आज आमच्याकडे जेवण साधं होतं… फक्त आमटी भात केला, असं आपण सहज बोलून जातो. आमटीभाताचं जेवण साधं असलं तरी ते पण नीट जमलेलं असावं लागतं… आमटी कितीही पातळ… फळळ् पाणी असली तरी ती चांगली मिळून यावी लागते. तिला तिखट मीठ चिंच गूळ खोबरं याची प्रमाणात अचूक चव यावी लागते. भात चांगला गरम मऊ शिजलेला आणि त्याला अन्नाचा एक तजेलदार वास यावा लागतो. तरच या दोन पदार्थांना मिळून जेवण ही पदवी देता येते… आणि आपल्या मनाची तृप्ती होते.
आमटी खारट बेचव रंगहीन असली आणि भात कच्चा किंवा अति शिजलेला असला तर आयुष्यातला एक दिवस फुकट गेल्यासारखा वाटतो. वैतागत केलेलं जेवण दिवसभर आतून त्रास देत राहतं. जेवणाविषयी बरंच काही बोलण्यासारखं आहे. आईबद्दलच्या बर्याचशा आठवणी या जेवणाशी निगडित असतात. आईने स्वयंपाक करणं सोडून दिलं तर आठवणी बहुधा निम्म्यावर येतील.
जेवणाच्या हजार तर्हा आहेत… तशाच जेवण जेवण्याच्या पण कितीतरी तर्हा आहेत. खूप जणं जेवताना भुरके मारून मारून जेवतात. म्हणजे दोन कामं त्यांना करावी लागतात… एक जेवण्याचं आणि दुसरं भुरके मारण्याचं (काही जणांना जेवताना पण राबावं लागतं. जेवणं सोपं नाही.) भुरका एवढा मोठा असतो की ते जेवताना घोरताहेत असं वाटतं. तसं जेवल्याशिवाय आपण रसभरीत जेवलो आहोत असं त्यांना वाटत नाही. आमटी कढी ताक पिताना तर ते डरकाळया फोडताहेत असा भास होतो. बरं अशावेळी ते एवढे तल्लीन झालेले असतात की आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल, याची त्यांना जराही पर्वा नसते. समाधीच ही एक प्रकारची… अशा वेळी आपण काही बोलणं म्हणजे मैफल बेसूर करणं असं आपल्या मोठ्या मनाला वाटतं. छोट्या मनाला हे असह्य झालेलं असतं. (छोटा मेंदू आणि मोठा मेंदू असतो… तसं मोठं मन आणि छोटं मन पण असतं बरं… जो छोट्या मनाला कोपर्यात चिणून मोठ्या मनाला पुढे करतो… तो माणूस) जेवण झाल्यावर एक मोठ्ठा कार्यक्रम आटपल्याचा भास होतो… बाकीच्यांना.
माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत… त्या आमटी अगदी कमी किंवा नाईलाजाने भाताबरोबर घेतात. पण नाही वाढली तर मात्र त्यांना ती हवीच असते (किमान टोमणे मारायला तरी… फुस्… तरी बरं… मी नाही किंमत देत अशांना).
बाहेरून आल्यावर आपण आपल्या घरी न जाता शेजार पाजारी जावं तसं त्या जेवताना भात घेवून लोणच्याकडे जातात. लोणचं भाताकडे आणत नाहीत. मग तिथे एक दोन घास खातात. मग परत थोडा भात घेवून कोशिंबरीकडे जातात. तिथे दोन घास खावून (म्हणजे तिचा नायनाट करून) मग भाजीकडे जातात. तिथे आपुलकीचे चार घास खातात. पण अर्धी भाजी टाकतात. नाहीतर ती चांगली झाली होती असं नकळत सिद्ध होईल. मग नाईलाजाने घरात यावं तसं आमटी भात खातात. बरं आमटीची अर्धी वाटी तशीच ठेवून (अर्धी वाटी वाढली तर पाव वाटी तशीच ठेवून) त्या ताक भाताशी सूत जमवतात… (ताकाचा आणि सुगरणपणाचा काही सबंध नसतो) आणि मग जेवून उठतात. त्यांचं जेवण म्हणजे बुद्धिबळाचा डाव असतो… डाव! याला त्याला मुख्य म्हणजे तिला शह देवून बर्याच जणांना जाग्यावर लोळवून वचपा सूड घेवून त्या उठतात… आणि विजयी मुद्रेने बेसिनवर जाऊन हात धुतात. बर्याच वेळा त्यांच्या तोंडाला बाहेरून एक शित चिकटलेले असते… ती जणू त्यांच्या मुत्सद्देगिरीची निशाणी असते.
