सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या असल्या, तरी दोन दिवस होऊनही प्रिया सरंजामेंचा काही शोध लागेना, तेव्हा पोलीस थोडे अस्वस्थ झाले. त्याचवेळी तालुक्याच्या ठिकाणी, एक अनोळखी प्रेत सापडल्याची खबर आली. एका तरूण बाईचं प्रेत तिथे नदीच्या किनार्याला लागलं होतं. सूर्यवंशी आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिथे गर्दी होती, प्रेताची दुर्गंधीही येत होती. प्रेत कुजायला सुरुवात झाली होती. पोस्ट मार्टेमच्या प्रक्रियेसाठी प्रेत पाठवून देण्यात आलं, पण का कुणास ठाऊक, सूर्यवंशींना हा चेहरा ओळखीचा वाटला. “जाधव, कदाचित ही बाई म्हणजे…“ त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच जाधव म्हणाले, “प्रिया सरंजामे तर नसेल?“
– – –
प्रसिद्ध उद्योजक विकास सरंजामे यांची बायको प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि सगळी पोलीस यंत्रणा हलली. विकास सरंजामे हे शहरातले प्रसिद्ध तरुण उद्योजक होते. शून्यातून सुरुवात करून त्यांनी मोठा कारभार निर्माण केला होता. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी त्यांचा गार्मेंटचा व्यवसाय होता. तरूण उद्योजक म्हणून त्यांना प्रसिद्धीही मिळाली होती. व्यवसायात त्यांचा आदर्श नव्या उद्योजकांना दिला जायचा. अशा वेळी त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी घडामोड घडली होती.
विकास स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले होते.
“कधीपासून घरी आल्या नाहीत त्या?“ इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांनी त्यांना धीर देत विचारलं.
“काल संध्याकाळपासून.“
“कुठे जाणार आहेत, काही सांगून गेल्या होत्या का?“
“नाही.“
“काही वाद वगैरे झाले होते का?“ या प्रश्नावर मात्र विकास एकदम गप्प झाले.
“साहेब, काही गोष्टी अशा असतात, की ज्या घराच्या चार भिंतींच्या बाहेर पडू नयेत, असं वाटत असतं. त्यातून आमच्यावर लोकांची सारखीच नजर असते. आमच्या घरात काय चाललंय, याविषयी बाहेर उत्सुकता असतेच.“
“हो, दुर्दैवाने ते खरं आहे. लोकांना चांगल्या बातम्यांपेक्षा वाईट बातम्यांचीच चर्चा करायला जास्त आवडते.“
“तसंच आहे. म्हणूनच घरातल्या गोष्टी बाहेर किती सांगाव्यात, असा प्रश्न असतो. पण तुमच्यापासून काय लपवणार? तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. आमच्यात हल्ली वाद होत होते. कधीकधी भांडण टोकालाही जायचं. तरीही आमचं एकमेकांवर प्रेम होतं साहेब. रागाच्या भरात तिनं असं काही टोकाचं पाऊल उचललं असेल, असं नाही वाटत.“
सूर्यवंशींना लक्षात आलं, की हे प्रकरण जरा नाजूक आहे. नेहमीच्या पद्धतीनं हाताळून चालणार नाही.
“मिसेस प्रिया कुठे निघून गेल्या असल्या, तर त्या नक्की परत येतील. आम्ही त्यांना शोधून काढू. पण तुम्ही प्लीज आम्हाला जे काही घडलं ते स्पष्टपणे सांगा,“ त्यांनी समजावलं. विकास सरंजामेंनी समजल्यासारखी मान डोलावली.
“तुमचं शेवटचं भांडण कधी झालं होतं?“
“काल सकाळी.“ सरंजामेंनी कबुली देऊन टाकली.
“त्यानंतर आमचा काही संपर्क झालेला नाही. मी दुपारी जेवायला घरी होतो. घरातून बाहेर पडल्यानंतर माझी मीटिंग आणि इतर कामं सुरू झाली. रात्री खूप उशिरा घरी आलो. प्रिया घरी नव्हती. काही वेळा कामासाठी ती बाहेर जायची, तशी गेली असेल, असं वाटलं. सकाळीही ती परत आली नाही, तेव्हा काळजी वाटायला लागली, म्हणून फोन करायचा प्रयत्न केला, तर फोन बंद. तिच्या माहेरीही कुणाला काही निरोप नाही, म्हणून अर्जंटली तुमच्याकडे आलो.“ त्यांनी सगळाच तपशील सांगून टाकला.
इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी लगेच त्यांची टीम कामाला लावली. शहरातल्या प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती गायब होणं ही साधी गोष्ट नव्हती. त्यावरून माध्यमांमध्ये चर्चा होणार, जनतेमध्ये तो विषय चघळला जाणार, सत्ताधार्यांना प्रश्न विचारले जाणार, हे उघड होतं. नवराबायकोत वाद असल्याचं स्वतः सरंजामे यांनी कबूल केलं होतं. त्या रागातून प्रिया कदाचित कुठेतली निघून गेल्या असतील, किंवा त्यांनी टोकाचा निर्णय म्हणून आत्महत्याही केली असेल, अशा दोन्ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाची चक्रं हलवली.
प्रिया यांचा मोबाईल रात्रीच बंद पडला होता. त्यावरून त्या कुठे गेल्या असतील, याचा काही पत्ता लागण्याची शक्यता दिसत नव्हती. पोलिसांनी त्यांच्या माहितीतली सगळी माणसं, त्यांच्या माहेरची मंडळी, अशा अनेकांकडून काही धागेदोरे मिळताहेत का, याची चौकशी सुरू केली.
“साहेब, शहराच्या बाहेर, गोळेकर वस्तीजवळ फुटपाथवर राहणार्या एका माणसाचा खून झाल्याचा मेसेज आलाय वायरलेसवर.“ सबइन्स्पेक्टर जाधवांनी सूर्यवंशींना माहिती दिली.
“जाधव, ह्या माणसांची पैशांवरून, दारूवरून काही ना काही लफडी सुरू असतात. त्यातूनच कुणीतरी वचपा काढला असणार. बॉडी पोस्ट मार्टेमला पाठवून द्या, बघू पुढचं पुढे. सध्या आपल्याला ह्या प्रिया सरंजामेंना शोधणं जास्त महत्त्वाचं आहे.“ सूर्यवंशींनी सूचना केल्यावर जाधवांनी मान डोलावली आणि ते पुढच्या कामाला लागले.
सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या असल्या, तरी दोन दिवस होऊनही प्रिया सरंजामेंचा काही शोध लागेना, तेव्हा पोलीस थोडे अस्वस्थ झाले. त्याच वेळी तालुक्याच्या ठिकाणी, एक अनोळखी प्रेत सापडल्याची खबर आली. एका तरूण बाईचं प्रेत तिथे नदीच्या किनार्याला लागलं होतं. सूर्यवंशी आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिथे गर्दी होती, प्रेताची दुर्गंधीही येत होती. प्रेत कुजायला सुरुवात झाली होती. पोस्ट मार्टेमच्या प्रक्रियेसाठी प्रेत पाठवून देण्यात आलं, पण का कुणास ठाऊक, सूर्यवंशींना हा चेहरा ओळखीचा वाटला. “जाधव, कदाचित ही बाई म्हणजे….“ त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच जाधव म्हणाले, “प्रिया सरंजामे तर नसेल?“ सूर्यवंशींनी चमकून त्यांच्याकडे बघितलं. आपला सहकारी आपल्या मनातलं कसं बिनचूक ओळखायला लागला आहे, या विचाराने त्यांचा चेहरा किंचित सुखावला.
“हा विकास सरंजामेच या मृत्यूला कारणीभूत तर नसेल ना?“ सूर्यवंशींनी शंका काढली. कुठल्याही गुन्ह्यात जवळच्या व्यक्तींवर संशय घेण्याची पोलिसांची सवय असतेच. त्यांच्या तपासाची सुरुवात अनेकदा तिथूनच होते. यावेळीही सूर्यवंशींना सगळ्या शक्यता पडताळून बघायच्या होत्या. त्यांच्या या प्रश्नाने जाधवही थोडे विचलित झाले.
“पण साहेब, एवढं मोठं काही घडलेलं नव्हतं त्यांच्यात. शिवाय आपण त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली, त्यातूनही फार काही संशयास्पद जाणवलं नाहीये.“ जाधवांनी खुलासा केला.
