील. काहीजणांना आठवड्याच्या सुरुवातीला धावपळ करावी लागेल. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होईल. मुलांकडे विशेष लक्ष द्या.
सिंह : नव्या नोकरीच्या शोधात असाल तर मनासारखी नोकरी मिळेल. लॉटरी, सट्टा, जुगार यातून चांगला आर्थिक लाभ होईल. पण त्याच्या आहारी जाऊ नका. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग घडतील. नोकरी, व्यवसायात वेळेला महत्व द्या. आर्थिक बाजू भक्कम राहील. पण, वायफळ खर्च नकोच. आरोग्याकडे लक्ष ठेवा. बाहेरचे खाणे टाळा, पोटाच्या विकारांना निमंत्रण मिळेल. उधार-उसनवारी टाळा. वडीलधार्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, दुर्लक्ष करू नका.
कन्या : काही दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल. नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव जाणवणार नाहीत. नव्या कामाची जबाबदारी खांद्यावर पडू शकते, त्यात चूक करू नका. वरिष्ठांचे ऐका. जुन्या ओळखींमधून चांगला फायदा होईल. नोकरी-व्यवसायातल्या फायद्याच्या गोष्टींत थोडी गुप्तता बाळगा. घरात वागताना बोलताना काळजी घ्या. वाद टाळा. विवाहेच्छुकांसाठी काळ चांगला राहील. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. वाहन चालवताना काळजी घ्या. कामात अति आत्मविश्वास नको.
तूळ : आंधळा विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार टाळा. सोशल मीडियावर सावधपणा ठेवा. संततीच्या बाबतीत शुभघटना घडेल, घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायाच्या नव्या आयडिया सुचतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. नवा व्यवसाय सुरु करताना घाई करू नका. व्यसनी मित्रमंडळींपासून दूर राहा. अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात यशाची बाजू भक्कम राहील. कुणाला आर्थिक मदत करताना दहा वेळा विचार करा. हेल्थ सांभाळा.
वृश्चिक : आयटी कर्मचार्यांना विदेशात जाण्याची संधी मिळेल. मार्वेâटिंगच्या क्षेत्रात चांगले दिवस. महागडी वस्तू खरेदी कराल. आर्थिक उत्पन्न वाढेल. नवीन गुंतवणूक कराल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. नवे घर घेण्याचा विचार मार्गी लागेल. नोकरीत छोट्या कुरबुरी झाल्या तरी वाद वाढवू नका. मोठी खरेदी होईल. आपलेच म्हणणे रेटू नका. काहींच्या इच्छा सहज पूर्ण होतील. मामा-मावशींकडून मदत मिळेल. चिडचिड करून घेऊ नका.
धनु : व्यावसायिकांना विदेशात व्यवसाय विस्तारात यश मिळेल. नव्या नोकरीच्या संधींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्रांबरोबर मोजकेच बोला. चेष्टा-मस्करी नको. कलाकारांचा मानसन्मान होईल. समाजकार्यात चांगले दिवस आहेत. दानधर्म कराल. संगीतकार, पत्रकार, संपादकांसाठी चांगला काळ आहे. काहीजणांना स्पर्धात्मक यश मिळेल, तरुणांच्या इच्छा पूर्ण होतील. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. महिलांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर : निश्चयाची पूर्तता होईल. नोकरी, व्यवसायात वेळेचा सदुपयोग करा, फालतू वेळ वाया घालवू नका. उधार-उसनवारी टाळा. कामे अडकून राहिली तर नाराज होऊ नका. संमिश्र अनुभव येतील. बँकेत कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी येईल, पण, जरा जपूनच पावले टाका. कलाकार, अभियंते यांना चांगले अनुभव येतील. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. खेळाडूंची चमकदार कामगिरी होईल. पावसाळ्यात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घ्या. छंदाला वेळ द्या.
कुंभ : चिडचिड वाढेल. मित्रमंडळींबरोबर आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, वादविवाद टाळा. हातून उल्लेखनीय काम पूर्ण होईल. कलाकार, संगीतकारांना मानसन्मान मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होईल. आर्थिक बाजूचे योग्य नियोजन केल्यास फार त्रास होणार नाही. कामानिमित्ताने बाहेरगावी जावे लागू शकते. प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल.
मीन : अधिक श्रावण महिन्यात धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. घरातल्या मंडळींना घेऊन देवदर्शनासाठी बाहेरगावी जाल. मानसिक शांतता मिळेल. शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ राहील. वास्तू घेण्याचा विचार लांबणीवर टाका. नवीन गुंतवणूक सल्ला मसलतीनेच करा. नोकरदारांसाठी चांगला काळ, वरिष्ठ कामावर खूष राहतील, त्यामुळे दोन कामे जास्त होतील. व्यावसायिकांची कामानिमित्ताने धावपळ होईल. प्रवासात काळजी घ्या.