हा सगळा बोवाळ आटपला की त्या बाहेर येवून मनसोक्त, पोटभर पान खातात. अरे मग एक दिवस फक्त पानच खा ना… नका जेवू. पण नाही… हे कदापि शक्य नाही. जेवण वाढेपर्यंतही थारा नसतो… दहा वेळा स्वयंपाकघरात येऊन जाणार. मी फोडणी देत असले तर हळद किती पिवळी आहे नाही, अशी कॉमेंट करणार. मग होय असं म्हणावंच लागतं.
काहींना दात नसले तरी पापड हवा असतो.तो तुटत नाही… मग आमटीत बुडवून खातात. हे म्हणजे आईस्क्रीम थंड लागतं म्हणून वितळल्यावर सावकाश वाटी तोंडाला लावून पिण्यासारखं आहे.
काही जणांना पदार्थ किती चांगला झाला तरी कौतुक करायला अगदी जिवावर येतं. आपण न राहवून कधी विचारलं तर… काहीतरी कमी आहे असं वाटतंय… हे उत्तर. (आजवर तीळ पापड बघितला नाही… पण होतो बर्याच वेळेला) तुमच्यातच काहीतरी कमी आहे… मी मनात मोठ्ठ्याने म्हणते. काही लोकांना दुसर्याचं चार शब्दांनी कौतुक करणं म्हणजे उधळपट्टी वाटते.
बरं त्यांच्याकडे कधी जेवायला गेलं तर आमटी छान झालीय नै, असं वदवून घेणार आणि माझा पडला गोडा स्वभाव.
काही जण जेवण एवढा इंटरेस्ट घेवून जेवतात की बघायलाच नको. लोकं रंगमंचावर पण एवढं मन लावून वावरत नाहीत. ती जेवणाविषयीची तन्मयता कधी कधी असह्य करते. एकदा एक वीस-बावीस वर्षाचा मुलगा पोळीचा तुकडा आमटीत बुडवताना… अर्धा वर उठला होता. म्हणजे विहीरीत पाणी किती आहे, हे आपण वाकून बघतो ना.. तसं.. म्हटलं नीट खाली बसून जेव… आमटीत पडलास तर लोणच्यात पाय पडतील आणि पोट दह्यात बुडेल. कानात मीठ जाईल, नाकात कुरडई जाईल.
काही माणसं खूपच घाईघाईने जेवतात… जणू उशीर झाला तर जेवण्याचा अधिकार कायमचा त्यांच्याकडून हिरावला जाईल… किंवा मग फास्ट जेवल्यावर काहीतरी गोल्ड मेडल मिळणार आहे.
कोण कोण अगदीच जीव नसल्यासारखं जेवतात. म्हणजे घास कालवणे आणि मग तो घेऊन तोंडापर्यंतचा (उभ्याने) प्रवास करणे आणि मग तो गिळणे. गिळणे म्हणजे काय तर जेवणावर, अख्ख्या जगावर निस्ते उपकारच उपकार. आमटी भात जेवताना पापड चटणी लोणचं भाजी यावर यांची नजर पडली, तर ते पदार्थ आयुष्यभर धन्य होतील आणि खायच्या आधी खाणार्याला दंडवत घालतील.