“ते खरंय, पण कधीकधी आपल्या नजरेपलीकडच्या गोष्टीही शकतात. एखादा निसटलेला दुवा असू शकतो, त्यातूनच पुढची दिशा मिळू शकते. बघू, आपलं काम सुरू ठेवू.“ सूर्यवंशींनी नेहमीच्या थाटात खांदे उडवले आणि गाडीत बसले.
पुलाजवळच्या फुटपाथवर झोपलेल्या ज्या माणसाचा खून झाला होता, त्याचं नाव सखाराम गव्हाणे असं होतं. सखाराम ४५ वर्षांचा होता. त्याच परिसरात हातगाडीवरून काही वस्तू विकण्याचा व्यवसाय करायचा. अनेक वर्षं फुटपाथवरच त्याचा संसार होता. दिवसभराच्या धंद्यात जमलेले पैसेही तो बरोबरच बाळगायचा. त्याचा खून झाला, त्याच्या आदल्या दिवशी त्याचं त्याच भागात फेरीवाल्याचा धंदा करणार्या दत्तूशी भांडण झालं होतं. हा दत्तू म्हणजे टग्या माणूस होता. कुणाशीही दोन हात करायला कायम तयार असायचा. सखारामवर त्यानं त्याच्याच गाडीवरची हातोडी उगारल्याचं त्या भागातल्या काही जणांनी बघितलं होतं. दत्तूला आत घेऊन ठोकून काढल्यावर तो पोपटासारखं बोलायला लागला.
“साहेब, सख्याशी अधूनमधून भांडण व्हायचं. त्या दिवशी तो जास्तच आगाऊपणा करत होता. आपण वेगवेगळ्या एरियात धंदा करू म्हणून त्याला सांगितलं, पण तो ऐकेना. तेव्हा मी रागाच्या भरात त्याच्या अंगावर हातोडी उगारली. पण आपण कुणाचा खून बिन नाय केलेला, साहेब,“ तो गयावया करत म्हणाला. त्यानं गुन्हा कितीही नाकबूल केला, तरी त्याला आणखी दोनचार फटके खावे लागणार होतेच. शिवाय तो निर्दोष असल्याची खात्री पटेपर्यंत त्याची सुटका होणं अवघड होतं. सखारामच्या पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आला. त्यात त्याच्या डोक्यावर जाडजूड लाकडाचे फटके बसले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. याचा अर्थ उघड होता. दत्तूने त्याच्या अंगावर हातोडी उगारणं आणि दुसर्याच दिवशी त्याचा खून होणं, हा केवळ योगायोग होता. दत्तूचा खुनाशी काही संबंध असण्याचं काही कारणही नव्हतं. दत्तूला दोषी ठरवण्यासाठी त्याच्याविरुद्ध तसे दुसरे कुठलेही पुरावे पोलिसांना आढळले नव्हते. त्यामुळे दत्तूची सुटका करण्यात आली.
“सख्याला ओळखणारं आणखी कुणी आहे का त्या भागात?“ सूर्यवंशींनी दत्तूला दरडावून विचारलं.
“एक आहे साहेब, त्याचं नाव बाळ्या. सख्या आणि तो लई वर्षांचे दोस्त आहेत. कधीमधी दारू प्यायला बी जातात दोघं,“ दत्तूने ही माहिती पुरवली, बाळ्याचा पत्ताही दिला. बाळ्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचं फर्मान काढण्यात आलं. बाळ्यानं आधी आढेवेढे घेतले, मग मात्र थोडा दम दिल्यावर तो बोलायला लागला.
“त्या दिवशी रात्री बारा-साडेबाराचा सुमार असेल, साहेब. सख्या आणि माझं दारू प्यायचं ठरलं होतं. मी बाटली पण आणून ठेवली होती. आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर आम्ही भेटणार होतो. पण सख्या आलाच नाही. मी त्याला शोधायला बाहेर पडलो, तर पुलाच्या दुसर्या बाजूच्या गल्लीत तो कुठेतरी लपतछपत निघालेला दिसला.“ बाळ्यानं ही माहिती पुरवल्यावर पोलिसांचे कान टवकारले गेले.
“कुठे निघाला होता तो? काही समजलं का?“ सूर्यवंशींनी त्याला आणखी बोलतं करायचा प्रयत्न केला. बाळ्या जरा घाबरलाच होता.