एक सडपातळ काटकुळ्या बाई जेवताना चेहरा एवढा कोरा ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात (आणि अर्थात त्यात त्या यशस्वीही होतात) की चुकून एखादी समाधानाची रेष तृप्तीची रेष चेहर्यावर उमटली तर जीवनाला कलंक लागेल. आता काय म्हणायचं या भावपूर्ण वागण्याला?… आणखी एक गोष्ट, त्यांच्या नजरेत एवढं प्रमाण बसलेलं आहे की भाताची २४० ऐवजी २९० शितं असली तर पन्नास शितांचा ऐवज काढून ठेवणार. गोड काही असलं तर दीडशे भाताची शितं बाजूला काढून ठेवणार.पण एवढं सगळं काटेकोर जगून जीवन नीरसपणे जगायचं असेल तर काय उपयोग या मेहनतीचा? आयुष्याची सफलता केवळ लांबी रूंदीवर ठरते का? (हे वाक्य तुम्हाला कृत्रिम वाटायची शक्यता आहे… पण हे परखडपणे कोणीतरी बोलणं आवश्यकच होतं.
बरं यांना दुसर्याचं तिसर्यानी कौतुक केलं तरी त्रास होतो. विटंबना एकच नाहीये…
त्या अमक्यांकडे जेवण खूप छान असतं…
आमचं काय बरं नसतं?… विचारणारच…
लग्नकार्यात पंगतीला आपल्या नेहमीच्या आहाराच्या तिप्पट चौपट आहार घेणारे मानवप्राणी मी बघितले आहेत (दुप्पट हे
नॉर्मल आहे). उंटाला जशी एक पिशवी असते, पाण्याचा साठा करून ठेवणारी, तशी लग्नकार्यात उघडणारी एखादी जरीची पिशवी पोटात आमाशयाच्या आडोशाला बांधलेली असते की काय, हा प्रश्न मला पडायला लागला आहे.
एका लग्नात बारा वाट्या मठ्ठा पिणारा माणूस मी बघितलाय.. म्हणजे पाच वाट्यांनंतर लोकांचं लक्ष वेधून घ्यायला त्याने सुरुवात केली. हळूहळू लोक कुतूहलाने कौतुकाने आश्चर्याने बघायला लागले. त्यामुळे त्याला अजून चेव आला. शेवटी मठ्ठा वाढणाराच गायब झाल्यावर त्याच्या या पराक्रमाला खीळ बसली.पण उठताना आपण एखाद्या पैलवानाची पाठ जमिनीला टेकवली, असा त्यांचा चेहर्याचा थाट होता… त्याला काही इलाज नाही. असली दृश्यं लग्नाच्या टायमाला बघावीच लागतात.
कोण कोण सुरुवातीपासूनच जेवणाचा एवढा स्पीड ठेवतात की गाडी डायरेक्ट १००च्या वरच… वाढणार्याला धडकी भरावी असा हा बुलंद वेग असतो… घरातली बाई लगेचच परत कुकर लावायला घेते. बाहेरून एक फेरी मारून येते आणि नंतर पीठही भिजवून ठेवते. टॉमेटो कांदा बारीक चिरून ठेवते. भाजी संपली तर वांदे नकोत. पण एखादं वादळ शांत व्हावं तसा झटक्यात हा वेग कमी होतो… आणि वेगवंत हात धुवायला निघून जातो. गृहिणीला रात्रीच्या जेवणाचीही तयारी झाल्याचं एक प्रकारचं अनपेक्षित धक्कादायक अविचित्र समाधान मिळतं.
कोण कोण एकदमच शापच विरक्तीने जेवतात. म्हणजे ताटात आमटी भात आणि लोणचं वाढलं तर जसा चेहरा असतो तसाच पुरणपोळी कटाची आमटी मसालेभात भजी कुरडया चटणी कोशिंबीर वाढल्यावर असतो… आश्चर्य नाही… अरे वा… नाही. बरं न बोलता चेहरा प्रसन्न होणे असंही नाही. गो. नी. दांडेकरांच्या पुस्तकात एक गोष्ट आहे. त्यात एक साधू अन्नाचे विकार मनात जाऊ नयेत म्हणून अन्न धुवून खायचा. म्हणजे चार घरी भिक्षा मागून तो नदीवर जायचा. अन्न धुवायचा. म्हणजे तिखट मीठ गोड काय ते सगळं वाहून जायचं. मग ते निर्विकार अन्न तो भक्षण करायचा… आणि मग साधना वगैरे काय ती करायचा.
एकदा वाटतं या लोकांना सांगावं की तुम्ही पण तसं अन्न धुवून खा म्हणून. पण ते एरंडेल पिल्यासारखं तोंड नका करू (कदाचित हे लोक एरंडेल मिटक्या मारून पीत असतील… काही सांगता येत नाही). पण साधूच्या साधनेपेक्षा ही साधना मोठी… सगळं खाऊन परत निर्विकार राहायचं… फक्त करणार्याला निर्विकार राहाणं थोडं कठीण जातं.
आपल्याकडे खाणं विशेषत: जेवण खूप लपून छपून खातात (म्हणजे साधारण शृंगाराप्रमाणे)… दुसर्याची नजर लागेल म्हणून म्हणा किंवा दुसर्याची आशा जाऊन आपल्या पोटात दुखेल या भीतीने असेल. कोण जाणे काय ते…
रेल्वेत विशेषत: पाठ करून म्हणा किंवा अगदी कोपर्यात चिमटून… काहीतरी गाठोडं किंवा बॅग वगैरे आडोसा ठेवून खाल्लं जातं. पहिला घास घेतला की तो आडोसा उद्घाटन केल्यासारखा धाडकन पडतो… ती एक वेगळीच गंमत… शिरा मार… पाहुणे यायच्या आधी भराभर कचरा काढून कोपर्यात जमा करून ठेवावा… तसे तोंडाची कमीतकमी हालचाल करून घाईघाईत संकोचाने खाऊन सगळे पदार्थ पोटात जमा करून ठेवतात.
अरे का बाबा असे शिक्षा केल्यासारखे जेवताय? खा मनमोकळेपणाने… स्वत:चीच स्वत:ला दया यावी असे नका वागू… शिर्यातल्या वेलचीच्या सालाची शपथ आहे तुम्हाला…
माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते तुम्हाला… मे महिन्याच्या सुट्टीत घरात पाच पंचवीस माणसं जमली होती… एकदा एक भांडण म्हणजे वादविवाद संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू झाला. शेवटी एका आजीच्या बोलण्यावरून सगळे तिला ओरडले. ती रडरड रडली आणि कोपर्यात जाऊन झोपली. तोपर्यंत आठ वाजले… जेवणाची वेळ झाली. जेवणं वाढली. मधली सून जेवायला बोलवायला गेली.
चला जेवायला…
मला नको जेवण…
थोडसं तरी जेवा… चार घास खा…
म्हातारी उठली (परत कुणी बोलावलंच नाही तर…). बघते तर ताटात तिच्या आवडीची खीर. तांदळाची… नारळाचा रस गुळ हळदीचं पान घातलेली. म्हातारी आवडीने घटाघटा प्याली. परत वाढली… परत प्याली. मग पान रागाने आणि किंचित उद्विग्नतेने ढकलत म्हणाली… मला नको जेवण… भुकय नाही आणि इच्छाय नाही.
मग चूळ भरून किंचित कण्हत ती खाटेवर जाऊन बसली. बसल्यावर एक मोठा ढेकर आला. तो ऐकून सगळ्या सुना गालातल्या गालात मोठ्ठ्याने हसल्या.