“साहेब… ते…“ तो जरा अडखळत म्हणाला.
“काय झालं? हे बघ, घाबरू नकोस. जे काही असेल ते मोकळेपणानं सांग. तुझ्या जिवाला काही धोका होणार नाही.“
“एक गाडी त्याच्या मागावर होती, असं मला वाटलं साहेब. मोठी पांढरी कार होती. सख्या एका गल्लीत शिरला, तिथे ती कारही घुसल्याचं मी बघितलं. नंतरचं मला काही माहीत नाही.“ बाळ्यानं सगळी माहिती देऊन टाकली. ज्या गल्लीचं वर्णन त्याने केलं होतं, त्याच गल्लीत सख्याचं प्रेत सकाळी सापडलं होतं. याचा अर्थ बाळ्या सांगत असलेली माहिती खरी होती. आता ती कार शोधणं महत्त्वाचं होतं. बाळ्याला त्या कारचा नंबर काही लक्षात नव्हता, पण मागच्या बाजूचं मडगार्ड थोडं वाकलेलं आहे, एवढं मात्र त्यानं नक्की सांगितलं.
दरम्यानच्या काळात प्रिया सरंजामेचा रिपोर्टही आला होता. तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं स्पष्ट झालं होतं. रात्री दहा ते बाराच्या दरम्यान तिचा जीव गेला होता आणि नंतर तिला पाण्यात टाकण्यात आलं होतं. सूर्यवंशींच्या डोक्यातली चक्रं वेगळ्याच दिशेने फिरू लागली. त्यांनी त्या पुलाच्या परिसरातल्या सगळ्या सीसीटीव्हींचं फुटेज मागवलं. प्रिया सरंजामे आणि त्यांच्याशी संबंधित जवळच्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्डस आणि लोकेशन्स मागवून घेतले आणि ते शोधताना त्यांना एक मोठं रहस्य उलगडल्याची जाणीव झाली.
सख्याचा पाठलाग करणारी ती गाडी कुणाची आहे, हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं. आता हाती आलेल्या कॉल
रेकॉर्ड्सवरून तर त्याबद्दल खात्रीच पटली. त्यांनी पथकासह जाऊन विकास सरंजामेला ताब्यात घेतलं. त्या दिवशी भांडण झाल्यानंतर तो संध्याकाळी घरी आला होता. प्रियाबरोबरचं भांडण मिटवण्यासाठी तिला बाहेर फिरायला न्यायचं नाटक त्याने केलं होतं. वाटेत एका ठिकाणी गाडी थांबवून ती बेसावध असताना गळा दाबून तिचा खून केला होता आणि तिचं प्रेत शहराबाहेर, एका नदीच्या पुलावरून नदीत ढकलून दिलं होतं.
त्याच वेळी तिथून बाळ्याला भेटायला निघालेल्या सख्याने हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. विकासला आता त्याचीही भीती वाटत होती, त्यामुळे त्याचा पाठलाग करून, हातात मिळालेल्या काठीचा फटका मारून विकासनं त्यालाही मारून टाकलं. अगदी छोट्याशा पुराव्यावरून, केवळ अंदाज बांधत पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचले होते. आता त्यांना फक्त खुनाचा उद्देश जाणून घ्यायचा होता.
विकास सरंजामे हा प्रसिद्ध उद्योजक असला, तरी सध्या तो व्यसनी आणि बेफिकीर झाला होता. धंद्यातली गणितं हुकली होती आणि तो कर्जबाजारीपणाकडे झुकत होता. प्रियाने तिचे दागिने, तिची प्रॉपर्टी विकून आपल्याला पैसे द्यावेत, असा त्याचा हट्ट होता आणि त्यावरूनच त्यांची भांडणेही होत होती. मात्र, ती सहजासहजी पैसे देणार नाही, हे लक्षात आल्यावर तिला मारून सगळे पैसे बळकावण्याचा त्याने विचार केला आणि त्यासाठीच हा बनाव रचला.
रस्त्यावर झोपणार्या एका फाटक्या माणसाने अचानक बघितल्यामुळेच विकासचा हा मुखवट्याआडचा चेहरा पोलिसांपर्यंत पोहोचू शकला. मात्र, त्यात त्या फाटक्या माणसाला, म्हणजे सख्यालाही आपला जीव हकनाक गमावावा लागला.